Thats all your honors - 11 books and stories free download online pdf in Marathi

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -११)

दॅट्स ऑल युअर ऑनर
(प्रकरण ११)

“ माझा पुढचा साक्षीदार आहे, तुषार संघवी ” दैविक दयाळ ने जाहीर केले.
“ तू लुल्ला रोलिंग कंपनीत रखवालदार म्हणून त्यांच्या पार्किंग च्या ठिकाणी आहेस? ” त्याच्या शपथा , ओळख वगैरे झाल्यावर दैविक ने विचारले.
“ आणि आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या गाडया तपासण्याचे तुझे काम आहे?”
“ आत येणाऱ्या गाड्याच फक्त.पण आम्ही बाहेर जाणाऱ्या गाड्यांवरही लक्ष ठेवतो.”
“ या महिन्याच्या पाच तारखेला तू नोकरीत होतास? ”
“ होतो.”
“ तपन लुल्ला ला तू ओळखत होतास? ”
“ वैयक्तिक ओळख नव्हती परंतु मालक या नात्याने तोंड ओळख होती.”
“ त्यांची गाडी तुझ्या परिचित होती का? ”
“ हो होती.
“ पाच तारखेला संध्याकाळी तपन ला त्याच्या गाडीतून बाहेर पडताना तू पाहिलेस का? ”
“ हो साधारण पावणे सहा च्या सुमाराला ”
“ तो एकटाच होता गाडीत की आणखी कोणी होते? ”
“ एक मुलगी होती त्यांच्या सोबत.”
“ तू तिला ओळखू शकतोस? अत्ता आहे ती कोर्टात? ”
“ हो. आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेली, पटवर्धन यांच्या पलीकडे, आकृती सेनगुप्ता.”
“ माझे प्रश्न संपले.मिस्टर पटवर्धन, तुम्ही विचारा.”
“ तुला खात्री आहे की ती मुलगी म्हणजे आकृती सेनगुप्ता च आहे? ”
“ नक्कीच ”
“ सात तारखेला दुसऱ्या एका तरुणीला बघायला तुला सांगण्यात आले होते? ”
“ हो ”
“ आणि तू त्याचं मुलीला तपन बरोबर गाडीतून बाहेर पडणारी मुलगी म्हणून ओळखलस? ”
“ बिलकुल नाही.मी असे काहीही सांगितलेले नाही.”
मी तारकरना सांगितलं होत आणि तुम्हालाही . मला खात्री नाही देता येणार कि दोन्ही तरुणी एकच होत्या. ... त्या नव्हत्याच.”
“ तुला कधी समजले की त्या वेगळ्या होत्या ?”
“ जेव्हा मी खरी तरुणी, जी गाडीतून बाहेर पडली, पहिली.”
“ आणि तिला बघे पर्यंत तू ओळख पटवली नाहीस?”
“ नक्कीच पटवली नाही.मला आहुजा चा फोटो दाखवला गेला तेव्हा मी तारकरला सांगितले होते की मला खात्री नाही.”
“ तपन च्या बरोबर गाडीतून बाहेर जाणाऱ्या मुलीला तू किती वेळ पाहिलेस?”
“ ते गेट मधून बाहेर जाई पर्यंत.”
“ किती वेगाने ते बाहेर पडले पार्किंग च्या? ”
“ ताशी पंधरा ते वीस किलोमीटर वेगाने.”
“ तेव्हा पाउस पडत होता? ”
“ हो.”
“ आणि तू तुझ्या टपरी मधे होतास? ”
“ म्हणजे तू त्या तरुणीला गाडी मधून बाहेर पडताना बघितलस ते तुझ्या खिडकीतून.”
“ बरोबर.”
“ किती रुंद आहे खिडकी? ”
“ अडीच फूट असेल.”
“ याचा अर्थ ताशी पंधरा किलोमीटर वेगाने ती गाडी जात असताना , बाहेर पाउस पडत असताना , तुझ्या टपरीच्या तीस इंच रुंदीच्या खिडकीतून तुला ती तरुणी दिसली म्हणजे किती थोड्या अवधी साठी दिसली असेल विचार कर.सेकंदाचा काही भाग. ”
“ ....” नेमके काय बोलायचे हे साक्षीदाराला सुचले नाही. पाणिनी पटवर्धन ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले. “ गाडी लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह होती की राईट हॅण्ड ?”
“ लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह ”
ही तरुणी गाडीच्या डाव्या बाजूला बसली होती का? ”
“ नाही सर्, डाव्या बाजूला तपन बसले होते आणि तेच गाडी चालवत होते. ही तरुणी उजव्या बाजूला बसली होती.”
“ तू तपन ला बघितलस? ”
“ हो बघितलं.”
“ तुझी खात्री आहे कि तोच गाडी चालवत होता? ”
“ खात्री आहे , पक्की.”
“ पण त्याला ओळखण्यासाठी तू त्याचा चेहेरा बघितलास कुठे? ”
“ बघितला की त्यांचा चेहेरा.”
“ किती वेळ बघितलास? ” पाणिनी ने विचारले.
“ त्याला व्यवस्थित ओळखता येईल एवढा वेळ बघितला.”
“ तो गाडी चालवत असताना बघितलास ? ”
“ हो.”
आणि त्या तरुणीकडे ही तू बघितलस, ते तपन कडे बघून त्याला ओळखल्या नंतर की त्यापूर्वी? ”
“ त्या नंतर.”
“ म्हणजे आधी तू तपन कडे बघितलेस.जास्तीत जास्त वेळ बघितलेस,त्याची ओळख पटण्या साठी जेवढे बघता येईल निरखून. तेवढा वेळ तू दिलास. त्या नंतर तू त्या तरुणीला बघितलेस. बरोबर?”
“हो.”
“ आता असे बघ,” एखाद्या लहान मुलाला गणित समजाऊन सांगावे तसे पाणिनी त्याला म्हणाला; “ तपन ताशी पंधरा किलोमीटर वेगाने गाडी चालवत असेल तर इंचाच्या आणि सेकंदाच्या भाषेत सांगायचे असेल तर पंधरा किलोमीटर म्हणजे पाच लाख नव्वद हजार पाच हजार पन्नास इंच जाण्यासाठी त्याला एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद लागतील म्हणजे तीस इंचाची खिडकी ओलांडून पुढे जायला अवघे शून्य पूर्णांक अठरा सेकंद लागतील. ”
“ मी एवढी आकडेवारी केली नाही.”
“ मग कागद पेन घे आणि कर.”साक्षीदाराने कागद पेन घेऊन अनेक गुणाकार भागाकार केले आणि शेवटी पाणिनी चे म्हणणे मान्य केले.
“ बरोबर आहे ना माझे म्हणणे? म्हणजे साधारण एक दशांश सेकंदात ते तुझ्या दृष्टी समोरून गेले.त्यातही तू आधी तपन ला बघितलेस, नंतर त्या तरुणीला.म्हणजे त्या तरुणीला तू एक दशांश सेकांदापेक्षाही कमी वेळ पाहिलेस.”
“ ठीक आहे तुम्ही म्हणता ते.”
“ त्या नंतर तू सात तारखेला जेव्हा दुसऱ्या तरुणीला पाहिलेस तेव्हा तुला खात्री नव्हती.बरोबर? ”
“ बरोबर.”
“ म्हणजे तुला खात्री नव्हती की ती तरुणी आणि गाडीतली तरुणी या एकाच होत्या कि वेगळ्या होत्या. असेच ना? ”
“ मी म्हणालो होतो की ती तीच तरुणी होती याची मला खात्री नव्हती.”
“ ती तीच तरुणी नव्हती याची ही तुला खात्री नव्हती? ”
“ नव्हती.”
“ तू एवढेच म्हणालास की मला खात्री नाही.”
“ हो तसेच म्हणलो मी.”
“ नंतर जेव्हा तू आरोपीचा फोटो पाहिलास,आणि तारकर किंवा पोलिसांपैकी कोणीतरी तुला सांगितले की तुला दाखवलेला फोटा हा आरोपीचा म्हणजे तपन बरोबर गाडीतून बाहेर पडलेल्या तरुणीचा आहे,तेव्हा तुला खात्री पटली? ”
“ मला आता माझ्या मनाची पूर्ण पणे खात्री पटली आहे की गाडीत तपन च्या बाजूला बसलेली स्त्री म्हणजे आरोपी आकृती हीच होती.”
पाणिनी हसला. “ तुला अत्ता खात्री वाटत्ये, पण सात तारखेला तुला वाटत नव्हती.”
“ कारण सात तारखेला मी आरोपी तरुणी पहिली नव्हती.”
“ पण तू दुसऱ्या तरुणीला पाहिलं होतस आणि म्हणाला होतास की ही दुसरी तरुणी नसेलच याची खात्री नाही. बरोबर ना? ”
“ मला खात्री नव्हती.”
“ दॅट्सऑल युअर ऑनर.” पाणिनी म्हणाला. माझे प्रश्न संपले.
प्रकरण ११ समाप्त