Choupadi - Ek Bhook - 1 books and stories free download online pdf in Marathi

चौपाडी - एक भूक! - ०१

परिचय :

"चौपाडी - एक भूक!" ही माझी नवीन कथा.

सदर कथा ही "लघुकथा संग्रह" या स्पर्धेकरिता लिहिण्यात येणार आहे.

थोडक्यात कथेचा विषय हा एका अशा सामाजिक समस्येला मांडतो; ज्याविषयी कुठेच वाच्यता केली जात नाही!

लोकांच्या स्थलांतरा सोबतंच अनिष्ट रूढी-परंपरा यांचे देखील स्थलांतर होऊन अमानुष कृत्य घडण्यास कसा वाव मिळतो; हे या कथेतून मांडण्याचा प्रयत्न असेल.

सदर कथेला भरभरून प्रतिसाद मिळावा हीच एक इच्छा!

कथेत काही शब्द नेपाळी भाषेत लिहिण्यात आले आहेत. ज्याची पूर्वकल्पना देणे येथे गरजेचे ठरते. ते शब्द खालीलप्रमाणे -

आमा - आई
हजुरआमा - आजी
बुबा - वडील/बाबा

सदर कथेतील पात्रांची नावे नेपाळी आहेत. कथा लिहिताना पुरेसे संशोधन करणे गरजेचे होतेच आणि ते अपेक्षेप्रमाणे केले गेले आहेतंच!

तरीही वाचकांना काही आक्षेप असल्यास त्यांनी ते समिक्षेत नोंदवावे जेणेकरून त्यांचे निरसन करता येईल.

"आमा, आमा….!" स्नानगृहातून दित्या मोठ्याने ओरडू लागली.

आवाज ऐकून बाहेर वडे तळत बसलेली भावरूपा पळतंच स्नानगृहात शिरली.

रोजगारासाठी नेपाळहून साधारण काही वर्षांपूर्वी स्थलांतर होऊन महाराष्ट्रातील एका छोट्या तांड्यात स्थायिक झालेलं हे कुटुंब! स्थलांतर फक्त याच कुटुंबाचे झाले नव्हते; तर यांच्यासोबत काही नेपाळी कुटुंब ही त्या ठिकाणी वास्तव्यास होती.

घरात पुरुषांपैकी कोणीच नसल्याने भावरूपा छोटा गाडा चालवून कुटुंबाचा सांभाळ करायची.

दिसायला गहूवर्णीय पण आकर्षक!, तिचे डोळे तिच्या चेहऱ्याची शोभा आणखीच वाढवत! शरीराचा प्रत्येक अंग कोणालाही मोहून टाकणारा, अशी ही भावरुपा!

दित्या हुबेहूब तिची प्रतिकृती!

भावरुपाने जाऊन बघितले, तर तिची मुलगी दित्या, रक्ताने माखलेला मोठा रुमाल अंगाला गुंडाळून एका कोपऱ्यात गोंधळलेल्या मनःस्थितीत उभी होती.

मुलीची गोंधळलेली अवस्था पाहून तिथल्या परिस्थितीचा अंदाज तिला आलाच होता. भावरूपा माघारी आली आणि खोलीत ठेवलेल्या एका गाठोड्यातून तिने सुतीकापडाचा एक मोठा तुकडा चरकन कापला.

पळतंच ती दित्या जवळ गेली आणि तिला जवळ घेत शांत केले.

"ना, ना. माझं बाळ! रडायचं नाही. तुला काहीही होणार नाही." भावरूपाने दित्याला छातीशी घट्ट कवटाळले.

"आमा, काय झालं हे? एवढे रक्त?" दित्याने प्रश्नार्थक नजरेने विचारणा केली.

"काही नाही बाळ, तुला आता असं दर महिन्याला होत जाईल. याला मासिक पाळी म्हणतात." भावरूपाने दित्याची समजूत काढली.

"अच्छा, इंदू ताई जसं म्हणाली होती. आमा, म्हणजे आता मी मोठे झाले ना?" दित्याने निरागसपणे प्रश्न केला.

"हो बाळा." भावरूपाच्या मनात भीती असून देखील ती दित्याच्या प्रश्नांना शांतपणे उत्तरली!

"आमा, तू पण मला बाकीच्यांसारखं चौपाडी वर पाठवणार?" दित्याने घाबरतंच विचारले.

हे ऐकून भावरूपाच्या मनात धस्स झाले.

दित्याच्या त्या भोळ्या प्रश्नावर काय बोलावे हेच भावरूपाला समजेना! कारण, "चौपाडी प्रथा" मान्य केली नाही तर, त्यांच्या तांड्याचा रोष त्या माय लेकींना पत्करावा लागणार होता!

या विचारानेच तिचा थरकाप उडाला. इतक्या मुश्किलीने त्यांना स्थलांतरानंतर राहायला जागा मिळाली होती आणि आता प्रथेच्या विरोधात गेलो; तर आहे ते ही हातून निसटायचं म्हणून तिने दित्याची समजूत काढायला सुरुवात केली.

"बाळा, फक्त काहीच दिवसाची गोष्ट आहे. परत चार दिवसांनी तू घरीच येणार ना." भावरूपा निराश होत म्हणाली.

"आमा, पण तुला माहीत आहे ना, आपली गाम्म्या! तिचे काय झाले?" दित्या घाबरट स्वरात बोलून गेली.

गाम्म्याचं नाव ऐकून भावरूपाच्या मनात दित्याविषयी काळजी निर्माण झाली.

गाम्म्या ही दित्यापेक्षा वर्षभर मोठी. त्यामुळे तिची मासिक पाळी आधी सुरू झाली होती. "चौपाडी प्रथा" जरी मूळ नेपाळची असली; तरी स्थलांतरानंतर सुद्धा तांडा ती प्रथा पाळत असे.

"चौपाडी" मुळे गाम्म्याला चार दिवस बाहेर एका झोपडीत म्हणजेच चौपाडीत राहावे लागले होते. पण, दुसऱ्याच दिवशी ती गायब झाल्याची बातमी पूर्ण तांड्यात पसरली. शोध घेतला गेला; पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. चार दिवसांनी तिचे मृत शरीर तिच्या घरच्यांच्या हाती लागले होते. तांड्याची बदनामी सोबतंच वास्तव्याचे ठिकाण गमवावे लागण्याच्या भितीपोटी तांडा प्रमुखाने सर्वांना शांत केले होते.

भावरूपाला दित्याची जास्तच काळजी होती. कारण, भावरूपाची सासू दित्याला चार दिवस बाहेर राहायला भाग पाडेल हे ठरले होतेच. काही केल्या दुसरा पर्याय नव्हताच!

भावरूपा रागातंच दित्याला स्नानगृहाबाहेर घेऊन आली.

"काय मग? चौपाडी ना?" हजुरआमाने कुतूहलाने विचारले.

"हो, पण मी काय म्हणते! जर, दित्या चौपाडी न जाता इथेच राहिली तर?" भावरूपाने न घाबरता विचारले.

"नाही, बिलकुल नाही! चौपाडी गेलं नाही तर लोकं आपल्याला वाळीत टाकतील. काय माहीत हाकलून दिले तर? आपण जाणार कुठे?" हजुरआमा तिच्यावर हिसकावत म्हणाल्या.

"पण आमा, गाम्म्या बद्दल तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे! नाही का?" भावरूपा आठवण करून देत म्हणाली.

"ते काही नाही, दित्याला चौपाडी जावंच लागेल." भितीपुर्ण नजर लपवत हजुरआमा म्हणाल्या.

"नाही आमा, मी दित्याला चौपाडी जाऊ देणार नाही!" भावरूपाने ठामपणे सांगीतले.

"भावरूपा, ऐक माझं. तांड्यातले आपल्याला जगू देणार नाहीत. त्यातल्या त्यात उद्गम! नाही नाही!" हजुरआमा तिची विनवणी करू लागल्या.

"तांड्यातले आपल्याला जगू देणार नाहीत; म्हणून सर्व काही माहीत असून देखील मी तिला त्या नरकात ढकलून देऊ?" भावरूपा चिडून म्हणाली.

"अग पण, जे त्या मुलीबाबतीत घडले; ते आपल्या दित्या बाबतीत घडेलंच, हे कशावरून?" हजुरआमाने तिची समजूत काढली.

"नाही! मी माझ्या दित्याला तिथे पाठवणार नाही." भावरूपा दित्याला जवळ घेत मोठ्याने रडू लागली.

चौपाडी प्रथेचा आणि भावरुपाचा काय संबंध ज्यामुळे तिचे अश्रू अनावर झाले होते? बघूया पुढील भागात!
.
.
.
.
क्रमशः

© खुशाली ढोके.