Mrunmayichi dayari - 8 books and stories free download online pdf in Marathi

मृण्मयीची डायरी - भाग ८

मृण्मयीची डायरी भाग ८

मागील भागावरून पुढे…


वैजू साधारण महिनाभरानी परत नागपूरला येते. कारण अमीता मॅडमनी येत्या शनिवारी साधारण दोन वाजेपर्यंत क्लिनीकमध्ये सारंग आणि वैजूला बोलावलं असतं.


वैजू सकाळी बसमधून उतरल्या उतरल्या सारंगला म्हणते. "सारंग आपण परवा आधी अमीता मॅडमच्या क्लिनीकला जाऊ नंतर प्राजूला भेटू असं मी म्हटलं होतं तुला.तसं सांगीतलं कातू प्राजूला ?"


" हो.तिलाही हाफ डे आहे तर जमेल म्हणाली."


"घरी या गोष्टी बोलणं म्हणजे आ बैल मुझे मार असं करण्यासारखं होईल. अमीता मॅमशी बोलणं कधीपर्यंत आटपेल त्यावर प्राजूला कधी भेटायचं ठरवू." वैजू म्हणाली.


" हो चालेल.मी तसंच सांगीतलं आहे प्राजूला."


बोलता बोलता दोघं घरापाशी आले.वैजू बॅग घेऊन घरात शिरली.आईची चांगली,वाईट या मधील कोणतीच प्रतिक्रिया वैजूनी अपेक्षीत केली नाही.


बाबा नेहमी प्रमाणे सकाळी फिरायला गेले होते.आई स्वयंपाकघरात चहा आणि इतर कामं करत होती.वैजू हातपाय धुवून स्वयंपाकघरात शिरली.


"आई चहा झाला?" तिथेच खुर्चीवर बसून वैजूनी विचारलं. आईनी होकारार्थी मान डोलावली आणि चहाचा कप वैजु समोर ठेवला.


आईचं हे मुकाटपणे वागणं म्हणजे आपल्यावरचा निषेध आहे हे वैजूच्या लक्षात आलं.वैजूनेही आईच्या निषेधाची पर्वा केली नाही.


वैजूनी शांतपणे चहा घेतला आणि बाहेरच्या खोलीत आली. बाबा नुकतेच बाहेरून फिरून येऊन फ्रेश होऊन हाॅलमध्ये येऊन बसले होते.


आईनी तिचा आणि बाबांचा चहा आणला आणि तीही बाहेरच बसली.


थोड्यावेळानी सारंग आणि वैजूची काहीतरी नेत्रपल्लवी झाली ते आईनी बघीतले पण स्वतःहून काही विचारलं नाही. बाबा तर पेपरमध्ये तोंड खुपसून बसले होते.


"आई बाबा हा फोटो बघा." वैजूनी आई समोर मोबाईल धरला.


"कोणाचा फोटो आहे?" आईनी विचारलं.


"प्राजक्ता.सारंगला ही मुलगी आवडते.हिच्याशी त्याला लग्नं करायचं आहे."


"काय? सारंग इतके दिवस मी सतत तुला म्हणत होते तर तेव्हा का सांगीतलं नाही?"


"कुठे मिळाला हा फोटो तुला?" पेपरमधून तोंड वर करून बाबांनी विचारलं.


"बाबा हा फोटो रस्त्यावर मिळाला नाही. सारंग हिला काॅलेजमधे असल्यापासून ओळखतो."


"अच्छा म्हणजे तेव्हाच ठरवलं लग्नं करायचं. मग आतातरी कशाला सांगतो आहेस?"


"सारंग तुझ्या लग्नाबद्दल वैजू का बोलतेय?" बाबांनी सारंगला बरोबर शब्दात पकडलं.


"बाबा प्राजक्ता आपल्या जातीची नाही." सारंग म्हणाला.


" मग कोणत्या जातीची आहे?" आईनी विचारलं.


" त्यांनी काय फरक पडतो?" सारंगनी आईला ऊलटप्रश्नं केला.


" पडतो.चालीरिती सगळ्यात फरक पडतो."


"आई सारंग आणि प्राजूचं एकमेकांवर प्रेम आहे. आत्ता झालेलं त्यांचं प्रेम नाही. काॅलेजपासून आहे. दोघही एकमेकांना चांगले ओळखतात. समजून घेतात. सारंग नोकरीत थोडा स्थिरावला की लग्न करायचं दोघांनी ठरवलं होतं. म्हणून इतके दिवस सारंग गप्प होता." वैजू बोलली.


"आतातरी कशाला सांगतोय?ठरवलं न लग्नं दोघांनी. करा मग. लग्नाला आम्ही येऊ अशी अपेक्षा करू नका." बाबा करवादून बोलले.


" तुम्हाला सांगीतल्या शिवाय मी लग्नं कसं करणार?" सारंग म्हणाला.


"जसं आम्हाला न सांगता लग्नं ठरवलं तसं." आई म्हणाली.


"आई उगीचच अर्थाचा अनर्थ करू नको.जर सारंगला तुम्हाला सांगायचच नसतं तर आताही सांगीतलं नसतं.लग्नं करून मग सांगीतलं असतं." वैजू म्हणाली.


"आता सांगतो आहे हे तसंच आहे. ऊद्या लग्नं करून वेगळं घर केलं तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही." बाबांचं हे बोलणं ऐकून सारंग भडकला.


" बाबा तुम्ही मला सुचवताय का मी वेगळं रहावं म्हणून."


" आम्ही कोण सुचविणारे?" बाबा वरच्या पट्टीत बोलले.


" अहो पण मी लग्नं केलय का? तुम्हाला आज सांगतोय ते हे की प्राजक्ता या मुलीशी मला लग्नं करायचं आहे. माझ्या मनात नसतं सांगायचं तर सांगीतलच नसतं.सरळ लग्नं केलं असतं." सारंगचा पारा आता चांगलाच चढला होता.


"आई बाबा प्राजूला मी बघीतले. तिच्याशी बोलले आहे. चांगली मुलगी आहे.माझ्या लग्नात ती आली होती."


" काय? हे कधी बोलली नाहीस तू?" आई उसळून म्हणाली.


"आई माझ्या काॅलेजचे मित्र-मैत्रिणी आले होते. त्यात प्राजू पण होती. तुला माहिती होतं माझ्या काॅलेजचे मित्र-मैत्रिणी येणार आहेत." सारंग म्हणाला.


" त्यात ही मुलगी येणार आहे हे कुठे माहिती होतं?"


"आई जरा शांत हो.प्राजू सारंग साठी योग्य आहे.जात काय महत्वाची?दोघांचे सूर जुळणं महत्वाचं.ते जुळलेत म्हणून दोघं लग्नं करणार आहेत."


" नातेवाईकांना काय तोंड दाखवायचं?"


"नातेवाईक! त्यांना स्पष्टीकरण कशाला देत बसायचं? त्यांच्यापैकी एकजण तरी आपल्या आयुष्यातील निर्णय घेतांना तुम्हाला विचारायला येतात का? कधी आलेत का? सांग नं आई?"


"मला नातेवाईकांना माझी होणारी सून वेगळ्या जातीची आहे सांगणं जमणार नाही." आईचा राग धुमसत होता.बाबा कुठेतरी नजर रोऊन बसले होते.


"अरे हो बरी आठवण झाली. मी जेव्हा काॅलेजला होते तेव्हा तुझ्या मावस बहिणीच्या मुलींनी केलं होतं. दुस-या जातीतील मुलाशी लग्नं. आठवतय का? ती मावशी आली होती तुझ्याकडे माझ्या मुलीला समजव म्हणून सांगायला."


" त्याला झाली आता पाच वर्ष."आई तिरीमीरीत बोलली.


"किती वर्ष झाली हे नाही विचारलं मी आई तुला. तू उत्तर टाळू नकोस आई. पत्रीका बघून केलेली सगळी लग्नं यशस्वी होतात का? काही टक्के भीती असतेच. मग हे दोघं एकमेकांना छान ओळखतात. समजून घेतात तर का नाही म्हणता त्यांच्या लग्नाला? फक्त जात वेगळी आहे म्हणून?"


" तुम्हाला जे करायचं ते करा." बाबा चिडून बोलले आणि उठत म्हणाले." मला जेवायला वाढ".


आईपण उठली तशी वैजू म्हणाली. "आई बाबा दोघांना सांगतेय.येत्या आठ दिवसांत सारंगच्या लग्नाला होकार द्या. अन्यथा तो कोर्ट मॅरेज करेल."


" वा! छान सगळं ठरलय तुमचं तर हा फार्स कशाला केला. बघीतलं का मॅडम आपली मुलं फार हुशार झालीत." बाबा चिडले की आईला मॅडम म्हणायचे.जुनी सवय होती त्यांची


"बाबा हा फार्स नव्हता. तुम्ही हट्टाला पेटला तर हा मार्ग आम्हाला निवडावा लागेल एवढंच वैजूचं सांगणं होतं."


"ठीक आहे तुम्हाला जे करायचं ते करा." बाबा निर्वाणीचं बोलले.


"सारंग आपण आई बाबांना आठ दिवसांचा वेळ दिलाय.आता आपण आठ दिवस शांत बसूया. नंतर ते काय निर्णय घेतात त्या वर आपण ठरवू. आपल्याला इतर कामं तोवर करायची आहे."


सारंग या वादळी चर्चेमुळे अस्वस्थ झाला.पुढे काय होणार आहे याचा त्याला अंदाज बांधता येत नव्हता. प्राजूचा तिनदा फोन येऊन गेला पण सारंगला तिच्याशी बोलण्याची हिम्मत होत नव्हती.


'सारंग काय झालं?फोनकडे काय बघत बसलात?" वैजूनी विचारलं.सारंग शुन्यात नजर लावून बसला होता.वैजूनी त्याला हलवलं,


"काय कसला विचार करतोयस?"


"प्राजूचा तिनदा फोन येऊन गेला मी घेतला नाही.या वादावादी मुळे तिच्याशी काय बोलावं समजलं नाही."


" ठीक आहे ऊद्या ऑफीसला गेलास की कर फोन."


" तिला हे जातीबद्दल वाद झाला हे कसं सांगू?"


" ते कशाला सांगतोय. आठ दिवस वेळ आहे आपल्याकडे .हेच कारण तिलाही सांग.आठ दिवसानंतर बघू." वैजू म्हणाली.


" समजा आई बाबा तयार नाही झाले तर?"


" तर कोर्ट मॅरेज कर. इतर कोणाशीही तू लग्नं करून सुखी होशील?"


" नाही."


"मग झालं तर. ते हट्टाला पेटले तरी त्यांच्यापुढे झुकू नकोस. मृण्मयीशी ते खूप चुकीचं वागले.आताही तीच चूक करतात आहेत. तिचा जीव गेला. तू जीवंत असून मेल्यासारखा जगशील एकतर एकटा राहून किंवा दुस-या मुलींबरोबर लग्नं करून. तुला काय मंजूर आहे? तुझं सूख की आईबाबांचा हट्ट?"


" तू म्हणतेस ते बरोबर आहे.मी प्राजू शिवाय दुस-या मुलीशी लग्नं करू शकणार नाही."


" पक्कं ठरवलं नं तू?" सारंगहो म्हणून मान बोलावतो.


"काळजी करू नको. तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोधून मगच अमरावतीला जाईन.


" वैजू तुझ्या मदतीशिवाय हे होणार नाही."


"माहिती आहे मला. लहानपणापासून मीच आले नं तुझ्या मदतीला धावून. लग्नासारख्या एवढ्या महत्वाच्या कामासाठी कशी येणार नाही?" वैजू हसून म्हणते.


" आज जेवावसही वाटतं नाही." सारंग ऊदासपणे म्हणाला.


" ऐ जेवण वगैरे नाही सोडायचं.चल जेवायला."

वैजू बळबळच सारंगला जेवायला आत घेऊन जाते.

---------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका... मीनाक्षी वैद्य.