Champa - 1 books and stories free download online pdf in Marathi

चंपा - भाग 1

अर्पणपत्रिका
त्या सर्व स्त्रियांमधील
प्रत्येक चंपाला...

प्रस्तावना:
प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, शहरात एक कोपरा असतो जिथे पुरुषाची शारीरिक भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया नटून थटून थांबलेल्या असतात. कोणी स्वतःच्या मर्जीने आलेल्या, काही घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, काही मनाविरुद्ध, काही फसवणुकीचा शिकार झालेल्या, कोणा एखादीला विकलेले. कुठे त्याला गंगा जमाना म्हणतात तर, कुठे कामाठी पुरा किंवा बुधवार पेठ की आणखी काही, त्यातून मर्जीविरुद्ध आलेल्या मुली बाहेर पडण्याची धडपड करत नसतील का? कदाचित कोणाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असेल तर काही आयुष्यभर तिथेच अडकून पडत असतील. ज्या मुली सुटकेसाठी प्रयत्न करतात तेंव्हा त्या मुलींना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल? वर्तमानपत्रात अनेक बातम्या असतात अश्या मुलींची सापळा रचून कशी पोलिसांनी सुटका केली. पण त्यांना सुटका झाल्यावर काय वाटले असेल?घरचे, आजूबाजूचा समाज स्वीकारेल का त्यांना? याच सगळ्या विचारांमधून त्या स्त्रियांमधील प्रातिनिधित्व करणारी स्त्री चंपा या नायिकेचा जन्म झाला. तो येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

'चंपा' लिहून पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम माझी जिवलग मैत्रीण अश्विनी महांगडे, मार्गदर्शक प्रदीपदादा कांबळे यांनी वाचली. चंपा त्यांना भावली. त्यांनी लिखाणाचे कौतुक केले. साऱ्यांचे मनापासून आभार!

आपली कृपाविभालाशी,

भाग्यशाली अनुप राऊत
पुणे.

चंपाला तसे कामावर ठेवण्यासारखे विशेष कारण काहीच नव्हते, असे सुरुवातीला वाटले खरं! पण तिच्या अंगचा एकेक गुण मला दिसायला लागला.

चंपाच लग्न झाल नाही अजून मग साडी कशाला नेसायला हवी? असा मला प्रश्न पडायचा.

चंपा शांत असायची. तिच्या चेहऱ्यावर कोणताही हावभाव नव्हता. तिचा मख्ख चेहरा बघुन मला राग यायचा, पण मला नेहमी वाटायचे की ती वैयक्तिक का काहीच बोलत नाही? आली की स्वत:ची काम आटपायची, कामाविषयी बोलायची आणि भरभर निघायची. आज ठरवले ही नक्की कुठे जाते ते बघायचेच. तिच्या मागेमागे गेलो. नको त्या वस्तीत तिला जाताना पाहून जरा ओशाळलो आणि कुठून तिच्या मागे आलो असे वाटले. पुन्हा ऑफिसमध्ये येवून बसलो. डोक्यामधून चंपाचा विचार काही केल्या जात नव्हता.

जर ती तिथे जात असेल तर हे काम कशासाठी आणि का करते?
मोठा प्रश्न पडला होता. कामामध्ये मन रमवायचा प्रयत्न करत होतो. मात्र तिचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. विचार करून डोकं सुन्न झाले होते.
घरी पोहचलो आणि फ्रेश होवून बेडवर अंग टाकल आणि चंपा माझ्याकडे कामाची चौकशी करायला आली तो दिवस आठवला.

"नमस्कार... मी चंपा"

बावीस - तेवीस वर्षाची सुंदर चंपा माझ्यासमोर उभी होती.
पुरुषवृत्ती जागी झाली ती अशी की, माझी नजर तिच्यावरून हलतच नव्हती. मी एकटक तीच रूप न्याहाळत होतो.
सहजतेने एखादी गोष्ट हाताळणे हि तिची खुबी. मुळातच ती सुंदर आहे. मातीच्या घरावर पोतेरा फिरवावा तसा चेहऱ्यावर मेकअपचा पोतेरा फिरवलेला नव्हता. उंचपूरी, गोरीपान, घट्ट वेणी, केसांची उगीचच आलेली बट, चापून- चोपून नेसलेली हलक्या गुलाबी रंगाची साड़ी तिचे रूप अधिकच खुलवत होती. दोन कोरीव भुवयांच्या मध्ये लावलेली नाजुक टिकली उठून दिसत होती. डोळ्यांचे वर्णन काय करावे, दोन अथांग समुद्रच त्याच्या तळापर्यंत पोहचणे अजूनही अशक्य. नवीन नवीन गोष्टी नेहमी शिकायची विचारून नाही तर फक्त बघून.

"साहेब? "तिने आवाज दिला आणि आपण चुकीच वागलो हे मला जाणवले.

"हो, बोला! का?"

"तुम्हाला रेफरन्स कोणी दिला?" माझ्या करड्या आवाजाने ती घाबरली.

"न... नाही कोणीच नाही."

"मग?"

"तुमचे ऑफिस मी येत - जाता बघत होते. वकिलांकडे बरीचची टायपिंगची कामे असतात म्हणून सहज विचारावे म्हंटले."

"खरंतर मला एका टायपिस्टची गरज होती पण एवढी सुंदर टायपिस्ट ठेवून घ्यायची म्हणजे कामाला घोडा लागायची भीती वाटत होती."

"बसा."
मी आदेश सोडवा तसा बोललो आणि ती माझ्या समोर असलेल्या खुर्चीवर बसली.

"कॉलीफिकेशन?"

"डीएड झाले आहे आणि मराठी, इंग्रजी टायपिंग कोर्स झाला आहे."

"टायपिंगचे स्पीड काय आहे?"

"६०."

"गुड! अजून पुढे काही करायचा विचार आहे ?"

"सर खरतर मला... पण …"

ती बोलता बोलता थांबली.

पेशा वकिलीचा असल्यामुळे मला थोडाफार अंदाज आला. पुढे काहीही न विचारता मी तिला कामावर ठेवायचा निर्णय घेतला.

"ओके उद्यापासून जॉईन झालीस तरी चालेल."

"सर पेमेंट साधारण किती असेल?"

तिने आपण फक्त पैशासाठी काम करणार आहोत याची जाणीव मला करू दिली. मला राग आला. कोणत्याही कामगाराला फुकट राबवून न घेता मी त्याचा पूर्ण मोबदला त्याला द्यायचो पण नंतर लक्षात आले की आपला हा स्वभाव तिला कुठे माहिती आहे.

"काम बघून सांगेन? चालेल?"

"नाही सर... गेल्या महिन्यामध्ये जिथे काम करत होते तिथे असेच सांगितले पण पगारचे नाव घेत नव्हते. साहेब... मला कुठेही फुकट काम नाही करायचे. काम आणि वेळ दोन्ही गोष्टी माझ्यासाठी फार महत्वाच्या आहेत."

ती स्पष्ट बोलली. तिचा स्पष्टवक्तेपणा मला आवडला.
"आठ हजार देईन, दर रविवारी सुट्टी असेल, इतरवेळी रजा हवी असेल तर मात्र पैसे कट केले जातील आणि मला काम परफेक्ट लागतात सततच्या किंवा त्याच त्याच चुका पुन्हा झाल्या तर कामावून काढले जाईल."
आठ हजार हा आकडा एकूण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. बाकीच्या सुचनांकडे तिचे लक्ष आहे की नाही ह्याची मला शंका आली.
"काहीच हरकत नाही. मी उद्याच येईन. सर वेळ काय असेल?"
"११ ते ५ असेल साडेदहाला तुम्हाला ऑफिसमध्ये पोहचावे लागेल."
"११ ते ५ " असे म्हणत ती विचार करू लागली आणि म्हणाली.
"सर ९ ते ३ चालेल का?
"अशी कामाची वेळ स्वतः ठरवता नाही येत."
"सॉरी सर... "ती गप्प बसली. जरा वेळ गेला.
"चालेल सर मी येईन."
ओके. मी म्हणालो आणि माझ्या कामाला लागलो.

तू नारी है कणखर,
रुक मत, झुक मत,
कभी मत मान हार,
क्यों की लढने की ताकत है
तुझ मे...
तू बस आगे बढती जा,
जीवन का तुझमे ही है सार...

क्रमशः

कथा मालिका लिहायला मला आवडते.
चंपा ही कथा फार वेगळी आहे.
वाचून नक्की रिपलाय द्या.

In frame - Ashwini Mahangade (fame Aai kuthe kay karate. Star Pravah)