Passport - 1 books and stories free download online pdf in Marathi

पासपोर्ट - भाग १

पास पोर्ट

भाग १

वसंत राव नुकतेच निवृत्त झाले होते. फंडांची  रक्कम अकाऊंट मध्ये जमा झाली होती. भरगच्च पेंशन दर महिन्याला मिळणार होती. म्हणजे तशी आर्थिक सुबत्ता होती. एका financial expert शी  बोलून त्यांच्या सल्याने त्यांनी फंडातली बरीचशी रक्कम कुठे कुठे गुंतवली होती. अशी सगळी व्यवस्था झाल्यावर, त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता बाई, एक दिवस रात्री जेवण झाल्यावर वसंत रावांना म्हणाल्या –

अहो, मी काय म्हणते,

अग म्हणल्यावरच कळेल न, आधीच कसं कळणार ? .

आणि असं म्हणून जोरात हसले. त्यांच्या मते त्यांनी मोठाच विनोद केला होता. पण सुनीता बाईंना तसं वाटलं नाही.

अहो, काय हे, प्रत्येक  गोष्ट कशी हसण्या वारी नेता तुम्ही ? ते काही नाही. आता माझं ऐकाच.

बरं ऐकतो , सांग काय म्हणतेस.

मी काय म्हणते,

अग पुन्हा तेच, काय ते बोल ना.

सांगतेच आहे पण तुम्ही बोलू द्याल तेंव्हा ना. आता मधे मध्ये बोलू नका. आणि मी काय सांगते ते ऐका.

ओके. बोल

रिटायर झाल्यावर आपल्याला बरेच पैसे मिळाले आहेत तेंव्हा आपण फिरायला जाऊ शकतो. थोडा फार खर्च करू शकतो. काय म्हणता ?

कुठे जायची इच्छा आहे तुला ?

आपण मध्यम वर्गीय आहोत, आणि तसं म्हंटलं तर आयुष्य गेलं, रोजच्या कटकटी आणि मुलांची दुखणी खुपणी आणि त्यांच्या खर्चाला प्राधान्य देऊनच. आता सगळे आपापल्या संसारात रमले आहेत. तेंव्हा आपण “आपलं” असं आयुष्य जगू की. आपल्या मनाला वाटेल, आपल्या मनाला भावेल असं काही तरी करू की. होईल थोडा खर्च, काय फरक पडतो ?

आता वसंत राव पण विचारात पडले. सुनीता बाईंच्या बोलण्यात तथ्य होतं.

खरच काय हरकत आहे कुठे जाऊया ? काश्मीर ?

अं हं, माझी इच्छा आहे युरोप टूर करायची. ट्रॅवल कंपनी सगळी व्यवस्था  आणि

सोय करते म्हणतात. मागच्या वर्षी, त्या सुधा ताई जाऊन आल्या त्या खूप तारीफ करत होत्या. आपण पण जाऊन चौकशी करूया का ?

अग आपण एकदा अमेरिकेला आणि Australia ला दोनदा जाऊन आलो आहोत. आता युरोप ला जाऊन काय वेगळं पहाणार ?

असू द्या हो, युरोप हे युरोप आहे आणि इंग्लंड पण आहे त्या पॅकेज मध्ये.

किती दिवसांचा टूर असतो ? तुझ्या त्या सुधा ताईंना जरा डीटेल मधे विचार मग ठरवू.

चालेल. उद्याच विचारते

दुसऱ्या दिवशीच सुनीता बाई, सुधा ताईकडे गेल्या. त्यांना तर खूपच आनंद झाला. त्यांच्या युरोप ट्रीप बद्दल कोण इंट्रेस्ट दाखवला आहे हे कळल्यावर त्यांच्या  जि‍भेवर जणू काही सारस्वतीच अवतरली. त्यांच्या ट्रीप मध्ये सुनीता बाईंना काडीचाही इंट्रेस्ट नव्हता पण माहिती हवी असेल तर थोडं सहन करावंच लागणार होतं.

रात्री जेवणानंतर त्यांनी पुन्हा विषय काढला.

अहो सुद्धा ताईंशी बोलून आले मी.

काय म्हणताहेत त्या ?

माणशी सव्वा लाख लागतात म्हणाल्या त्या. पण हे डॉलर आणि रुपया च्या रेट वर अवलंबून असतं असं म्हणाल्या. सध्या ४३ रुपये चालू आहे म्हणाल्या. मग काय म्हणता ?

सुनीता, सव्वा लाख खर्च करणं हा काही प्रॉब्लेम नाहीये. पण मला फारशी इच्छा नाहीये युरोप ला जायची. तुझी एकट्याने जायची तयारी असेल तर तू जाऊ शकतेस. पहा.

अहो, असं काय करता ? आजवर मी एकटी, तुम्हाला सोडून  कधी कुठे गेली आहे का ? दोन वर्षा पूर्वी, त्या अनिकेत च्या लग्नाला जायचं माझ्या खूप मनात होतं पण तुम्ही येणार नव्हता म्हणून मग मी पण गेले नव्हते. ते काही नाही, मी कधी तुम्हाला यापूर्वी आग्रह केला का ? नाही ना, मग आता चलायचच  तुम्ही पण युरोप ट्रीप ला.

मग बरीच भवती न भवती होऊन वसंत राव ट्रॅवल ऑफिस मध्ये यायला तयार झाले.

सगळी माहिती दिल्यावर तो एजेंट म्हणाला की पुढच्या महिन्याच्या १८ तारखेला निघतोय. पण एकच जागा शिल्लक आहे.

आता प्रॉब्लेम झाला. सुनीता बाई म्हणाल्या दूसरा ग्रुप केंव्हा जाणार आहे ? त्या मध्ये बघा.

असं बघा आता ऑगस्ट चालू आहे आणि सप्टेंबर पर्यन्त तिथला बेस्ट सीजन असतो. तेंव्हा यांच्या नंतर कदाचित डिसेंबर उजाडेल.

बरं आम्हाला कोण कोण जातं आहे हे कळेल का ?

हो, ही बघा लिस्ट.

त्या लिस्ट मध्ये सुनेत्रा वाडकर चं नाव दिसलं.

अहो हे बघा सुनेत्रा पण जाते आहे असं दिसतंय.

असं ? बघू. मग आता तू एक काम कर सुनेत्राशी बोल. आणि मग तुला वाटलं तर जा. तिची कंपनी असेल तर तुला एकटीला जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये.

सुनीता बाईंना वसंत रावाचं बोलणं काही आवडलं नाही, पण त्या गप्प बसल्या. उद्या सांगतो असं सांगून ती दोघं निघाले.

घरी आल्यावर सुनीता बाई म्हणाल्या

तुम्ही सुनेत्राशी बोल असं का म्हणाला हो ? तुम्हाला खरंच यायची इच्छा नाहीये का ?

असं बघ, जर तुला चांगली कंपनी मिळत असेल तर काय हरकत आहे ? मला  खरंच युरोप मध्ये इंट्रेस्ट नाहीये. तू बोलून तर बघ, जर नाही जुळलं तुला, तर मी आहेच.

सुनेत्राशी बोलणं झाल्यावर सुनीता बाई म्हणाल्या की ती पण एकटीच जाते आहे. आणि मी येण्याचा विचार करते आहे म्हंटल्यांवर तर फारच खुश झाली.

म्हणाली बरं बाई तू येणार आहेस. मला पण सुटल्या सारखं झालं नाही तर परदेशात एकटीने जायचं धाडस तर केलं, आणि बूकिंग पण केलं, पण जरा धाक  धुकच होत होती. आता बरं वाटतंय. तू पण येच नक्की. मी तुझ्या फोन ची वाट पाहते.

मग ? काय विचार ठरतोय ?

काय करू ? तुम्हीच सांगा.

अग बिनधास्त जा. सुनेत्रा तुझी बाल मैत्रीण आहे आणि आज तागायत तुमचे

संबंध टिकून आहेत. तुम्ही दोघी बरोबर असल्या तर तुम्हाला पण वावरणं सोपं होईल.

खरं आहे तुमचं म्हणण पण अहो, मी आजवर एकटी कुठेच गेले नाहीये, नेहमी तुम्ही बरोबर असताच.

हो, पण आता तुम्ही दोघी असाल नं, आणि दोघी ग्रॅजुएट आहात, अडाणी नाही. सुनेत्रा तर नोकरी करते आहे. आणि मैत्रीण बरोबर असल्यावर तुला माझी आठवण सुद्धा येणार नाही. परत फक्त १५ दिवसांचाच तर प्रश्न आहे. ते ही तुम्ही ट्रॅवल कंपनी बरोबर जाणार आहात, सगळी काळजी घेतीलच ते. हे १९९० साल आहे, आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. अठराव्या शतकात नाही. आता सगळ्या सोई झाल्या आहेत.

त्या रात्री सुनीता बाईंना नीट झोप लागली नाही. कसं होईल, काय होईल याचाच विचार रात्रभर डोक्यात चालू होता.

दुसऱ्या दिवशी दोघंही जाऊन सुनीता बाईंचे पैसे भरून आले.

 

क्रमश: .......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com