Utkarsh - 4 books and stories free download online pdf in Marathi

उत्कर्ष… - भाग 4

उत्कर्ष भाग 4

रात्री जरा लवकरच आम्ही झोपायला गेलो. आज तरी झोपेच खोबरं होऊ naye म्हणून प्रार्थना करून झोपी गेलो.....
गाढ झोपेत असताना अचानक कसलाशा आवाजने झोप चाळवली गेली.डोळे चोळत उठून कानोसा घेतला...
संपूर्ण बिल्डिंग दणाणून सोडणाऱ्या व्हॅल्यूममध्ये कुठल्या तरी पंजाबी गायकाच्या गाण्याचा आवाजाने मी जागा झालो होतो. उत्कर्षचा उपदव्याप चालू झालेला दिसत होता! आता स्वतःला फार त्रास करून घेण्याच्या फंदात न पडता मी उशाला ठेवलेले कापसाचे बोळे कानात सरकावले, तरीही असह्य आवाज येत होता.
मी घड्याळात बघितले.. रात्रीचे दोन वाजले होते. त्या दणदणीत आवाजाने बहुतेक सगळी बिल्डिंग आता जागी झाली होती. बिल्डिंगमधील बरेच रहिवाशी हळू हळू वैतागत उत्कर्ष रहात होता त्या फ्लॅटसमोर जमा होऊ लागले होते. सगळे मिळून त्याचा दरवाजा वाजवत होते. घराची बेल बहुतेक त्याने बंदच केली असावी. उत्कर्ष आपल्याच धुंदीत तोंडाने मोठ्या मोठ्या आवाजात ओरडत त्या कर्कश संगीतावर नाचत असावा कारण त्याचा आवाज बाहेर येत होता. जर त्याचा आवाज बाहेर येऊ शकत होता तर दरवाजा वाजण्याचा आवाज त्याला नक्कीच जात असावा, तो मात्र जाम दाद देत नव्हता!
तो दाद देत नाही हे पाहून नाईलाजाने काही लोकांनी 100 नंबर डायल करून पोलिसांची मदत मागितली होती. आमच्या बिल्डिंग प्रतिनिधीने उत्कर्षच्या अमेरिकेत असलेल्या बहिणीला फोन लावला आणि उत्कर्षच्या कारवाया सांगितल्या. तिने बहुतेक लगेच उत्कर्षला फोन केला असावा कारण स्पीकर बंद करून उत्कर्ष फोनवर बोलण्याचा आवाज यायला लागला. दोन पोलीस हवालदारही तेथे आले. त्यांनीही दरवाजा वाजवला.
खूप वेळाने एकदाचा दरवाजा उघडून उत्कर्ष बाहेर आला... त्याच्या हातात बियरची बाटली होती. शिव्या देतच तो बाहेर आला बाहेरची गर्दी आणि पोलीस बघून उत्कर्ष घाबरून आत जायला लागला, पण पोलिसाने त्याला बाहेर खेचले. आता उत्कर्ष केविलवाणा दिसायला लागला...
पोलिसांनी त्याच्या बहिणीला फोन करायला लावला आणि तिची चांगलीच कानउघडणी केली. पुन्हा लोकांना त्रास झाला तर उत्कर्षला अटक केली जाईल अशी धमकी दिली. आधी उर्मटपणे बोलणारा उत्कर्ष आता जाग्यावर आला होता. काही रहिवाशी त्याला मारायला धावत होते, पण पोलिसांनी त्यांना थांबावले नाही तर आज उत्कर्षची काही खैर नव्हती!
पोलिसांनी समजूत घातल्याने रहिवाशी आपल्या आपल्या घरी गेले.
ती रात्र अशा गोंधळात झोपेविना संपली. या उत्कर्ष प्रकरणाचा लवकर निकाल लागणे आवश्यक होते...
दुसऱ्या दिवशी दुपारी काही कामा निमित्त मी खाली निघालो होतो,बाराव्या मजल्यावर लिफ्ट थांबली,लिफ्टमध्ये उत्कर्ष आला.आज उत्कर्ष जरा उत्साहात दिसत होता. कदाचित दाढी व अंघोळ केली असावी शिवाय बहुतेक कालची नशा पूर्ण उतरलेली दिसत असावी.मला पाहून तो थोडासा बुजला.
त्याच्यामुळे आमची रात्रीची झोप पार खराब झाली होती तरी मी आता त्याच्यावर चिडलो नव्हतो, उलट 'वाट चुकलेला तरुण' म्हणून मला त्याची कीव वाटत होती.
मी त्याला चिडवण्याच्या दृष्टीने म्हणालो...
" उत्कर्षsss कैसा है तू? "
" ठीक हूँ अंकल, आज बहुत काम करना हैं, कल मेरी सिस्टर बहुत दिन के बाद इंडिया आ रहा रही हैं... कल उसके स्वागत के लिये सोसायटी में ढोल बजेगा, फुल बरसेगे, नाचगाना होगा,मैंने पुरा तैयारी करी हैं "
" अच्छा, कितने दिन के बाद आ रही हैं आप की सिस्टर? "
" पाच साल के बाद आ रही हैं, सिलिब्रेशन तो करना ही पडेगा, हैं ना अंकल? "
कालचा उत्कर्ष खरा की आजचा खरा?
मी विचार करत होतो. मी हसत मान डोलावली आणि लिफ्टमधून बाहेर पडलो...
आता बहिणीच्या स्वागताच्या निमित्ताने उत्कर्ष अजून काय काय गोंधळ घालणार होता काय माहीत!
"फार विचार न करता उद्या काय काय बघायला मिळेल ते बघायचे!"
आता मनाचा निश्चय केला होता...
(क्रमश:)
....प्रल्हाद दुधाळ
9423012020