Mrunmayichi dayari - 4 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मृण्मयीची डायरी - भाग ४

Featured Books
Categories
Share

मृण्मयीची डायरी - भाग ४

मृण्मयीची डायरी भाग ४था..

मागील भागावरून पुढे….


किती तरी वेळ वैजू डायरीकडे सुन्न नजरेनी बघत बसली होती. तिला वाटू लागलं एका मुग्ध निरागस मनाच्या जीवाला आपण खूप मोठ्ठी शिक्षा दिली.अशी शिक्षा देण्याचा आपल्याला काय अधिकार होता?


आपल्या स्वप्नांच्या कळ्या वेचण्यासाठी आपण धडपड केली नं! तिची स्वप्नं तर खूपच छोटी होती.ती फुलवण्याचा तिला आपल्यासारखाच अधिकार होता. मी, आई, बाबा, सारंग सगळ्यांची जबाबदारी होती तिच्या स्वप्नांना ऊमलविण्यासाठी हवी ती मदत करायची. मदत सोडा आपण तिची स्वप्नंसुद्धा समजून घेतली नाही.


तिची स्वप्नं या जगातील स्वप्नांपेक्षा वेगळी होती. निरागस होती. सच्ची होती. तिची स्वप्नं आपल्याला पेलवली नसती कदाचित.


आपण नेहमीच जगाच्या वेगवान शर्यतीत दौडत होतो. या जगात निरागसतेला किंमत नाही. आहे फक्त व्यवहार. तो मृण्मयीला कधी जमला नाही आणि पुढेही जमलाच नसता. इतकी ती हळवी होती.


वैजूला डायरी पुढे वाचवेना.तिच्या डोळ्यातून अखंड पाणी वहात होतं.अजून जवळपास अर्धी डायरी वाचायची होती.


कशी वाचू मी ही डायरी? जेवढी वाचली तेवढ्यानीच मनात गुन्हा केल्याची भावना आली आहे. इतकं अपराधी वैजूला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं.


आज आपण मृण्मयीची डायरी वाचली. आईबाबा आणि सांरंगला कशी वाचाविशी नाही वाटली. मृण्मयी डायरी लिहीते हे आम्हा कोणालाच माहिती नव्हतं.आज मला तिची डायरी सापडली. तिची खोली आवरताना म्हणून मला कळलं.


आईला दिसली नसेल का?,की दिसूनही जाणून बुजून तिनं लक्ष दिलं नाही. कारण आईला मृण्मयीच्या कोणत्याच गोष्टी पटत नव्हत्या.


आपल्याकडे बघून आई जशी हसायची तशी मृण्मयी कडे बघून नाही हसायची. आता एकेक गोष्टी वैजुच्या लक्षात येऊ लागल्या. वैजूच्या डोक्यात विचारांचा नुसता गुंता झाला.


आत्तापर्यंत आपण इकडून तिकडून बाहेरच्या लोकांबाबतीत घडलेल्या अश्या गोष्टी ऐकल्या. आज आपल्या बहिणी बाबतीतच असं घडलंय. आपण तिच्याजवळचे असून आपल्याला तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली नाही.


आपण सगळे इतके स्वतःतच रममाण झालो होतो की आपल्या बहिणीनी मदतीसाठी मारलेली हाक आपल्याला ऐकू आली नाही. इतके कान बंद करून एकाच घरात आपण वावरलो? असं नको होतं व्हायला.पण झालं.भयानक पद्धतींनी झालं.


किती लाजीरवाणी गोष्ट आहे ही. पण ती घडलीय आमच्या चौघांकडुनच.आता याचं प्रायश्चित्त घेणार कसं? आणि घेतलं तरी उपयोग काय? जी व्यक्ती आमच्याजवळ येण्याचा अहोरात्र प्रयत्न करत होती तीच आता या जगात नाही. प्रायश्चित्त केलं तरी ते सांगणार कोणाला? आणि दाखवणार कोणाला?


वैजू हताश झाली. सारंग आणि मी मृण्मयीची सख्खी भावंडं असून असं कसं वागलो हा विचार तिच्या मनाला पोखरत होता. तिची कुठेतरी तंद्री लागली होती. कोणीतरी तिला गदागदा हलवलं म्हणून ती भानावर आली. बाजूला सारंग उभा होता.


"अगं वैजू काय झालं?अशी मृण्मयीच्या खोलीत का बसली आहेस?आणि रडते का? "


" सारंग मी मृण्मयी ची डायरी वाचत होते.आपण खूप वाईट वागलो तिच्याशी."


"ऐ काहीतरी काय बोलतेस?अगं ती मंदच होती म्हणून वेड वाकडं वागून आपली बोलणी खायची."


" नाही सारंग ती मंद नव्हती. ही डायरी वाच तिची. म्हणजे तुला कळेल मी काय म्हणते आहे."सारंग वैजू च्या हातातली डायरी बघून हसला.


"ही डायरी... मृण्मयी डायरी लिहायची! काहीतरीच काय. तिला शाळेचा अभ्यास जमला नाही ती मुलगी डायरी लिहेल! वैजू तू नं विचीत्र गंम्मत करते आहेस."


"नाही सारंग ही डायरी मृण्मयीनीच लिहीली आहे. डायरी वाचताना माझे डोळे रडायचे थांबत नाहीत. खूप कठोरपणे आपण तिच्याशी लागलो. तिच्या छोट्या छोट्या इच्छांना आपण बावळटपणा समजलो. तिच्या इच्छा आपल्या इच्छांपेक्षा खूप छोट्या होत्या पण त्या टाकाऊ नव्हत्या.


मोठी महत्वाकांक्षा असणं चांगलं आणि छोटीसी इच्छा जिला आपण महत्वाकांक्षा म्हणणार नाही ती असणं वेडेपणा आहे का रे ?"


"वैजू तू फारच सेंटी झालीस एकदम. बघू असं काय आहे त्या डायरीत?"


" सारंग तू चेष्टा करणार असशील तर नको वाचू ही डायरी. मी मुळीच जबरदस्ती करणार नाही तुझ्यावर."


"अगं नाही करणार चेष्टा.मला गंम्मत वाटतेय जिला बोलणं सुचायचं नाही ती लिहू कशी शकेल? हा माझा छोटासा प्रश्न आहे."


"आपण खूप बोलतो सारंग पण तरीही चार ओळी आपल्याला कोणी लिहायला सांगीतलं तर आपली ततपप होते.नाही लिहू शकत आपण. मृण्मयी कमी बोलायची पण शब्दातून छान सविस्तर बोलायची. तू वाच डायरी पण को-या मनानी वाच. ही डायरी मृण्मयीची आहे असं समजून वाचू नको.मग तुला तिनी लिहीलेलं कळेलं"वैजू मृण्मयी बद्दल इतकी हळवं कशी झाली याचं सारंगला आश्चर्य वाटलं. त्याने हातात घेतलेली डायरी खाली ठेवली.हे बघून वैजू म्हणाली


"सारंग डायरी का खाली ठेवलीस?वाच ती."


"मला फारसा इंटरेस्ट नाही हे वाचण्यात.तू इतकी कशी मृण्मयी साठी हळवी झालीस.मंदच होती ती."


" नाही सारंग ती मंद नव्हती.आपण तिला त्या रूपात बघीतलं. तिला आपण समजूनच नाही घेतलं कधी. तू तिला सारखं मंद म्हणायचास."


"अगं ती मंद होती म्हणून म्हणायचो."


"डायरी वाचली की तुला कळेल आपण सारखं तिला मंद म्हणायचो पण किती अन्याय केला आपण तिच्यावर."


" हं... काहीतरीच तुझं.मी एक चुकलो असेन पण तुमच्या तिघांचं काय? तुम्हालाही ती मंदच वाटायची नं? बोल नं?"


"इथेच तर चुकलं आपलं. सारंग तिनी ज्या पद्धतींनी डायरी लिहिली आहे त्यातुन कुठेही ती मंद असल्याचं जाणवत नाही.तिची भाषा, तिचे विचार, तिच्या इच्छा सगळं खूप स्वाभाविक होतं. आपण आपल्या इच्छा अपेक्षा ओळखल्या नं! आई बाबांकडून त्या पूर्णही करून घेतल्या. मग मृण्मयीला का आपण संधी दिली नाही.?"


"वैजु असं असतं तर तिनी शाळा का सोडली? हा प्रश्न येतोच."


"तिला एक मुलगा शाळेत जाता येता त्रास देत असे. तिनी आईला सांगायचा प्रयत्न केला. पण आईनी ऐकूनच घेतलं नाही.त्या मुलापायी मृण्मयीचं शैक्षणिक नुकसान झालं.


आपण त्या गोष्टीचा इतक्या गांभीर्याने विचार केला का? नाही. तिला मंद ठरवून मोकळं झालो. अरे तिला शाळा आवडायची. तिला आपल्यासारखंच शिकायचं होतं. आणि मृण्मयी...ती बिचारी सगळ्यांना सांगून सांगून थकली आणि आपल्याच कोषात गेली."


वैजूला रडू आवरेना ती पुढे बोलूच शकली नाही.सारंगही कुठंतरी हरवल्या सारखा बघत होता.त्याच्या मनात आलं वैजू म्हणते ते खरं असेल? खरच आपल्या सगळ्यांचं वागणं चुकलं असेल का? आता त्यालाही लक्षात आलं की आपण कधीच तिच्याशी प्रेमानी बोललो नाही. आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती.


दादा म्हणून आपण कधी तिचं कौतुक केल्याचं आठवतं नाही. वैजू आणि आपल्यात दोनच वर्षांचं अंतर असल्याने आपली गट्टी जमली होती.पण मृण्मयी लहान असल्याने आपल्या आणि वैजूच्या विश्वात तिला स्थानच नव्हतं.


आपण तिला मंद म्हणायचो का म्हणायचो तेच कळत नाही. ती खूपच कमी बोलायची. वैजू म्हणते तसं आपण ती कमी का बोलते त्यामागचं कारणच कधी शोधलं नाही आणि तिला मंद ठरवून मोकळं झालो.सारंग अश्या विचारात असतानाच त्यांचं लक्ष खुर्चीवर ठेवलेल्या डायरी कडे गेलं.त्याने डायरी उचलली.वैजूनी ते बघीतले.म्हणाली


"तू डायरी वाच. इतकी वर्ष आपल्या सहवासात असलेली आपली बहिण आपल्याला कळलीच नाही. ही डायरी तिची ओळख करून देते. ही आपल्यासाठी शरमेची गोष्ट आहे."


"वैजू आपलं सोडं आई बाबांना सुद्धा ती कशी आहे ते कळलं नाही? कधीही मला आई म्हणाली नाही की तिला मंद म्हणून नकोस.आईनी एकदा जरी मला म्हटलं असतं तर.."


"तू ऐकलं असतं? तुझा स्वभाव मला माहिती आहे. तुझं काय मी सुद्धा तशीच वागले.फक्त तुझ्यासारखं येता जाता तिला मंद म्हटलं नाही एवढंच."


"मी वाचीन मृण्मयीची डायरी.पण तू म्हणतेस तसं असेल तर आपण तिच्यापासून जवळ असूनही खूप दूर होतो. सख्खी बहीण होती मृण्मयी आपली. आपणच तिला आपल्या जगापासून लांब ठेवलं. कधीच तिच्या मनात डोकावून बघण्याचा विचार कसा आपल्या मनात आला नाही? आता वाईट वाटतं. आपण असं कसं वागलो?""डायरी वाचलीस की अपराधीपणाची भावना तुझ्या मनात पण येईल. मी मलाच दोषी मानते आहे."


"असं नको वाटून घेऊस. खरतर आई बाबांची आधी चूक आहे.त्यांनी तिला समजून घेतलं नाही.त्यामुळे आपल्याही चुका त्यांना दिसल्या नाहीत. आपण तर लहान होतो. तेव्हा कुठे कोणाला समजून घेणं वगैरे कळतं.आई बाबा पण त्यांच्याचच जगात होते.खरतर आपण चौघेही स्वतःच्याच जगात होतो."


"माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. आपण आपल्यातच मस्त होतो. तिचे प्रश्न, तिच्या मनाला होणारा त्रास हे सगळं आपल्याला समजण्या पलीकडे होतं.तीनी किती आशेनी काही गोष्टी मला सांगीतल्या होत्या.त्यातून तिला बाहेर पडायचा मार्ग हवा होता.पण मी तिची समस्या जाणूनच घेतली नाही.घरातच असणा-या मुलीला काय समस्या असू शकतील असं वाटून मी दुर्लक्ष केलं.आणि तिथेच मी चुकले होते.आता असं वाटतंय."


सारंग वैजूजवळ जाऊन तिच्या खांद्यावर थोपटून म्हणाला.

"आता कशाचाच उपयोग नाही वैजू. वेळ निघून गेली."


सारंग आणि वैजू दोघंही सुन्न झाले होते.


अचानक वैजू म्हणाली,


"सारंग आपण काहीतरी केलं पाहिजे."


"आता काय करू शकतो? आता मृण्मयी नाही. जे काय करायला हवं होतं ते आधीच करायला हवं होतं."


"मृण्मयी सारखे अनेक मुलं मुली असतील. त्यांच्यासाठी काहीतरी करू. मृण्मयीला आपण ओळखू शकलो नाही म्हणून तिला वाचवू शकलो नाही पण इतरांना आपली मदत झाली तर ते या जगातून जाण्याचा विचार करणार नाही."


"तुझा विचार योग्य आहे पण अशी मुलं कोण आहेत हे आपल्याला कसं कळणार?"


"कळेल.आपण त्या काऊंन्सलरला भेटू. मला वाटतं आपल्याला त्यांची मदत होईल. मृण्मयीच्या वेळी आपण काही करू शकलो नाही. जगात अनेक मुलं मुली मृण्मयी सारखे असतील. त्यांच्यासाठी काही करता येतं का बघू." सारंग होकारार्थी मान डोलावतो


"आईकडून त्या काऊंन्सलरचा फोन नंबर आणि पत्ता घ्यायला हवा. आजच मागते आईला त्यांचा नंबर.फोन करून त्यांची वेळ घेते. सारंग मला वाटतं मृण्मयीची डायरी आणि चित्र कलेची वही बरोबर घेऊन जाऊ."


" हो हे ठीक राहील." एवढं बोलून वैजू आईला फोन आणि पत्ता वीचारायला गेली.सारंगही खूप अस्वस्थ झाला होता. केवढी मोठी चूक आपल्या हातून घडली यांचं त्याला दु:ख होतं होतं.वैजू म्हणते तसं केलं तर थोडं तरी प्रायश्चित्त घेतल्या सारखं होईल.


आमच्यासारखी भावंड नको कोणत्याही मृण्मयीच्या सहवासात यायला.हे असं वाटलं तरी दुस-या बाजूनी त्याला हेही वाटलं होतं की यात जास्त चूक आई बाबांची आहे. आपण तर तेव्हा लहान होतो पण मोठं झाल्यावरही आपलं तिच्याशी वागणं का बदललं नाही?


मोठं झाल्यावर आपल्याला नानू आणि मृण्मयी मधला फरक कसा लक्षात आला नाही. नानू तर वेडाच आहे. आता वाटतं मृण्मयी नानू सारखी नव्हती. आपणच चूक केली तिला समजून घ्यायला कारण आपण आपल्याच जगात मस्त होतो.


आपलं करीयर, आपली नोकरी हेच आपलं लक्ष्य होतं.या सगळ्यात आपल्या बरोबरीनी घरातले सगळे होते.फक्त मृण्मयी नव्हती कारण मृण्मयीची चाल हळू होती म्हणून ती मागे राहीली.


मागे वळून मला आणि वैजूला तिचा हात धरता आला असता. एवढं कठीण नव्हतं.पण आपण चुकतोय हेच कळत नव्हतं आम्हा दोघांना. हे आई बाबांनी आम्हांला सांगायला हवं होतं. 'थांबा जरा मृण्मयीला पण बरोबर घ्या.' असं ते म्हणाले नाहीत आणि आमच्या बुद्धीची पोहोच नव्हती तेवढी आम्हीं पण थांबलो नाही.


सारंगचा आता बांध फुटला.कसं आवरायचं स्वतःला हे त्याला कळत नव्हतं.शेवटी मुक्तपणे त्यांनी डोळ्यातून पाणी ओघळू दिलं.

सारंगही वैजू सारखाच विचारांच्या भोव-यात अडकला.

---------------------------------------------------------------

क्रमशः


लेखिका... मीनाक्षी वैद्य.