Kans Maj Balachi - 1 books and stories free download online pdf in Marathi

कंस मज बाळाची - भाग १





आसं मज बाळाची ... भाग पहिला.

काल अनघा खूप आनंदात होती कारण जवळपास दीड महिना पाळी न आल्याने तिला यावेळी तरी नक्कीच गोड बातमी असेल याची खात्री वाटत होती. म्हणूनच तिने प्रेग्नेंट प्रेग्नेंसी टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट येईपर्यंत मनातल्या मनात तिने स्वतःचं बाळंतपण झालेलं सुद्धा बघितलं होतं. एका छोटसं गोंडस बाळ आपल्या कुशीत पहुडलं आहे असं बघितलं.थोड्यावेळानी वास्तव लक्षात येताच ती खुदकन स्वत:शीच हसली.

खरंच मनाबद्दल म्हणतात ते काही खोटं नाही मन कसं असतं कुठल्याही काळात जाऊन विहार करु शकतं. मनाच्या शक्तीमुळेच तर आपण जिवंत राहतो. मनाला मुक्तपणे विहार करायला जगाचा कोणताही कोपरा चालतो. पण या सगळ्या गोष्टी कालच्या होत्या आज सगळंच विपरीत घडलं होतं.
अनघाला वाटलं आपल्याला कोणीतरी उंच कड्यावरून दरीत फेकून दिलं आहे.


त्या खोल दरीतील भयाण शांतता तिला नकोशी झाली होती. सगळीकडे अंधार पसरला आहे आणि आपणच या खोल दरीत एकटेच आहोत. वैभवपण आपल्याबरोबर नाही. वैभव नाही म्हणजे माझा आधारच नाही. मी या खोल दरीतून कसं बाहेर येऊ? आपल्याला बाळ होईल नं! की आपल्याला निपुत्रिक म्हणूनच जगावं लागेल. वैद्यकीय शोध इतके लागलेत मग माझ्याच बाबतीत असं का? माझीच झोळी का रिकामी आहे?


इतके प्रश्नं. प्रश्नं कसले प्रश्न सर्पाचे वेटोळे तिच्या मनाभोवती पडले आहेत. किती ठरवलं मनावर ताण घ्यायचा नाही. हिम्मत करूनही तिला तिच्या मनावरचा ताण तिला दूर करता आला नव्हता डोळे अगदी टक्क उघडे होते.


झोप तिच्या डोळ्यात यायलाच तयार नव्हती. रोज झोप कशी पटकन आपल्या डोळ्यांच्या कुशीत शिरायची. नंतर संपूर्ण रात्र माझ्या एकटीचीच असायची. मी कितीदा स्वप्नात माझ्या बाळाशी खेळली असेल. स्वप्नात बाळाची शाळासुद्धा दिसली. आताही तिला तिच्याच वेडेपणाचं हसू आलं. ती हमसून हमसून रडत होती पण मनातल्या मनात. जोरात रडली असती तर वैभवची झोपमोड झाली असती.



बिचारा...वैभव.बाळाची स्वप्नं त्यानेही तिच्या बरोबरीनी बघितली होती त्याला मुलगा किंवा मुलगी काही चालणार होते पण तिला मात्र मुलगाच हवा होता. अगदी वैभवचच रूप घेऊन जन्माला आलेला छोटा वैभव.हं...एक दीर्घ उसासा अनघाच्या तोंडून बाहेर पडला. डोळ्यातून अविरत वाहणारे अश्रू तिला आवरता आले नाही.तिने ते आवरण्याचा प्रयत्नही केला नाही. आजच्या संध्याकाळचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला.


प्रेग्नेंसी टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं बघून तिला धक्का बसला रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि पाळीही आली नाही म्हणजे यांचा अर्थ काय ? पाळी बंद झाली का? असं कसं असेल एवढ्या लवकर पाळी बंद होईल. तेही शक्य नाही वाटत मग नेमकं काय झालं असेल?


विचार करून करून तिचा मूड गेला. अस्वस्थपणे ती खोलीतच फे-या मारू लागली होती. रीपोर्ट मिळाल्यापासून वैभव तिची अस्वस्थ हालचाल बघत होता.त्याला कळत होतं सगळं पण त्याने काही वेळ तिला तसंच मुद्दाम ठेवलं. अशा प्रसंगात माणसाला कोणाकडून उपदेश ऐकायची इच्छा नसते. मनावरचं ओझं दूर करण्यासाठी त्याला एकांत हवा असतो तो त्याला देणं गरजेचं असतं हे वैभव जाणून होता. जवळपास तासाभरापासून वैभव तिची अस्वस्थता बघत होता त्यानं काही न बोलता शांतपणे दोघांसाठी चहा केला. अनघा चहा घेणार नाही हे माहिती असूनही त्याने तिच्या पुढे चहाचा कप ठेवला आणि स्वतः सोफ्यावर चहा घेत बसला आणि तिचं निरीक्षण करु लागला.


समोर चहाचा कप होता पण त्याकडे तिचं लक्षच नव्हतं. ती फक्त काय झालं असेल याचा शोध घेत होती. असा रिपोर्ट का आला असेल? याचच ती उत्तर शोधत होती. बर्‍याच वेळाने तिनं हाक मारली वैभव ...वैभव.. काही न बोलता तो उठून तिच्याजवळ येऊन बसला आणि चहाचा कप समोरच्या टेबलवर ठेवला तिचा थरथरणारा हात हातात घेऊन तो हळूच थोपटला. त्याचक्षणी त्याच्या अंगावर अनघा कोसळली आणि रडू लागली.

स्वतःच्या भावना अनावर झाल्या तरी वैभव रडून दाखवू शकत नव्हता कारण तो जर रडला असता तर अनघाचं काय झालं असतं. तोही रिपोर्ट असा का आला असेल याचा विचार करत होता. वैभव हळुवारपणे तिला थोपटत होता. अनघा बऱ्याच वेळाने शांत झाली.
अनघा अचानक बोलली

"वैभव काय झालं असेल रे? असा रिपोर्ट का आला असेल.?

"हे बघ आपण उद्या डॉक्टरांकडे जाणार आहोत ना तेव्हा याचं उत्तर मिळेल." त्यानं हळूच तिचा हात थोपटत म्हटलं.

"मला खूप भीती वाटते रे."अनघा रडतच बोलली.

"घाबरू नकोस शांत रहा. तिच्या डोक्यावरून हात फिरवत वैभव म्हणाला.

"पण माझ्याच वेळी असं का?"अनघानी वैभवकडे बघत विचारलं. तिला पुढे बोलू न देता वैभव म्हणाला,

"हे बघ हे आणखीही कोणत्यातरी स्त्रीबरोबर असं घडलं असेल. आपल्याला कसं कळणार नेमकं काय घडलं आहे? उद्या डॉक्टरकडे गेल्यावर कळेल ना. हे बघ मी तुझ्यासाठी तुला आवडतो तसा चहा केला आहे. तो पी आणि जरा आराम कर."


त्याने तिच्या हातात चहाचा कप दिला. तोही चहा पिऊ लागला. अनघा जबरदस्तीनं चहा प्यायला लागली. वैभवनं आज खरच तिला आवडतो तसाच चहा केला होता. पण आज त्या चहाची चव सुद्धा तिला कळली नाही. एरवी असा चहा तिला अचानकपणे जर वैभवनी दिला असता तर तिनी आनंदानी त्याला मिठीच मारली असती. उद्या डॉ. मेहता काय म्हणतील याचा विचार वैभव करत होता. त्यालाही वाटलं खरच आपण एवढे अस्वस्थ आहोत तर अनघाला काय वाटत असेल.
एक स्त्री म्हणून तिला मातृत्वाची ओढ असणारच.आपल्याला बाबा म्हणावं कोणीतरी म्हणून आपणही वाट बघतोच आहोत न! अनघाला खचू द्यायचं नाही हे वैभवनी मनाशी ठरवलं.

आताही तो तिच्या पाठीवर हळुवार थोपटत होंता.जेव्हा एखाद्या बाईला मूल होत नसेल तर तिला समाज किती वाळीत टाकल्यासारखा वागवतो. किती सहजपणे मुल न होण्यावरून टोमणे मारतो. स्त्रीबरोबर तिच्या नव-याला समाज का नाही बोलत. नव-याच्या पाठीशी हाच समाज ठामपणे उभा असतो. काहीवेळेस विकृत डोक्यातून त्या पुरुषाच्या दुस-या लग्नाचापण विषय होतो. हि किती क्रूर चेष्टा आहे त्या स्त्रीची. अनघा खरतर या गोष्टीमुळेच घाबरत असावी.

आपल्या कुशीतून बाळ जन्माला यावं असं जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही स्त्रीला वाटणारच. मी पुरुष असून जर या गोष्टीची वाट बघतोय तर ती स्त्री आहे. तिच्यात मातृत्वाचं गाणं मुळातच आहे. ते मातृत्वाची गाण गुण-गुणल्या शिवाय तिला आपलं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं कसं वाटेल.


वैभवला अनघाच्या मनाची काळजी वाटली.अनघा बाळासाठी खूप आसूसली आहे.अनघाच का आपणही बाबा व्हायला आसूसलो आहोत. मूल होत नाही म्हणून मी सुद्धा अस्वस्थ आहे.पण माझी अस्वस्थता अनघासमोर नाही दाखवू शकत कारण माझी अस्वस्थता अनघाने बघीतली तर ती पार कोलमडून जाईल.मला माझ्या चेहऱ्यावर तसूभरही चिंता दाखवता येणार नाही.मग मी माझ्या भावना अश्या व्यक्त करू? कोणाजवळ?

ताई जवळच सगळं बोलता येईल.ताईजवळ मनातलं सगळं बोललं की मनाला खूप शांतता मिळते.
अचानक वैभवची तंद्री मोडली कारण त्याचा फोन वाजत होता.

फोनवर अनोळखी नंबर बघून त्याने फोन उचलला नाही.आत्ता वैभव कोणाशी बोलण्याच्या मन: स्थितीतच नव्हता.

किती वर्ष झाली लग्नाला आता एवढ्या वर्षानंतर अनघाचा धीर सुटत चालला आहे.ऊपचार करून घ्यायला नाखूष दिसते. पण असं करून चालणार नाही.बाळ हवं असेल तर हे उपचार करावेच लागतील. ते यशस्वी झाले की नाही हे बघण्यासाठी वाट बघावीच लागेल.

वैभवचं डोकं विचार करून गरगरायला लागलं. भावना वेगाने त्याला रडू फुटलं. तोंड दाबून आवाज न करता वैभव रडत राहिला.वैभवच्या रडण्याचा आवाज अनघाला ऐकू जायला नको हे वैभवला मनातून वाटत होतं.त्यामुळे तोंडावर हात ठेऊन डोळ्यातून अविरत अश्रू धारा वैभवने वाहू दिल्या.
---------------------------------------------------------------------------
क्रमशः पुढे काय झालं पुढच्या भागात वाचा
लेखिका... मीनाक्षी वैद्य.
माझं लिखाण तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि इतरांना शेयर करा ही विनंती.