Rangeela Gotya books and stories free download online pdf in Marathi

रंगीला गोटया

गोटयाला 'रंगीला' हे नाव त्याच्या मित्रांनीच ठेवले होते. मित्रच एवढे बिलंदर असतात की ते कोणाच्या कोणत्या खोडीवरून काय नाव ठेवतील ते सांगता येत नाही. गोटयाचे ‘रंगीला’ नाव पडण्यामागेही एक कारण होते. गोटया आता एकवीस वर्षाचा झाला होता. वयात आल्यापासून त्याला मुलींचे जरा जास्तच आकर्षण वाटु लागले होते. कॉलेजमध्ये पण तो नेहमी मुलींच्या मागे-मागे फिरायचा. गावात कोणाचं लग्न असेल तर गोटया मुद्दामहून बायकांच्या पंगतीत वाढण्यासाठी जायचा. तो काही कामधंदा करत नव्हता पण तरीही तो 'लग्न करून द्या' म्हणून आई-वडीलांच्या मागे लागला होता. कधी-कधी तो याच कारणाहून रूसून बसायचा. गावातील इतर प्रौढ माणसांना 'माझ्या लग्नाबद्दल आमच्या वडीलांना बोला' अशी विनवणी करायचा. लोक त्याचं ऐकून घ्यायचे व त्याच्या पाठीमागे त्याची चेष्टा करायचे. काही म्हातारे त्याला 'तुझ्यासाठी मुलगी पाहतो' असे म्हणून त्याच्याकडून फुकटचा चहा प्यायचे. तो निघून गेल्यावर पाठीमागे त्याला हसायचे. त्यामुळे गावातील प्रौढ मंडळीही आता त्याला 'रंगीला गोटया' याच नावाने ओळखत होते.

        पण आता त्याला कोणाची गरज नव्हती. आज त्याला आपणहून एका मुलीचा फोन आला होता. आज गावामध्ये असलेल्या एका लग्नामध्ये ती त्याला भेटणार होती. तिला गोटया खूप आवडतो. असे त्या मुलीने गोटयाला फोनवरच सांगीतले होते.गोटयाने अद्यापपर्यंत त्या मुलीला पाहिले नव्हते. तिचा आवाज ऐकूनच त्याला तिच्यावर प्रेम झाले होते. तिचा आलेला फोन रेकॉर्ड झालेला होता. गोटया तिचा आवाज परत-परत ऐकत होता व मनातच खूष होत होता.

        गोटया लग्न मांडवात आला. त्याने एकदा तेथील सर्वच मुलींवर नजर फिरवली. कोणत्या मुलीने फोन केला असेल याचा तो मनाशीच अंदाज घेऊ लागला.कारण त्या मुलींमध्येच अशी कोणीतरी एक मुलगी होती. जी त्याच्यावर प्रेम करत होती. तीच मुलगी आज त्याला भेटणार होती. त्या मुलीने सांगीतल्याप्रमाणे त्या मुलीचा आवडता रंग काळा असल्याने त्याने तिने सांगीतल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाचा शर्ट व जिन्स पँट घातली होती. मुळातच काळा असलेला गोटया पांढऱ्या रंगाचा शर्ट घातल्याने आणखीनच उठून दिसत होता.

        लग्न झाले. संपूर्ण लग्नामध्ये गोटयाचं त्या मुलींच्या घोळक्याकडेच लक्ष होतं. पण आपल्याला फोन करणारी मुलगी कोणती असेल याचा त्याला अंदाज येत नव्हता. तो त्या मुलीच्या फोनची वाट पाहत होता. कारण तिने त्याला ‘आई सोबत असल्याने मीच तुला आईच्या गुपचूप फोन लावेल तोपर्यंत तु मला फोन करु नकोस’ असे सांगीतले होते. त्यामुळे गोटयाला तिला फोनही लावता येत नव्हता. एखादेवेळेस त्याने तिला फोन केला व तिच्या आईनेच फोन उचलला तर भलतंच लफडं झालं असतं. गोटया मनातच तळमळत होता. पण तिचा फोन काही येत नव्हता. लग्न झाल्यावर पंगती बसल्या. गोटया मुद्दामच महिलांच्या बाजूला वाढण्यासाठी गेला. त्याला त्याच्यावर प्रेम करणारी मुलगी शोधायची होती. पण प्रयत्न करूनही त्याला ती मुलगी सापडली नाही. त्यामुळे तो खूपच निराश झाला.

        थोडया वेळाने त्याला तिचा फोन आला.

        ती, "सॉरी गोटु.मी तुला भेटु शकले नाही. कारण आमच्या आईने मला एकटीला सोडलेच नाही. त्यामुळे तुला फोनही करता आला नाही."

        गोटया," सॉरी काय सॉरी? मी कितीवेळ तुझी वाट पाहिली. आज भेटशील म्हणून मी ‍किती आनंदात होतो. पण तु आली नाहीस. मला तुला पाहण्याची खूप ईच्छा झाली आहे. मला तुला आजच पहायचं आहे. तु कोण आहेस ते तरी मला सांग."

        ती, "मी मुद्दामच तुला कोण आहे ते सांगीतले नाही. मी तुला समोरासमोरच भेटणार आहे. तेव्हा तुला कळेलच मी कोण आहे ते."

        गोटया, " हो. पण तोवर माझ्या मनाची खूप तळमळ होत आहे ना."

        ती,"मी तुला लवकरच भेटणार आहे थोडे थांब.... अरे मी तुला नंतर फोन लावते माझी आई आली आहे." असे बोलून तिने फोन कट केला.

        तिने फोन कट करताच गोटयाची खूप तगमग होऊ लागली. त्याचं कशातच लक्ष लागेना. सारखा ‍तिचा तो मंजूळ आवाज त्याच्या कानात घुमु लागला. त्याला जिथे-तिथे तिच्याच त्या मंजूळ आवाजाचा भास होऊ लागला. तिला भेटण्यासाठी त्याचा प्राण आतुर झाला. तिला भेटण्याची तीव्र ईच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली. तहानलेला चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहतो.घाईत असलेला प्रवासी जसा वाहनाची वाट पाहतो. तेवढयाच आतुरतेने,  तितक्याच तळमळीने तो तिची वाट पाहू लागला. दिवसांमागून दिवस निघून जात होते. ती नुसतं मोबाईवर बोलत होती. भेटायचं म्हणलं की काहीतरी कारण सांगत होती. ती तिचं नावही सांगत नव्हती. गोटया मित्रांमध्ये असला तरी तो फक्त शरीराने त्यांच्यामध्ये असायचा. मनाने मात्र तो तिचाच झाला होता.त्याने आता त्याचे राहणीमानही बदलले होते. पहिल्यांदा तो साधेच कपडे घालायचा. पण आता त्याने जिन्स पँट, टीशर्ट, डोळयाला गॉगल, पायात बुट व गळयात साखळी घालु लागला. तिच्या सांगण्याप्रमाणे फ्रेंच कट दाढी ठेवू लागला. बऱ्याच जणांना त्याच्या राहणीमानात झालेल्या या अचानक बदलाचं कारण कळत नव्हतं. गोटयाला हिरो झाल्यासारखं वाटत होतं. त्याला दुनियेची पर्वा राहिली नव्हती.

        एके दिवशी त्याने आपल्या मनातील गोष्ट आपल्या चम्या नावाच्या मित्राला सांगीतली. त्यावेळी ट्रु कॉलरही नव्हते. तिची अटच होती. मीच फोन करणार. तु फोन करायचा नाही.घरच्यांनी फोन उचलला तर  विनाकारण त्रास होईल. त्यामुळे गोटया तिच्या फोनची वाट पहायचा. तिचा फोन आल्यावर कधी-कधी अर्धवट जेवण तसेच सोडून बोलण्यासाठी बाहेर जायचा.

         चम्या गोटयाला म्हणाला, "आता ज्यावेळी तिचा फोन येईल त्यावेळी मला सांग. मी तिला बोलतो व तुझी तिच्याशी भेट घालून देतो."

         गोटया हो म्हणाला.पण ज्यावेळी चम्या त्यावेळी त्याच्याजवळ असायचा नेमका त्यावेळी तिचा फोन यायचा नाही. व ज्यावेळी चम्या त्याच्यासोबत नसायचा नेमका त्यावेळी तिचा फोन यायचा.त्यामुळे ते दोघेही खूप परेशान झाले. पण एके दिवशी तो योग जुळून आला. चम्या जवळ असताना त्या नंबरवरून फोन आला.पण समोरून कोण्यातरी पुरुषाचा आवाज आला. तो आवाज भारदस्त होता.चम्याने स्पीकर ऑन केला.

        समोरून आवाज आला 'हॅलो...' त्या आवाजाने गोटयाच्या मनात धडकी भरली. काय बोलावं त्याला काही सुचेना. त्याने घाबरून चम्याकडे पाहिलं.चम्या धाडस करून हॅलो म्हणाला.

        समोरची व्यक्ती, " हॅलो.कोण बोलतंय?"

        चम्या,"तुम्हाला कोण पाहिजे?"

        "मला तुच पाहिजे. तु कोण आहेस नुसतं नाव सांग. तुला मारूनच टाकतो. माझ्या पोरीला फोन लावतो का?"

        त्या धमकीने गोटयाच्या तोंडचं पाणीच पळालं. तो भेदरलेल्या नजरेने चम्याकडे पाहू लागला.  चम्या धाडस करत बोलला.

        "आम्ही तुमच्या पोरीला फोन केला नाही. तिनेच आम्हाला फोन केला होता."

        "मला ते काय माहित नाही. आता पोलीस स्टेशनला जावून तुझ्यावर केस करतो.नाहीतर तुला जिताच मारतो. तु नुसता कोण हाईस ते सांग."

        आता मात्र चम्याच्याही तोंडचं पाणी पळालं. त्याने पटकन फोन कट केला व तो गोटयाला म्हणाला, "आता हा पोरीचा बाप पोलीस स्टेशनला जाणार. पोलीस कसेही करून तुला शोधणार. मग उगाचंच त्यांचा मार खावा लागणार. तू असं कर. गाव सोडून आताच्या आता पळून जा. मी तुला मधून- मधून फोन करत राहील.वातावरण निवळलं की परत ये."

        गोटया आधीच बावचळून गेला होता. त्याला काय करावं ते सुचत नव्हतं. पण चम्याचं म्हणणं त्याला पटलं होतं. आता इथे थांबण्यात अर्थ नाही हे त्याला कळून चुकलं होतं. गोटया गावाच्या बाहेर जावून वेशीच्या रस्त्याला असलेल्या केकताडाच्या झुडपाच्या मागे लपला. तिथे चम्या गोटयाची मोटारसायकल घेवून येणार होता. गोटयाने मोबाईलही बंद करून ठेवला.जी मुलगी कधी पाहिली पण नाही  तिच्यामुळे उगाचंच आता मार खावा लागणार. आता आपली इज्जत धुळीस  मिळणार या विचाराने त्याला पश्चाताप होवू लागला. तेवढयात मोटारसायकलचा आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. जवळपास चार मोटारसायकल होत्या. पोरीचा बापच आपल्याला मारायला आला आहे असा समज होवून तो केकताडामागून उठून ऊसाच्या शेतात शिरला.

        मोटारसायकली येवून पांदीत उभ्या राहिल्या. त्याने लपूनच पाहिलं. चम्या त्याच्या सगळया मित्रांना घेवून आला होता. त्यांना पाहून गोटयाला धीर आला. अशा संकट समयी आपले मित्र आपल्या पाठीशी उभे राहिले याबद्दल त्याला आनंद झाला. ज्या मुलीच्या आपण प्रेमात पडलो. तिच्यामुळे आपण आपल्या मित्रांना काही काळ विसरून गेलो होतो.पण तेच मित्र आज आपल्यासाठी धावत आल्याचे पाहून त्याला खूपच आनंद झाला. तो ऊसाच्या शेतातून रस्त्याला आला.

        चम्या, "ही गाडी घेवून तु लवकर निघून जा.आम्ही गावात पेटलेलं वातावरण विझवतो." गोटयाचे डोळे भरून आले. तो गाडीवर बसला. त्याने किक मारली. तो निघणार तेवढयात त्याला त्या मुलीने त्याच्या नावाने हाक मारली.

        गोटयाने त्या आवाजाच्या दिशेने पाहिले. तर तो आवाज तिचा नसून त्याचा होता. नववीला असलेल्या बबडयाला मुलींचा आवाज काढता येत होता. गोटयाच्या सगळा प्रकार लक्षात आला. बबडयाच मुलीच्या आवाजात गोटयाला बोलत होता. सगळे मित्र हसू लागले. गोटया त्यांना शिव्या देवू लागला. गोटया सगळया मित्रांकडे पाहत, "अशी मजाक का केली मित्रांनो."

        चम्या, "तसं करणं गरजेचं होतं. कारण काही दिवसांपासून तुझं वागणं बदललं होतं. तु कोणत्याही मुलीच्या मागे फिरायचास. मित्रांमध्ये असला तरी तु मुलींचाच विचार करायचास. तुझी नियतही बदलली होती. लोक तुला नाव ठेवायचे. ते म्हणायचे तुझी नियत चांगली नाही. कोणाच्या घरी घेवून जाण्याच्या लायकीचा तु नाहीस.आम्हाला माहित आहे. तु आधी असा नव्हतास. पण हा दोष वयाचा आहे. आम्हीही तुझ्याच वयाचे आहोत. पण संयम राखणे गरजेचे आहे. स्त्रीयांची इज्जत आपणच केली पाहिजे. आम्ही तुझे जवळचे मित्र असल्यामुळे लोक तुला नावे ठेवतात हे आम्हाला चांगले वाटत नव्हते.तुला आम्ही बऱ्याचवेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण तू ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हता. त्यामुळे तुला अद्दल घडवण्याची आम्ही योजना आखली."

        गोटया, "सॉरी मित्रांनो. मी चुकलो पण यापुढे मी असे कधीच वागणार नाही."

         तेवढयात घोगऱ्या आवाजात बप्प्या मस्करीत बोलला, "आता चुकलास तर तुला म्या जित्ताच सोडणार नाही."

        तो आवाज ऐकून गोटयाच्या लक्षात आले. थोडयावेळापुर्वी मुलीचा बाप म्हणून दम  दिलेला बप्प्याच होता.

         गोटया हात जोडून हसत म्हणाला, "एवढी बार माफ करा.आता कधीच चूक होणार नाही."

         ते पाहून हसतच चम्या म्हणाला, "आता आम्हीही तुला कधीच रंगीला म्हणणार नाही."

         ते ऐकून गोटयासहीत सगळे मित्र हसू लागले. त्या दिवसापासून गोटयाने चांगले आचरण करील. सर्व मुलींचा, स्त्रीयांचा आदर करील. अशी मनातच  शपथ घेतली व त्याप्रमाणेच तो आचरण करू लागला. काही दिवसांतच त्याला लोक रंगीला गोटया  विसरून फक्त गोटया म्हणू लागले.