Sakshidaar - 8 in Marathi Thriller by Abhay Bapat books and stories PDF | साक्षीदार - 8

साक्षीदार - 8साक्षीदार प्रकरण ८
“ ईशा, तू मागच्या दाराने आत जाऊन पुढचा दरवाजा आतून उघड.मी ही किल्ली पुन्हा होती तिथे खिळ्याला लाऊन पुढच्या दाराने आत येतो. ”
पाणिनी म्हणाला
तिने मान हलवली आणि मागील दार उघडून आत गेली किल्ली पुन्हा पाणिनी कडे दिली.पाणिनी ने दार लाऊन घेतले आणि पुन्हा पुढच्या बाजूला आला.
पाणिनी पुढच्या बाजूला दारा बाहेर आला.ईशा च्या पावलांचा आवाज त्याला आतून आला.तिने दार उघडले.पाणिनी ला दिसलं की हॉल मधला नाईट लँप लागला होता, तिथून वरच्या मजल्या वर जाणारा जिना दिसत होता, हॉल मधील फर्निचर ,आरशाचे कपाट, छत्री चा स्टँड,रॅक या सर्वाकडे त्याचे लक्ष गेले. रॅक वर स्त्रीचा कोट होता.तीन छत्र्या स्टँड वर होत्या.त्या खालून पाण्याचा ओघोळ खाली सांडला होता. त्या पाण्यातून रात्रीच्या दिव्याचा उजेड प्रतिबिंबित होत होता.
“ ऐक. तू बाहेर पडलीस तेव्हा दिवे मालवून बाहेर पडली होतीस?” पाणिनी ने विचारलं.
“ नाही, आत्ता आहेत दिवे तसेच होते. ”
“ म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का ,की तुझ्या नवऱ्याने ज्या माणसाला घरात घेतले,तेव्हा दिवे न लावताच आत घेतले?”पाणिनी ने विचारलं.
“ हो, मला तसच वाटतंय”
“ तुम्ही झोपे पर्यंत जिन्यावर मोठा दिवा चालू ठेवत नाही? हा नाईट लँप च ठेवता लाऊन? ” पाणिनी ने विचारलं.
“ वरचा मजला दधिची वापरायचा कायम, आम्ही त्यात लक्ष घालायचो नाही.”
“ बर.बर, चल वर जाऊ. दिवा लाव जिन्या वरचा.”
तिने दिवा लावल्यावर जिना आणि वरची खोली पूर्ण उजळून निघाली.पाणिनी ला त्याची आणि दधिची अरोरा ची पहिली भेट आठवली.जी खोली उघडून अरोरा त्याला भेटायला बाहेर आला होता,ती आत्ता बंद होती.पाणिनी ने दाराची मूठ फिरवली आणि आत आला.ती एक मोठी अभ्यासिके सारखी खोली होती,आत एक दार बेडरूम मध्ये जात होतं.त्या दारा पासून काही फुटावरच बाथरूम चं दार होतं.बेड रूम मधून बाथरूम मध्ये जायला पण दार होतं.दधिची अरोरा चं प्रेत बाथरूम च्या अभ्यासिकेत उघडणाऱ्या दारात पडलं होत.अंगात टर्किश चा रोब घातला होता.त्याला पाहून ईशा च्या तोंडून एक अस्फुट किंकाळी बाहेर पडली आणि ती पाणिनी ला बिलगली.पाणिनी ने तिला दूर केलं आणि तो खाली प्रेताच्या जवळ गुढग्यावर बसला.अरोरा नि:संशय पणे मेलेला होता.त्याच्या हृदयातून एक बुलेट आरपार गेलेली होती आणि सकृत दर्शनी त्याचा तत्काळ मृत्यू झाला होता.अंगातल्या झग्याला पाणिनी ने स्पर्श करून पहिला तर आतून दमट पण जाणवत होता.पाणिनी ने आपला मोर्चा बाथरूम कडे वळवला.साधारण बाथरूम पेक्षा ही खूप मोठी होती.जमिनीच्या पातळी खाली सुमारे ४ फुट खोल असा टब होता.अरोरा सारख्या देहयष्टीच्या माणसाला साजेसा होता.आठ फुट तरी लांबी असेल.खोलीच्या मध्यभागी मोठे बेसिन होतं.रॅक वर टॉवेल्स व्यवस्थित घड्या करून ठेवलेले होते.पाणिनी ने या सगळ्या गोष्टींवर नजर मारली आणि नंतर ईशा अरोरा कडे वळला.
“ असं दिसतंय की तो अंघोळ करत होता. असं काहीतरी घडलं की त्याला अंघोळ करताना मधेच उठून बाहेर यावं लागलं. टॉवेल्स आहेत तसेच आहेत याचा अर्थ त्याला टॉवेल ने अंग पुसायला सुद्धा वेळ नव्हता.त्याने टर्किश चा रोब अंगात अडकवला आणि बाहेर आला.”
“ मला वाटत आपण टॉवेल थोडे ओलसर करून ठेवले त्याच्या अंगाला लपेटून तर बरे होईल, म्हणजे जणू काही त्याने टॉवेलने अंग पुसायचा प्रयत्न केला असं भासवण्याचे दृष्टीने. ” ईशा ने सुचवलं
“ कशासाठी?” पाणिनी म्हणाला.
“ सहजच, म्हणजे मनात आलं तसं.”
“ नीट लक्ष देऊन ऐक, असा खोटा पुरावा आपण निर्माण करायचा प्रयत्न केला तर आपण आपल्या समोरच्या अडचणी वाढवून ठेऊ.सद्य तरी असं दिसतंय की इथे जे काही घडलंय आणि कधी घडलंय या बद्दल आपल्या दोघांच्या शिवाय कोणालाही माहिती नाहीये. पोलिसांना कळवलं नाही तर ते जाम वैतागातील आणि त्रास देतील.त्यांना वाटेलच की खुनाची बातमी त्यांना सांगण्यापूर्वी तू वकीलांना,म्हणजे मला कशी काय कळवलीस. समजतय ना तुला?”-पाणिनी
पुढे काय काय होणार या अंदाजाने तिने डोळे विस्फारले.मान डोलावली.
“ तू मला ज्या पद्धतीने ही हकीगत सांगितलीस,तशीच तू पोलिसांना सांगणार आहेस, अपवाद फक्त एकच,तुझ्या नवऱ्याशी बोलत असलेला माणूस बाहेर गेल्या नंतर तू वर गेलीस हे सांगायचं नाही. तुझ्या हकीगती मधील हा भाग मला आवडला नाहीये आणि पोलिसांना ही आवडणार नाही.तो माणूस गेल्यावर तुला वर जायचं सुचलं पण मग पोलींसाना फोन करायचं का सुचलं नाही ?अशी शंका ते घेतील.पोलिसांपूर्वी वकीलाला बोलवायची तुला गरज पडली म्हणजे तुझ्या मनात अपराधीपणाची भावना होती असं पोलिसांना वाटेल.” -पाणिनी
“ मी दुसऱ्या एका प्रकरणात तुम्हाला वकील म्हणून नेमले होते, ते प्रकरण याच्याशी एकत्र होवू नये म्हणून तुमचा सल्ला घेण्यसाठी तुम्हाला फोन केला असं मी मोकळे पणाने सांगू शकते की.” ईशा म्हणाली.
पाणिनी हसला. “ काय मस्त गोंधळ उडेल मग ! पोलीस खोदून खोदून विचारतील हे दुसरं प्रकरण काय आहे नेमकं म्हणून.आणि जेव्हा तू सांगशील त्या दुसऱ्या प्रकरणाबद्दल, तेव्हा पोलिसांच्या लक्षात येईल की तुझ्या नवऱ्याला ठार करण्यात सर्वात जास्त फायदा तुझा होता.आपल्याला तातडीने हृषीकेश ला भेटायला पाहिजे आणि हे बघितलं पाहिजे की तो त्याचं तोंड बंद ठेवेल ना. ” –पाणिनी म्हणाला.
“ तो गप्प बसेल हो, त्याची काळजी नाही मला पण मिर्च मसाला चं काय? ते बोंब मारतील ना पेपर त्यांच्या मधून ! ” ईशा घाबरून म्हणाली.
“ तुझ्या हे लक्षात नाही का आलं की दधिची अरोरा च्या मृत्यू मुळे मिर्च मसाला ची तू मालकीण झाल्येस ! त्यांनी काय करावं, काय छापावं हे तू ठरवू शकतेस आता.!” पाणिनी म्हणाला.
“ पण माझ्या नवऱ्याने मला त्याच्या इच्छ्या पत्रात मी मालकीण होऊ नये अशी तरतूद केली असेल तर? ”
“ तर त्या इच्छ्या पत्रा ला आपण दावा ठोकून आव्हान देऊ आणि त्या दाव्याचा निर्णय लागे पर्यंत, तुला प्रशासक म्हणून नियुक्त करायला लावू.” पाणिनी म्हणाला
“ बर तर मग,मी घरातून बाहेर पळाले,पुढे?”
“तुझ्या नवऱ्या बरोबर वर जो माणूस होतं तो निघून जाण्या पूर्वीच तू घाबरून घराच्या बाहेर पळालीस.तू एवढी घाबरली होतीस की रेनकोट घ्यायचे सुध्दा तुला भान नव्हते.स्टँड वर जे दिसलं ते रेनकोट समजून हातात धरून तू पळालीस,प्रत्यक्षात ते पुरुषाचं जर्किन होतं.तू घाबरून घराच्या बाहेर पळत सुटलीस, बाहेर एक गाडी होती पण घाईत तू ती नीट पाहिली सुध्दा नाहीस.कोणती गाडी होती, नेमकी कुठे लावली होती ते काहीही तुला आठवत नाही.तेवढ्यात तो माणूस घरातून झपाटल्या सारखा बाहेर आला आणि गाडीत बसला.आणि गाडीचे हेड लाईट्स त्याने चालू केले,तुला वाटलं की तो तुझा पाठलाग करेल म्हणून तू एका झुडपात लपलीस. तो गाडी घेऊन बाहेर पडला आणि तू त्याचा पाठलाग करायचं ठरवलंस,त्याशिवाय त्याच्या गाडीचा नंबर तुला मिळाला नसता आणि तो माणूस कोण हे तुला शोधता नसतं आलं. ” पाणिनी म्हणाला.
“ समजलं, इथपर्यंत काय सांगायचं ते.पुढे?” ईशा ने विचारलं
“ नंतर तू त्या औषधाच्या दुकाना पर्यंत गेलीस पण त्याचा शेवट पर्यंत पाठलाग नाही करू शकलीस.मग तिथे थांबून मला फोन केलास. तुला हे माहिती नव्हत की तुझा नवरा मेलाय की जीवंत आहे.” पाणिनी ने तिला पढवलं.
“ समजल”
“ तू फक्त गोळीचा आवाज ऐकलास.तुझ्या नवऱ्याने गोळी झाडली आणि त्या माणसाला जखमी केलं की तो माणूस गोळी मारून पळाला हे तुला माहिती नव्हतं. तुला हे ही माहीत नव्हत त्या वेळी की ती गोळी कोणाला लागली की नेम चुकला, तुझ्या नवऱ्याला गोळी लागली होती का, तो किती जखमी झाला, की मेला हे तुला काहीच माहिती नव्हतं तेव्हा. अगदी तुझ्या नवऱ्याने स्वत:ला गोळी घालून घेतली का हे सुध्दा तुला कळायला मार्ग नव्हता. राहील लक्षात, काय सांगायचं ते? ” पाणिनी म्हणाला.
तिने मान डोलावली.
“ हे सगळं जसच्या तसं सांगितलस तर तू मला का बोलावलंस,पोलिसांना बोलावण्यापूर्वी याचा आपोआपच खुलासा होईल. तू मला बोलावल्यावर मी तुला सांगितलं की मी लगेच येतो म्हणून.पण गोळी मारली गेल्याचे तू मला फोन वरून सांगितले नाहीस. तू एवढंच म्हणालीस की मी खूप अडचणीत आहे आणि घाबरली आहे,तेव्हा लगेच या. ” पाणिनी म्हणाला.
“ पण मी तुम्हाला या का म्हणाले? याचा खुलासा पोलिसांनी विचारला तर?” ईशा ने शंका विचारली.
“ असं सांग की मी तुझा जुना स्नेही आहे.” पाणिनी म्हणाला. “ मला वाटतं दधिची अरोरा लोकांत फारसा मिसळत नसावा. ”
“ बरोबर.”
“ हे चांगलं आहे. आपल्या आसपास लोक असतील किंवा पोलीस असतील तेव्हा माझा उल्लेख करताना पाणिनी असाच कर मुद्दाम.म्हणजे आपण खरोखर जुने मित्र आहोत असे वाटेल. ”
“ हो ,चालेल.”
“ तुला बरंच काही सांगितलंय मी,तू लक्षात ठेवशील ना ते सर्व?” पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ ठीक आहे, आपल्याला आता पर्स शोधायला हवी तुझी.” पाणिनी म्हणाला
तिने एका टेबलाचा ड्रॉवर उघडला आत पर्स होती ती बाहेर काढली.
“पिस्तुली चं काय करायचं? ” आपली नजर टेबला खालच्या अंधाऱ्या जागेकडे वळवत तिने विचारलं. “ काहीतरी करू या ” ती म्हणाली
“ पाणिनी ने खाली जमीनीवर पडलेल्या बंदुकी कडे पाहिलं.
“ हा आपल्यासाठी मोठा ब्रेक आहे.” पाणिनी म्हणाला. “ पोलीस आता शोधून काढतील कोणाची आहे ही बंदूक ते.”
“ खून करून खुनी माणूस पिस्तुल इथेच टाकून पळून जाईल हे हास्यास्पदच वाटतंय मला. आपण लपवून ठेवायची का?” ईशा म्हणाली
“ कर ना तसं ! आणि खुलासा देत बस नंतर पोलिसांनी विचारलं की. पोलिसांनाच सापडू दे ती.” पाणिनी म्हणाला.
ती काहीतरी बोलणार तोच पाणिनी ने विचारलं, “ लक्षात आहे ना सगळं?, पक्क?”
तिने होकारार्थी मान हलवली. पाणिनी ने फोन हातात घेतला.
“ पोलीस स्टेशन?” पलीकडून फोन घेतल्याचा आवाज येताच त्याने विचारलं.
( प्रकरण ८ समाप्त)

Rate & Review

Bal Kshirsagar

Bal Kshirsagar 3 months ago

Harshada Bhalerao

Harshada Bhalerao 4 months ago

KALPANA ADHAL

KALPANA ADHAL 11 months ago

Please next part