Choupadi - Ek Bhook - 2 books and stories free download online pdf in Marathi

चौपाडी - एक भूक! - ०२

आतापर्यंत आपण बघीतले,

नेपाळी कुटुंबाच्या स्थलांतराने केवळ त्यांच्या कुटुंबियांचेच स्थलांतर झाले नव्हते. तर, सोबतंच त्यांच्या अनिष्ट रूढी-परंपरा यांचे देखील स्थलांतर घडून आले. त्यातीलंच एक म्हणजे, "चौपाडी प्रथा!"

आता पुढे!

भावरूपा जिवाच्या आकांताने ओरडत दित्याला चौपाडीवर पाठवण्याचा विरोध करू लागली!

दित्या आणि भावरूपाची आई दोघींना काहीच सुचेना!

"आमा, काय झाले? रडू नकोस ना तू." दित्या रडकुंडीला आली.

"कसं सांगू दित्या तुला, गाम्म्यासोबत जे काही घडले, त्याचा अनुभव मला चौपाडी वर असताना आला आहे!!" भावरूपा आता हुंदके देत ओक्साबोक्सी रडू लागली.

"काय?????" दित्या आणि हजुरआमा आश्चर्यचकित होऊन भावरूपाकडे बघू लागल्या.

"हो आमा, म्हणूनच मी दित्याला चौपाडी जायला नको म्हणत होते!" भावरूपाने रडतंच सांगीतले.

"पण, हे कधी घडले? आणि कोणी केले? काही सांगशील का?" हजुरआमाने गोंधळून विचारले.

"उद्गम…!!" भावरूपा जागेवरून उठत म्हणाली.

उद्गम हा त्या तांड्याचा प्रमुख होता. नेपाळी कुटुंब इथे स्थायिक झाल्यापासून त्याने स्वतःचा दबदबा निर्माण केला होता.

"काय??? उद्गम???" दित्या आणि हजुरआमा अवाक होऊन एकमेकींकडे बघू लागल्या.

"हो, उद्गम! या तांड्याचा प्रमुख. आजवर कितीतरी मुली आणि बायकांचा त्याने चौपाडीवर उपभोग घेतला." भावरूपा हुंदके देत मोठ्याने रडू लागली.

भावरूपाची ही अवस्था बघून हजुरआमाने तिला मिठीत घेत धीर दिला.

"नको ग पोरी, त्या चौपडीच्या नावाखाली इतकी क्रूर मानसिकता दडून असल्याची साधी कल्पना ही कोणी केली नसेल!" हजुरआमाने तिला छातीशी घट्ट कवटाळले.

"दित्याचं काय आमा? तिला आपण यातून कसं वाचवणार?" घाबरट स्वरात भावरूपाने विचारले.

थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. नंतर हजुरआमा जागेवरून उठत बोलू लागली.

"पोरी जर एका मार्गावर अडथळे असतील तर, ती वाट सोडून दुसऱ्या वाटेने जाणे कधीही चांगले!" हजुरआमाने तिची समजूत काढली.

"म्हणजे?" भावरूपाला प्रश्न पडला.

"तू, मी आणि दित्या हा तांडा सोडून निघून जाऊ." हजुरआमाने युक्ती सुचवली.

"पण, जायचे कुठे? इथे आपले कोण आहे? बाहेर आपल्याला दुसऱ्या देशातले म्हणून हीन वागणूक देण्यात येते." भावरूपाने वास्तविकता मांडली.

या सर्वात माञ छोटी दित्या वेगळ्याच विचारात होती आणि तिने तो बोलूनही दाखवला.

"आमा, हजुरआमा आपणच का जायचं इथून? आपली यात काय चुक? मग आपण का आपली वाट सोडायची? ते काही नाही, मी इथून जाणार नाही." असं म्हणत दित्या हट्टाला पेटली.

"अग पण, उद्गम वाईट आहे आणि या तांड्याचा प्रमुख! आपण त्याचा सामना करू शकणार नाही." हजुरआमा तिची समजूत काढत म्हणाली.

"आपण सामना करू शकणार नाही, हाच विचार करतो. पण सामना कसा करायचा हा विचार कधीच करत नाही!" छोटी दित्या चिडून म्हणाली.

"म्हणजे?" दोघींनी आश्चर्याने तिला प्रश्न केला.

"हजुरआमा तूच शिकवलं आहेस ना, त्रास देणाऱ्याला सोडायचं नाही. आपण ही तेच करणार. आज मी चौपाडी वर जाणार." दित्याने तिचा विचार बोलून दाखवला.

"काय? मघाशीच बोललीस जायचं नाही! आता काय झाले?" भावरूपा आश्चर्यचकित होत म्हणाली.

"हो, कारण तेव्हा मी माझ्या एकटीचा विचार केला होता पण, आता मला पूर्ण तांड्यातील लहान मुली आणि बायकांना वाचवायची युक्ती सुचली आहे." दित्या खंबीरपणे उभी राहत म्हणाली.

"कसली युक्ती?" भावरूपाने उत्सुकतेने विचारले.

दित्याने दोघींना स्वतःची योजना सांगीतली आणि त्यावर दोघींनी खूप विचार केला. शेवटी अर्ध्या तासाने दोघींनी तिच्या योजनेवर विचारपूर्वक सहमती दर्शवली.

सध्या दित्याला मासिक पाळी आल्याचे कोणालाही सांगण्यात आले नव्हते. त्यांच्या योजनेनुसार सायंकाळी खेळ सुरू होणार होता!

भावरूपा गाड्यावर निघून गेली. हजुरआमा आज घरीच थांबून राहिली. दित्या विषयी तांड्यात माहिती पसरण्याचा भीतीने तिने दित्याला एकही सेकंद स्वतःच्या नजरेआड जाऊ दिले नाही.

दुपार पर्यंत भावरूपा घरी परतली. आज तिची चांगलीच कमाई झाली होती. पण दित्याच्या काळजीने तिला बैचेन केले होते.

तिघींनी थोडी विश्रांती घेतली. सायंकाळी योजनेनुसार हालचाली सुरू झाल्या!

तिघी मिळून उद्गमचा सामना करू शकतील का? बघूया पुढील भागात!
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.