perjagadh - 30 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - ३०




३०. रितूची आणि मृत्युदेवाची गाठ....

इकडे आचार्य निघून गेल्यावर हॉस्पिटलमध्ये रितू एकटीच माझ्यापाशी बसली होती.आचार्यांना बघून तिच्यात एक तरतरी आली असल्याची, खूण मात्र तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होती.आता लवकरच आणि निश्चितच काहीतरी मार्ग निघणार असे वारंवार तिला वाटत होते.खिडकीतून येणाऱ्या मंजुळ हवेचे चेहऱ्यावर झोत घेत ती बेडपाशी आली.जवळ असूनसुद्धा पुन्हा नव्याने ती माझ्या शरीराकडे बघत होती.कधी श्वास घेताना सुई...असा आवाज आला की डोळे एकवटून चेहऱ्याकडे बघायची.कदाचित मी डोळे उघडणार हा भास मनी घेऊन.

इतक्यात दंडावरच्या ताईताने माझ्यावरचा यमराज घालवला होता.त्यामुळे शरीरावर बराच फरक जाणवत होता.शरीरावर पडलेल्या बऱ्याच वळांना उभारतांना बघून रितू थोडीफार निश्चिंत झाली होती.हळूच तिने ओढणीचा चंबू घेऊन माझ्या चेहऱ्यावर जमा झालेल्या थेंबांना पुसून काढले आणि एक चुंबन कपाळावरचे घेत केसांवर हात फिरवत राहिली. न जाणे माझ्यासोबतच्या कोणत्या विश्वात रममाण झाली तिचे तिलाच ठावूक.कारण नर्सने येऊन सगळं काही चेक करून गेली तरी तिचं थोडंसंही लक्ष तिच्याकडे नव्हतं.तिला माझ्यासोबतचे ते शेवटचे क्षण आठवत होते.ती सारखी मला अडवत होती आणि मी तिला अव्हेरत होतो.अचानक तिला आचार्यांनी दिलेल्या पुस्तकाची जाणिव झाली.

त्यासरशी ती हळूच उठली.आणि ते पुस्तक घेऊन ती परत माझ्या बेडपाशी येऊन बसली.ज्यात आचार्यांनी केलेले बरेच संशोधन आणि त्यांचे अनुभव तथ्यासहित मांडल्या गेले होते.त्यातल्या एका पानावर ती वाचू लागली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अड्याळ टेकडीवरून उठले आणि आजूबाजूच्या बऱ्याच गावात प्रबोधन केले. विश्वबंधुत्वाचा संदेश देत गेले.त्यांच्या खंजिरी भजनात एक खास आशयाची शैली होती. मिंथुर येथे स्वतः आपल्या हातांनी गुरुदेव मंदिराची त्यांनी स्थापना केली.त्यांना भेटायला,त्यांची भजने ऐकायला फार दुररून लोक यायचे.सगळ्या ग्रामाला संदेश देत सबंध महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास चालू होता त्या वेळेची ही गोष्ट.

महाराज जेव्हढे जनमानसांत येऊन प्रबोधन करीत होते.तसेच त्यांचा प्रवासही एकांताचा असताना अगदी पशुसुद्धा त्यांना मान देत. अड्याळ टेकडीच्या गुंफेतून निघून समाज प्रबोधन करीत ते पेरजागडावर आले.त्या वेळेस पेरजागडावर त्यांचा सहवास बरेच दिवस राहिला.मग तिथून ते गोंधोडा तपोभूमीकडे परतले.त्याच डोंगररांगेने.आणि तिथे त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.त्यावेळेस पेरजागडावरील बरेच विचित्र अनुभव त्यांनी कथन केले होते.

एकदा ते तपश्चर्येला बसले असताना आजूबाजूला वाघ आणि अस्वलाची झुंज चालू होती.त्यांचं ते वेदनेने विव्हळणे आणि परत एकमेकांवर हल्ला करणे.यामुळे महाराजांच्या तपश्चर्यात बऱ्यापैकी व्यतय येत होता.ते उभे झाले आणि वाघ आणि अस्वलाच्या मध्ये झाले.दोघांच्याही डोळ्यात डोळे घालून सारखे बघत राहिले.त्या हिंस्त्र जनावरांना बघून काय वाटले ते कुणास ठावूक.पण परत वाद न करता अस्वल आणि वाघ दोन्ही आपापल्या वाटेनी परत गेले.पुढे जितके दिवस त्यांचा सहवास त्या पेरजागडावर होता.तितकेच दिवस ते त्यांच्या सोबतीला असायचे.ज्या दिवशी महाराज गोंधोडा गुंफेला परतले, तेव्हा सुद्धा या हिंस्त्र श्र्वापदांनी त्यांना तिथपर्यंत नेऊन सोडले होते.त्यांचं असं पण म्हणणं होतं की गडावरती त्यांना कपिला मिळाली होती.जेव्हा जेव्हा महाराजांना भूक लागायची, एक शुभ्र गाय गडावर त्यांच्यापाशी यायची.तिचं ताजं दूध पिऊन महाराज तृप्त व्हायचे.त्यांनी अशा बऱ्याच गोष्टी वर्णन केल्या होत्या.

पेरजागडचं ऊर्जास्त्रोत एका विहिरिशी साम्य ठेवतो असेसुद्धा ते म्हणाले होते.दर अमावास्येला तर दर पौर्णिमेला ती विहीर काठोकाठ भरलेली असायची.मी बऱ्याचदा त्या विहिरीपाशी जायचो.ती मला रितेच दिसायची.पाण्याचा एक थेंबही तिच्या गर्भात दिसेनासा व्हायचा.

आचार्यांनी नोंद केलेल्या बऱ्याच गोष्टी त्या पुस्तकात रचलेल्या होत्या.रितू पुन्हा पुन्हा बारकाईने त्या संशोधनात घुसली होती.

इकडे आचार्य रितूची भेट घेऊन परतले.इन्स्पेक्टर राठोडने त्यांना घरी सोडले आणि लवकरात लवकर काही उपाय योजना सुचवा अशी तंबी देत ठाण्यात निघून गेले.इकडे आचार्य हात पाय धुवून जरा फ्रेश झाले आणि आपल्या खोलीत परतले. लँम्प लावून टेबलावरचं सगळं सामान काढून टेबल साफ केलं आणि नक्षा घेऊन खुर्ची सरकवून ते बसले.त्यांच्या संशोधनार्थ त्यांना त्या नक्षावर असलेल्या बऱ्याच रस्त्यांची माहिती होती.पण ती जुनाट रस्ते होती.त्यातल्या फक्त काहीच रस्त्यांची तीथे पायवाट दिसत होती.आणि ज्या रस्त्यांच्या वाटा तिथे दाखवल्या होत्या,त्या तर दिसल्याच नाही.आणि ज्या आकृत्या मॅपवरून मी काढल्या होत्या.त्या अगदी हुबेहूब त्या नक्षावर् दिसत होत्या.बराच विचार करुनही आचार्यांना त्या नक्षाबद्दल काहीच कळलं नाही.ते सारखं आलटून पालटून फक्त त्याला बघत होते.कशाशी मिळतो का हे बघायला सोशल मीडिया तसेच जुनाट ग्रंथाचा वापर करू लागले होते.पण त्यांच्या कपाळावरच्या आठ्या सपाट होण्याचा नाव घेत नव्हते.शेवटी त्रासून त्यांनी नक्षा तिथे ठेवला आणि जेवण करण्यासाठी बाहेर आले.

रात्रीला म्हणजे बऱ्याच वेळपर्यंत रितू आचार्यचे पुस्तक वाचत होती.माझा आणि आचार्यचा सिद्धांत तिला काहीही वेगळा वाटत नव्हता.कारण जे संशोधन आचार्यांनी आठ वर्ष खर्च करून मिळविले होते.तेच संशोधन मी आठ महिन्यात मिळवले होते.गडाच्या उपयोगापासून ते त्यांच्या अंतापर्यंतचा मी विचार केला होता.कारण त्या पुस्तकात ती इतर माहिती जी मी वास्तव्यात अनुभवली होती.आणि जे अनुभव आचार्यांनी घेतले होते ते अनुभव मी नेहमीच घेत आलो होतो.

नेहमीसारखे पुस्तकांना बॅगेत कोंबून रितू माझ्यापाशी येऊन बसली होती.जेव्हापासून मी हॉस्पिटलला आलो होतो.तिने हॉस्पिटलच्या बाहेरच्या जगाशी संबंध तोडून दिले होते. बेड ते खिडकी,आणि बेड ते दरवाजा बस इतकाच तिचा प्रवास होता.पण दिवसभरातून तिच्या इतक्या येरझारा व्हायच्या की तिलासुद्धा त्या कळायच्या नाहीत.घड्याळात बघितले.आठ वाजणार होते. रात्रपाळीचे डॉक्टर्स आणि नर्स मला बघून जातील हे तिला माहिती होते.आणि म्हणून ती सारख्या येरझारा घालीत होती.

तितक्यात डॉक्टरचे आणि नर्सचे आगमन झाले.माझ्या निपचित पडलेल्या देहाकडे येत त्यांनी हाताची नाडी आपल्या हातात घेतली.डोळे उघडुन त्यात प्रकाशझोत टाकून बघितले.हृदयाची धकधक कानात ऐकली आणि ते नर्ससोबत कुजबुज करू लागले.हे ऐकून रितुला काही उत्सुकता वाटली.ती डॉक्टर जवळ जाऊन म्हणाली...

"काय झालं डॉक्टर?परिस्थितीमध्ये काही सुधारणा होते आहे काय?"

"सुधारणा तर होत आहे पण फक्त शरीरावर झालेल्या वळांवर होत आहे.जे बाह्यभागावरील आहे.पण पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंत अजूनतरी नवीन रिस्पॉन्स नाही.आणि मी त्याचेच आश्चर्य करतो आहे.की अजूनही काहीच बदल का नाही?"

"मग पवन सुधारणार की नाही डॉक्टर?"

"नो नो...मी असं थोडेच म्हटलं आहे.पण इतक्या मेडिसिनवर काहीतरी बदल हवा होता.पण पवनची बॉडी काहीच ॲसेप्ट करत नाही आहे.आणि शेवटी मीसुद्धा एक डॉक्टरच आहे...देव नाहीच."

"डॉक्टर म्हणजेच देवाचं दुसरं रूप असते डॉक्टर."

"मी प्रयत्न करत आहे रितू.आता जे काही आहे ते सगळं त्याच्या हातात आहे."

एखाद्याने दाखवलेली नुसती शब्दांची हिम्मत असली तरी शरीर कसं साहसाने बळकट होते.त्याचप्रमाणे डॉक्टरने सांगितल्या कारणामुळे रितुचं हृदय जोरजोरात धडधडायला लागले होते.आणि डोळ्यातून सरी ओथंबायला सुरुवात पण झाली होती.आणि त्याच परिस्थितीत ती बेडपाशी जाऊन बसलेली होती. रडता रडता ती नेहमीसारखीच झोपी गेली.

तिला जाग आली तेव्हा रात्रीचा मध्यान्ह सुरू होता.पण तिला जाग आली होती ती एक अनामिक स्पर्शाने.तिने हाताकडे बघितलं.कारण नेहमीसारखाच माझा हात तिच्या हातात होता.पण तो थंडगार नव्हता.माझं हृदय जोरजोराने धडाडत होते.चेहऱ्यावर घामाचे ओघळ जमा होऊ लागले.जणू मी स्वप्नात गुंतत चाललोय असे रितुला वाटू लागले.ती सारखं माझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसण्याचा प्रयत्न करत होती.शरीराचं तापमान कधी थंड तर कधी गरम होत जात होतं.बराच वेळ हा विचलित प्रकार चालला होता.मी ओठातल्या ओठात काही पुटपुटण्याचा प्रयत्न करत होतो.हे सगळं काय चाललेय? रितुला काहीच कळत नव्हते.पण एक आसमंत भेदणारा कर्कश आवाज तिच्या कानात घुटमळत होता.तो आवाज सारखा हसत होता.मृत्यू मृत्यू म्हणून सारखा डिवचत होता.संपूर्ण खोलीत त्या आवाजाचा वादळ उठला होता.

रितुची नजर दरवाज्यावर गेली.पुसट पुसट एक काळी आकृती ती चालत येताना दिसत होती.त्या आकृतीला बघताच रितू समजून चुकली की तो "मृत्युदेव" आहे.चालत चालत ती आकृती माझ्या बेडपाशी आली.तो मृत्युदेव होता.पण रितुला ताईतावर विश्वास होता की तो माझे प्राण हरू शकत नाही. मृत्युदेवाने बेडपाशी येताच जोरदार एक ठाहाका मारला....मृत्यू...आणि परत त्याच्या हसण्याचा आवाज संपूर्ण खोलीभर वावरू लागला होता. हसता हसता मृत्युदेव रितुला म्हणाला...

"मूर्ख मुली,तू त्याला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केलेस,तरीही त्याचा मृत्यू अटळ आहे,त्या ताईताने जरी मी त्याला स्पर्श करू शकलो नाही तरी त्याचा मृत्यू अटळ आहे...तो
"रितुला आता या सगळ्याची सवय झाली होती.आणि जे काय घडत आहे ती या सगळ्यांपासून अपरिचित नव्हतीच.त्यामुळे ती म्हणाली..."

" मृत्युदेवा...त्याच्यासोबत सतीसुद्धा जायची तयारी आहे माझी.आणि जोपर्यंत माझी साथ त्याच्या वाट्याला आहे.तोपर्यंत मी त्याला मरूच देणार नाही.तिने बॅग काढली ज्यातून एक डबी काढली.ती उघडली.त्यात कुंकू होता.माझा हात हातात घेऊन तिने कुंकवाचे बोट तिच्या कपाळावर लावून घेतले.आणि ती जोरात ओरडली."

"हे चंद्रदेवा,तुझ्या पावलांना साक्षी मानून,तुझ्या प्रकाशकिरणांत मी ह्या कुंकवाला पवनच्या नावाने वरतो आहे.तो माझ्या जीवनाचा साथीदार तसेच मी त्याच्या जीवनाची अर्धांगिनी म्हणून आज या उजेड्या रात्री एक दैवत म्हणून मी तुम्हांस सांगतो आहे.आता एक माय बाप म्हणून तुम्हालाच आमची दया घ्यावी लागेल.महादेवाच्या जटावर तुम्ही विराजमान होऊन आज प्रत्यक्ष तुम्हाला माझी शोकांतिका दिसत नाही का?हे कसल्या जन्माचे ऋण आमच्या वाट्याला दिलेस,जर जगणं आमच्या नशिबात नसेल तर सांग त्या महादेवाला ,मी सती जायला तयार आहे,अनंतात सामावून घे म्हणा आम्हाला,पण ह्या यातना,इतक्या दुःखदायी कशाला?"

"रितुच्या मनाचे बंधारे पूर्णपणे तुटून पडले होते.ती गुडघ्यावर विसावली.ओढणीने दोन्ही डोळ्यांच्या कडांना पुसत ती एकवार मृत्युदेवाकडे बघून म्हणाली..."

" शेवटी काय चूक आहे माझ्या पवनची,हे तुम्ही तरी सांगू शकता ना मृत्यूदेवा..."

" मुत्यूदेव हसत होता. दिर्घ वेळाने हसून तो म्हणाला.हे बघ मुली,माझ्याकडे फक्त प्राण हरण्याचे काम असते.त्यामूळे मी ते का हरतो किंवा त्याची काय चूक आहे,तो माझा प्रश्न नाही.मी फक्त एक सांगू शकतो की मानव जन्म त्याच्या मागील पाप पुण्याच्या क्रमवारीनुसार येते.चांगले कर्म त्याची आयु वाढवतात तर वाईट कर्म त्याचे आयुष्य कमी करतात.आणि या सगळ्यांचा लेखाजोखा सगळा चित्रगुप्ताजवळ असतो."

"मग आम्हा दोघांनाही न्या मृत्यूदेव,या क्षणी माझी तयारी आहे,त्याच्या यातना मला सहन होत नाही."

"तुला काय वाटलं? मी प्राण हरतो म्हणून विधात्याच्या नियमांचं उल्लंघन करणार नाही. जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे.तो कोणीच थांबवू शकलेला नाही.मग राजा काय? रंक काय?देव काय? दानव काय?वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर कधीच काही झाले नाही आणि कधीच काही होणार नाही."

"मग हा यातनांचा प्रवास कधी संपेल मृत्यूदेव?"

"तो माझ्याही हातात नाही मुली,कारण तुला वाटतेय त्या ताईताने मला अव्हेरलेय.पण त्या ताईतापेक्षा महत्वाचं म्हणजे पवन इथे आहे कुठे?हे फक्त त्याचं शरीर आहे.आणि ते ताईत तेच वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.आणि त्याचा मृत्यूयोग हा जवळच आहे.."

"मग यावर उपाय सांगावे मृत्यूदेव.मी आजन्म आपली आभारी असेन,तो कुठे आहे?मला कळवा मृत्यूदेव? मला सांगा..."

"मी जरूर सांगितलं असतं पण माझ्या मर्यादेच्या पलिकडे मीसुद्धा जाऊ शकत नाही.पण एक मात्र नक्कीच सांगेन.पवन जिथे अडकलाय तिथून तो तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय.तुझी मदत त्याला हवीय.आणि तिथे जायचा मार्ग हा तुझ्याजवळच आहे.फक्त रहस्यांना जरा समजून घे...निघतो मी..."

" मृत्यू.......हा....हा..."

रितू काही म्हणायच्या आत मृत्यूदेव आला तसा निघून गेला.पण यावेळेस रितू त्याला घाबरली नव्हती.ज्या पतीनिष्ठेने ती वागली होती कदाचित काळाची सुद्धा तिला तमा उरली नाही.इतक्यात नॉर्मल होऊन मी बेडवर पडलो होतो.आणि शिवाय माझ्या शरीराच्या मी इथे नाही हे रितुला आता कळलेले होते.त्यामुळे ती माझ्या प्रत्येक भेटीचा प्रसंग आठवू लागली.काय चुकतो आहे?अशी एखादी वस्तू जी तिला पवनपर्यंत पोहचवू शकेल.कारण त्याला आता तिच्या मदतीची गरज आहे हे वाक्य तिला स्वस्थ बसू देत नव्हते.ती प्रत्येक वस्तू बॅगेतली काढत होती.त्याला अगदी न्याहाळून बघत होती.

ती रात्र जशी रितुच्या बाबतीत घडली. तीच रात्र पुन्हा कुणाच्यातरी बाबतीत घडली होती.आणि ते होते आचार्य?त्यांनी बराच संशोधन केला. पण त्या नक्षाची उकल करण्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्रासून ते निद्रेच्या स्वाधीन गेले.पण आज त्यांना झोप येत नव्हती.सारखा माझा छिन्नविछीन्न निपचित पडलेला चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता.पवन प्रकरण इतक्या गूढ रहस्याशी जोडून असेल असे त्यांना वाटले नव्हते.

न जाणे किती वेळ ते विचारांच्या तंद्रीत बेडवर पडून होते.अचानक फुस्स...असा आवाज त्यांच्या कानाशी आला.ते इकडे तिकडे बघू लागले.झोपताना ते मंद प्रकाशाचा वापर करीत असत पण संपूर्ण खोलीत लाल लाल प्रकाश पसरला होता.आचार्य जरा घाबरले.कारण तो प्रकाश टेबलावर असलेल्या एका वस्तुमधून येत होता.जरा भितभित आचार्यांनी अंगावरची चादर काढली.भयावह चित्कार, फुंकार असे आवाज तिथून येत होते.त्यामुळे जरा सावरतच आचार्य उठले आणि त्यांनी टेबलावर नजर टाकली.तो लाल रंगाचा प्रकाश आणि तो भयानक आवाज त्या नक्षामधून येत होता.सावकाश चालत चालत ते त्या नक्षापाशी आले.त्या नक्षाचं संपूर्ण रूप पालटलं होतं.

एक भयावह सर्पाकृती सरपटताना दिसत होती.आणि पेरजागडापासून काही अंतरावर एका आकृतीची हालचाल त्यांना दिसत होती.जेव्हा ती सर्पाकृती एखाद्या आकृतीपाशी जायची, तेव्हा काही क्षणासाठी तिचा प्रकाश मंद व्हायचा.पण आश्चर्य असे होते की ज्या वाटेने ती सर्पाकृती नक्षात वावरताना दिसत होती.ती वाट मात्र इथे अस्तित्वात नव्हती.सगळ्या आकृत्यांची भेट घेऊन ती सर्पाकृती पेरजागडाच्या पायथ्याशी आली आणि गडप झाली.आणि ती हालचाल पण.हळूहळू नक्षामधुन निघणारा तो लाल प्रकाश मंद मंद होत दिसेनासा झाला.आणि निर्जीव झाल्यागत तो नक्षा टेबलवर पडून राहिला.आचार्यांनी तो नक्षा हातात घेतला.पुन्हा एकदा त्या वाटांकडे ते बघू लागले.ती सर्पाकृती जिथे गडप झाली तो भाग म्हणजे हत्तीखोयाळ होता.आणि जिथे ती आकृती हालचाल करताना दिसत होती ती म्हणजे पांढरी भिंत होती.जी भावाच्या डोंगरावर स्थित होती.आचार्य सकाळ होण्याची वाट बघत होते.कारण त्यांच्या कपाळावर पडलेल्या आठ्यांवर काहीतरी समाधानाची सपाटी दिसत होती.आणि आत्तापर्यंत जे काही घडलं होतं त्याबद्दल लवकरात लवकर त्यांना रितुला सांगायचं होतं.