Kush - 1 books and stories free download online pdf in Marathi

कूस! - ०१.

"गळफास लावून नववधूची आत्महत्या!"

या घटनेने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले! कारण ती नववधू दुसरी तिसरी कोणी नसून एका प्रतिष्ठित माजी कॅबिनेट मंत्र्याची सून होती. पण त्यांना यावर्षी तिकीट देण्यात न आल्यामुळे ते राजकारणातून बाहेर पडले होते.

घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. बाहेर लोकांची गर्दी जमली, तर काही लोकं समूहात कुजबुज करत उभी राहून आत ढुंकून पाहण्याचा प्रयत्न करू लागली.

पंचनाम्या नंतर आतील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णालयात रवाना करण्याचे वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले आणि पोलिसांची मुख्य तुकडी घटनास्थळी तपासणी करण्यात व्यस्त झाली.

ज्या खोलीत घटना घडली होती; ती खोली इथून पुढचे २४ तास पोलिसांच्या निरीक्षणात राहणार होती. त्यामुळे घरातील बाकी मंडळींना दुसऱ्या खोल्या ठरवून देण्यात आल्या. त्यांच्यावर पोलिसांची कडक नजर असणार होती!

घटना घडलेली खोली पोलिसांनी बंदिस्त करवून घेतली. घरातील प्रत्येक सदस्यांवर पोलिसांची बारीक नजर होतीच. कारण बहुतांश गुन्हे जवळच्या लोकांकडून घडवून आणल्याचे पुरावे कमी नव्हते! सर्व सदस्यांना दिवाणखान्यात बोलावण्यात आले.

राजकीय पार्श्वभूमी असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावरील हावभावातून वेगळाच रुतबा दिसून येत होता. माञ तो किती वेळ टिकून राहील याचा अंदाज देखील त्यांना नव्हता!

पोलीस उप निरीक्षक संजीव नाईक यांना या गुन्ह्याच्या तपासणीचे आदेश देण्यात आले. अशा प्रकारच्या गुन्ह्यात गुन्हेगार ४८ तासांच्या आत गजाआड करण्याचा दांडगा अनुभव त्यांना होता.

घटनेची माहिती मिळताच काही मिनिटांच्या आतंच ते घटनास्थळी दाखल झाले होते. आता पर्यंतच्या तपासातील मुद्दे त्यांनी कनिष्ठांकडून मागवून घेतले आणि विचारपूरस करायला सुरुवात केली.

सोफ्यावर वेगळ्याच रुबाबात बसत एक गंभीर कटाक्ष समोर बसलेल्या व्यक्तीवर टाकला आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली!

"काय मग पाटील साहेब, शेवटी गाठ पडलीच म्हणायची?"

यावर पाटील निरीक्षकांना कर्तव्याची जाण करून देत बोलले!

"हे काय वायफळ बोलणं? कामाचं बोला!"

पाटील चिडतंच बोलले. सरळ बसत संजीव नाईक यांनी एक नजर फाईल वर टाकली आणि पुढे बोलू लागले.

"असं कसं चालणार साहेब? कारण नसता तुम्ही आमची बदली केली; आता कारण असून सुद्धा आम्ही गपच बसायचं का?"

"काय बोलायचं ते स्पष्ट बोला?"

एक भुवई उंचावत पाटील म्हणाले.

"हो हो, स्पष्टच बोलणार आहे. बरं, मला सांगा तुमची सून स्वभावाने कशी होती? म्हणजे घरच्यांशी काही भांडण वगैरे?"

"नाही!"

"शेजाऱ्यांशी काही वैर? किंवा मग बाहेर अनैतिक संबंध वगैरे?"

"नाही!"

संजीव नाईक यांनी पाटलांना परत दोन चार प्रश्न केले. त्यावर माञ उडवाउडवीची उत्तरं देताना पाहून निरीक्षकांनी थेट पाटलांच्या बायकोला प्रश्न केला.

"पाटील बाई तुम्हीच सांगा, तुम्हाला सुनेकडून काही त्रास तर नव्हता ना?"

प्रश्न विचारताना पाहून पाटील साहेबांनी डोळे मोठे करत बायकोला दम भरला. तशाच खाली मान घालून त्या गप्प बसल्या! त्यांच्या अशा संशयास्पद वागण्यावर पोलीस उप निरीक्षकांना संशय आला.

"काय पाटील साहेब, कोणा-कोणाला गप्प करणार? एक ना एक दिवस तुम्ही आत जाणार म्हणजे जाणार!"

निरीक्षकांना पटलांविषयी पुरेपूर माहिती असल्याने ते असे बोलून गेले.

"आधी पुरावे गोळा करा, मगच मला आत टाकण्याची भाषा करा."

"पुरावे!! ते तर आम्ही गोळा करणारंच!"

वेगळ्या उद्देशाने हसत संजीव नाईक बोलले.

"आणखी काही विचारायचं आहे, की येता?"

"पुरावे गोळा करून लगेच येतो. तोवर तुम्ही सुखानं झोप घ्या!"

"पुरावे मिळाले, की नक्की या."

असं म्हणत पाटील साहेब जागेवरून उठत रागातंच आत निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ बायको आणि त्यांची दोन मुलं ही आत निघून गेली. बाहेर निरीक्षकांनी काही निर्देश देत शिपायांच्या तुकडीला कडक निरीक्षण ठेवण्यास सांगितले; माञ सोबतंच पाटलांच्या कुटुंबातील एकुण एक सदस्यांवर सुद्धा डोळा ठेवायला सांगीतला.

निरीक्षक संजीव नाईक आधी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांकडून माहिती घेणार होते व त्यानंतर पोलीस ठाण्याकडे रवाना होणार होते. या घटने मागील धागे दोरे शोधून काढण्याच्या पूर्ण तयारीत ते लगबगीने बाहेर पडले.

पाटलांच्या विरोधात संजीव नाईक पुरावे गोळा करू शकतील?
.
.
.
.
क्रमशः

©® खुशाली ढोके.