entangle books and stories free download online pdf in Marathi

गुंता

गुंता

वरूण सुन्नपणे समोरच्या स्त्रीच बोलण ऐकत होता.तो खुपच गोंधळलेला होता.जे तो ऐकत होता ते जर खर असेल तर मग आजपर्यंतच त्याच आयुष्य म्हणजे फक्त आभास होता.काल पर्यंत त्याच्या आयुष्यात कोणतीही गुंतागुंत नव्हती. अगदी सरळ व सोप आयुष्य होत त्याच.पण आत्ता या क्षणी त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.प्रश्नांचा एक गुंतवळा समोर 'आ ' वासून उभा राहिला होता. पाऊण तासापूर्वी स्वतःला माई देशपांडे म्हणवणार्या स्त्रीने त्याच्या आॅफिसमध्ये पाय ठेवला अन् त्याच विश्वच उलटपालट झाल.एका वृध्दाश्रमाच्या रौप्यमोहत्सवासाठी ती निमंत्रण द्यायला आली होती. आठ दिवसांपूर्वी वरूणची रत्नागिरी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती.
राजापुरात असलेल्या ' गोकुळ ' या वृध्दाश्रमाबध्दल वरूण ने ऐकले होते.या वृध्दाश्रमाची सारी जबाबदारी माई देशपांडे यांच्याकडे असून अतिशय सक्षमपणे त्या हा वृध्दाश्रम चालवतात अस त्याने ऐकले होते.सत्तर- पंच्याहत्तर वय असलेल्या त्या बाई त्याच्या समोर येवून बसल्या व निमंत्रण पत्रिका त्याच्या समोर ठेवून म्हणाल्या...

" साहेब, परवा या .समारंभ वेळेत सुरू होईल व वेळेतच संपेल ." जाण्यासाठी उठत असताना
समोरच्या नेमप्लेट कडे लक्ष जाताच त्यांनी ती जरा मोठ्याने वाचली ' वरूण श्रीधर सावंत -भोसले'.
अचानक ती वळून म्हणाली..
" श्रीधर सावंत- भोसले म्हणजे सिंधुदुर्ग कुडाळ मधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक का ?"
" होय..."
अचानक माई पुन्हा खुर्चीत बसल्या.
" म्हणजे तू श्रीधरचा मुलगा... मला ओळखतोस ?"
त्या चक्क ऐकेरीत बोलत होत्या.
वरूण व त्याचा सचिव महापुरे दोघेही माईंच्या तोंडाकडे बघत राहिले.
" कसा ओळखशील म्हणा.. ! लहानपणी मला बघितलेलस....मी तरी तूला कुठे ओळखल पहिल्यांदा?"
वरूणच्या सचिवाकडे बघत ती म्हणाली..
" थोड बाहेर जाता का? मला तूझ्या साहेबाशी एकट्यानेच बोलायचय."
सचिवांनी प्रश्नार्थक मुद्रा करत वरूणकडे पाहिले. वरूणने मान हलवली तेव्हा सचिव मुकाट्याने बाहेर पडले.
" तूझा वेळ खुप महत्त्वाचा आहे. मी पण वेळेला महत्व देते पण आत्ता मी जे सांगणार ते अत्यंत महत्वाचे आहे.योगायोगाने आज आपण समोरा समोर आलोय.कदाचित मी नंतर हे तुला सांगू शकेन की नाही ते सांगता येणार नाही.कारण मी वचनबध्द आहे.पण श्रीकृष्णाने सांगितलय पापी माणसाला धडा शिकविण्यासाठी धर्म- अधर्मच्या फेर्यात पडायच नाही. म्हणून ऐक..
एक तरूण जोडप होत .त्यांच एकमेकांवर प्रेम होत ..विश्वास होता.ऐकमेक प्रेमात ती आकंठ बुडाली होती. आयुष्य म्हणजे सुखाचा झुला बनला होता त्यांच्यासाठी. पण लग्नानंतर तीन वर्षे होऊनही घरी पाळणा हलला नाही. तेव्हा दोघ थोडी निराश झाली.डाॅक्टरकडे तपासणी केली तेव्हा कळल की ती आई बनू शकणार नाही. कारण तीच गर्भाशय गर्भ धारण करण्याएवड सक्षम नाही.काही हार्मोन्स व्यवस्थित काम करत नाहीत. दोघही निराश झाले. तो तर चिडचिड करू लागला. एवड कमावलय त्याला वारस कोण ? असा प्रश्न त्याला पडला.तीने त्याला दुसर लग्न करण्याचा सल्ला दिला पण त्याने नकार दिला. अखेर आणखी काही मार्ग आहे का हे विचारण्यासाठी त्यांनी ओळखीचा गायनाकाॅलाजिस्ट गाठला.
" हे बघा भाडोत्री माता...म्हणजेच सरगोरेट मदर हा उपाय तुम्ही करू शकता.तुमच्या पत्नीच्या अंडपेशी सक्षम आहेत.आय.व्ही.एफ. तंत्र वापरून तयार झालेला गर्भ दुसर्या स्रीच्या गर्भाशयात रोपीत करायचा...तिने तो नऊ महिने वाढवायचा..व बाळ॔तपणानंतर ते मुल तुमच्या ताब्यात मिळेल.
ते मुल तुमच्याच अंशापासून बनलेल असेल."
" पण यात ...काही धोका तर नाही ना?" पतीने विचारले."
माईंच बोलण ऐकणार्या वरूणने त्यांना मध्येच थांबवल व म्हणाला...
" आजी, हे सगळं मला का सांगताय...मी...इथला जिल्हाधिकारी आहे.अश्या फालतू कथा ऐकायला मला वेळ नाही"
माई हसल्या व म्हणाल्या..
" घाई नको करूस , तुझा आणि माझाही या घटनेशी संबध आहे....आणि हो तुला काही विचारायच असेल तर नंतर विचार..आता मध्ये थांबवू नकोस..
तर मी काय सांगत होते ..पतीने विचारले ...की यात काही धोका आहे का? डाॅक्टर म्हणाले...धोका तसा काहीच नाही. जी स्री असेल ती विश्वासू पाहिजे....तीच नाव - गाव गुप्त ठेवल जाईल.कायदेशीर नोंद ठेवली जाईल ..पण ती गुप्त राहील.तिला पैसा द्यावा लागेल. शांतपणे विचार करा व मला सांगा .एखादी अशी स्री असेल तर तुम्ही पहा बाकी सगळं मी बघेन."
अखेर दोघांनी हा उपाय करायचा ठरवल.पण भाडोत्री माता कुठून शोधायची हा प्रश्न पडला.योगायोगाने त्याचवेळी तीची मावशी व तीची मुलगी 'आशा' तिथे आली होती. पत्नीने आपल्या मावशीला एखादी स्री शोधायला सांगितली.त्यावेळी आशा पण तिथे होती.एकोणतीस वर्षे होऊनही तिच लग्न झाल नव्हतं. आणि यानंतर लग्न करण्याचा तिचा विचारही नव्हता. आशा आपणहून म्हणाली
" गायत्री, दुसर कुणी शोधण्यापेक्षा ...मी ..मी ही जबाबदारी घेते.बाहेरची स्री नको ते धोकादायक ठरेल.आणि माझ म्हणशील तर मला आई बनण्याची संधी मिळेल..कदाचित नियतीची तीच इच्छा असेल. तुझी मावसबहिण म्हणून मी हक्काने सांगतेय."
आशाची आई व गायत्री दोघही तिच्याकडे बघतच राहिल्या.
" एवड्या घाई गडबडीत दोघांनींही निर्णय घेवू नका." आशाची आई म्हणाली.
" होय, मलाही तसच वाटतय मावशी." गायत्री म्हणाली.
पण अखेर आशाच्या हट्टापायी आणि घरातली व्यक्ती म्हणून आशाच योग्य अस ठरल.गायत्रीला वाटल चला आपला संसार तर वाचला. सगळ्या टेस्ट आटोपल्यावर गायत्रीच्या पतीचे शुक्राणू व गायत्रीची सक्षम अंडपेशी यांच मिलन टेस्टट्युबमध्ये करण्यात आल. कोणालाही हे कळू नये म्हणून आशाला पुण्यात ठेवण्यात आल.सोबत तिची आई व गायत्री राहत होती.योग्यकाळात तयार झालेला भ्रूण आशाच्या गर्भाशयात रोपीत करण्यात आला. नऊ महिन्यांनी आशाने एका मुलाला जन्म दिला.मुलाच्या स्पर्शाने गायत्री सुखावली आपल्याला हे भाग्य आशामुळे लाभल तिचे उपकार आपण कधीच फेडू शकणार नाही अस तिला वाटल.
सगळे पुन्हा कुडाळला आले.मुलाला दुध पाजव लागणार म्हणून आशाही त्यांच्या सोबत राहू लागली. मधल्या काळात शालिनतेने वागणार्या आशाने हळूहळू आपल जाळ गायत्रीच्या पतीवर
फेकायला सुरूवात केली. त्या जाळ्यात तो फसत गेला....अडकत गेला.या सार्या गोष्टी आशाच्या आईच्या ध्यानात आल्या. तिने गायत्रीला सावध केल.
" गायत्री वेळीच सावध हो.आता तूझा मुलगा बाहेरच दुध पितो...तूच त्याची सगळी काळजी घेतेस.आशाला आता जायला सांग. ती हट्टी व शीघ्रकोपी आहे. तिने एकदा ठरवल तर त्यासाठी ती वाटेल ते करते. तिच लग्न न जुळण्याच आणखी एक कारण आहे तिला एक विचित्र मानसिक आजार लहाणपणापासून होता. कुठेही बाजारात एखाद्या दुकानात गेली की दुकानातली एखादा वस्तू गुपचुप पर्समध्ये टाकायची.अगदी हजारबाराशेची खरेदी केली तरी दहा -पंधरा रूपयाची वस्तू गुपचुप पळवायची.चोरीच्या हेतूने नव्हे तर एक थ्रिल एक आनंद म्हणून.शहरातल्या सगळ्या व्यापार्याना हे माहित होत.मी त्या वस्तूचे पैसे नंतर द्यायचे. मानसोपचार तज्ञाकडून उपचार केल्यावर हा प्रकार कमी झाला. पण आज पुन्हा त्या प्रवृत्तीने उचल खाल्लीय.आज तेच ती करतेय. तुझ्या पतीला ती पळवतेय....अगदी तुझ्या डोळ्यादेखत."
माशवीचे बोलण ऐकून गायत्री घाबरली. खर म्हणजे तिलाही ते जाणवत होत.तिने धाडस करून याबाबत पतीला सांगितले. पण तो तिरसटून म्हणाला...
" हे बघ , तूला काय कळतय? आशाचे आपल्यावर फार उपकार आहेत.तिला वाटेल तेवडे दिवस ती राहिल."
आशाने तिथेच बस्तान ठोकल.गायत्री तोंड बंद करून मुलात रमली.आशाने गायत्रीच्या पतीला पूर्णपणे ताब्यात घेतल होत.अगदी सगळे आर्थिक व्यवहारही ती बघायला लागली.दोघही एकत्रच बाहेर पडत.गायत्रीचे स्थान घरकाम करणारी एवडच शिल्लक राहिल होत.मनात कुढत-रडत ती दिवस काढत होती.तो मुलगा तिच्यासाठी वाळवंटातली हिरवळ बनला होता.

' प्रेइंग मॅटिस हा टोळ वयात आला की त्याच्या शरीरात बदल होतात. त्याच्या डोक्यात एक प्रकारच द्रव्य स्रवू लागत. त्या रसायनामुळे मादीकडे जाण्यास विरोध होतो. या उलट त्याच्या पोटात स्रवणार रसायन त्याला प्रियेकडे जाण्यास प्रवृत्त करते.मेंदू व ह्रदय यात जीवघेणा संघर्ष होतो. अखेर ह्रदय मेंदूवर मात करते व तो तिच्याकडे जातो. एका भयानक पध्दतीने मादी त्याची या झगड्यातून सुटका करते.ती चक्क त्याच डोक म्हणजे मेंदूच खाऊन टाकते.त्यामुळे पोटातल रसायन त्याला बेभान करते तो मिलनाला उत्सुक होतो.तो टोळ डोक नसतानाही मादिच्या शरीराशी एकरूप होतो. बेधुंद समागमानंतर मादी ते डोकेविरहित शरीरही खाऊन टाकते.'

अगदी असच आशाने गायत्रीच्या पतीचा मेंदू निकामी केला होता.अखेर आशाने गायत्रीला रीतसर घटस्फ़ोट घेऊन घराबाहेर काढायला लावल.त्यासाठी तिच्या चारित्रावर हल्ला केला गेला. व्याभिचारी..वांझ ..ठरवून तिला बदनाम केल. ती कुठ गेली कुणाल कळल नाही. आणखी एक आशाने गर्भाशय भाड्याने देण्यासाठी प्रचंड पैसे घेतले होते. शिवाय एका करारानुसार दर महिन्याला ठराविक रक्कमेची व्यवस्था केली होती.यातल काहीच गायत्रीला माहित नव्हते. आशाने कोणताच विधिनिषेध पाळला नव्हता. आज गायत्री कुठे आहे सांगता येणार नाही. तो मुलगा पुढे हुषार निघाला.खर म्हणजे त्याला यातल काहीच माहीत नव्हते. तो आज तरूण वयात एक मोठा अधिकारी झालाय."
एवड बोलून माई देशपांडे गप्प झाल्या.
" म्हणजे तो मुलगा म्हणजे...." डोके गच्च पकडून वरूण बडबडला.
" होय...तो मुलगा म्हणजे वरूण श्रीधर देशपांडे. "
" आणि तुम्ही आजी म्हणजे आशाची आई....होय ना?"
"होय, हुषार आहेस...परवा समारंभाला ये...एक अनमोल ठेवा तूला तिथे मिळेल. आयुष्यभराची प्रेरणा मिळेल. "
माई कधी दालनाबाहेर गेल्या ते वरूणला कळलेच नाही. विचारांच्या वावटळीत तो सापडला होता. आयुष्यात कधी काय समोर येवून उभे ठाकेल ते सांगता येणार नाही. कुठे असेल गायत्रीआई, कोणत्या स्थितीत असेल...की परीस्थितीशी टक्कर देता -देता हरून तिने जग सोडले असेल? लहानपणी जिला आपण घरकाम करणारी बाई समजत होतो ती आपली आई होती? आपला जन्म किती विलक्षण व वेगळा आहे.किती विचित्र होत हे. गायत्री आईला अपमानित होऊन घराबाहेर पडाव लागल. त्याला बाबांचा व जिला तो आई समजत होता त्या ' आशाचा ' प्रचंड राग आला होता. तीने त्याला जन्म दिला होता..पण त्यासाठी पैसे घेतले होते...त्यानंतरही ती विचित्र वागली होती.
आपण ' आई' ला न्याय दिला पाहिजे.तिला लागलेला कलंक पुसला पाहिजे. ते सहज शक्य आहे.पुण्याला वंध्यत्वनिवारण केंद्रात जुन्या नोंदी सहज सापडतील.पण त्यापूर्वी आईला शोधल पाहिजे...कुठे शोधायच तिला? अचानक त्याला माईंचे शेवटचे वाक्य आठवल.
'समारंभाला ये तिथे तुला अनमोल ठेवा सापडेल.'
म्हणजे गायत्रीआई तिथेच असणार...नक्की तिथेच असणार."
वरूणला हायस वाटल.त्याला वाटल आत्ताच गाडी काढावी व राजापुरला ' गोकुळ ' वृध्दाश्रमात जाव.त्याने स्वतःला आवरल.परवापर्यंत वाट पहावी लागणार होती.या कार्यक्रमातच तो आपल्य ' आई' ला न्याय देणार होता.मनाशी निश्चय करून त्याने आपल्या बाबांना फोन लावला.
" बाबा, उद्या रत्नागिरीत या. आईला सुध्दा घेवून या. माझ्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात तुम्ही दोघ असलाच पाहिजे .तिथे तुम्हाला मी एक भेटही देणार आहे..नक्की या."
आता त्याला शांत वाटल .ताण थोडा कमी झाला. थोडा स्थिरस्थावर झाल्यावर त्याने सचिवांना हाक मारली...
" महापुरे......सावर्डेच्या शिष्टमंडळाला आत पाठवा..."
आता तो पुर्वीचाच वरूण झाला होता.
बाळकृष्ण सखाराम राणे
सावंतवाडी