Kans Maj Balachi - 8 books and stories free download online pdf in Marathi

कंस मज बाळाची - भाग ८

आसं मज बाळाची भाग ८

मागील भागावरून पुढे...


ताई काय बोलली हे वैभवनी अनघाला सांगितलं. हे ऐकताच अनघानी आनंदाने वैभवला मिठीच मारली.


" वैभव मला न जाम भीती वाटत होती."


" भीती कसली?"


"अरे ताईनी तिची इच्छा घरी बोलून दाखवल्यावर घरचे काय म्हणतील? होकार देतील की नाही म्हणतील.पण आता सगळ्या चिंता दूर झाल्या. ताई आणि मुकुंदराव डॉ.ना भेटून आले की पुढे सगळं लगेच सुरु होईल.वैभव पैशाची तजवीज कशी करायची?"


" त्याची तू काळजी करू नकोस. आता तू हसतमुख रहा." वैभव म्हणाला. त्यावर अनघानी छान स्माईल दिलं.


स्वयंपाकघरात जाता-जाता अनघा म्हणाली


"आज इस खुशीमे मै कुछ मिठा बनाती हुं."अनघा आनंदाने म्हणाली.


"अरे...आज एकदम हिंदी?"


तिचा हसरा चेहरा बघून वैभवला खूप बरं वाटलं.वैभवनी लगेचच ताईला डॉ. चा नंबर आणि त्यांच्या क्लीनिकाचा पत्ता पाठवला.

***


डॉ. चा पत्ता आणि नंबर वाचून ताईला मनातून खूप आनंद झाला कितीवेळ ती हातातल्या मोबाईल कडे नुसतीच बघत बसली होती. तिच्या मनानी तर अनघाला बाळ झालेलं पण बघितलं आणि ती खुदकन स्वत:शीच हसली.


मुकुंदराव तिच्याजवळ येऊन उभे होते. काही सेकंद झाले असतील. पण ताईला त्यांची अजिबात चाहूल लागली नाही. ताई जेव्हा स्वत:शीच हसली तेव्हा त्यांना रहावलं नाही त्यांनी तिच्या पाठीवर एक थाप देऊन तिला जागं केलं.


"काय ग काय झालं? स्वत:शीच हसते आहेस?" दचकून ताईनी मुकुंदरावांकडे बघितलं आणि लाजली. "ए लाजते कशाला?


"अहो मला न खूप आनंद झालाय. माझ्या मनात मी अनाघाचं बाळंतपण झालेलंसुद्धा बघितलं.." एवढा बोलून ती हसू लागली. मुकुंद रावांनी तिच्यापुढे हात जोडले.


"धन्य आहे तुझी डॉ. ना फोन करून त्यांची वेळ घ्यायची आहे नं? वैभवनी पत्ता आणि नंबर पाठवला का?"


" हो पाठवला. आताच फोन करते."

"आज स्वयंपाक करशील नं? की हसतच राहणार?" मुकुंद रावांनी तिला मिश्किलपणे विचारलं.


"नाही हो करते. आधी डॉ ची वेळ घेते मग स्वयंपाक करते. तुम्हाला कुठे जाऊन यायचं असेल तर जाऊन या."


"हो परवा उद्धवाचा फोन होता त्याच्या दुकानावरच जातो बघतो काय म्हणतोय. मला तासाभाराहून जास्त वेळ लागेल."


" माहिती आहे मला म्हणूनच पोहे केलेत ते खाऊन जा. उद्धाव भावजी फार गप्पिष्ट आहे."


"हं खरय. दे पोहे लवकर. लगेच निघतो. फार उन व्हायच्या आत परत यायला बरं."


"कशाला उन्हाचं गाडीनी जातंय? जा की कॅबनी."


" ए काहीतरी काय. त्याचं दुकान आहे वीस मिनिटावर. काही नको कॅब वगैरे. निघतो मी."


पोह्याची रिकामी प्लेट टेबलावर ठेवत मुकुंदराव बोलले.ताई आपल्याच आनंदात स्वयंपाक करत होती. कामाला आलेली मंजुळा काहीतरी तिला विचारात होती. ती काय विचारात होती हे ताईला कळलं पण नाही. शेवटी कंटाळून मंजुळानी बोलणं सोडून कामाला कामाला सुरवात केली.


ताईला केव्हा उद्याचा दिवस उजाडतो असं झालं होतं. कारण तिला डॉ. ची आजची वेळ मिळाली नाही तर उद्याची मिळाली होती. तिनी तसं वैभवलाही सांगितलं होतं.


आज गोड करायची तिची इच्छा होती कारण तिच्या निर्णयाला हिरवी झेंडी मिळाली होती. पण बाहेरून काही आणण्यापेक्षा शेवयांची खीर ड्राय फ्रुट्स घालून करायचं ठरवलं. ती हसतमुखानी स्वयंपाकाला लागली.

***



वैभवनी त्याच्या बाबांना म्हणजे माधवरावांना ताईचा निर्णय सांगितला त्यावर ते म्हणाले


"वैभव ताईनी तुमच्या प्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही दोघं जर आमंदात राहिलात तरच या ऑपरेशनचा फायदा होईल. तेव्हा निट रहा. अनघाची मना:स्थिती तुलाच सांभाळायची आहे. आई काहीही बोलली तरी तिच्या बोलण्याकडे लक्षं देऊ नका. कळलं?"


"हो बाबा. तुम्ही काळजी करू नका. मी अनघाला सांभाळीन."

वैभव नी बाबांना आश्वासन दिलं आणि फोन ठेवला.


एक मोठ्ठा प्रश्न आज सुटला होता..परमेश्वरा तुझीच कृपा.

असं मनाशी म्हणत वैभव पैशाची जुळवाजुळव कशी करायची याचा विचार करू लागला.


अनघा तर आनंदात न्हाऊन निघाली. तिची मातृत्वाची आस आता पूर्ण होऊ शकणार आहे हे कळल्यामुळे तिच्या मनावरचं चिंतेचं गाठोड कधी लांब फेकल्या गेलं हे तिलाही कळलं नाही.


****


माधवराव फोन ठेवून ते मागे वळले तशी त्यांना त्यांच्या मागे उभी असलेली मालती त्यांची बायको दिसली. तिच्या चेह-यावर भयंकर राग होता. हे कळूनही न कळल्यासारखं दाखवून माधवरावांनी त्यांना विचारलं,


"काय झाला? अशी रागानी का बघते आहेस?"


" तुम्हाला कळलं नाही. छान किती खोटा अभिनय करावा माणसानी."


"आता मी कसला अभिनय केला?"

"हाच तुम्हाला काहीच कळलं नाही असं तुम्ही दाखवत आहात तोच अभिनय आहे. तुम्हाला कळलं आहे मी का रागावली आहे."


" मी अंतर्ज्ञानी नाही. मला कसं कळेल. तू का रागावलीस. उगीचकाहीतरी बडबड करायची."


"मी उगीच बडबड करत नाही. ममता का तिचं बीजांड देते आहे? त्या अनघाला मूल होत नाही म्हणून माझ्या मुलीचा जीव तिनी का धोक्यात टाकायचा. शोधावी की तिनी दुसरी बाई."


रागारागात मालतीबाई येर-झा-या घालत मोठ्यानी बोलत होत्या.


"ममताचा जीव कुठे धोक्यात घालतेय अनघा?"


" ऑपरेशन नाही करत आहे? का त्याशिवाय ममताच्या पोटातून बीजांड बाहेर येणार आहे? सांगा न असं होणार नाही न? मग माझ्या मुलीचा जीव धोक्यात नाही का? अनघाला कोणी अधिकार दिला माझ्या मुलीचा जीव धोक्यात घालायचा?"


माधवराव कपाळावर हात मारतात.


" मालती हात जोडले तुझ्यापुढे. मामाताचीच इच्छा आहे अनघाला बीजांड देण्याची. अनघानी तिच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. या ऑपरेशनमुळे वैभव अनघाच्या घरात बाळ येईल याचा तुला आनंद होत नाही का?"


" कशावरून हे केल्यानी अनघाला बाळ होईलच?"


"अग डॉ. नी सांगितलं आहे. ते खात्री असल्याशिवाय सांगतीला का?"


" एवढा खर्चिक उपाय करायचाच कशाला?"


मालतीबाईंचा राग कमी न होता वाढतच चालला होता.


"लग्नाआधी पत्रिका बघा म्हटलं होतं पण माझं ऐकतं कोण?"


"आता इथे पत्रिकेचा काय संबंध?"


"वा कसा नाही. पत्रिकेतून दिसतं न सगळं अगदी बाळ होईल की नाही हे सुद्धा कळतं."


"मालती आपली पण पत्रिका बघितली होती. पण त्यातून तू इतकी विचित्र स्वभावाची असशील हे कुठे कळलं? नाहीतर तेव्हाच मी तुझ्याशी लग्न केलं नसतं."


" काय मी विचित्र स्वभावाची आहे. छान...! इतकी वर्ष कधी तुम्हाला माझ्या स्वभावातील दोष दिसले नाही आता सुनेचा पुळका आला म्हणून मी विचित्र वाटायला लागली का?"


"तुझ्या या विचित्र स्वभावामुळे आपली मुलंच काय सगळे नातेवाईकही आपल्यापासून लांब गेलेत. काधी त्यांना आमंत्रण केलच तर बिचकत येतात. कारण पाहुण्यांना घरी बोलावूनही तू त्यांचा छान अपमान करू शकते. हे सगळ्यांना माहिती आहे."


बोलता-बोलता माधवराव खुर्चीवर विमनस्क अवस्थेत बसले.


मालतीला कसं समजवायचं त्यांना कळत नव्हतं.


" तुम्हाला माहिती आहे न तिच्या एका मावशीला मूल झालच नाही.. दुस-या मावशीला कितीतरी वर्षानी मूल झालं. आता अनघाची तशीच कथा आहे. उपचार करूनही काही झालं नाही तर पैसे तर गेलेच असं होईल न? वैभावालाच भुर्दंड पडणार. ती काय नोकरी करत नाही कि कुठून पैसे कमावत नाही."


"मालती अग कुठली गोष्ट कुठे नेऊन सोडते. वैभवलाही बाळ हवं आहे नं? अनघा त्याची बायको आहे. दुस-या कोणा बाईसाठी तो एवढा खर्च करत नाही. जरा पटेल असं बोलत जा."


"तुम्हाला सगळं गोडगोड ऐकायची इच्छा असते. मी खरं बोलले की तुम्हाला टोचतं. म्हणून मला सगळं सांगत नाही."


"कसं सांगणार? तुझी प्रत्येक गोष्टीला नकारघंटा वाजवण्याची सवय माहिती आहे. या उपचाराला तुझा नाट लागू नाही म्हणून सांगत नाही. अग जे बाळ येईल ते तुझही कोणीतरी असणार नं! त्या येणा-या बाळाकडे, त्याच्यामुळे आपल्या घरात येणारा जो आनंद याकडे बघ नं. कशाला उगीच वेडे-वाकडे विचार मनात आणायचे आणि रागावून बसायचं. सतत कानात गुण-गुणणा-या डासासाराखी बडबड करत बसायचं."


माधवरावांनी जरा चिडून आणि हताश होऊन मान झटकली.


"हे बघ या विषयावर तू अजिबात अनघाला फोन करून तिला त्रास द्यायचा नाही. मला ते आवडणार नाही. पूर्ण उपचार होईपर्यंत ती आनंदित राह्यला हवी. वैभवला सुद्धा तू फोन करायचा नाहीस. जे काय असेल ते मी तुला सांगत जाईन. कळलं?"


एवढं बोलून माधवराव पायात चपला अडकवून तडक बाहेर जायला निघाले.


"आत्ता एवढ्या उन्हाचं कुठे जाताय? "


"डोकं जरा शांत करून येतो."


" उन्हात डोकं शांत होणार आहे? काहीतरीच."


"तुझ्या बडबडी पासून थोडावेळ तरी शांतता लाभेल."


हे बोलून माधवराव एकही मिनीट न थांबता घराबाहेर पडले.मालतीबाईंचा चेहरा रागानी फुललेला होता.

---------------------------------------------

क्रमशः आसं मज बाळाची भाग ८

पुढे काय झालं? वाचा पुढील भागात

लेखिका... मीनाक्षी वैद्य