Mrudula - 2 books and stories free download online pdf in Marathi

मृदुला - 2

मृदुला आज खूप जास्त घाबरली होती . तिला क्लास मधून बाहेर जाणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या रस्त्याने एकटीने प्रवास करण म्हणजे एक भयानक संकट वाटत होत ज्यामधे ती हळूहळू अडकली होती . तिला सगळ व्यक्त करण्यासाठी ना कोणी जवळची व्यक्ती होती ना कोणी जवळची मैत्रिण . तिला वारंवार सतत तो चेहरा आणि आवाज आठवत होता . तिच्या मनातून काही केल्या तो प्रसंग जात नव्हता आणि सगळ्यात जास्त तिला या सगळ्यातून रूम वर कसं पोहचायच याच विचार येत होता . थोड्या वेळात तिचा क्लास सुटला , एक दोन मुलींसोबत ती बोलली , तिने कोणी त्या दिशेने जाणार आहेत का यासाठी विचारणा केली पण तिला कोणी सोबती नव्हत . शेवटी ती मन घट्ट करून एकटी निघाली . क्लास मधून बाहेर पडली पण ती खूप सावध आणि घाबरलेली होती , पण तिला ती भीती तिच्या चेहऱ्यावर दाखवायची नव्हती . बाहेर निघाल्यानंतर तिने तिचा वेग वाढवला , जोरजोरात पाऊले उचलू लागली , यामध्येच सारखं आपल कोणी पाठलाग नाही करत ना याचा अंदाज ही घेत होती . नेहमी अर्धा तास अंतर लागणाऱ्या रस्त्यावरून आज ती पंधरा मिनिटात च रूम वर पोहचली होती. तिथे तिची एक रूम पार्टनर होती पण ती अभ्यासामध्ये मग्न होती .
मृदुला रूम मध्ये पोहचली आणि शांत बेडवर बसली होती , अर्थात कोणीही बघताच ओळखेल की ही प्रचंड विचारात गुंतलेली आहे . तितक्यात तिच्या मैत्रिणीचे लक्ष तिच्यावर आले , तिने मृदुला ! मृदुला अस दोन ते तीनदा आवाज दिला पण तिला काही हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही . म्हणून ती उठून मृदुला च्या जवळ गेली आणि तिला हाताचा हळुवार स्पर्श केला , पण हा स्पर्श जणू काही मृदुला साठी जीवघेणा स्पर्श होता , ती अचानक झालेल्या स्पर्शाने दचकून ओरडली आणि हे पाहून तिची मैत्रीण ही घाबरली . मृदुला आता शुध्दीवर आली होती , तिला समजत होत ती काहीतरी विचित्र वागत आहे . तितक्यात तिच्या मैत्रिणीने मीनल ने तिला विचारलं ," काय झालं आहे ? काही प्रोब्लेम आहे का ? " मृदुला ने नकारार्थी मान हलवली , पण तिला काहीतरी सांगायचं आहे हे स्पष्ट दिसत होते . मीनल पुन्हा विचारले ," काय झालंय, काही मदत हवी आहे का ?" आता मात्र मृदुला खूप अनावर होऊन मीनल ला मिठी मारून रडू लागली . ती मीनल ल सांगत होती , मला शिकायचं आहे ग अजून ! मला इतक्यात गावी नाही जायचं !" मीनल ला काहीच कळत नव्हत ही अस अचानक का बोलतेय ? म्हणून मीनल आता फक्त तिला शांत करत होती आणि सगळ व्यवस्थित होईल असे समजावत होती . काही वेळाने मृदुलाला ही वाटल , मीनल सोबत बोलून काहीतरी मार्ग निघू शकतो .
मृदुला ने मीनल च हात पकडला , तिच्या अजून थोड जवळ गेली आणि घडलेला प्रसंग अगदी पहील्या दिवसापासून काय झालं ते सांगू लागली . हे सगळं व्यक्त करताना मृदुला मध्ये रडत होती , तर कधी रागात बोलत होती पण तिला या गोष्टीचा बऱ्याच दिवसापासून त्रास होतोय हे मीनल ला आता समजल होत . तीच सगळ ऐकून घेतल्यानंतर ,' आपण तुझ्या घरी सांगुया का ? म्हणजे बाबांना तरी सांगू या ! ' हे ऐकताच मृदुला जागेवरून उठली आणि मीनल ला हे घरी न सांगणं तिच्यासाठी किती चांगल हे पटवून देऊ लागली . तिच्या म्हणण्यानुसार हे घरी किंवा बाबांना जरी समजल तर तिला शिक्षण बंद करून कदाचित कायमच गावी जावं लागेल ! आणि तिला त्या प्रसंगापेक्षा हे जास्त भयानक वाटत होत . मीनल ला आता मृदुला ची अवस्था योग्य प्रकारे समजली होती . तिने मृदुला ला इतकंच समजावून सांगितलं की , " घाबरु नकोस , नक्की च काहीतरी यामधून मार्ग निघेल ! आणि तू पण थोड कठोर रहा ! "


( क्रमशः)...