Mrunmayichi dayari - 6 books and stories free download online pdf in Marathi

मृण्मयीची डायरी - भाग ६

मृण्मयी ची डायरी भाग ६वा

मागील भागावरून पुढे…


वैजू काऊंन्सलर अमीता पटवर्धन यांना फोन करून त्यांची वेळ आणि पत्ता विचारून घेते.


"सारंग ऊद्या संध्याकाळी पाच वाजता या म्हणाल्या. आपण दहा मिनीटे आधी पोहचू असंच घरून निघू. पहिलीच वेळ आहे आपल्या भेटीची उगीच उशीर नको व्हायला.या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही." वैजू सारंगला म्हणाली.


"हो बरोबर बोलते आहेस.आपल्या या मिटींगबद्दल आई- बाबांना सांगायची काही गरज नाही."


"अर्थातच नाही.का सांगायचं? त्यांना मुळी पटत नाही आपण जे करतोय ते.मग कशाला सांगायचं?"


" हं. चार सव्वा चारलाच निघू आपण."


"हो. मृण्मयीची डायरी आणि चित्रांची वही दोन्ही बरोबर घेऊन जायला हवं.मी आत्ताच दोन्ही गोष्टी माझ्या पर्समध्ये ठेवते नाहीतर विसरेन." वैजूनी मृण्मयीची डायरी आणि चित्रांची वही आपल्या पर्समध्ये ठेवली.


या दोन गोष्टींमुळे अमीता पटवर्धन मृणृमयीच्या मनाचा ठाव घेऊ शकतील. मृण्मयी नेमकी अशी का वागते होती याचं ऊत्तर देऊ शकतील असं वैजूला वाटलं.


अमीता पटवर्धननी दिलेल्या वेळेत सारंग आणि वैजू त्यांच्या क्लिनीकमध्ये जाऊन पोहोचले.मॅडमनी थोड्याच वेळात त्यांना आत बोलावलं.


"नमस्कार मॅम.मी वैजयंती मृण्मयीची मोठी बहीण आणि हा सारंग माझा भाऊ." वैजूनी मॅडमना स्वतः:ची आणि सारंगची ओळख करून दिली.


"बसा" समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत अमीता मॅडम म्हणाल्या.दोघही बसले. बसल्यावर लगेच वैजू आपल्या पर्समधून मृण्मयीची डायरी आणि चित्रांची वही काढून मॅडमला दाखवली.


मॅडम वही चाळतच असतात की वैजु मृण्मयी आता नाही असं सांगते.मॅडम ते ऐकताच दचकतात.


" हे कधी झालं?"


वैजू त्यांना सगळी घटना सांगते.


"तुमची आई तर पुन्हा तिला घेऊन येणार होत्या.मी मृण्मयीलापण सांगीतलं होतं की येताना तुझी डायरी आणि चित्रांची वही आणशील.पण त्या दोघी आल्याच नाहीत."


"मॅडम आम्ही तिला नीट ओळखू शकलो नाही आणि खरं सांगायचं तर आमच्या आई बाबांनी पण फारसं मनावर घेतलं नाही म्हणून आई तिला तुमच्याकडे पुन्हा घेऊनच आली नाही."सारंग म्हणाला.


" मॅडम मृण्मयीच्या वेळी चूक झाली आमची ती सुधारायची असेल तर तिच्यासारख्या मुलांसाठी काहीतरी करण्याची आमची इच्छा आहे."वैजू मॅडमना म्हणाली.


"बरेच आई वडील असे आहेत जे या मुलांना समजून घेऊ शकत नाही. काहीजण मात्र आपल्या मुलांना आमच्याकडे आणतात आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे आमच्याकडून शिकतात.


आम्ही त्या मुलांचं काऊंन्सलींग करतो. हळुहळू त्यांच्यात प्रगती दिसते.मी आजपर्यंत खूप वेगवेगळ्या केसेस बघीतल्या.पण मला तुमची बहीण तशी वाटली नाही.


ती खूप समंजस होती.त्या एकाच सिटींग मध्ये मी तिचं जे काही निरीक्षणं केलं त्यात हे लक्षात आलं की ती मीतभाषी होती. तिला खूप बडबड करणं जमायचं नाही. अश्या केस मध्ये घरच्यांनी त्यांचा स्वभाव ओळखला नाही तर ते आपल्या कोषात जातात."


"हो मॅडम मला तर हे सगळं तिची डायरी वाचल्यावर कळलं. त्याआधी आम्हीपण तिला मंद समजायचो. खूप मोठी चूक झाली. गुन्हाच म्हणायला हवं. मृण्मयी तर आता नाही पण आपल्याच कोषात जाणा-या इतर मुला मुलींसाठी काही करता आलं तर आम्हाला करायचंय. मृण्मयीला तर वाचवू शकलो नाही. इतरांच्या आयुष्यात चांगलं घडवता आलं तर हीच मृण्मयीला आमची श्रद्धांजली असेल."


" हं...मृण्मयीसाठी तुम्ही काही करु शकला नाहीत हे वाईट झालं पण उशीरा का होईना तुम्हाला जाग आली. इतर मुलांसाठी तुम्हाला काही करावसं वाटतंय हे चांगलं आहे. तुम्ही यावर काही विचार केलाय का?" मॅडमनी दोघांना विचारलं.


"मॅम मला असं वाटतंय की एखादं असं सेंटर ऊघडावं जिथे कोणीही व्यक्ती जी खूप गोंधळलेली आहे.तिला निर्णय घेण्यात त्रास होतोय किंवा आमच्या मृण्मयी सारखी असेल तर तिला मनमोकळेपणाने बोलता येईल. चर्चमध्ये असतं नं तसं.चर्चमध्ये एखाद्याला कन्फेस करता येतं. असं काहीसं करावं असं मला वाटतंय." वैजूनी तिच्या डोक्यातली कल्पना सांगितली.


"कल्पना छान आहे.पण ती अंमलात कशी आणता येईल यावर विचार व्हायला हवा.जी व्यक्ती मनातलं सगळं बोलेल तिला आपली गोष्ट कुठे कळणार नाही याची खात्री असायला हवी तरच ती मोकळेपणाने बोलेल."


"हो बरोबर आहे तुमचं.मला आणि वैजुला असं सेंटर ऊघडावं असं वाटतं होतं."


" म्हणजे कसं?" मॅडमनी विचारलं.


"मॅडम दोन खोल्या जर आपण भाड्यानी घेतल्या आणि दोन वेगळ्या खोल्यांत माईक वगैरे बसवलं.एका खोलीत काऊंन्सलर बसेल.दुस-या खोलीत ती व्यक्ती बसेल जी मनातलं सांगेल. तिने आपलं नाव गाव सांगायचं नाही. तिला एक नंबर दिल्या जाईल. तो सांगून तिने मनातलं बोलावं.काऊंन्सलर कडून तिने सल्ला विचारला तर त्याने सांगावा.असं माझ्या मनात आहे." वैजू मॅडम कडे बघत होती.


थोडा विचार करून मॅडम म्हणाल्या " तुझी कल्पना चांगली आहे पण ही प्रत्यक्षात उतरेल का ही शंका आहे."


" का मॅडम.हे नाही होऊ शकणार?" वैजूने जरा निराश होऊन विचारलं.


" हे बघा जिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं आहे ती कुठल्याही अश्या माणसाला नाही सांगणार. जी व्यक्ती तिचं सगळं ऐकणार आहे तसंच ती समोर दिसल्या शिवाय ती बोलणार नाही. ती खूप खाजगी गोष्टी सांगणार आहे तर ती फक्त आवाजावर कशी विश्वास ठेवेल?"


" वैजू हा पण मुद्दा बरोबर आहे मॅडमचा." सारंग म्हणाला.


"आज मी इतकी वर्ष या क्षेत्रात आहे.मला वीस वर्ष झाली हे काम सुरु करून.माझा अनुभव हा आहे की पहिल्या सिटींग मध्ये कुणीच खूप आतल्या गोष्टी मोकळेपणाने सांगत नाहीत.आम्हालापण त्याचा अंदाज असतो.


पहिल्या भेटीत आम्ही येणा-या व्यक्तीला जसं चाचपडतो तसंच येणारी व्यक्तीही आम्हाला चाचपडत असते.पहिल्या भेटीनंतर काहीजण येत नाही. त्या आल्या नाहीत म्हणजे आम्ही कुठे कमी पडतो असं नाही किंवा आमचं ज्ञान कमी पडतं असं नाही. इथे मनाचा संबंध येतो. या क्षेत्रात येणा-या व्यक्तीला हळुवारपणे बोलणं करायचं असतं.


काही व्यक्ती का येत नसतील? याचं कारण हे की येणा-या व्यक्तीचं आणि आमचं ट्युनिंग जर जुळलं नाही तर ती व्यक्ती पुन्हा येत नाही. जिचं आमच्याशी जमतं ती वारंवार येते.आम्ही सांगीतलेल्या गोष्टी लक्षात ठेऊन वागते आणि स्वतःमध्ये बदल घडवते.यासाठी काऊंन्सलरनी समोर असायला हवं."




अमीता मॅडम सविस्तर बोलल्या.



" मला वाटलं होतं. की मला खूप ग्रेट आयडिया सुचली.पण त्या मागे हा एवढा विचार मी केला नव्हता."वैजू बोलली.यावर मॅडम हसतच म्हणाल्या


" म्हणून मी या खुर्चीवर बसले आहे आणि तुम्ही समोर बसलात."


" हो खरय तुमचं."सारंग ही हसतच बोलला.


" मॅडम मग आम्हाला काहीच करता येणार नाही का?" वैजूनी निराश होऊन विचारलं.


"निराश का होता? आपण करूया काहीतरी.तुम्हा दोघांची इच्छा आहे तर नक्कीच आपण काही तरी चांगलं करू.आपण पुन्हा कधी भेटू शकतो?"


"तुम्ही सांगा तसं भेटू. मी अमरावतीला असते. तिथून नागपूरला येणं कठीण नाही" वैजू बोलली.


"मी नागपूरलाच असतो.त्यामुळे मलाही तुम्ही सांगाल तेव्हा जमेल." सारंग अमीता मॅडमना म्हणाला.


"यासाठी विचारतेय कारण शनिवारी सेकंडहाफ मला फ्री असतो.तेव्हा आपण निवांत बोलु शकू. एरवी पेशंट असतात.आताही तासभर बोलतोय."


" हो चालेल.तुम्ही एक दोन दिवस आधी सांगीतलं की मी अमरावतीहून येऊ शकेन."


"ठीक आहे.तुमचा नंबर द्या मला म्हणजे मला कळवता येईल."


" हो देते."


वैदू दोघांचेही नंबर देते.


" मॅडम कुणाला एकाला कळवलं तरी चालेल." वैजूने तिचा आणि सारंगचा नंबर लिहून दिला.


" येतो मॅम आम्ही." सारंग म्हणाला.


" हो" अमीता मॅडम हसत मान डोलावली .


वैजू आणि सारंग मनात एक समाधान घेऊन त्यांच्या क्लिनीक च्या बाहेर पडले.


" सारंग घरी गेल्यावर या विषयावर चर्चा करायची नाही."


" हो पण आई विचारल्याशिवाय थोडीच राहणार आहे."


" तिने विचारलं तर मी देईन उत्तर."


" ठीक आहे. काय ऊत्तर द्यायचं ते ठरवून घे आधीच. आई फार खोदून वीचारते. पोलीस असल्यासारखी.चल बस गाडीवर.' वैजू सारंगच्या गाडीवर बसली आणि दोघं घराच्या दिशेनी निघाले.


"सारंग आता किती काही विचारुदे. मी तिचीच मुलगी आहे तिच्यासारखच वागणार आता.बघ तू." वैजू हसत म्हणाली.


"भांडू नका.तुमचं भांडण सुरू झालच तर मी ऊदयकडे कल्टी मारणार ठरलं माझं."


"आधी घरी तर चल."


" वैजू लिहून घे माझी वाक्य .आई आणि बाबा दोघंही आपण कधी येणार याची वाट बघत समोर हाॅलमध्ये बसले असतील. टिव्ही चालू असेल पण नावापुरता."

यावर दोघंही हसले.

---------------------------------------------------------------

क्रमशः

लेखिका... मीनाक्षी वैद्य.