perjagadh - 32 books and stories free download online pdf in Marathi

पेरजागढ- एक रहस्य.... - ३२

३२. पवनच्या वडिलांचे मनोगत...


जवळपास तीस वर्षे होतात या गोष्टीला.माझं लग्न होऊन चार ते पाच वर्षे झाली तरी आम्हाला संतान प्राप्तीचे सुख नव्हते.मी एक प्राध्यापक असलो तरी त्या सुखाकरिता कित्येक अंधश्रद्धाचं, मी त्या वेळेस खतपाणी घालून पालन केलं होतं.कित्येक उपास तपास पोटाला आळी मारेपर्यंत घालवले होते.कित्येक देव्हारे अंगठे झिजेपर्यंत तुडवले होते.पण हातात निराशेचे कौल घेऊन परतल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हतं.त्यावेळेस देव देवळे,पूजा अर्चना,वैद्य नैवैद्य या सगळ्यांशी मी त्रासून गेलो होतो.जगाला दाखवण्यासाठी आम्ही सुखी तर होतोच पण समाधान नव्हतेच आम्हांत.

हिंडता फिरता जेव्हा आम्ही इथे स्थायिक झालो तेव्हा बऱ्याच डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती.अशाच एका ट्रीटमेंटला जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळेसची ही घटना आहे.बाहेर कॅबिनमध्ये डॉक्टरांच्या बोलावण्याची वाट बघत होतो.त्यावेळेस गंगाधरची आणि माझी ओळख झाली.आणि तीच गंगाधरची आणि माझी पहिली भेट. त्या दिवशी त्याच्यासोबत कुणीतरी पदराने तोंड झाकून एक महिला बसली होती.कदाचित ती त्याची बायको असावी.अगदी मनमिळाऊ स्वभाव होता त्याचा.स्वतःहून त्याने आम्हाला आपलेसे केले होते.

गप्पांच्या ओघाओघात मला सारखे त्याचे हावभाव टोचत होते.कारण ज्या कार्यासाठी आम्ही हॉस्पिटलला आलो होतो, त्यासाठीच तो पण आला होता.पण त्याच्या चेहऱ्यावर कसलीही चिंता नव्हती.त्याचे अगदी ठामपणे बोलणे त्याच्या प्रत्येक वाक्यात दिसून यायचे.एखादा भविष्य समजून घेणारा बोलतो त्याप्रमाणेच त्याचे बोल असायचे. आमच्यासारखेच पुत्रप्राप्तीसाठी त्यानेही नको ते उपाय केले होते.फरक फक्त इतकाच होता की आज त्याच्याकडे समाधान होतं, आणि आमच्याकडे अपुरे नशीब. त्यांचं सुख बघून मला जळायला झालं होतं.पण शेवटी ते माझे नशीब होते.त्यात त्याचा काहीच दोष नव्हता.

काही वेळात डॉक्टरांचं त्यांना बोलावणं आलं.त्यामुळे ते आतमध्ये निघून गेले.मी बाकावरच बसून विचार करू लागलो होतो. गंगाधरने मला बोलावलं होतं. पेरजागडाच्या पायथ्याशी एका छोट्याशा गावात तो राहत होता.त्याने तिथे एका शेषाची आराधना करायला सांगितले होते.खरंतर त्यावेळेस मला थोडा अचंबा वाटला, पण त्याचं सुख बघून मला ते कृत्य करावेसे वाटले होते.

काही वेळाने त्याच प्रसन्नतेसह ते कॅबिनच्या बाहेर आले.काही दिवसांत पुत्रप्राप्तीचा सुख मिळणार हे डॉक्टरांनी निश्चितपणे त्यांना सांगितलं होतं.आणि ही सगळी त्या सात बहिणीची कृपा आहे असे तो वारंवार सांगत होता. त्यानेच स्वतःचा पत्ता माझ्या स्वाधीन केला.तसे काही जणांच्या तोंडून मी पेरजागडविषयी बरेच ऐकले होते.गडाला पिरबाबांचा आशिर्वाद आहे.असेही म्हणतात.आणि शिवाय त्यांचं जिवंत उदाहरण माझ्या सामोरी होतं.माझ्या मनात सारखी गंगाधर विषयी ईर्ष्या जागृत होत होती.त्यामुळे त्याला निरोप देताना माझ्या अंतःकरणाची लाही लाही होत होती.गंगाधर गेल्यानंतर काय कुणास ठाऊक? पण आम्हा दोघांची डॉक्टरकडे जायची ईच्छा होत नव्हती.त्यामूळे आम्ही पण तिथूनच परतत घराकडे चालले आलो.

त्या दिवशीची रात्र आमच्यासाठी फार दुःखदायी ठरली होती. गंगाधरने म्हटलं होतं की पेरजागडाचा वारसदार येणार आता.त्याचा तो आनंद सारखं सारखं आमच्या डोळ्यांसमोर येत होता.संतान प्राप्तीचा आढावा आमच्या तळाशी खोल रुतून बसला होता.कारण त्यानंतर आम्ही बऱ्याचदा त्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं.मी कधी कॉलेजला जाण्याचा प्रयत्न केलाही, तरी आठवणीतून ते दृश्य ओघळत नव्हते.

म्हटलं सगळंच तर केलं,हेच करायला कशाला बाकी ठेवायचं.त्यामुळे काही दिवसांतच आम्ही तिथे निघायचं ठरवलं. रजा टाकून दुसऱ्याच दिवशी गंगाधरकडे रवाना झालो.त्याने सांगितलेल्या पत्त्यानुसार घर शोधायला फारसा वेळ लागला नाही.आम्हाला बघताच दाराशी गंगाधर आणि त्याची बायको आली.त्या दोघांचं ते प्रसन्नतेनं फुललेलं स्मित पुन्हा एकदा मनामध्ये मत्सर निर्माण करत होते.

घर तसं साधेच होते.अगदी जंगलाच्या काठावर.बारीक झुडूपांच्या काटक्यांचा जोडा घेऊन त्यावर लीपलेला मातीचा लिंपण.बऱ्याच जागी उकरलेलं होतं. अधीमधी मोठेमोठे खांब टाकून वर गवताने शाकारलेले होते.बाहेरून कितीही झोपडीसारखं घर वाटत असलं तरी आतमध्ये बऱ्याच प्रमाणात ओलावा जपलेला होता.बाहेरून घर छोटंसं वाटत असलं तरी आतमध्ये विशाल वावर होता.बाहेरच्या पडवीत चूल होती.आतमध्ये बसायला एक छोटीसी चारपाई होती.ज्यावर फाटकी एक चादर अंथरलेली होती.

गंगाधरने पाय धुवायला पाणी दिले आणि आत बसायला सांगितले.प्यायला पाणी घेत स्वतः आमच्याकडे आला आणि बायकोला चहा बनवण्यासाठी पडवीत पाठवले.आणि म्हणाला...

"कसं काय वाटलं साहेब आमचं घर..."

"छान आहे ना.."

"माझी गरीबाची झोपडी आहे साहेब.रोज लिंपत राहावं लागते साहेब.आमच्या नशिबाला कुठल्या आल्या विटांच्या भीती, कुळाचीच ढेकळे आहेत ही."

"गंगाधर...भेदभाव हा माणसांचा असतो.वस्तूंचा नाही.महत्वाचं असतो तो माणुसकीचा मोठेपणा.तुझं घर छोटं आहे यात तुझ्या कमीपणाची कुठेच तरतूद होत नाही.त्यामुळे समांतर असं बोलावे.उच नीच हा भेदभाव नको."

"खरंय तुमचं साहेब...आणि म्हणूनच की इतका खुश आणि आनंदी माणूस आहे.काही दिवसांआधीच माझ्या घरी गोंडस एका मुलाने जन्म घेतला साहेब.तुम्ही यायच्या आधीच दूध पिऊन तो झोपी गेला.( बाजूलाच एका दोरीच्या पाळण्याकडे बोट दाखवून गंगाधर म्हणाला.)"

इतक्यात माऊलीने गंगाधरला बोलावले.त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की साखर घरी संपलेली आहे.कारण वारंवार साखरेचा उल्लेख कानावर येत होता.

खरंतर त्या गंगाधरचं अगदी साधंच राहणं होतं.पण त्या दिवशी मला त्याचा फार हेवा वाटत होता.कारण आज माझ्याकडे स्वतःचं राहतं घर होतं.पैसा प्रॉपर्टी सगळंच होतं.पण गंगाधरचं तसं नव्हतं. आपलं घर एकदा बनतं पण त्याला रोज मेहनत करावी लागायची.आपण खाणं नाही झालं की फेकतो,त्याला उद्या पोटाला काय खायचं?हा प्रश्न होता.तरी त्याचं समाधान त्याच्या प्रसन्न स्मितावरून दिसत होतं.सुखाचे बोट धरून दुःखाचे डोंगर चालताना मी त्याला बघत होतो.आणि इतकं सगळं असूनही त्याला कसलीच चिंता नाही. खरं तर त्याचंच जगणं म्हणजे मला खरं जगणं वाटत होतं.नाहीतर एक आमचं जगणं म्हणजे स्वतःला फक्त जिवंत ठेवणे असं वाटत होतं.स्वतःचं म्हणता म्हणता मातीमोल व्हायचं.ज्या वास्तव्याला जपण्यासाठी आयुष्य खर्ची घालायचे तिथेच आपलं अस्तित्व लुप्त करायचं.

इकडे तिकडे बघतच होतो की माऊलीने चहा आणून दिला.चहाच्या पहिल्याच घोटाला गुळाचा आणि गवतीपत्तीचा सुगंध नाकात शिरला.त्या चहाची चवच काही वेगळी होती.खरंतर तिथे आल्यापासून मन कसे प्रसन्न वाटत होते.काही वेळात चिमुकला उठला आणि त्याने आपले निनाद स्वर चालू केले.माऊलीने त्याला लाडवत अंगणात असलेल्या झाडाखाली खेळवायला नेले.गंगाधर हायसं होऊन म्हणाला...
साहेब..श्रद्धेचा आणि भक्तीचा वारसदार आहे तो.त्यामुळे त्याचं जरासंही रडू आवरत नाही आम्हाला.आम्ही बी तुमच्यासारखेच होतो.ह्यो शेजारच्याच गावची मुलगी हाये. लय प्रयत्न केले पण पोटीपाठी काहीच फुललं नाही.त्यामुळे नवस घातला पेरजागडी भुजंगाला आणि वारसदार उदरात अवतरला.श्रद्धा असेल तर काय बी होऊ शकते साहेब.त्यामुळे मी तुम्हास्नी बोलावलं होतं.आजची रात्र आराम करा साहेब.उद्या तिरपीच्या बऱ्याच आधी निघायचं आहे.आत्तापासून जाऊन काही उपयोग नाही.

मी एक प्राध्यापक असलो तरी त्या बाबतीत मी शून्य होतो.कारण मुलांना अंधश्रद्धेचे धडे देणारा, आज मीच त्या वाटेवर पाऊल ठेवलं होतं.आणि निदान समोर तरी आता काय करायचं आहे? हे सुद्धा मला माहिती नव्हतं.त्यामुळे गंगाधर जे म्हणेल तेच हो म्हणण्याचे आणि मानून घ्यायचं असं मी ठरवलं होतं.

उन्हे उतरली आणि पूर्ण अंगणभर अंधार पसरला.रानातला शीतल असा रानवारा अंगणात भिरकावू लागला. पेरजागडच्या डोंगराकडे नजर टाकली.हळूहळू काळोखाची किरणे उतरू लागली होती. गंगाधरच्या घरात लाईटची सोय नव्हती. ग्रामपंचायतीच्या मेहेरबानीने अंगणात तेव्हढा एक लाईट दिला होता.बाकी घरातलं सगळं काय सौरऊर्जेच्या टॉर्चवर व्हायचं.बाहेर चारपाई अंथरून गंगाधरशी आम्ही बसलो होतो.आतमध्ये स्त्रियामंडळी स्वयंपाकात मग्न झाल्या होत्या.त्यामुळे चर्चेच्या विषयात मीच गंगाधरला म्हटलं..हे पेरजागड म्हणजे नक्की काय आहे?

साहेब असं म्हणू नका कधी?मी मघाशीच बोललो की हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे.हा डोंगर म्हणजे फार पुरातन आहे. साधी साक्ष अशी द्यायला मी पुरणार नाही साहेब. सत्य आणि सत्वाला अलगदपणे हृदयात कवटाळून ठेवलाय या डोंगराने.इथे देव काय? दानव काय?जनावर काय?प्रत्येक गोष्टीच्या खुणा आहेत.तुम्ही जरी पूर्ण डोंगर फिरलेत ना, तर प्रत्येक गोष्टींचे उत्तर आणि समाधान तुम्हाला मिळून जाईल.जो इथलं सत्व समजून जातो ना साहेब तो इथलाच होऊन जातो.तुम्ही मागा मनापासून काही,तो देतो साहेब पण तुम्ही त्याला त्याच्या नियमाप्रमाणे हवं वागायला.

"असं आहे तर... बरं उद्या किती वाजता निघायचं आहे मग आपल्याला..."

साहेब तुम्ही येणार म्हणून हे मला फार आधीच माहिती होतं.त्यामुळे पूर्वतयारी मी आधीच करून ठेवली होती.आणि तुम्हीपण अगदी योग्य वेळेवर आलात.आज पौर्णिमा चालू झालीय.आजचा दिवस हा बारालाच संपेल.आणि बारापासून त्याची वेळ चालू होईल अगदी सकाळपर्यंत.आणि जिथे तो जाईल तिथेच आपल्याला जायचंय.या सगळ्या सत्वाचा तोच एक रक्षक आहे.त्याच्याजवळ केलेली प्रार्थना कधीच वाया जाणार नाही.आणि हो बाईसाहेबांना म्हणावं भीती ठेवायची नाही.अन्यथा त्याचे परिणाम फार वाईट होतील.

खरंतर त्याच्या सांगण्यावरून माझ्याही मनात भीती साठायला लागली होती.काही क्षणाकरीता तर असं वाटायला लागलं होतं की,आपण कुणा एका तांत्रिकाच्या तर घरी आलो नाहीये.कारण ज्याच्या मागे तो जायला म्हणत होता.त्याची कल्पनाच एक असह्य बाब होती.त्यामुळे माझ्या त्या हो म्हणण्यात सुद्धा अफाट स्थिती दडलेली होती.विचारात मग्न असतानाच माऊली पाण्याचा ग्लास घेऊन जेवायला बोलवायला आली होती. गंगाधरने जी जाणीव मला आत्ता करून दिली होती. तीच जाणीव माऊलीनेसुद्धा आत दिली होती.त्यामुळे जेवण झाल्यावर वसुधा आणि मी बाहेर आलो होतो.

" मला फार भीती वाटतेय वसुधा,हे सगळं साध्य तर होईल ना,नाहीतर निघून जाऊयात आपण..."

" मलाही तितकीच भीती वाटतेय.पण इतक्या दूर आल्यावर जर आपण माघारी फिरलो तर इथे येण्याचं काहीही महत्त्व उरणार नाही.त्यामुळे जे नशिबात आहे ते घडेलच यावर काही शंका नाही."

"हो पण नक्की आपल्याला काय करायचंय हे तुला माहिती आहे का?"

"हो त्यांनी मघाशीच पूर्ण माहिती दिली.विश्वास ठेवा सगळं काही बरोबर होईल.धैर्य असे खचू देवू नका.ज्या आशेने आपण इथपर्यंत आलोय.ती पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवा."

"कशाची कुजबुज चालू हाय साहेब..उदयाला लवकर निघायचं आहे.जरा लवकर पाय लंबे करा."

"हो..हो...सहज विचारपूस चालू होती."

"मला समजतेय तुमची परिस्तिथी.अडाणी आहे साहेब.पण इतकाही नाही की चेहरा वाचता नको यायला.."

जंगलाचा इतका भय असताना देखील गंगाधर आणि मी बाहेरच झोपलो आणि स्त्रियामंडळी आत घरात होत्या.रोज टीव्हीवर बातम्या बघताना झोप यायची.आज कितीतरी दिवसांनी असं खुलं आभाळ दिसत होतं.चांदण्यांची गम्मत बघायला मिळत होती.हळूहळू एकेक ढगाला मागे टाकत जाणारा चंद्र दिसत होता.बऱ्याच वेळानंतर झोप लागली.थंडगार वाऱ्याच्या बाहुपाशात तशी घट्ट निद्रा कधीच मला आली नसेल.कारण दोन वाजेच्या सुमारास सगळे मला हलवत होते तरी पण जाग यायला तयार नव्हती.

डोळे उघडले तेव्हा गंगाधर अंगावर घोंगडं आणि एका हातात टॉर्च घेऊन उभा होता. आवं उठा न सायेब, आकाशतनं कवाचाच कौल आलाय.मी घाबरून उठून उभा झालो.पण मला एक कळत नव्हते की गंगाधरला आकाशाची कोणती भाषा समजते.माझी प्रश्नार्थक मुद्रा गंगाधरच्या लक्षात आली असावी.त्याने आकाशाकडे बघत बोटे दाखवली.खगोलीय विषुववृत्तावरील एक मोठा परंतु अंधुक तारकासमूह चकाकत होता. टॉलेमी यांच्या ४८ तारकासमुहांपैकी हा एक होता.याला इंग्रजीमध्ये ophiuchus ( ऑफीयुकस) म्हणतात.आणि हे मूळ ग्रीक नाव असून त्याचा अर्थ साप( भुजंग) असा होतो.पूर्वीच्या लोकांमध्ये असे काय समज अजून लपले आहेत माहित नाही.पण त्या चमकणाऱ्या तारकासमुहांचा इथे काय संबंध आहे हे मला बघायचं होतं.

झोप उडवण्यासाठी चेहऱ्यावरून पाणी घेतलं आणि गंगाधरच्या मागोमाग चालू लागलो.कानोसा घेत गंगाधर रस्ता काढायचा.आणि त्याच्या मागोमाग आम्ही सगळे चालायचो.अजूनही आठवते त्या प्रवासात माऊलीचा तान्हा अजिबात रडला नाही.एखाद्या शहाण्या बाळासारखे कधी टकमक बघायचा तर कधी शांतपणे झोपायचा.हात दुखू नये म्हणून वसुधा अधीमधी त्याला पकडायची.

अंधारात चाचपडत असताना आम्ही बराच अंतर चालून आलो होतो.गंगाधरची झोपडी आणि तो अंगणात असणारा लाईट केव्हाच नजरेच्या आड झाला होता.मी चालत तर होतो पण अर्धा लक्ष माझं सभोवार असायचं. जरासाही काही आवाज आला की माझ्या हृदयात एकदम जोराने धस्स व्हायचं.

रात्रीचा थंडगार वारा चाललेला होता.पण कपाळावर घामाचे ओघळ जमा होत होते. श्वासांचा आता आवाज पण व्हायला लागला होता.पण गंगाधर मात्र कमालीचा माणूस होता.त्याला जरासाही दम येत नव्हता.टॉर्च घेऊन आधी सामोरी जाणे,आजूबाजूची चौकशी करणे आणि आम्ही कुठे थांबलो आहोत म्हणून परत आमच्यापर्यंत येणे.त्याच्याकडे बघितल्यावर असं वाटत होतं की जणू तो काही चाललाच नाही आहे.

इतक्याने बरं होतं की रात्र उजेडाची होती.त्यामुळे अंधाऱ्या रात्रीपेक्षा बरंच काही डोळ्यांना दिसत होतं.आणि अर्धा पाऊण तास चालत आलो, तरीपण एकही प्राण्याचे दर्शन झाले नाही.मलापण थोडा दम आला होता.त्यामुळे दहा मिनिटे बसून विश्रांती घेऊयात असं मी म्हणालो.तितक्यात गंगाधरच म्हणाला...

"बसा साहेब बसा...पाच दहा मिनिटे विश्रांती घ्या...कारण आता आपण जवळच आलोय."


गंगाधर वाक्य पूर्ण करतच आहे की एक घुबड एक कर्कश घुत्कार काढत गंगाधरच्या डोक्यावरून उडत गेला.त्यासरशी गंगाधर स्तब्ध झाला.तो आजूबाजूचा कानोसा घेऊ लागला.हे जे काही घडत होते माझ्यासाठी कुतूहलास्पद होते.मीच काय एवम वसुधासुद्धा घाबरली होती.घाबरून ती सुद्धा माझ्याजवळ येऊन बसली होती.

बघितलं तर घुबड हा रात्रीकर पक्षी आहे.बरेच आवाज काढतो पण तरीही त्याला बरीच लोक भितात.आपल्याला जसं रात्री दिसत नाही. तसं त्याला दिवसाढवळ्या दिसत नाही.पण एक मात्र आहे त्याच्या आवाजामागे किंवा त्याच्या कृत्यामागे बरीच कारणे दडलेली असतात.आणि या वेळेसचे कारण गंगाधरच्या लक्षात आले असावे.काही वेळाने गंगाधर आला आणि म्हणाला...

सायेब, एकदाचं ध्यान देऊन आयका,मनात जे बी भीती आसल,सगळी काढून टाका.कारण आता जे काही घडणार आहे, किंवा जे काही दिसणार आहे ते तुमच्या विश्वासाच्या पलीकडचं हाये.आता जी अनुभूती तुम्हाला होणार आहे.ती काही मामुली नाही.त्यामुळे ज्या काही शंका असतील त्या आत्ता आणि शेवटच्या इथेच टाकून द्या,पुन्हा त्याचा काही त्रास नको.कारण आता समोरचा त्रास फक्त तुम्हालाच नाही, तर आम्हाला बी होणार.हे लक्षात ठेवा.

गंगाधरची घाई आता लक्षात येत होती.बरेचसे चित्रविचित्र आवाज यायला लागले होते.आता रस्ता पूर्णपणे चढाईचा होता.आणि डोंगर दणाणेल असा फुत्कार कानाशी येत होता.आणि त्याच आवाजाच्या मागे मागे गंगाधर आम्हांस नेत होता.जेव्हा जेव्हा तो फुत्कार होई.हृदयात जोरात धस्स व्हायचं.आणि त्या फूत्काराच्या मागे खण खण असा आवाज व्हायचा. असं बरंच वेळ आम्ही त्या फूत्काराच्या मागे मागे जात होतो.तो एक विशालकाय भुजंग होता.रात्र उजेडी असली तरी स्पष्टपणे मी त्यांस पाहू शकत नव्हतो.पण त्याचा आवाज आणि त्याची हालचाल बघून एवढं नक्की वाटत होतं की तो साधासुधा भुजंग नाहीच.खरंच गंगाधरच्या म्हणण्यानुसार कल्पनेच्या बाहेरचं सगळं घडत होतं.आणि त्याच्या मागे असणारं खण खण म्हणजे या जंगलात अमाप द्रव्यसाठा आहे याची ग्वाही देत होता.भले गंगाधरने सांगितलं होतं की भीती त्यागून द्यायची, पण जेव्हा कधी तो भुजंग थांबल्यासारखा वाटायचा.माझी भीतीने गाळण उडायची.
शिवाय तो प्रकाश चालू बंद व्हायचा.अगदी काजव्यासारखा, हळूहळू तो भुजंग आडीमोडी डोंगराच्या पायथ्याशी सरपटू लागला.दगडांचे उंचच उंच कडे होते.त्यामुळे दगडांचा आधार घेत त्याच्या मागे मागे जाऊ लागलो.समोर एक गुंफा होती.आम्ही सगळे बाजूलाच थांबून होतो.क्षणभर गुंफेच्या पायथ्याशी भुजंग घुटमळला.आणि जोरात फुत्कारला.सबंध रान जागेल असे त्याचे फुत्कारने होते.कानठळ्या बसतील असा तो आवाज दगडांना चिरत चिरत गेला होता.सारखं हृदयाला एक थरकाप जाणवत होता.

मी एका दगडाच्या कडेने वाकून पाहिले. गुंफेशी ठाण मांडलेला भुजंग स्पष्टपणे दिसत होता.त्याचे लाल लाल अजस्त्र डोळे रागाने लालबुंद दिसत होते.बहुतेक कुणाची चाहूल लागल्यागत तो भुजंग तिथे ठाण मांडून बसलेला होता.आणि इतक्यात चित्रविचित्र आवाज करत मघाशी असलेला घुबड आला.पायथ्याशी असलेल्या झाडावर बसून ओरडू लागला.कदाचित तो त्या भूजंगाला डिवचू बघत होता.

भुजंगाला त्याच्या येण्याची आधीच चाहूल होती.त्यामुळे त्या झाडाच्या दिशेने भुजंगाने झेप घेतली, आणि तो घुबड घुत्कार करता करता पळून गेला. भुजंगाच्या त्या आकांडतांडवाने ते झाड जमिनीपासून उखळून गेले होते. घुबडाच्या गेल्यानंतरही भुजंगाचा राग कमी झाला नव्हता.संपूर्ण पेरजागड दणाणेल असा त्याने एक फुत्कार सोडला आणि जवळच असलेल्या गुंफेत त्याने प्रवेश घेतला.

त्याचा राग इतका भयंकर होता की त्याच्या गेल्यानंतरही जागचं हलायलासुद्धा भीती वाटत होती. पायाखालच्या पाचोळ्यायाचाही इतका आवाज येऊ नये, याची काळजी घेत होतो.पण या सगळ्यात निश्चिंत होता तो माऊलीचा तान्हा.भीतीने आमची धावपळ होत होती पण तो शांत साखरझोपेत होता.जणू इथे त्याला कशाचीच चिंता नव्हती.

काही वेळाने सगळीकडे एक भयाण शांतता पसरली.कुठलाही फुत्कार वा चित्कार ऐकायला येत नव्हता.जिकडे बघावे तिकडे एक विचित्र शांतता जाणवत होती.गंगाधर आणि आम्ही ज्या आडोशाला लपलो होतो, तिथून गंगाधर बाहेर आला.आणि त्या भूजंगाच्या गुंफेकडे जाणाऱ्या एका दगडावर उभा झाला.त्याला बघून मागोमाग मी आणि इतरही येऊ लागले. गंगाधरने दगडांना कान लावला. भुजंगाचं कंपन अजूनही दगडांशी उमडत होतं.त्यामुळे सावकाश पाऊले टाकत गंगाधर गुंफेकडे जात होता.आणि मागोमाग आम्ही पण जात होतो.

काही वेळाने जरा भीतभीतच आम्ही सगळे त्या गुंफेच्या समोर होतो.गुंफेच्या तोंडाशी एक पंचशेषाची मूर्ती होती.गुंफा किती खोल आहे कळलं नाही पण तोंडाशीच इतका अंधार दाटला होता की तिथं उभं राहायलाही जीवावर येत होतं.आणि आपल्या डोळ्याच्या समोर जेव्हा भुजंग त्या गुहेत गेला, तेव्हा तिथेच त्या गुंफेच्या तोंडाशी उभे राहणे म्हणजे थोडं भीतीदायकच असते ना!आणि खरंच त्या वेळेस मला सारखी भीती जाणवत होती.

गुंफेच्या तोंडाशी थोडी बरीच जागा होती पण पहिल्यांदा जायचे कुणी?हा विचार सारखा माझ्या मनात येत होता.माझी ती चिंता गंगाधरने ओळखली असावी.त्यामुळे एक मशाल पेटवून तोच सगळ्यात आधी तिथे गेला. तान्ह्याला वसुधेकडे सोपवत माऊली सुद्धा मागोमाग गेली.मी जरा भीतभीतच वसुधेसोबत त्यांच्याजवळ पण बाहेरच असलेल्या दगडावर जाऊन बसलो.कारण अजूनही तिथे जायचे धाडस माझ्या अंगात येत नव्हते.

गंगाधर आणि माऊली पंचशेषाच्या समोर ध्यानस्थ बसले.आणि सोबतच आणलेल्या सामग्री सोबत ते पूजेची तयारी करू लागले होते.गंगाधर ओठातल्या ओठात काहीतरी मंत्र पुटपुटत होता.आणि माऊली त्याला जे हवेय ती सामग्री काढून देत होती.पूजा संपन्न झाल्यावर त्याने बाजूलाच दगडे रचून यज्ञाची तयारी सुरू केली.माऊलीने आधीच वसुधेला त्याची कृती समजावून सांगितली होती.त्यामुळे आता जे काही होतं ते तिच्याच हाती होतं.

त्या भयाण शांततेत गंगाधरचा मंत्रनाद चालू होता.माऊली त्याच्या प्रत्येक वाक्यासरशी यज्ञात समर्पण करत होती.मला ते थोडे विचित्र वाटत होतं, पण जे घडत आहे त्यावर विश्वास करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.त्यामुळे मी हे सगळे बघत होतो.काही वेळात वसुधेने डोळे मिटले.जणू ती इथे असूनही डोळे मिटून दुसऱ्या विश्वात वावरत आहे.त्यावेळेस तिच्या विश्वात काय घडत आहे? हे तिनेच काही दिवसानंतर मला सांगितले होते.

ती बघत होती.ती कुठेतरी विशालकाय पाण्याच्या पातळीच्या तळाशी जाऊन पोहचली होती.चारही बाजूला पाण्याचा संथपणा तिला जाणवत होता.ती कोणत्या कल्पनेत वावरत होती,माहिती नाही पण त्या तळात असूनही ती स्वच्छंदपणे बघू शकत होती की वावरू शकत होती.दूर दूर पर्यंत तिला काहीच दिसत नव्हतं.ती चालत चालत सामोरी जात होती.काही वेळ असं सामोरी गेल्यावर तिच्या नजरेत काही आलं.

सामोरी एक शिवशंकराची प्रतिमा होती.ती इतकी प्राचीन आणि कोरीव होती की क्षणभर ही मूर्ती इथे कशी? हा विचार वसुधा करायला लागली होती.मूर्तीच्या खाली एक शिवपिंड होती.ती चालत चालत त्या शिवपिंडाकडे जात होती.लक्ष अशी सामोरी होती.आणि तेव्हढ्यात शिवशंकराच्या प्रतीमेमागून एक छोटीशी सुतापेक्षा बारीक वस्तू हालचाल करून शिवपिंडाकडे आली.ती अवघ्या काही पावलांवरच असल्यामुळे तिला ते दिसायला आलं.जशी ती वस्तू शिवपिंडावर आली,शिवपिंडाचा स्पर्श होताच त्या वस्तूत बदल होऊ लागला.ती सूतापेक्षा बारीक असलेली वस्तू हळूहळू मोठी होऊ लागली.तो एक शिवपिंडावरचा भुजंग होता.हळूहळू त्याचा व्याप इतका वाढत गेला की नजरेच्याही कोपऱ्यात मावेनासा होऊ लागला होता.तो बदल बघताच वसुधा घाबरली.ती इतकी घाबरली की तिने डोळे लावले आणि ओरडायला लागली.

मग डोळे उघडले तेव्हा तेव्हा वादळ आल्यासारखं त्या तळात हालचाल होताना दिसली.तो भुजंग,ती शिवपिंड,शिवप्रतिमा सगळे काही दिसेनासे झाले.ती पूर्ववत झाली.पण भुजंग मात्र डिवचलेला होता.मला वाटते ती हीच भीती असेल जी टाकून द्यायला सारखा गंगाधर म्हणत होता.

पूर्ववत आल्यावर वसुधा इतकी घाबरली होती की ती उठून उभी झाली.आणि मला परतूयात म्हणून निघू लागली.त्यावेळेस मला त्याची काहीच कल्पना नव्हती.पण ती घाबरली होती, त्यामुळे नक्कीच काहीतरी भयंकर घडले आहे, असे मला वाटत होते.अचानक मघाशी असलेला फुत्कार जाणवू लागला.

यज्ञ चालूच होता आणि गंगाधरला याची पूर्व कल्पना होतीच.पण हे आता सगळ्यांवरच भारी पडेल याची पूर्वसूचना सुद्धा त्याने खूप आधीच दिली होती.त्याच्या कानाशी येत असलेले फुत्कार आता कळायला लागले होते, की नक्कीच काहीतरी अघटीत घडेल आता.फुत्कार वाढू लागले आणि भुजंग बाहेर आला. यज्ञावरून सरपटत आल्यामुळे यज्ञाची केव्हाच राखरांगोळी झाली होती.

मी आणि वसुधा फार घाबरलो होतो.गुंफेत अडकल्या गंगाधरचं आवाज आला.. सायेब बाळास्नी घेऊन निघा तुम्ही...अजिबात थांबू नका. भुजंगाचे आकांततांडव आम्हाला माहीत होते त्यामुळे न बघता आम्ही वाट मिळेल त्या रस्त्याने निघायला लागलो.मागाहून ऐकू येत होती ती गंगाधरची आणि माऊलीची किंकाळी,आणि त्या भुजंगाचे आक्रोश.

या सगळ्या धावपळीत उजाडायला पण लागलेच होते.पण एक अजूनही प्रश्न पडला होता.जेव्हा आम्ही परतत होतो तेव्हा गंगाधरचे घर आम्हाला दिसले नाही.बऱ्याच लोकांनी तुम्ही जंगलातून येत आहात?तिथे काय करत होतात?कशाला गेला होतात? हे प्रश्न अगदी आवर्जून विचारले असतील.

आणि तो बाळ त्या धावपळीतही अगदी शांत होता आणि इकडे शहरात आल्यावर रडायला लागला.त्याला बघून वसुधेची माया ममता उमळू लागली.तिच्या डोळ्यांतून पाणी आणि उरोजांतून दुधाच्या धारा वाहू लागल्या.तो मुलगा म्हणजे तूच आहेस पवन. पेरजागडाचा वारसदार तूच आहेस.

पण एक कळत नाही.जर गंगाधर त्या दिवशी जिवंत वाचला होता तर मग आजपर्यंत मला भेटला का नाही.निदान तुझी भेट घ्यायला तुला न्यायला येण्याचं त्याचं पुरेपूर हक्क होतं,काहीही झालं तरी तो तुझा खरा वडील होता.

शेवटी आपला प्रश्न पुन्हा तितक्यावरच राहिला.कोण होता पवन?आणि नेमकं त्याचं आणि या भुजंगाचं काय नाते होते?कुठे होता गंगाधर? आता काय तयारी असेल पवनची? या सगळ्यांची उत्तरे तुम्हाला सापडतील. पेरजागड भाग पाच मध्ये.पण त्याआधी पेरजागड भाग एक,दोन,तीन हे भाग वाचायला विसरू नका,आणि कसे वाटले ते मत द्यायलासुद्धा विसरू नका. पेरजागड भाग पाच लवकरच आपल्या प्रतीक्षेत...