Namune - 2 books and stories free download online pdf in Marathi

नमुने - 2

रिक्शा सोसायटीच्या गेटवर थांबली. मी उतरलो. पैसे दिले. गेट समोर पारधे काका आणि अम्या बोलताना दिसले.
" मी आता काय सांगितल ते ऐक. बाकीच विसर. साॅरी म्हण आधी. आणि परत अस रस्त्यावर बोललास तर याद राख." पारधे काका एकमद सुनावण्याच्या मुड मध्ये होते. अस दिसत होत. समोरुन मी येतोय बघताच. रोजच्या टोमण्याच्या स्वरात काका म्हणाले,
" काय रे बॅटरी कुणी कडे गेलेलास उंडगायला? जेव्हा बघाव तेव्हा हात फळकुट घेऊन फिरतोय? बॅट तरी पकडता येते का?" अम्या कडे बघत म्हणाले," हे टोनक क्रिकेट खेळतय?" आपण काही सर्वोत्तम विनोद केला अशा गैरसमजातून काका माझ्याकडे बघून हसले. तेवढ्यात बाजूने दुबे काकांचा पोरगा बाईक वरुन जाताना दिसला त्याला थांबवत पुढे सोड म्हणत बाईकवर बसले. अम्या कडे बघत म्हणाले.
"सांगितल ते लक्षात ठेव बर!!! आणि या टोणक्याच्या नादी लागु नको." म्हणत काका पुढे निघाले.
" काय रे पारधे काकांचा प्रोब्लेम काय आहे तुझ्या सोबत?" अम्या हसत म्हणाला
" मला काय माहिती?"
" जेव्हा बघाव तेव्हा तुला दुधाची आंघोळ घालतो म्हणून विचारलं!"
" ते जाऊ दे सोड, तुला काय तो साॅरी म्हणायला सांगत होता? काय केल काय तु?"
" नाही रे, म्हातारा जरा ज्ञान दान करत होता. माझा टाईमिंग खराब बाकी काय?"
" अरे पण येवढा उडत कशाला होता."
" अबे त्याला काय कारण लागत का?"
" म्हणजे?"
" त्याच झाल अस की, मी जात होतो घरी तर काकाने हाताने इकडे ये करत बोलवल. म्हटलं झाला रेडियो सुरु? येवढा पकवतो ना हा माणुस!!!"
" हा ते माहितीय, पण तो बोलत काय होता?"
" काही नाही रे. गेटवरच्या सिक्युरीटीवाल्या नेपाळ्याशी हा बोलत बसलेला. मला बोलावल. यांचे विषय कशावर असणार? एकतर सोसायटीची पोर-पोरी. नाय तर देशाची जबाबदारी. हे म्हणतील ते पुर्व."
" अबे आता झाल काय ते बोल."
" अरे कुठून बातम्या येतात काय माहिती? यांच बोलन हिंदु मुस्लिम वर चालल होत. मी हो काका बरोबर काका म्हणत मान हलवत नंदी बनलो. निघणार होतो पण जायला देत नव्हता हा माणुस. हे हिरवे झेंडे खुप दिसायला लागले म्हणे हल्ली. उठसुट बोंबलतात लेकाचे सकाळीच. भोंगा वाजला की झोप मोड."
" मग तु काय म्हणालास?"
" मी काय म्हणणार? बरोबर काका! अगदी बरोबर! तेवढ्यात समोरुन तु इरशाद चाचाच्या रिक्शेतुन उतरलास."
" हा मग ?"
" मी म्हणालो, हा आला हिरवा कंदील, भाई एकदम भडकला. म्हणाला तोंड सांभाळून बोल! मला समजेना काय गलत बोललो? म्हणाला हे आपले लोक आहेत! यांना त्यांच्यात घेऊ नको. इरशाद नसता तर बायको माझी वाचली नसती. म्हटलं हा पण काकीचा अॅक्सीडंट झाला तेव्हा आम्ही पण होतो की सगळे हाॅस्पिटल मध्ये! याने काय केल? तर म्हणाला बायकोचा रक्त गट ओ निगेटिव्ह होता. रात्रभर ब्लड बँक फिरलो. पण कुठेच भेटेना. इरशादला एक काॅल केला रात्री दोन वाजता उठून आलाय तो माझ्यासाठी! समजल! पुन्हा त्याला काही बोललास तर याद राख!"
मी म्हणालो,
"पण काका आता तर तुम्ही म्हणत होता की?"
एकदम काकाचा मुड बदलला म्हणाला,
" मी आता काय सांगितल ते ऐक. बाकीच विसर. साॅरी म्हण आधी. आणि परत अस रस्त्यावर बोललास तर याद राख."
आता मला हसायला आलं. मला हसताना बघून अम्या म्हणाला
" म्हटलं भाई साब, दोन मिनिटा आधी हिरवे झेंडे भोंगे जास्त वाटत होते. यांनी उनीधुनी काढली तर बरोबर, पण मी हिरवा कंदील म्हणालो ते चालणार नाही. खायची यांना चकली पण यांचे दात नकली."
अम्याच शेवट वाक्य ऐकल आणि दोघे पण हसायला लागलो. जाता जाता अम्या मागे वळून म्हणाला
" बॅटरी "
" काय रे?"
" रुमालानं थोबाड तरी पुस नाय तर चष्मा तरी पुस लय माखलाय तु आज ठेकण्या." म्हणत डोळा मारु निघाला.
लगेच डोळ्यावरचा मी चष्मा काढला. रुमालाने काचा पुसल्या. चष्मा डोळ्यावर चढवला आणि हसत घरी निघालो.