Kush - 3 books and stories free download online pdf in Marathi

कूस! - ०३.

आतापर्यंत आपण पाहिले,

पोलीस उप निरीक्षकांच्या बदलीत पाटलांचा हात असल्यामुळे घटनेच्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणे त्यांच्यासाठी वर्दीला मान मिळवून देण्यासारखे होते!

आता पुढे!

"अतिगुह्यतरं तत्वं सर्वमंत्रौघविग्रहम। पुण्यात् पुण्यतरं चैव परं स्रेहाद् वदामि ते।।"

तिसऱ्यांदा हा मंत्र कानी पडताच नाईकांनी एकच जोरदार काठी बाबाच्या मांडीत घातली!

"आह!!!"

जोरदार बसलेल्या माराने बाबा विव्हळले आणि सांगायला तयार झाले.

नाईकांनी शिपायांना सांगून बाबाचे स्टेटमेंट नोंदवून घेतले. बाबाच्या माहितीनुसार एकूण एक मुद्दा उघडकीस आला.

नाईकांसाठी हे प्रकरण आता स्वतःच्या आत्मसन्माना पुरतेच मर्यादित राहिले नव्हते! तर त्या निष्पाप महिलेवर केल्या गेलेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे रक्त सळसळत होते.

पाटील कुटुंबियांच्या डीएनए सॅम्पलचे तात्काळ आदेश जारी करण्यात आले.

आदेशानुसार काहीच तासात रिपोर्ट्स आल्या आणि सर्व काही उघडकीस आले!

सर्व पुराव्यांच्या जोरावर त्यांनी वकिलांच्या मदतीने पाटील कुटुंबियांच्या विरोधात तक्रार नोंदवली.

पोलिसांची एक तुकडी घेऊन ते आता पाटलांच्या बंगल्याकडे रवाना झाले. बंगल्यावर पोलिसांच्या एका दुसऱ्या तुकडीचा पहारा होताच.

नाईकांसोबत आलेली तुडकी वेळ न दवडता आत शिरली. दिवाणखान्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसोबतंच घरातील काम करणाऱ्या नोकरांना ही बोलावण्यात आले.

पाटलांचा थाट काही औरच! तो पाहून निरीक्षकांना फार राग आला व त्यांनी पाटील कुटुंबीयांनी केलेल्या गुन्ह्यांची यादी वाचून दाखवली.

नाईकांच्या तपासात क्रूर गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले होते!

जसं जसे त्यांच्यावरील आरोप कानावर पडू लागले, तसं तसे पाटील कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत गेले. या आरोपांमुळे पाटलांच्या घरातील नोकरांना देखील घाम फुटला. त्यातल्या एकाने तर चक्क मोठ्याने हंबरडाच फोडला! दोन शिपायांनी पुढे येत त्याला शांत केले.

"तुम्हाला रडायला काय झाले?"

भुवई उंचावत प्रश्न करताच उप निरीक्षक नाईकांच्या आवाजाने तो आणखीच घाबरला.

"नाही साहेब, म्या कायबी केलेलं नाय! आदित्य बाबांनी नोकरीवरनं काढायची धमकी दिली होती म्हणून….!"

पाटलांचा नोकर शंभू घाबरून असल्याने सर्व काही बोलून गेला. त्याच्या या विधानावर मात्र सर्व उघड होणार असल्याची खात्री निरीक्षकांना पटली.

"काय मग पाटील साहेब? आता तरी सांगणार, की आम्ही आपल्या पद्धतीने काढून घ्यायचं?"

"तुम्हाला काय वाटलं, या एका नोकराच्या बोलण्यावरून तुम्ही मला आत टाकाल? छे!! माझं वजन कदाचित तुम्हाला माहीत नसावं!"

"सत्तेत नसून उड्या मरणाऱ्यांचं किती वजन असतं, हे वेगळं सांगायची गरज मला तरी वाटत नाही! सत्तेत असताना तुम्ही आमची बदली केली; याचा अर्थ हा नाही, की आज ही तुम्ही ते करू शकाल! तुम्ही सांगा, आदित्य साहेबांनी त्यांच्या बायकोसोबत काय केले?"

जाब विचारताच शंभू पुरता घाबरला आणि रडत रडतंच त्याने सर्व काही सांगायला सुरुवात केली.

"साहेब, बाईसाहेब भल्या होत्या. या समद्यांनी बाईसाहेबांचा जीव घेतला. नको तितका छळ केला. मुलगा होत नव्हता, म्हणून पाच एळा गर्भापात केला. आदित्य बाबांकडून त्यासनी मुलीच राह्यल्या, म्हून मोठ्या बाईसाहेबांनी पाटील साहेब आणि अमृत बाबा संगट शारिरीक संबंध ठेवायला मजबूर केले! हे समदं या समद्यांनी बाबा चिरागीच्या सांगण्यावरनं केलं. लहान बाईसाहेबांना हा छळ सहन झाला नाही आणि या समद्यांची तक्रार त्या पोलसांत करणार म्हणून त्यासनी संपवण्याचा समद्यांनी कट रचला. पंख्याला लटकवून दिला त्यासनी! आपल्या चुकीचा आम्हास्नी बी भागीदार केला साहेब!"

हे सांगताना अक्षरशः शंभुचे रडून रडून वाईट हाल झाले होते.

"पाटील साहेब, इतका निर्लज्जपणा कुठून आणता? एका बाईला मुलगा होत नाही, म्हणून तिचा छळ करणारी तुमच्यासारखी काही हरामखोर माणसं पाहून मला जीव घ्यावा वाटतो!"

असं म्हणत संजीव नाईक भावनेच्या भरात पाटलांवर धावून गेले. दोन शिपायांनी धरून त्यांना मागे खेचले.

सोबत आलेल्या सहायक पोलिस कर्मचाऱ्यांनी नाईकांना धीर दिला.

"शांत व्हा साहेब!"

यावर पोलीस उप निरीक्षक नाईक चिडून बोलू लागले.

"आता आपण यांची रवानगी थेट न्यायालयीन कोठडीत करणार आहोत! जिथे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा कसा आणि कुठल्या आरोपांखाली दाखल करवून घ्यावयाचा हे मी बघतो. आता तुम्हाला कठोरातली कठोर शिक्षा झालीच म्हणून समजा."

थोडं शांत होत ते पुढे बोलले.

"कॉन्स्टेबल कल्याणी, पाटलीन बाईंना आदरपूर्वक घेऊन या! शिंदे, शिर्के तिन्ही पाटलांना कोठडीत सुजे पर्यंत हाणा, त्यांचा सगळा माज काढा. हरामखोर कुठले! आणि प्रत्येक नोकराकडून बारकाईने माहिती घ्या! नाही दिली, तर त्यांनाही ताब्यात घ्या!"

पाटील कुटुंबियांवर गुन्हे नोंदवून घटनेला पूर्णविराम लागेल, की पोलीस उप निरीक्षक नाईकांसमोर येतील नवीन संकटे?
.
.
.
.
क्रमशः

©® खुशाली ढोके.