Sant Eknath Maharaj Ganga read the scripture - 22 books and stories free download online pdf in Marathi

श्री संत एकनाथ महाराज - २२

एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

सात्त्विकः कारकोऽसङगी रागान्धो राजसः स्मृतः । तामसः स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः ॥२६॥

कांटेनि कांटा फेडितां । जेवीं निवारे निजव्यथा । तेवीं संगें संगातें छेदितां । सात्विक कर्ता असंगी ॥४६॥ सदुचरणसत्संगें । सकळ संग छेदी विरागें। सात्विक कर्ता निजांगें । विषयसंगें असंगी ॥४७॥ फळाभिलाषेच्या चित्तीं गांठी । तेणें अंध झाली विवेकदृष्टी । राजस कर्ता फळाशेसाठीं । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥४८॥ निःशेष हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरा वळघे रान । नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥४९॥ अनन्य भावें हरीसी शरण । कर्मचाळक श्रीनारायण । कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥३५०॥ त्रिगुणांची श्रद्धा त्रिविध । निर्गुणाची श्रद्धा शुद्ध । येच अर्थीचें विशद । स्वयें गोविंद सांगत ॥५१॥

एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

सात्त्विक्याध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी । तामस्यधर्मे या श्रद्धा मत्सेवायां तु निर्गुणा ॥२७॥

देह इंद्रिय चेतना प्राण । येणेंसीं स्फुरे जें मीपण । तेथ विवेक करुनियां पूर्ण । आपुलें मीपण आपण पाहे ॥५२॥ देह नव्हें मी जडमूढत्वें । इंद्रियें नव्हें मी एकदेशित्वें । प्राण नव्हें मी चपळत्वें । मन चंचळत्वें कदा मी नव्हें ॥५३॥ चित्त नव्हें मी चिंतकत्वें । बुद्धि नव्हें मी बोधकत्वें । ’अहं’ नव्हें मी बाधकत्वें । मी तों येथें अनादिसिद्ध ॥५४॥ एवं मीपणाचें निजसार । विवंचूं जाणे बुद्धिचतुर । ते अध्यात्मश्रद्धा उदार । सात्विक नर सदा वाहती ॥५५॥ जें जें मी नव्हें म्हणत जाये । तें मी देखिल्या मीचि आहें । माझ्या मीपणाचे वंदिल्या पाये । मीचि मी ठायें कोंदोनी ॥५६॥ हे आध्यात्मिकी शुद्ध श्रद्धा । सात्विकापाशीं वसे सदा । आतां राजसाची श्रद्धा । ऐक प्रबुद्धा सांगेन ॥५७॥ मी एक येथें वर्णाश्रमी । मी एक येथें आश्रमधर्मी । मी एक येथें कर्ता कर्मी । हें मनोधर्मी दृढ मानी ॥५८॥ येणें भावार्थें कर्मतत्परु । कुशमृत्तिकेचा अत्यादरु । अतिशयें वाढवी शौचाचारु । विधिनिषेधां थोरु आवर्त भोंवे ॥५९॥ दोषदृष्टीच्या रंगणीं । मिरवती गुणदोषांच्या श्रेणी । पवित्रपणाच्या अभिमानीं । ब्रह्मयासी न मनी शुचित्वें ॥३६०॥ देहाभिमान घेऊनि खांदा । सत्य मानणें कर्मबाधा । ते हे राजसाची कर्मश्रद्धा । जाण प्रबुद्धा उद्धवा ॥६१॥ अधिक अविवेक वाढे । जेणें अकर्म अंगीं घडे । अधर्माची जोडी जोडे । हे श्रद्धा आवडे तामसी ॥६२॥ जेथ अपेयाचें पान । स्वेच्छा अभक्ष्यभक्षण । अगम्यादि घडे गमन । हे श्रद्धा संपूर्ण तामसी ॥६३॥ अधर्म तोचि मानी धर्म । हें तामसी श्रद्धेचें वर्म । आतां निर्गुणश्रद्धा परम । उत्तमोत्तम ते ऐक ॥६४॥ सर्व भूतीं भगवंत । ऐशिये श्रद्धे श्रद्धावंत । अनन्य भावें भूतां भजत । तो भजनभावार्थ निर्गुण ॥६५॥ स्त्री पुत्र वित्त जीवित । मजलागीं कुरवंडी करित । अनन्य भावें जे मज भजत । ते श्रद्धा निश्चित निर्गुण ॥६६॥ चारी पुरुषार्थ त्यागिती । उपेक्षूनि चारी मुक्ती । ऐक्यभावें मज भजती । ते श्रद्धासंपत्ती निर्गुण ॥६७॥ निष्काम नामस्मरण । निर्लोभ हरिकीर्तन । भावार्थें जें जें भजन । ते श्रद्धा निर्गुण उद्धवा ॥६८॥ त्रिगुणांचा त्रिविध आहारु । स्वयें सांगे शार्ङगधरु । निर्गुण आहाराचा प्रकारु । सखोल विचारु हरि सांगे ॥६९॥

एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

पथ्यं पूतमनायस्तमाहार्यं सात्त्विकं स्मृतम् । राजसं चेन्द्रियप्रेष्ठं तामसं चार्तिदाशुचि ॥२८॥

पवित्र आणि हळुवार । सत्यवृद्धीसी हितकर । अप्रयासीं प्राप्ति साचार । सात्विक आहार या नांव ॥३७०॥ अल्पाहार या नांव पथ्य । पवित्र म्हणिजे धर्मार्जित । तेंही अप्रयासानें प्राप्त । तो जाण निश्चित सात्विकाहार ॥७१॥ गोड खरपूस आंबट । तळींव घोळींव तिखट । चिरींव चोळींव तुरट । वळींव वळिवट आळिलें ॥७२॥ रसीं रसांतरमिळणी । पन्हीं कालवणीं शिखरिणी । कुडकुडीं निर्पूस सणाणी । आहारभरणी राजस ॥७३॥ नाना परींच्या आवडी । सडिवा सोलिवा परवडी । रसनासुखाची अतिगोडी । तो आहार निरवडी राजस ॥७४॥ नाना परींचे आयास । करुनि अतिप्रयास । आहार सेविती राजस । ऐक तामस भोजन ॥७५॥ सेवितां दुर्गंधि उन्मादक । परिपाकें करी मूर्ख । अशुचि आणि दुःखदायक । हा आहार देख तामस ॥७६॥ भगवंताचा भुक्तप्रमाद । साधुसज्जनांचें शेष शुद्ध । हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ’च’ कारें गोविंद बोलिला ॥७७॥ ग्रासोग्रासीं गोविंद । येणें स्मरणें अन्न शुद्ध । हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ’च’ कारें गोविंद बोलिला ॥७८॥ ’अन्नं ब्रह्म अहं च ब्रह्म’ । पंक्तीकर तोही ब्रह्म । ऐसा ज्याचा भोजनानुक्रम । तो आहार परम निर्गुणत्वें ॥७९॥ त्रिगुणांचें त्रिविध सुख । निर्गुण सुख अलोलिक । त्याही सुखाचा परिपाक । यदुनायक स्वयें सांगे ॥३८०॥