Namune - 3 books and stories free download online pdf in Marathi

नमुने - 3




आमच्या सोसायटीच्या पारथे काका, अम्याचे बाबा, इरशाद चाचा आणि दुबे काकांना तुम्ही ओळखत असालच. उरलेल्या लोकांशी हळुहळु ओळख होईलच. तस येवढी वर्ष एकत्र चाळीत राहिल्यामुळे अचानक झालेल्या बदलांना आपल करन जरा कठिन होत. चाळीच्या घरचे दरवाजे उघडे असायचे. बिल्डिंगचे मात्र बंद. पण सवयी काही केल्या बदलल्या नव्हत्या. सोसायटीत तस मीनी इंडीया राहत होती. चाळीच्या जागेवर आता उंच टाॅवर बांधला होता. 4-5 लोकांनी रुम विकल्याने आता ते या नविन सोसायटीत दिसत नव्हते. पण चाळीतले बाकीचे सगळी कुटुंब मात्र आपल्या वाढवडीलांची जागा सोडायला तयार नव्हते. काही नवीन लोक हि राहायला आले. चाळ गेली बिल्डींग आली. नोकीया गेला स्मार्ट फोन आला आणि सोसायटीत बदल झाला.

स्मार्ट फोन आले तसे सोसायटीचे ग्रुप बनले. सोसायटीचा एक ग्रुप, बायकांचा एक ग्रुप, पोरांचा एक ग्रुप, पोरा- पोरींचा एक ग्रुप. चाळीच्या बायकांचा बचत गट होता. आता किटी पार्टी बनली. चाळीचा काॅमन गणपती मंडपाचा ग्रुप होता. आता जिम ग्रुप आणि प्ले ग्राऊंड ग्रुप बनला. यंग रायडर नावाने म्हातार्या लुंगील्या अण्णांचा ग्रुप तर रोज चर्चेचा विषय बनला. रिटायर्ड झालेले चाळीतले( आता सोसायटीतले ) म्हातारे बिल्डिंग खाली सोसायटी आॅफिस मध्ये संध्याकाळी वाचनालय उघडुन बसले. पण बदल जसे अचानक होतात तसे ते फनी आणि शाॅकिंग हि असतात.

काॅलेजला जायला सकाळी उठल्यावर पहिला फोन बघायची सवय. प्रत्येक ग्रुपच गुड माॅर्निग मेसेज, इमेज, सुविचार, कोट्स, पण मजा यायची. कोण सकाळी लवकर उठतो. कोण रात्री उशीरा झोपतो आता ग्रुपवर समजायला लागल. प्रत्येकाचे स्टेटस काही विनोदी, काही शायरी, काही सुविचार! सुविचारांनी तर शाळेपासुन पाठ सोडली नव्हती. हळु हळु सोसायटी अजुन जवळ आली. काकु आज काय बनवल म्हणताना आता फक्त स्टेटस बघ असा रिप्लाय यायचा. स्टेटसवर काकीची पाककला खमंग दिसत होती पण आता त्यांचा झंझनीत वास नाका पासुन दुर झाला. जीभेला पाणी सुटायचं पण आता जीभे वरची चव दुर झाली. खमंग पदार्थाचा स्वाद आता स्टेटसवर बघायचं.

रविवारचा दिवस होता. सगळे आठवड्याची झोप पुर्ण करत ताणुन उशीरा झोपले होते. सकाळी जाॅगिंग आणि माॅर्निंग वाॅक साठीची मंडळी लवकर वजन कमी करायच्या नादाला थकुन लवकर घरी परतली होती.
अम्या, मी, सिध्दु सकाळीच बिल्डिंग खाली भेटलो. सिध्दु ने विचारलं
'अम्या कुणी कडे सकाळीच स्वारी चालली?'
डोळ्यावर झोप घेऊन. दोन्ही हात हवेत फिरवत, आळस झटकत अम्या म्हणाला.
" काही नाही रे दुध पिवशी आणायला जातोय. येतो का टपरीवर चहा मारु मस्त."
" आता घरी तर पिणार ना भाई."सिध्दु अम्यावर हसत म्हणाला.
" अबे तुला नाय रे बॅटरीला बोलतोय! तुझ काय झेमण्या सकाळीच मांजर आडव."
रोजची दोघांची हमरी तुमरी चालु झाली. दोघांना थांबवत म्हणालो
" चल रे सिध्दु, तस पण म्हातारे आता झुंड घेऊन उतरतील खाली. सकाळीच कोबंडा आरवाच्या आधी उठतात पण येतात सगळा कार्यक्रम आटपुन."
मग तिघे हि टपरीवर गेलो. चहाचा ग्लास दोघांना देत अम्या म्हणाला
" बॅटरी, सोसायटीत ग्रुपवर काय नवीन येडं लागलय रे!"
हातला गरम चहाचा चटका लागला तसा हात मी मागे घेतला.
" अबे बघ की गरम आहे जरा दमाने पकड. भाजला का हात."
मी हात झटकत नकरार्थी मान हलवली. दोघे पण हसायला लागले. त्यांना हसताना बघुन विषयाकडे लक्ष जावा म्हणून म्हटलं
" कुठे काय? काय चालणार ग्रुप वर? रोजचे गुड माॅर्निंग मेसेज. रोज सकाळी मोबाईल टिवटिव करतो. वैताग आला यार"
परत हसत अम्या म्हणाला,
" सिध्दया साल्या तुलाच येडा समजत होतो मी पण बॅटरीचा नादच खुळा! याची तर बॅटरी अगदीच झिरो वर आलीय."
तसा अम्या सिध्दु माझ्या पेक्षा मोठे होते त्याचा फायदा तर ते चाळीत जन्मल्या पासुन घेतच होते. आता तर ग्रुपवर पण तेच चालु होत. पण आज अम्याचा मुड माझ्यावर हसण्या पेक्षा ग्रुपवरच्या गोष्टीत जास्त होता. न राहुन मग सिध्दु म्हणाला
" अरे सोसायटीच्या ग्रुपवर आता सकाळ शुभ नसते."
" म्हणजे?"
" अबे ता वरुन ताक भात ओळखायला शिक बॅटरी!"
अम्या वैतागत म्हणाला.
" अरे मला कस माहिती आता तुम्ही काय बोलताय. रोज तर गुड माॅर्निंग मेसेज येतात! हे बघ" म्हणत मोबाईल किशातुन काढुन दाखवायला लागलो.
" बर वाच बघू काय आहे?"
आता मला दोघ येड्यात जमा करतात की काय? अस वाटायला लागल होत. म्हटलं
"तुच वाच ना! सकाळीच सकाळी डोक्याला शाॅट देताय यार."
" बर दे इथे" मोबाईल हातातून काढुन घेत अम्या वाचायला लागला.
" रत्ना ताई- गुड माॅर्निग, कुणाल- शुभ सकाळ, लोबो अंकल- The eyes of the Lord are everywhere, keeping watch on the wicked and the good. Good morning. पारधे काका- शिव सकाळ, माझा बाप पण तेच काॅपी पेस्ट करतोय. सौरभची मम्मी- उम्मीद से भरी एकनई सुबह मेंआपका स्वागत है…शुभ प्रभात, शिंदे काका- धम्म सकाळ अजुन वाचु?"

आता मला हसायला आलं. म्हटलं
" सेम तर आहे!"
डोक्यात टपली मारत अम्या म्हणाला
" अबे, गुड माॅर्निंग चालु होत तोपर्यंत ठिक होत. आता हे नको ते चाललयं! समजतय का? काय करतात हे म्हातारे आता?"
" अरे कुठे काय आहे? उगाच आपलं सकाळीच काही तरी!"
" बर ठिक आहे." म्हणतं अम्या म्हणाला
" आता काॅलेजला गेल्या गेल्या सर आला कि तु हर हर महादेव कर आणि तिकडुन अब्दुल ला अल्ला हु अकबर करायला सांग!"
" काय पागल झाला बे, अस कोण करत?" मी हसायला लागलो.
" अडाण्या मी पण तेच सांगतोय ना. गूड माॅर्निंग बोलता तर तेच चालवा हे काय आता नवीन आणलंय या म्हातार्यांनी?"
" हे पण तेच आहे ना मग!"
" हा मग जाता येता चांग भल म्हणायला लाग आज पासुन!" सिध्दु चहाचा ग्लास ठेवत म्हणाला.
" ते नाही ना जमणार आता. चाळीतच ठिक होतो बे आपण!"
" अरे पण झालयं काय? गुड माॅर्निंग तर म्हणतात सगळे रोज!"

अम्या आणि सिध्दु उठले आणि म्हणाले
" हा समजल तु चहाचे पैसे दे, आयला गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता." रोज सारखी म्हण म्हणत अम्या निघाला. मागुन मी आवाज देत होतो.
" अम्या यार सकाळी पाकीट कोण आणत? पैसे नाहीत माझ्याकडे."
" उधारी कर! खात्यात लिहुन ठेवेल तो!"
" अबे पण?"
ते ऐकायच्या मुड मध्ये नव्हते आणि मी बरा बकरा भेटलो सकाळीच दोघांना म्हणत टपरी वाल्या कडे बघितल. तो समजला आणि खोचक हसत गुड माॅर्निंग म्हणाला.