Thats all your honors - 8 books and stories free download online pdf in Marathi

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-८)

दॅट्स ऑल युअर ऑनर भाग ८

पाणिनी त्याच्या ऑफिस मध्ये परत आला तेव्हा ओजस त्याची वाट बघत होता.

“ पोलिसांनी आकृती सेनगुप्ता ला पकडलंय.” ओजस म्हणाला.

“ त्यांनी तिला कुठे शोधून काढले?”

“ देवनारमध्ये, मैथिली च्या अपार्टमेंटमध्ये.”


“ पण त्यांना तिच्याच घरी शोधावे हे सुचले कसे?” पाणिनी ने विचारले.

“ बहुदा तिच्या सगळ्याच मैत्रिणींकडे त्यांनी चौकशी केली असावी.”

“ सौम्या, मला अॅड.खांडेकर ना फोन लाऊन दे .” पाणिनी ने सौम्या ला सांगितले. “ मला त्यांच्याशीच वैयक्तिक बोलायचं आहे,पण ते अगदी नसतीलच तर त्यांच्या हाताखालच्या वकिलाशी बोलेन .”

सौम्या ने फोन लावला आणि पाणिनी ला खूण केली. “ ते येताहेत फोन वर.”

पाणिनी ने तो उचलला. “ हॅलो अॅड.खांडेकर ,” तो म्हणाला.

पलीकडून आलेला अॅड.खांडेकर यांचा आवाज एकदम सावध होता. “ बोल पटवर्धन, काय हवय माझ्या कडून?”

“ पोलीस माझ्या आकृती सेनगुप्ता नावाच्या अशिलाला पकडत आहेत.”

“ हो, कानावर आलंय.तपन च्या खुनाच्या संदर्भात त्यांना चौकशी करायची आहे.” अॅड.खांडेकर म्हणाले.

“ तुम्ही तिला प्रश्न विचारणार असाल तर मी तिथे उपस्थित राहणार आहे.” पाणिनी म्हणाला.

“ माझा तरी काही विचार नाहीये तिला प्रश्न विचारण्याचा.माझे सहाय्यक विचारतील तिला.”

“ म्हणजे एकूण एकच.तुम्ही काय किंवा तुमचे सहाय्यक काय !” पाणिनी उद्गारला. “ तुम्ही ज्या क्षणी तिला तिथे आणल तेव्हा मला सांगा मी येणार आहे तिथे.”

“ माझ्या डोक्याशी कटकट करू नको पटवर्धन, तू पोलिसांशी बोल.” अॅड.खांडेकर म्हणाले.” तुला पोलीस कसे काम करतात माहिती आहे ना ? त्यांनी आधीच तिला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत.आणि आता ते जेव्हा पुन्हा तिला इथे आणतील तो एक शिष्ठाचार म्हणून , कारण त्या आधीच त्यांनी त्यांचे काम संपवले असेल. ” अॅड.खांडेकर म्हणाले.

“ तुमच्या ऑफिस मधून एक शब्द पोलिसांना टाकला जाणे म्हणजे आपल्या दोघांचाही वेळ वाचवणे आहे. तिला तुमच्या कडे घेऊन येतील तेव्हा मी तिथे हजार असणार आहे.मग तुम्ही तिच्यावर आरोप ठेवलेला असो किंवा नसो.” पाणिनी म्हणाला.

“ पोलिसां शी का बोलून घेत नाहीस तू, पटवर्धन ? ” अॅड.खांडेकर म्हणाले.

“ मी तुमच्या शी बोललोय.तुम्ही सहकार्य केलेत तर माझे काम सोपे होईल नाहीतर ते काम करण्यासाठी मला अवघड वाट चोखाळावी लागेल आणि त्याची जबाबदारी तुमची असेल.”

“ अवघड वाट म्हणजे काय करणार तू?” अॅड.खांडेकर नी विचारले.

“ आकृती ला जिवंत किंवा मृत अवस्थेत अत्यंत तातडीने कोर्टात हजर करावे असा अर्ज मी कोर्टात सदर करणार आहे.”

अॅड.खांडेकर नी यावर थोडा विचार केला.आणि एक पाउल माघार घेत पाणिनीला म्हणाले,

“ मला वाटत की तुला तिथे हजर राहायला काहीच हरकत नाही अर्थात तू तिचे वकील पत्र घेतले असलेस तर.”

“ मी वकील आहे तिचा.” पाणिनी म्हणाला.

“ पटवर्धन, मला या प्रकरणाची थोडी फार माहिती आहे म्हणून सांगतो , की आकृती ने तपन चा खून झाल्याचे समजल्यावर स्वतःहून पोलिसांना का सांगितलं नाही की त्या दिवशी संध्याकाळ पासून ती त्याच्या बरोबर होती म्हणून? ” अॅड.खांडेकर नी पटवर्धन ला विचारले.

“ हा फार छान प्रश्न विचारलात तुम्ही.” पाणिनी म्हणाला. “ मला सांगा आकृती ला केव्हा समाजलं तपन चा खून झाला म्हणून? ”

“ पटवर्धन, तू माझ्या प्रश्नाला उत्तर देण्या ऐवजी मलाच उलटे प्रश्न विचारतो आहेस.”

“ मला तरी याहून वेगळ्या पद्धतीने हाताळता येत नाही हा विषय.”

“ पटवर्धन, मी प्रांजळ पणाने सांगतो , जर ती निर्दोष असेल तर उगाचच तिला या प्रकरणात गोवण्यात आणि अवास्तव प्रसिद्धी देण्यात आम्हाला रस नाही.पण जर ती दोषी असेल तर अर्थात आम्हाला नियम नुसार तिच्यावर दावा लावावा लागेल.अर्थात तिच्या कडून तपन स्वतःचा बचाव करताना मारला गेला असेल आणि तू तिला गुन्हा कबुल करायचा सल्ला दिलास तर गोष्ट वेगळी.”

“ मी तिच्याशी चर्चा करून सांगतो तुम्हाला.” पाणिनी म्हणाला.

“ तू आधीच दहा वेळा तरी चर्चा केली असशील तिच्याशी या विषयावर.”

“ मी नाही असे उत्तर दिले या प्रश्नाचे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.”

“ ठीक आहे पटवर्धन.” अॅड.खांडेकर म्हणाले. “ तुला कोर्टात अर्ज करायची गरज नाही ,तू इथे तिच्या बरोबर हजर राहू शकतोस.पण मगाशी सांगितलेले लक्षात ठेव,तिला काही पढवायची किंवा उत्तर देऊ नको वगैरे सांगण्याची संधी तुला मिळणार नाही कारण इथे आणण्यापूर्वीच पोलिसांनी तिला बेजार करून टाकले असेल प्रश्न विचारून.” अॅड.खांडेकर यांनी पाणिनी ला जाणीव करून दिली.

“ माझी काहीही हरकत नाहीये. ” पाणिनी म्हणाला. “ मला वाटत की तुम्ही या प्रकरणाशी पूर्ण परिचित आहात.”

“ मला माहिती व्हायला लागली आहे हळू हळू.तपन कुटुंब हे शहरातील फार प्रतिष्ठित आहे.आणि हा खून म्हणजे कोण्या आयऱ्या गयऱ्या माणसाचा नाही.”

“ धन्यवाद अॅड.खांडेकर . तुम्ही मला कळवाल, पोलिसांनी तिला इथे आणल म्हणजे, अस मी समजतो.” पाणिनी म्हणाला आणि फोन ठेऊन दिला.

“ कनक एखादी नवी बातमी?” पाणिनी ने विचारले.

“ बातमी एवढीच आहे,की तपन आणि आकृती ने बिस्किटे आणि आम्लेट खाल्या नंतर पुढच्या काही मिनिटातच त्याचा मृत्यू झाल्याचे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. म्हणजे अन्नाचे पचन होण्यास किती वेळाने सुरुवात झाली वगैरे निष्कर्षावरून ते अनुमान काढले असावे.” ओजस म्हणाला.

“ त्या आउट हाऊस च्या जागे बद्दल तुला काय माहिती मिळाली आहे?”

“ करमणुकीसाठी बांधलेले ते घर आहे. द्रौपदी मंडलिक नावाची एक विधवा आहे, पाच किलोमीटर वर तिचे घर आहे. आउट हाऊस ची देखभाल ती करते.”

“ आणखी काय?” पाणिनी ने विचारले.

आउट हाऊस भोवतालची जागा उंच अशा काटेरी तारेच्या कुंपणाने वेढली आहे.आत जायला दार आहे. त्यातूनच आत जायला लागते अन्यथा दुसरा मार्ग नाही.पण हे दार कायमच बंद असते.याचे कारण आत मध्ये पोहण्याचा तलाव आहे रात्री कोणी आले आणि न दिसल्याने तलावात पडले असे होऊ नये म्हणून दार कायमच बंद ठेवण्यात येते.तिच्या कडेच दाराची किल्ली असते.ती सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत केव्हा तरी येते, झाड लोट करते, काही भांडी,डिशेश धुवायची कामे करते. कोणी मुक्कामाला आले तिथे तर त्यांच्या खोल्या स्वच्छ करणे, पलंगपोस बदलणे असली कामे करते. दुपारी दुसरा माणूस येतो तो आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करतो.जलतरण तलावाची देखभाल करायला त्या कंपनीचे लोक येतात. त्यातले पाणी हे कायम उबदार राहील अशी व्यवस्था केलेली आहे.येणाऱ्या या सर्वांकडे दाराच्या किल्ल्या असतात.”

“ पोलिसांनी आकृती ला नेमके किती वाजता पकडले सांगू शकशील?”

“ साधारण तास भरा पूर्वी.”

“ सकृत दर्शनी अस दिसतंय की मी मैथिली ला बोलावून घेतलं त्यावेळी त्यांनी आकृती ला ताब्यात घेतलं असाव.आपल्याला खून झाला त्या जागेला भेट द्यायची आहे.”

“ आपल्याला आत जाता येणार नाही पाणिनी.”

“ का नाही येणार? लावतोस का पैज? ”

“ पाणिनी, असे अवैध मार्गाने आत घुसून आपल्याला अडचण निर्माण होईल असे मी तुला करू देणार नाही.” ओजस म्हणाला.

“ पोलिसांनी त्याचे तिथले काम संपवलय ना?”

“ ते संपवलय आणि वृत्त पत्राच्या फोटोग्राफर ना परवानगी पण दिली होती फोटो काढायला. पण त्यानंतर पोलिसांनी ती जागा सील केली आहे,एखादे पिंप जसे सील करतात तशी. ”

“ असू दे. तुझ्या कडे मंडलिक बाई चा पत्ता आहे ना?” पाणिनी ने विचारले.

ओजस ने मानेनेच होकार दिला.

“ चल तर निघू आपण. तिला भेटू.” पाणिनी म्हणाला.

“ मी यायला हवी आहे का? ” सौम्या ने विचारले.

पाणिनी जरा विचार करून म्हणाला, “ हो, चल तू पण. स्त्री च्या नजरेला जे दिसतं ते पुरुषाच्या नजरेतून सुटू शकत.”

“ तुला काय शोधायचं आहे ? ” ओजस ने विचारले.

“ अरे बाबा, ते मला कळले असते तर ऑफिस मध्ये बसूनच मी शोधले नसते का? ” पाणिनी उद्गारला.

तिघेही पाणिनीच्या गाडीतून निघाले.ओजस ने दाखवलेल्या रस्त्या वरून पाणिनी ने मंडलिक च्या दारा जवळ गाडी उभी केली. “ आता एक गोष्ट सर्वानीच स्पष्टपणे मनात ठेऊया, त्या दाराच्या किल्ल्या एकूण चार जणांकडे असणार, कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांकडे, मंडलिक बाई कडे, जलतरण तलाव दुरुस्त करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीकडे आणि आउट हाऊस च्या बाहेरचा परिसर स्वच्छ करणाऱ्या नोकराकडे. कनक, त्या माणसाचे नाव काय म्हणालास?” पाणिनी ने विचारले.

“ ओमकार केसवड.” ओजस ने माहिती पुरवली.


तो कुठे राहतो? ” पाणिनी ने विचारले.

“ याच रस्त्यावर अर्धा किलोमीटर पुढे.”

“ बर आहे, चला द्रौपदी मंडलिक ला भेटू आत जाऊन.” पाणिनी म्हणाला.

तिघही तिच्या दारा जवळ गेले.पाणिनी ने बेल दाबली. दार उघडले गेले.दारात उभी असलेली स्त्री म्हणजे तिशीच्या उंबरठ्यावर असलेली एक धिप्पाड अशी स्त्री होती पण धिप्पाड असली तरी स्थूल नव्हती.तिच्या चालण्यात एक उत्साह आणि लगबग होती.पाणिनी ने स्वतःची ओळख करून दिली आणि म्हणाला, “ मला तपन च्या प्रकरणात रस आहे म्हणून आलोय.”


“ सर्वांनाच रस आहे त्या प्रकरणात , कोणाला नाहीये?” ती म्हणाली.

“ तुम्ही आज सकाळी त्या घरी झाड लोट करायला गेला होता का? ”

“ पोलिसांनी नाही करू दिले काम.ते म्हणाले काही काळ थांब.”

“ पण तुम्ही तिकडे गेला होता की नाही?”

“ नव्हते गेले.पोलीस म्हणाले की आम्ही सांगे पर्यंत यायचे नाही. ते फोन करणार होते त्यांचे काम उरकले की.”

“ त्यांनी अजून फोन नाही केला का तुम्हाला?”

“ अत्ता अर्धातासापूर्वीच आला होता , आता जायला हरकत नाही म्हणाले.”

“ मग आता जाणार असाल ना?”

“ हो आता जाणार आहे.”

“ तुम्हाला मी मदत केली तर कसे वाटेल?” पाणिनी ने विचारले.

तिने मानेनेच नकार दिला.पाणिनी ने पाकिटातून एक नोट बाहेर काढून तिला दिली.तिने पुन्हा घ्यायला नकार दिला. पाणिनी ने अजून एक नोट बाहेर काढली. मग पुन्हा एक, आणखी एक. तिच्या चेहेऱ्यात बदल झाला नाही.

“ हे बघा एका निष्पाप मुली वर तपन च्या खुनाचा आळ आलाय. मी तिचे वकील पत्र घेतलय. मला त्या जागेत जाऊन पहाणी करायची आहे म्हणजे मी अधिक चांगल्या प्रकारे त्या मुलीचे प्रतिनिधित्व करू शकेन. आता पोलिसांच्या दृष्टीने तिथे काही शिल्लक नाहीये, ते पण निघून गेलेत,तुम्हाला सुद्धा आत जायला परवानगी दिली आहे.तस बघायला गेल तर त्या घरात जायची परवानगी मी कोर्टातून मिळवू शकतो.पण त्यात वेळ जाईल . आणि मग तुम्हाला मी अत्ता देऊ केलेले पैसे ही मिळणार नाहीत. माझा वेळ पैशाच्या स्वरूपात मी मोजतो नेहेमी.”

तिच्या तोंडावरचे भाव बदललेले पाणिनी च्या नजरेतून सुटले नाहीत.मासा गळाला लागत होता.पाणिनी ने बळजबरीने तिच्या हातात नोटा कोंबल्या.तिने नाकारल्या नाहीत.त्या हातात ठेवत ती म्हणाली “ खुनाच्या रात्री काय झाल मला माहिती नाही.पण मला काही गोष्टी दिसल्या जेव्हा मी ते स्वच्छ करत होते......”

“ येस, बोला ना , काही तरी म्हणत होतात तुम्ही.” ती एकदम थांबली तेव्हा पाणिनी ने तिला पुन्हा विचारले.

“ मी नाही काही सांगणार.” तुम्ही येताय ना तिकडे , तुम्ही बघा., मला वाटतय की तुम्हाला तिकडे जाऊ देण्यात काही कायदेशीर कटकटी नाही होणार.”

“ मला कोर्टाचा आदेश मिळू शकतो आत जाण्या साठी.”

“ मी तुम्हाला आत येऊ दिल हे कोणाला समजता कामा नये.”

“ ते तुम्ही माझ्यावर सोपवा.” पाणिनी म्हणाला.

“ मी माझ्या वाहनाने येते तुम्ही जा तुमच्या गाडीतून , मी पुढे जाऊन आधी गेट उघडते.मला वाटतय की मला आज तिथे फार आवरा आवरी करायला लागणारे.”

“ उष्ट्या डिश आणि भांडी?” पाणिनी ने शंका व्यक्त केली.

“ त्या तर पोलिसांनी जप्त केल्या.”

“ सर्वच्या सर्व?”

“ खाण्यासाठी वापरलेल्या सर्व.” ती म्हणाली.

“ तुम्ही व्हा पुढे, आमची गाडी आम्ही तुमच्या मागोमाग ठेवतो.” पाणिनी म्हणाला.

ते तिघे तिच्या मागोमाग आले. तिने गेट उघडून त्यांची गाडी आत येऊ दिली.लगेच पुन्हा गेट लाऊन घेतले. “ आम्ही हे कायमच कुलूप लाऊन ठेवतो.” ती म्हणाली.

ते तिघेही आउट हाऊस च्या दारापाशी आले.गाडीतून उतरतानाच सौम्याने पाणिनी ला विचारले, “ नोट घेण्याची वही घेऊ का?”

“ एखादी छोटी पुरेल.तझ्या पर्स मध्ये असेलच ना? तेवढी बास झाली.”

तिघांनी तिच्या बरोबर घरात प्रवेश केला. तिथले उंची फर्निचर, अंथरुणावरील महागडे रग आणि पलंगपोस, स्वयंपाक घरातील भांडी, सर्व काही पाणिनी ने नजरे खालून घातले.

“ जेवण खाण वगैरे सर्व केव्हाही बनवता येईल असे जय्यत तयारी असलेले किचन आहे.” पाणिनी म्हणाला.

“ मोठे साहेब आहेत ना, ते खाण्या चे मोठे शोकीन आहेत.ते स्वतः उत्तम स्वयंपाक बनवतात.बऱ्याच वेळेला इथे बर्बिक्यू च्या मेजवान्या होतात मोठे साहेब सगळे स्वत: करतात.मला ते मदतीला , म्हणजे वाढायला आणि नंतर भांडी घासायला बोलावतात.” मंडलिक म्हणाली.

“ सर्व खाद्य पदार्थ तयारच असतात इथे कायम ठेवलेले?”

“ नाही,नाही. जेव्हा एखादी पार्टी ठरते तेव्हाच सगळे आणले जाते.इथे फक्त अंडी आणि दुधाची पावडर असते.कधीकधी गोठवलेले मांस असते.”

पाणिनी चे लक्ष जमिनीवर खडूने रेखाटलेल्या प्रेताच्या आकृतीकडे गेले.त्याच्या बाजूला थोडे रक्ताचे डाग होते.

“ मला त्यांनी हे सर्व साफ करायला सांगितले पण मोठे साहेब मला या कामाचे वेगळे पैसे देणार आहेत की नाही मला माहित नाहीये.माझ्या आत्ताच्या पगारात जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग पुसण्याचे काम येत नाही.” ती म्हणाली

“ तपन ज्या पार्ट्या द्यायचा त्यात तो तुम्हाला मदतीला बोलावत असेल असे मी समजतो.”

“ तो देत असलेल्या पार्टी म्हणजे फक्त त्या दोघांसाठीच असे.” ती पटकन बोलून गेली आणि दूर निघून गेली. पाणिनी आणि ओजस ने एकमेकांकडे पहिले. त्यांनी घरात फिरून तपासणी करायला सुरुवात केली.आणि द्रौपदी मंडलिक त्याला काही हरकत घेत नाहीये हे लक्षात आल्यावर त्यांनी कपाटाचे खण कप्पे, बघायला सुरुवात केली.

“ इथे कोणाचे कपडे दिसतं नाहीत ठेवलेले.”पाणिनी ने शंका व्यक्त केली.

“ इथे मुक्कामाला कोणी नसायचे .फारसे मोठे साहेब क्वचित बर्बिक्यू पार्टी नंतर राहिलेच तर सोय म्हणून त्यांचे रात्री झोपायचे कपडे ठेवत.किंवा सकाळी व्यायामाचे कपडे,म्हणजे शॉर्ट वगैरे., किंवा पोहायची लहर आली तर ते कपडे. तलावाच्या बाजूला असलेल्या खोल्यात पाहुण्यांसाठी पोहण्याचे कपडे ठेवलेले असतात.”

पाणिनी ची नजर लिहायच्या टेबलावर गेली. “ इथे असे डेस्क आहे म्हणजे विशेषच आहे.कशासाठी आहे हे ?” पाणिनी ने विचारले.

“ का माहित नाही पण प्रथम पासून आहेच ते.”

“ कोण वापरायचे ते.? ”

“ मी वापर करायचे त्याचा.” ती सहज म्हणाली.

“ तुम्ही?” पाणिनी आश्चर्याने उडालाच.

“ मी इथली बिले ,म्हणजे धोब्याचे पैसे, वगैरे म्हणजे घर चालवायला जो दैनंदिन खर्च होतो त्याची बिले इथे ठेवायचे.@

पटवर्धन ने ते डेस्क उघडले, आतला कप्पा ओढल्यावर त्याचे लिहिण्याचे टेबलात रुपांतर झाले.त्याने सहज आत हात घातला, तर हाताला काहीतरी लागले,

“ अरेच्च्या, हे काय आहे इथे ? ” तो उद्गारला.

“ चेक बुक दिसतंय.” द्रौपदी मंडलिक. म्हणाली.

“ तुझं आहे? ”

“छे, माझं कुठलं आलंय ! ” ती म्हणाली.

“यातले फक्त चार पाच चेकच वापरले आहेत.” पाणिनी म्हणाला. त्याने त्या चेक बुक च्या काउंटर फाईल पहिल्या. “ एक चेक एका आठवड्या पूर्वीचा आटोमोबाईल एजन्सी च्या नावाने आहे,एक मधुगंध अपार्टमेंट च्या नावे आहे,आणि हा शेवटचा खुनाच्या दिवशीचाच आहे,तो ओनिक केपसे. या नावाने आहे.पाच हजार रुपयाचा. शिवाय एका काउंटर फाईल पर पाच हजार रक्कम लिहून नावाच्या जागी फक्त ओके अस लिहिलंय. आणि पंचवीसशे सतरा खात्यात शिल्लक असल्याचे लिहिलंय ”

“ हे कुठे होते? ”

‘ इतर बिले आणि पावत्यांच्या सोबत.”

पाणिनी पटवर्धन ने ती सगळी बिले आणि पावत्या बाहेर काढल्या.काही बिलाला पावत्या जोडल्या होत्या तर काहींच्या पावत्या नव्हत्या.जलतरण तलाव देखभाल करणाऱ्या बिलावर ओके लिहिले होते.धोब्याच्या बिलावर ओके लिहिले होते.

“ हा सर्व काय प्रकार आहे ? ” पाणिनी ने मंडलिक. ला विचारले.

“जेव्हा बिले येतात तेव्हा मी ती तपासते आणि बरोबर असतील तर ओके लिहिते.मग इथे मालकांपैकी कोणी येते तेव्हा ती बिले भरतो मग त्याची पावती मी बिलाला जोडते. ”

“ चेक च्या काउंटर फाईल वर ओके तूच लिहितेस का? ”

“ नाही,नाही. चेक ला मी हातही लावत नाही. मी कशाला लाऊ त्याला हात? ”

“ बरोबर आहे तुझा प्रश्न. पण मला वाटलं की ज्या अर्थी तू बिलावर ओके लिहिते तसेच चेक च्या काउंटर फाईल पण तू लिहीत असशील. ”

“ सांगितलं नं तुम्हाला एकदा मी नाही ते लिहिले म्हणून. आणि तुम्हाला फक्त घर बघायचं अस म्हणाला होतात , कपाटे उघडून बघायची आहेत असे ठरले नव्हते.”

“ मला इथले सर्व वातावरण नजरे खालून घालायचे होते. तपन ला पाठीमागून भोसकण्यात आले,किचन मधल्या एका सुरीने.तुम्ही जरा बघून सांगाल का कोणती सुरी सापडत नाही ते ? ”

‘ मी काहीही सांगणार नाही. मी विचार केला की माझी नोकरी धोक्यात येईल असे मी काहीच करणार नाही. चला निघूया आपण आता.”

ती पाणिनी ची वाट न बघता त्याच्या कडे पाठ करून दाराच्या दिशेने निघाली. ती संधी साधून पाणिनी ने ते चेक बुक आपल्या कोटाच्या खिशात सरकवले.”

“ मोठया मालकांना आवडले नसते मी इथे तुम्हाला येऊ दिले हे.तुम्ही गेट च्या बाहेर गेल्यावर मी पुन्हा त्याला कुलूप लावणार आहे.”

“ तुम्हाला काही त्रास होईल असे मला करायचे नाही.” पाणिनी म्हणाला. चौघे बाहेर पडल्यावर तिने गेट ला कुलूप लावले.आणि ती तिच्या वाहनाने जायला निघाली. गाडीत बसताच पाणिनी म्हणाला, “ त्या चेक चा विषय निघाल्यावर अचानक तिच्या वागण्यात फरक पडला.”

“ तिला वाटले असेल की तुम्ही काहीतरी पुरावा शोधताय आणि मग लोक विचारतील की तुम्हाला हा पुरावा कसा मिळाला .मग तिने आपल्याला घरात येऊ दिले हे सिध्द होईल म्हणून ती घाबरली असावी.”

सौम्या ने अंदाज बांधला.

“ माझा कॅमेरा कुठे आहे? ” पाणिनी ने विचारले.

“ गाडीच्या कप्प्यात आहे.”

“ त्यात क्लोज अप शॉट घ्यायची लेन्स पण आहे ना? ”

“ आहे.”

सौम्या म्हणाली आणि तिने कॅमेरा आणि आणि ती लेन्स पाणिनी कडे दिली. पाणिनी आणि सौम्या ने त्या चेक बुक चे आणि काउंटर फाईल चे फोटो काढले.

“ तुम्ही एव्हाना निघून जायला हवे होते.” मंडलिक. ओरडली.

“ मी ते चेकबुक तपासायला घेतले होते , तो एक महत्वाचा पुरावा आहे.तू पोलिसांना तसे सांगशील का? ”

“ ते तुम्हाला घ्यायचा अधिकार नव्हता. कसला पुरावा आहे ? ”

“ आम्ही ते घेतले नाही.तुम्हालाच परत करतोय. आणि पुरावा कसला आहे ते मला माहीत नाही.” पाणिनी तिला म्हणाला.

“ मला पण नाही माहीत कसला पुरावा आहे ते.” ती म्हणाली.

“ सर्व सहकार्या बद्दल आभार.” [पाणिनी म्हणाला. तिघेही गाडीत बसले.

“ कनक. तू आता शोधून काढ की हे चेक बुक कोणाच्या मालकीचे आहे, तपन च्या आहे का? आणि हा ओनिक केपसे. कोण आहे.”

“ तुला का वाटतंय की ते त्याचे चेक बुक असेल? ” ओजस ने विचारले.

“ ज्या पद्धतीने तिने चेक बुक सापडल्यावर प्रतिक्रिया दिली,त्यावरून मला वाटलं की तिचा त्या चेक बुक शी काही संबंध असावा. तिचे एखादे खाते असावे बँकेत आणि तिला असे वाटत असावे की या खात्या बद्दल कोणाला काही कळू नये. ”

“असू शकेल ” ओजस म्हणाला.

“ ज्याने कोणी तो शेवटचा चेक लिहिला तो खुनाच्या दिवशीच्या तारखेचा होता आणि तो ओनिक केपसे. च्या नावाने होता. तो चेक कॅश चेक सुध्दा असू शकतो. काउंटर फाईल वरून ते समजणार नाही. हे विचित्र वाटते की जी बिले भरायची आहेत त्यावर मंडलिक. ओके असे लिहिते आणि ओनिक केपसे. च्या नावाने दिलेल्या पाच हजार रकमेच्या दोन चेक्स चेक च्या काउंटर वर दुसऱ्या कोणीतरी ओके लिहिलंय. जर ते चेक बुक तपन चे असेल तर तो एक मोठा पुरावा ठरू शकतो.” पाणिनी ने खुलासा केला.

“कसे काय ? त्यानेच त्या कप्प्यात ठेवलेले असेल.” ओजस ने विचारले.

“ नाही असे घडू शकत. ते चेक बुक तपन च्या खिशातून काढले गेले असले पाहिजे. असा माझा तर्क आहे.जे चेक दिले गेले होते ते गेल्या पाच,सह दिवसात दिलेले दिसतात.त्यात त्याच्या मधुगंध अपार्टमेंट च्या भाड्याचा चेक आहे,गॅरेज च्या बिलाचा आहे, आपले चेक बुक तपन त्या आउट हाउस मधे ठेवेल आणि तिथे रोज येऊन वेगवेगळया पाच दिवसाचे पाच चेक लिहील असे संभवत नाही. ”

“ ते दुसऱ्या कोणाचे तरी चेक बुक असेल असे समजले तर ? ” ओजस ने शंका घेत विचारले.

“ तसे असेल तर ते ज्या व्यक्तीचे असेल ती व्यक्ती मधुगंध अपार्टमेंट मधे राहणारी असावी.”

“ ठीक आहे सर, आपल्याला काहीतरी सुगावा तरी मिळालाय हे काय कमी नाही.” सौम्या म्हणाली.

“ कनक , तू आता मला हवी असलेली माहिती काढायला सुरुवात कर., मी माझ्या अशीलाशी बोलतो आणि तिला काय माहिती आहे ते विचारतो.” पाणिनी म्हणाला.

(प्रकरण आठ समाप्त)