Nilya Aakashanch Swapn - 1 books and stories free download online pdf in Marathi

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग १

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग १


" माधवी ऐ माधवी"


पंकजने माधवीला हाक मारत आधी घरातले सगळे दिवे लावले. पंकजने तीन चारदा बेल वाजवली तरी कोणी दार उघडलं नाही. दार नेहमीच माधवी ऊघडते.घरात अजून दुसरं कोणी नाही. पंकज आणि माधवी दोघच असतात.


पंकजच्या स्कूटरचा आवाज माधवीला त्यांच्या घरातील बाल्कनीत येतो. पंकज घरी यायच्या आधी माधवी नेहमीच बाल्कनीत उभी राह्यची. पंकजला पार्किंग मध्ये गाडी ठेवताना बघीतलं की माधवी घराचं दार उघडून ठेवत असे.


हा माधवीचा रोजचा शिरस्ता होता. त्याप्रमाणे आज काही घडलं नाही त्यामुळे मनाशी आश्चर्य करत पंकज स्वतःजवळ असलेल्या किल्लीने दार उघडून घरात शिरला


आता शिरला तर घरात सगळीकडे त्याला अंधार दिसला.


" आज झालं काय माधवीला ? सगळं घर अंधाराच्या हवाली करून गेली कुठे?"


माधवी सहसा पंकज घरी यायच्या वेळी कधी बाहेर जात नसे. अगदी अर्जंट काम निघालं तर ती पंकजला सांगून जात असे. आज असं काही घडलं नाही. पंकजने खिशातून फोन काढून बघीतला . माधवीचा मिस कॉल किंवा मेसेज दिसतोय का? तेही दिसलं नाही.


पंकजने सगळ्या घरात आधी दिले लावले आणि सहज

बाल्कनीत डोकावला तर त्याला बाल्कनीत असलेल्या खुर्चीवर माधवी बसलेली दिसली. तिला पंकज घरात शिरला, सगळ्या घरात दिवे लावले आणि आता आपल्या शेजारी येऊन उभा आहे याची कसलीही जाणीव तिला झाली नाही. ती कुठेतरी शुन्यात डोळे लावून बसली होती.


" माधवी"


पंकजने बाल्कनीतला दिवा लावून तिला हाक मारत हलवलं. तशी माधवी दचकून भानावर आली आणि पंकज कडे बघायला लागली.


" माधवी अगं रडतेस का?"


माधवीच्या गालाला अश्रूंनी चिंब भिजवलं होतं. पंकज तिच्या बाजूला खुर्चीवर बसला आणि त्याने तिचे अश्रू पुसून टाकले तशी माधवी झटकन पंकजच्या कुशीत शिरून रडायला लागली.


पंकजने हळूहळू तिला थोपटलं. माधवीला रडू दिलं. माधवीच्या रडण्या मागचं कारण त्याला माहिती होतं.

बराच वेळाने माधवी शांत झाली.


" झालीस का शांत? बाहेर थंड हवेत आपण एक चक्कर मारून यायची का? तुला अजून फ्रेश वाटेल.जरा तरतरी येईल.चलतेस?"


माधवीने मानेनेच नकार देत म्हणाली,


" नको. मला कुठेच जावसं वाटत नाही. सगळं जग थांबल्या सारखं वाटतं. किती रूक्षपणा आलाय माझ्या जगण्यात. कधी कधी खूप कडेलोट झाल्यासारखा वाटतो. निराशेच्या दरीत कोणीतरी निर्दयपणे मला फेकून देतय असं वाटतं."


" माधवी तुला असं वाटणं स्वाभाविक आहे पण जरा सावर स्वतःला. स्वतःचा इतका कडेलोट होऊ देऊ नको. ही वेळ पण निघून जाईल. धीर धर."


पंकज माधवीला समजावत म्हणाला पण तोही स्वतः अस्वस्थ होता


त्याचं बोलणं म्हणजे फक्त शाब्दिक बुडबुडे आहेत हे त्याला स्वतःला कळत होतं. माधवीला खचलेलं तो बघू शकत नसल्याने वारंवार त्याला हे शाब्दिक बुडबुडे हवेत ऊडवावेच लागायचे. पण त्यांचा काही फार फायदा व्हायचा नाही.


पंकज शांत बसला. विचार करू लागला की आपण तर ऑफीसमध्ये असतो चार लोकांत मिसळतो आपलं दुःख विसरतो पण माधवीचं काय? ती कुठेही जात नाही. एकटी एवढा वेळ विचारांच्या आवर्तनात स्वतःला गोल गोल फिरवत बसते आणि मग सरते शेवटी कडेलोट झाल्यासारखी थकून हतबल होऊन बसते.


जरावेळाने पंकज माधवीला म्हणाला,


" माधवी तू आपल्या बिल्डींगच्या भीसीमध्ये का जात नाहीस? बहुतेक जणी तुझ्याच वयाच्या आहेत. तुझं मन रमेल. तुला भिसी लागली की सगळ्यांना आपल्या घरी बोलावलं की तुला छान वाटेल बघ. तू किती सुंदर पदार्थ करतेस. तुझ्या हाताला चव आहे. तुझ्या मैत्रीणींना पण तुझ्या हातच्या पदार्थांची चव घेऊन दे. विचार आपल्या शेजारच्या ताईंना आणि भिसी जाॅईन कर."


पंकजचा हाही उपाय व्यर्थ गेला. माधवीने मान हलवत ठाम नकार दिला आणि म्हणाली,


" नको माझ्या समोर प्रश्नांची भेंडोळी ऊलगडणा-या कोणत्याही व्यक्ती मला माझ्या जवळपासही नको वाटतात.


"कोलमडते मी रोज आतल्या आत

साहवेना मला तीर प्रश्नांचे अता.

नजरेतूनीच सुटतात तीर आपसूक

ते झेलण्याची शक्ती नाही अता."


हे बोलून पुन्हा माधवीला हुंदका फुटला. पंकजने तिला हळू थोपटले आणि भिसीचा विषय काढून पुन्हा माधवीला दुखवायचं नाही हे ठरवलं.

कितीतरी वेळ दोघं बाल्कनीत बसून होते.

_________________________________

कोणतं दु:ख माधवीला छळतय.बघू पुढील भागात.