Shri Sant Eknath Maharaj 7, Naam Mahatmya. in Marathi Spiritual Stories by Sudhakar Katekar books and stories PDF | श्री संत एकनाथ महाराज ७, नाम महात्म्य.

Featured Books
Categories
Share

श्री संत एकनाथ महाराज ७, नाम महात्म्य.

श्री संत एकनाथ महाराज नाम महात्म

श्र्लोक ३७

ह्यतः परमो लाभो, देहिनां भ्राम्यतामिह

यतो विन्दत परमां शान्तिं नश्यति संसृतिः ॥३७॥

जे जन्ममरणांच्या आवर्तीं पडिले, संसारीं सदा भ्रमती

त्या प्राणियां कलियुगाप्रती कीर्तनें गती नृपनाथा ॥२२॥

कलियुगीं कीर्तनासाठीं संसाराची काढूनि कांटी

परमशांतिसुखसंतुष्टीं पडे मिठी परमानंदीं ॥२३॥

ऐसा कीर्तनीं परम लाभु शिणतां सुरनरां दुर्लभु

तो कलियुगीं झाला सुलभु यालागी सभाग्यां लोभु हरिकीर्तनीं ॥२४॥

'कीर्तनास्तव चारी मुक्ती भक्तांपासीं वोळंगती

हें घडे ' कोणी म्हणती ऐक ते स्थिती नृपनाथा ॥२५॥

कीर्तनीं हरिनामाचा पाठा तेणें देवासी संतोष मोठा

वेगीं सांडोनि वैकुंठा धांवे अवचटा कीर्तनामाजीं ॥२६॥

हरिकीर्तना लोधला देवो विसरला वैकुंठा जावों

तोचि आवडला ठावो भक्तभावो देखोनी ॥२७॥

जेथ राहिला यदुनायक तेथचि ये वैकुंठलोक

यापरी मुक्ति 'सलोक' कीर्तनें देख पावती भक्त ॥२८॥

नामकीर्तन-निजगजरीं भक्तां निकट धांवे श्रीहरी

तेचि 'समीपता' मुक्ति खरी भक्तांच्या करीं हरिकीर्तनें ॥२९॥

कीर्तनें तोषला अधोक्षज भक्ता प्रत्यक्ष गरुडध्वज

श्याम पीतवासा चतुर्भुज तें ध्यान सहज ठसावे ॥४३०॥

भक्तु कीर्तन करी जेणें ध्यानें तें ध्यान दृढ ठसावें मनें

तेव्हां देवाचीं निजचिन्हें भक्तें पावणें संपूर्ण ॥३१॥

श्याम चतुर्भुज पीतांबरधारी शंखचक्रादि आयुधें करीं

हे 'सरूपता' भक्तातें वरी कीर्तनगजरीं भाळोनी ॥३२॥

तेव्हां देव भक्त समसमान समान अवयव सम चिन्ह

भावें करितां हरिकीर्तन एवढें महिमान हरिभक्तां ॥३३॥

दोघां एकत्र रमा देखे देवो कोण तेंही नोळखे

ब्रह्मा नमस्कारीं चवके देवो तात्विकें कळे त्यासी ॥३४॥

भावें करितां हरिकीर्तन तेणें संतोषे जनार्दन

उभयतां पडे आलिंगन मिठी परतोन सुटेना ॥३५॥

तेव्हां सबाह्यांतरीं देवो प्रगटे चराचरीं

दुजें देखावया संसारीं सर्वथा उरी उरेना ॥३६॥

वृत्ति स्वानंदीं निमग्न परतोनि कदा नव्हे भिन्न

'सायुज्यमुक्ति' या नांव पूर्ण जेणें दुजेपण असेना ॥३७॥

ऐशी लाहूनि पूर्ण सायुज्यता तो जैं करी हरिकथा

ते कथेची तल्लीनता जीवां समस्तां अतिप्रिय ॥३८॥

यापरी हरिकीर्तनापासीं चारी मुक्ती होती दासी

भक्त लोधले हरिभजनासी सर्वथा मुक्तीसी घेती ॥३९॥

एवं योगयागादि तपसाधनें पोरटीं केलीं हरिकीर्तनें

कलियुगीं नामस्मरणें जड उद्धरणें हरिकीर्तनीं ॥४४०॥

श्लोक ३८ वा


कृतादिषु प्रजा राजन्‌, कलाविच्छन्ति संभवम्

कलौ खलु भविष्यन्ति, नारायणपरायणाः ॥३८॥

कीर्तनासाठीं चारी मुक्ति हेचि कलियुगीं मुख्य भक्ति

यालागीं इंद्रादि देवपंक्ति जन्म इच्छिती कलियुगीं ॥४१॥

स्वर्ग नव्हे भोगस्थान हें विषयाचें बंदिखान

कलियुगीं सभाग्य जन जन्मोनि कीर्तन हरीचें करिती ॥४२॥

जेथींच्या जन्मा देव सकाम तेथ कृतादि युगींचे उत्तमोत्तम

प्रजा अवश्य वांछिती जन्म कीर्तनधर्म निजभजना ॥४३॥

कृतयुगींचे सभाग्य जन यागीं पावले स्वर्गस्थान

तेही कलियुगींचें जाण जन्म आपण वांछिती ॥४४॥

कृत त्रेत आणि द्वापर तेथीलही मुख्य नर

कलियुगीं जन्म तत्पर निरंतर वांछिती ॥४५॥

तैंचे लोक करिती गोष्टी चारी पुरुषार्थ कीर्तनासाठीं

कलियुगीं हे महिमा मोठी धन्य धन्य सृष्टीं कलियुग ॥४६॥

जे असती धन्यभागी ते जन्म पावती कलियुगीं

ऐसें कलीच्या जन्मालागीं नर-सुर-उरगीं उत्कंठा ॥४७॥

तरावया दीन जन कलीमाजीं श्रीनारायाण

नामें छेदी भवबंधन तारी हरिकीर्तन सकळांसी ॥४८॥

यालागीं कलिमाजीं पाहीं श्रद्धा हरिकीर्तनाच्या ठायीं

जन तरती सुखोपायीं संदेहो नाहीं नृपनाथा ॥४९॥

कलियुगीं बहुसाल नर होतील नारायणीं तत्पर

भक्तीचें भोज विचित्र स्त्रीशूद्र माजविती ॥४५०।।

श्लोक ३९ व ४० वा


क्वचित् क्वचिन्महाराज, द्रविडेषु च भूरिशः ।

ताम्रपर्णी नदी यत्र, कृतमाला पयस्विनी ॥३९॥

कावेरी च महापुण्या, प्रतीची च महानदी ।

ये पिबन्ति जलं तासां, मनुजा मनुजेश्वर ।

प्रायो भक्ता भविष्यन्ति वासुदेवोऽमलाशयाः ॥४०॥

विशेषें द्रविड देशाचे ठायीं । अतिशयें भक्ति वाढेल पाहीं ।

तेथेंही तीर्थविशेष भुयी । ते ते ठायीं अतिउत्कट ॥५१॥

ताम्रपर्णीच्या तीरीं । हरिभक्तीची अगाध थोरी ।

कृतमालेच्या परिसरीं । उत्साहेंकरीं हरिभक्ति नांदे ॥५२॥

निर्मळजळा पयस्विनी । जीचिये पयःप्राशनीं ।

वृत्ति वाढे हरिचरणीं । भगवद्भभजनीं दृढ बुद्धी ॥५३॥

देखतां कावेरीची थडी । पळती पापांचिया कोडी ।

जेथ श्रीरंगु वसे आवडीं । तेथें भक्ति दुथडी उद्भट नांदे ॥५४॥

प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुद्धि जोडे रोकडी ।

भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥५५॥

ऐकें नरवरचूडामणी । या पंचनदींचिया तीर्थस्त्रानीं ।

अथवा पयःप्राशनीं । भगवद्भजनीं दृढ बुद्धी ॥५६॥

या तीर्थांचें केल्या दर्शन । होय कलिमलक्षालन ।

केल्या स्त्रान पयःप्राशन । भगवद्भजन उल्हासे ॥५७॥

दर्शन स्पर्शन स्त्रान । या तीर्थींचें करितां जाण ।

वासुदेवीं निर्मळ भजन । नित्य नूतन दृढ वाढे ॥५८॥

यापरी जे भगवद्भक्त । ते ऋणत्रयासी निर्मुक्त ।

सुरनरपितरां पंगिस्त । हरिभक्त कदा नव्हती ॥५९॥