Mall Premyuddh - 7 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 7

Featured Books
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 7

मल्ल - प्रेमयुद्ध

"अर्जुनराव जे हाय ते तुमच्या समोर... कसला आडपडदा न्हाय की लपवाछपवी... हा शेतजमीन बघायला जायचं असेल जाऊ... संग्राम गाड्या काढा." आबांनी आदेश सोडला तसे संग्राम उठला.

"नको... नको अमास्नी इशवास हाय आबासाहेब... अन इशवास माणसावर असावा जमीनजुमल्यावर न्हाय..." दादा शांतपणे म्हणाले.
" लाखातली गोष्ट बोललात अर्जुनराव... पण तरी सांगतो. तीस एकरात ऊस लावलाय, वीस एकरात हळद, दहा एकरात तरकारी, बाकी हंगामी असलं 25 एकरात... छोटं मोठं हाय अजून बाकी... गुर ढोर, बैलं गडीमाणसं बघत्यात..." आबा सगळ्या संपत्तीचं वर्णन करत होते.
" आबासाहेब अहो काहीच गरज नाय एवढं सांगायची. तुमची संपत्ती डोळ्यांसमोर दिसती की... अन ही पोर ही भलीमोठी संपत्ती हाय तुमची." दादा
" मग ठरवून टाकायचं का लग्न? आलाच तर बोलणी करून ठेवू... तशी बोलणी झाली अमास्नी नारळ आणि आमची सून दया. बाकी लग्नाची तारीख काढून ठेवू." आबा बोलल्याबरोबर दादांनी संतोष आणि आशाकडे बघितले.
" आबासाहेब आमास्नी येळ द्या थोडा... पोरीची अजिबात इच्छा न्हाय आत्ता लग्न करायची. जे हाय ते स्पष्ट सांगितलेलं बर..." दादा बोलल्यानंतर सगळे शांत झाले.
" हे बघा अर्जुनराव... आम्ही म्हणणार न्हाय की जबरदस्ती पोरीला लग्नला उभ करा... तुम्ही तिच्या मतांन निर्णय घ्या अन मग आमाला सांगा. काय बी घाई न्हाय..." पाटलांचे सामंजस्याने बोलणे दादांना पटले होते.

आमदाराने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यात कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तीन लाखाचे पाहिले बक्षीस होते.
वीर स्पर्धेची चांगलीच तयारी करत होता. तालमीत उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. वीर प्रॅक्टिस करताना त्याची प्रॅक्टिस बघायला जवळजवळ गावातील सगळे लहान मुलं, तरुण मुले आणि म्हातारे पुरुष होते.
" तात्या आर हा असा खेळतो... पाहिल्या खेळीत समोरच्याच्या नाकात दम आणतो...मग त्या पोरीसंग खेळताना कसा काय र हरला...?" राजाभाऊ दात नसलेल्या तोंडानं जीभ वेडीवाकडी हलवत बोलत होते.
" आर आपलं गावकडंच पोर... पोरीसनी कधी वर नजर करून बघितलं न्हाय अन कुस्ती कस करायचं लेका... लाजल असलं बघ नक्की... " राजाभाऊ हसायला लागले.
तेवढ्यात मागून गावातला एक पोरगा आला अन म्हणाला "म्हणूनच त्याच पोरीबर लगीन करायचा इचार हाय भाऊ वीर चा..."
"काय लेका खूळ लागलं काय ह्या पोराला... लगीन....?" तात्या म्हणलं.
" व्हय लगीन... अपमानाचा बदला..." पोरगा म्हणाला.
" हे आपल् हे पोरग तसलं न्हाय बघ... तो डोक्यात राग घालून न्हाय घेत... आवडली असल म्हण लग्न करत असल..." राजाभाऊ हसत म्हणाल.
" समजल... पोरगी व्हय म्हणलं तवा..." पोरगा अस म्हणत निघून गेला.

आमदारांनी भव्य मैदानाच्या समोर सजवलेल्या स्टेजवर उभे राहून भला मोठा केक कापला. स्पर्धेचे उदघाटन केले.कुस्त्या चांगल्याच रंगात आल्या. महिला कुस्त्या असल्यामुळे तिथे क्रांती आणि रत्ना सुद्धा स्पर्धेसाठी आल्या होत्या. रत्नाची नजर वीरवर पडली.
" क्रांती... पैलवान आल्यात." रत्ना
" कुस्त्या म्हंटल्यावर पैलवान येणारचकी..." क्रांती कुस्ती बघण्याच्या मूड मध्ये होती.
" हम्म... आग तुझा पैलवान आलाय..." क्रांतीने वीरकडे पाहिले. वीर कुस्त्या न बघता क्रांतिकडे बघत होता. क्रांतीला काय करावे सुचत नव्हते. तेवढ्यात तिच्या नावाची अनौसमेंट झाली. क्रांतीला रत्नाने हलवले. क्रांती एक एक पायरी खाली बघताना वीरकडे बघत होती. वीरने तिला दोन्ही हाताचे अंगटे दाखवले आणि ऑल द बेस्ट म्हणाला. क्रांतीला काय रिअक्ट व्हावे समजत नव्हते. तिने नजर दुसरीकडे फिरवली आणि स्वतःला म्हणाली.
" क्रांती फोकस...." क्रांतीने पूर्ण लक्ष खेळाकडे दिले आणि हा हा म्हणता क्रांती जिंकली. सगळीकडे क्रांतीच्या नावाचा जल्लोष सुरू होता. हात उंचावून ती जिंकली याचा आनंद व्यक्त करत होती पण सतत तिचे लक्ष वीरकडे जात होते. एवढ्या लोकांमधून वीर फक्त तिच्याकडे बघत होता. तिच्याकडे बघून हाताने 👌👌👌 अस म्हणल्यावर क्रांतीने रत्नाकडे पाहिले रत्ना खूप खुश होती.
महिला गटात क्रांती पहिली होती तर पुरुष गटात वीर पहिला दोघांची नावं घोषित केल्यावर दोघे स्टेजवर आले दोघांना शाल श्रीफळ दिले. तीन - तीन लाखाचा चेक देऊन आमदार साहेबांनी दोघांना सन्मानित केले.

सगळीकडे दोघांच्याच नावाचा आवाज होता. वीर क्रांतीच्या कानात म्हणाला जाम भारी वाटतय दोघांचं एकत्र नाव ऐकून...
"क्रांती - वीर"
क्रांतीला कस नुस झालं. तिने आमदारांना नमस्कार केला आणि स्टेजवरून खाली आली. रत्नाला दुसरा नंबर मिळाला होता. तिचे नाव अनाऊन्स झाल्यानंतर ती स्टेजवर गेली. तोपर्यंत वीर तिथेच उभा होता. रत्नाला शाल श्रीफळ आणि चेक वीरच्या हातून देण्यात आला. वीर रत्नाला हळूच म्हणाला.
"ताई कार्यक्रम झाल्यानंतर थांबाल... मला बोलायचं होत." वीर
" माझ्याशी की...?" रत्ना हुन म्हणाली.
"तुम्ही थांबलात तरीबी चाललं... पण माझं काम करा." वीर
" प्रयत्न करते... सांगू शकत न्हाय... संतोष घ्यायला यायच्या आत न्हायतर अवघड हाय.... गेटवर या..." रत्ना एवढं बोलून निघाली. तिला घाम फुटला होता. आपण हे योग्य करतोय का हे तिला कळत नव्हते. क्रांती आवरून बाहेर आली.तिला काहीच जाणवू न देता रत्ना म्हणाली.
" क्रांती लय भारी खेळलीस..." रत्ना
" व्हय... आज दादा पाहिजे व्हते ही मॅच बघायला." क्रांतीच्या डोळ्यात पाणी आले.
" बर जा आवरून घे मी दादाला फोन लावते. कुठं आलाय बघते." क्रांतीने खिशातला फोन काढला.
"क्रांती... मी येते आवरून तू गेटवर जाऊन थांब... इथं रेंज नसते फोनला उगच संतू अन आपली चुकामुक नको व्हायला." रत्ना
" अरे होच की इथं रेंज न्हाय अन मी फोन लावती. बर ये भायर लवकर मी वाट बघतीया." क्रांती बाहेर पडते.

क्रांती सतत संतोषला फोन लावायचा प्रयत्न करते पण त्याचा फोन लागत नाही. तेवढ्यात मागून रत्ना येते. अजून तिथे वीर आला नाही म्हणून काळजी करते.
" क्रांती... संतूचा मला फोन आला होता. आग गाडी बंद पडली. तो म्हणाला की तिथूनच एखादी गाडी करा आणि घरी या..." रत्ना काळजीने तिला घडलेला प्रकार सांगत होती.
" अरे देवा... एवढ्या उशिरा गाडी कुठून मिळणार...? आणि आपल् गाव एवढ्या आत कोण ग गाडीवाला येणार??? बापरे... काय करावं? रत्ना आग तू त्याला सांगायचं तुझ्या मित्राला सांग एखाद्या... पण ठीके बघू आपण..." क्रांतीने विचार करायला सुरुवात केली तेवढ्यात मागून गाडीच्या हॉर्नचा आवाज आला. कारमधून वीर खाली उतरला आणि क्रांतिकडे न बघता रत्नाला विचारले.

" काय झाल???" वीर
" संतोषची गाडी बंद पडली. आम्ही खाजगी गाडी करून निघालो." रत्नाने सगळं सांगितले आणि मग क्रांतीकडे बघितले. क्रांती रागाने रत्नाकडे बघत होती. भूषण गाडीतून बाहेर आला.
" काय झालं वीर?" भूषणने विचारले.
" अरे यांची गाडी आली न्हाय. जायचा प्रश्न...?" वीर म्हणाला.
" अरे आपण त्याच मार्गाने जाणार सोडू यांना, रात्र लय झाली अस दोघीच कोणाच्या पण गाडीत जाण बर न्हाय..." भूषण काळजीने म्हणाला.
" आम्ही समर्थ आमची काळजी घ्यायला. रत्ना यांची मदत नको आपल्याला सांग त्यांना जायला." क्रांती दुसरीकडे बघत म्हणाली.
"अहो वहिनी... बापरे सॉरी... क्रांती...तुम्ही करू शकता स्वतःची मदत पण ही वेळ न्हाय आत्ता आमच्याबरोबर चला." भूषण समजूत घालत होता आणि वीर एकटक क्रांतिकडे बघत होता. तिला काहीच समजत नव्हते आता काय बोलावे.
" क्रांती काय करायचं? त्यांचं बरोबर हाय एक दृष्टीन...मला वाटतय आपण जावं...." रत्ना तिच्या कानात कुजबुजली.
" तुमास्नी वाटतय ना मग तुम्ही बस गाडीत ह्या बघतील कस यायचं..." वीर गाडीकडे वळला. रत्नाची त्याच्या मागे गेली. क्रांती अस्वस्थ झाली.
" वहिनी... पुन्हा भूषणने जीभ चावली. क्रांती चला.." क्रांतीकडे पर्याय नव्हता. वीर ड्रायव्हिंग सीटवर बसला, भूषण त्याच्या बाजूला आणि या दोघी मागे बसल्या.
बराचवेळ शांतता होती. सगळं शांत बघून भूषण बोलायला लागला. ड्रायव्हिंग करत आरश्यामधून वीर क्रांतीकडे बघत होता. क्रांतीला समजत होते पण ती दुर्लक्ष करत होती.
" खरंच लय भारी खेळता दोघी तुम्ही... तुमच्यासारख्या खेळाडू महाराष्ट्रात अजून तरी नाहीत." भूषण
" हो मग आमी भारीच आहुत...क्रांतीचा तर विषयच न्हाय... तुमच्या मित्रानं पाहिलच ते..." क्रांतीने रत्नाला जोरात चिमटा काढला. रत्ना ओरडली. वीर गालात हसला. भूषण सुद्धा तोंडावर हात ठेवून हसत होता.
" खरच भारी खेळता क्रांती... " भूषण पुन्हा म्हणाला. क्रांती भूषणकडे बघून हलकी हसली. तिला मनामधून घर कधी येतंय अस वाटत होतं. तेवढ्यात तिच्या कानावर भारदस्त आवाज पडला.
" रत्ना जेवण करून जायचं का? अमास्नी भूक लागली अन लागली की सहन व्हत न्हाय." वीरने विचारल्यावर रत्नाने क्रांतीकडे बघितल. क्रांती मानेने नाही म्हणाली.
" घरी जायला उशीर व्हईल... अमास्नी घरी सोडा अन मग तुम्ही जेवयाला थांबा दादा काळजी करत बसतील." रत्नाने वीरला समजावले.
" ठीक ..." वीरने गाडीचा स्पीड वाढवला आणि पुन्हा क्रांतीकडे बघू लागला.

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
( काय असेल नेमकं वीरच्या मनामध्ये? वीरला क्रांतीसोबत वेळ मिळावा म्हणून त्याने तिला गावी सोडायचा प्लॅन त्याने बनवलेला असेल का? क्रांतीला वीरबद्दल काय वाटेल? तिला वीर चांगला आहे असे वाटेल का? नक्की वाचा पुढच्या भागात....)