आईचा त्याग अविस्मरणीय?
*नागपुरातील एक घटना. आईला मुलगा म्हणाला, 'मी तुला पोषतो. तू फुकटचं खाते.' तशी त्याची आई फुकट खात नव्हती. तिनं त्याला एक कॅफे टाकून दिला होता आपल्या वेतनाच्या पैशातून. आता तिनं काही मिळकत आपल्या म्हातारपणाची शिदोरी म्हणून शिल्लक ठेवली होती. त्याही पैशावर डोळा होताच तिच्य लेकराचा. म्हणूनच ते शब्द. ते ऐकून आई घायाळ झाली. तिला दुःख झालं व तिनं त्याला धडा शिकवायचं ठरवलं. तद्नंतर तिनं ज्या जागेत आपल्या मुलाला कॅफे टाकून दिला होता. ती जागा आताही तिच्याच मालकीची होती. ज्यातून तिनं त्याला नोटीस पाठवला व नोटीसमध्ये ती जागा खाली करायचा आदेश दिला.*
आई ....... आई माझा गुरु आई कल्पतरु. अशा आईवर बऱ्याच लोकांनी लेख लिहिले. काहींनी कविताही लिहिल्या. तेवढं लिखाण वडिलांवर झालेलं नाही.
लोकं आपल्या वडिलांपेक्षा जास्त आईवरच प्रेम करतात. का? त्याचं उत्तर असतं आईचा त्याग. आई ही आपल्या वडिलांपेक्षा आपल्यासाठी जास्त त्याग करीत असते. उदाहरणार्थ आपला परिसर. आपल्या परिसरात अशा काही लोकांचं निरीक्षण करुन पाहिल्यास आपल्याला आईचा दर्जा समजतो. बरीचशी आपल्या आजुबाजूला असलेली अशीही मंडळी दिसतील की ज्यात जोडीदारांपैकी एक मरण पावलेला आहे. अशावेळेस त्या जोडीदारांपैकी जर पुरुष मरण पावला असेल तर ती स्री बरेचवेळेस आपला दुसरा विवाह करीत नाही आणि समजा करीत असेलही तरी ती आपल्या बाळाला आधी सुरक्षीत ठेवते. मगच आपला विवाह करते. परंतु त्याच जागी जर पुरुष असेल तर तो आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आपला विवाह साजरा करतो. विचारल्यावर आपल्या बाळाचा हवाला देतो. म्हणतो की आपल्या बाळाची काळजी घेता यावी. म्हणूनच त्यानं विवाह केलेला आहे. परंतु ही नवीन घरात आलेली पत्नी त्या पुरुषांच्या मतानुसार खरंच बाळांची काळजी घेते काय? याचं उत्तर नाही असंच येतं. उलट ती त्या मुलांना नोकर समजते व ती त्यांना राब राब राबवीत असते. त्यांना महाभयंकर त्रास देत असते की जो त्रास ती मुलं कुणाला सांगू शकत नाहीत. आपल्या वडिलांनाही सांगू शकत नाहीत. कारण वडील आपल्या पत्नीचंच जास्त ऐकतात. मुलांचं नाही. ही वास्तविकता आहे. तशी पत्नी करीत नाही. परंतु त्यातही आजकाल बरेच अपवाद आहेत. आई...... आईचं महात्म भरपूर आहे. एक आई आपल्या बाळासाठी भरपूर काही करते. परंतु मुलं मात्र त्या आईसाठी काहीच करीत नाही. आईची चांगली भुमिका जशी मानवांमध्ये दिसते. तशी ती प्राण्यांमध्येही दिसून येते. प्रत्यक्षात आपल्यालाच त्रास देणारे नर वाघ, आपल्याही लेकराला त्रास देईल. ही कल्पना करुन नर वाघीण गर्भार होताच आपल्या पतीला हाकलून लावते. त्याचं कारण असतं, त्याचं विचित्र वागणं. तिला माहीत असतं की मला पिल्ले होताच हाच माझा पती असलेला वाघ त्यांना खावून त्यांचं जीवन संपविणार. तीच गोष्ट घडते विंचवी नावाच्या प्राण्यातही. तिलाही माहीत असतं की मी बाळ जन्माला घातल्यावर माझी बाळंच मला खावून टाकणार. तरीही ती मातृत्व स्विकारते व आई बनते. त्यानंतर जे व्हायचं ते होतेच.
मातृत्वाचं व आईचं महत्व या केवळ दोनच प्राण्यात दिसत नाही, तर ते इतरही बर्याच प्राण्यात दिसतं. वाळवी या किटकांमध्ये मादी केवळ अंडीच देण्याचं काम करते. बदल्यात तिला सगळ्या वाळवी जेवन खावण देण्याची व्यवस्था करतात. तिला भरपूर खायला टाकतात. ज्यातून ती लठ्ठ होते व तेवढीच आळशीही. ज्यातून तिचे पाय लहान असल्यानं ती हालचालही करु शकत नाही. त्यातच ती अंडी देत असतांना तिलाही माहीत असतं की तिचा वापर केवळ अंडी घालण्यासाठीच केल्या जात आहे. त्यासाठीच तिला खावू पिवू घातलं जात आहे. तिचं अंडी देण्याचं काम झालं की बस, तिला मरण्यासाठीच सोडून देतील. तिला पुरेसं अन्नही कोणी देणार नाही. हे तिला माहीत असूनही ती आईपण व मातृत्व स्विकारते. ज्यात शेवटी घडतं तसंच. ती अंडे जेव्हा देवू शकत नाही. तेव्हा सर्व वाळवी तिला सोडून जातात. ज्यातून ती लठ्ठ असल्यानं व तिचे पाय लहान लहान असल्यानं ती हालचाल करु शकत नाही. ज्यातून ती उपाशी राहू राहू मरण पावते. हेच घडतं, मुंगी व मधमाशीच्या जीवनचक्रातही. त्यांच्याही जीवनात आईपण महत्वाचं असलेलं दिसून येतं.
आईपणाचं महत्व. यात काही अपवादही असतात. सापाच्या पिल्लाला जन्म देणारी त्यांची आई त्यांना जन्म देताच खावून टाकते. कुत्र्याला जन्म दिल्यानंतर त्यांना भुकेपोटी खावून टाकणाऱ्या आई जगात आहेत. तसेच कांगारुच्या पिल्लाला जन्म देणारी त्यांची आई अल्पकाळात जन्म दिल्यानंतर त्याला जमीनीवर सोडून देते. तेव्हा डोळेही उघडलेले नसतात. अशाकाळात तेच कांगारुचं डोळे न उघडलेलं बाळ, जमीनीवरुन तर तिच्या पिशवीपर्यंत प्रवास करते. हा प्रवास महाभयंकर असतो. हा प्रवास करतांना जर ते पिल्लू पिशवीपर्यंत पोहोचलं तर वाचतं. नाहीतर मरुन जातं. पांडा या प्राण्याचाही असाच जीवनक्रम आहे. या प्राण्यांची मादी दोन पांड्याना जन्मास घालते. ज्यातून मादी त्या दोनपैकी सशक्त अशा पाडसाला निवडते व त्यालाच दूध देते. इतर दुसऱ्या पाडसाला नाही. ज्यातून एक पाडस मरतो व दुसरा जगतो. गरुड पक्षांमध्ये मादी आपल्या जोडीदाराची परिक्षाच घेते मातृत्वासाठी. विभिन्न नरांना आकर्षित केल्यानंतर ती त्यांची परिक्षा घेते. अशा परिक्षेवेळेस ती काड्या फेकते. जो झेलेल, त्या नराला जोडीदार म्हणून निवडते. त्याचं कारण असतं, आपल्या बाळाची काळजी घेणं. हेच घडतं शिंपी व सुतार पक्षातही. जो पक्षी घरटी चांगली बनवेल. त्या नराची मादी जोडीदार म्हणून निवड करते. हे बाळाची काळजी घेण्यासाठीच असतं. काही पक्षी हे समुद्रालगत राहात असतात. त्यातही जो नर घरटं चांगलं बनवेल. त्यालाच भाव देत असतात माद्या. पक्षांमध्ये एक मादी तर अशी आहे की जी अशाच परिक्षेतून नराची निवड केल्यानंतर एखाद्या झाडाच्या ढोलीत निवास करते व नराला त्या ढोलीचं तोंड मातीनं बंद करायला लावते. ज्यातून फक्त अन्न आतमध्ये टाकता येईल, तेवढंच छिद्र असते. ज्यातून नर तिला अन्न पुरवतो व ती मादी तिची पिल्लं मोठी होईपर्यंत स्वतःला बंदिस्त करुन कैदेत राहते.
यात काही अपवादात्मक मादा प्राणी व पक्षीही आहेत. त्या आपल्याच पिल्लांना खातात वा मारतात. असे का? त्याचं कारण असतं परिस्थिती. त्या प्राण्यांच्या मादीला वाटत असते की पर्यावरणीय बदलात वेगवेगळे बदल होत असतात. त्यात कमजोर असलेली आपली पिल्ले टिकणार नाहीत. ती टिकावीत. म्हणूनच त्यांचं कमजोर असलेल्या आपल्या बाळाला खाणं वा त्यांना मारुन टाकणं. असं बरंच प्राण्यात घडतं आणि घडवलं जातं. ही प्रक्रिया निसर्गच घडवीत असतो. निसर्गातही कमजोर असलेल्या घटकांना जागा नाही.
वरील सर्व उदाहरणातून असं दिसून येतं की मादा प्राणी आपल्याच लेकरांना त्यांची इच्छा नसूनही मारुन टाकतात. ते त्यांना मरणासाठी सोडतात. प्रसंगी स्वतः मरतात. कधीकधी आपल्या पतीला गर्भार झाल्यानंतर हाकलून देतात. हे सर्व घडतं आपल्या बाळाच्या काळजीसाठी. आपलं बाळ सशक्त तयार व्हावं ही प्रत्येक आईची इच्छाच असते. त्यासाठीच त्या त्याग करीत असतात. आपला जोडीदार असलेल्या नराची परिक्षाही त्या घेत असतात. त्यामुळं त्यांचा जो त्याग असतो. तो अगदी महत्वपुर्ण असतो. हे तेवढंच खरं.
आई ही अविस्मरणीय असतेच. तसा तिचा त्यागही अविस्मरणीयच असतो. अशा त्यागासाठी ती तिची इच्छा नसूनही तयार होते. म्हणूनच आईची सेवा ही अतिशय महत्वाची सेवा आहे. ती प्रत्येकानं करावी. जो तशी सेवा करतो. तोच भवसागर पार करीत असतो. त्याला जीवनात संकटं येत असली तरी संकटं वाटत नाहीत. तो संकटं टाळून सृष्टीत टिकून राहतो. मग सृष्टीत कोणतेही बदल झाले तरी तो कोणत्याही बदलाला तसेच संकटाला घाबरत नाही. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०