"शोभा ss अय शोभाव ss!!"
अशी हाक दाराच्या बाहेरून सकाळी आठच्या सुमारास कानावर पडली कीं समजायचं आज पौर्णिमा आहे.
त्याकाळी "घरांची दारं" उघडीच असायची.
आई किंवा मी दारात येणार आणि म्हणणार, " या मामा. "
"सायब्या"
माझ्या आजीकडून आणि वडिलांकडून ऐकलेलं ते नाव आणि ते नाव लावणारा तो वृद्ध.
डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, त्यातून फुल पडल्यागत दिसणारे डोळे. लुकडी, कृष आणि पाचेक फूट उंची असलेली चण. रापलेला काळा रंग. अंगात पांढरा शर्ट त्यावर बिनबाहीचा कोट, खाली धोतर आणि डोक्यावर काळी टोपी. या व्यतिरिक्त पोशाखात मी त्याला कधीही पाहिल्याच मला स्मरत नाही.
फक्त "या" ऐकलं कीं पायातलं जीर्ण पायताण काढून तो वृद्ध घरात यायचा आणि आत असलेल्या देवघराजवळ जाऊन बिनदिक्कत बसायचा. आतल्या माळ, परडी, पोताला आणि देवीच्या मुखवट्याला निरखायचा.
" आईचं पातळ बदललं ना? " असं विचारायचा.
आई हो म्हणायची. तो मग हात जोडून चांगला मिनिटभर नमस्कार करायचा आणि काहीतरी पुटपुटल्या सारखा करायचा.
त्यानंतर खाली बसताना पाठीवरून काढून ठेवलेलं संबळ तो पुढ्यात घ्यायचा.
एका हातात काडी आणि दुसऱ्या हातात आकडा घेऊन दोनदा त्यावर आपटणार आणि मग.
डुंगडुंग डुंगडुंग
डुंगडुंग डुंगडुंग...
संबळ वाजवत देवींची स्तुती गायला सुरुवात करायचा.
आई तुळजाभवानी गं तुझ्या गोंधळाला येते |
येते गं येते तुझ्या चरणी लीन होते ॥ धृ ॥
गळ्यामध्ये तुझ्या कवड्याची माळ ।
कपाळी आहे तुझ्या केशरी टीळा ॥
तुझ्या दर्शनानं अंबा हरला माझा काळ ।
संसाराचा माझ्या तूच वाढविते मळा ॥ १ ॥
तुळजापुरात आई तुझं थोर गाव ।
शिवाजी राजानं तुझं घेतलं होतं नाव ॥
संकटाच्या वेळी तूच पावतेस धावून ।
भक्तांच्या हाकेला येतेस धावून ॥ २ ॥...
मला ते बोल समजायचे नाहीत. पण मी तिथं उभा राहून तल्लीन व्हायचो. त्याच्या गळ्याच्या ताणलेल्या शिरा आणि फुललेला कृष छातीचा भाता त्याच्या गाण्याचा प्रयत्न किती तीव्र आहे ते दाखवत राहायचं. मन लावून तो ती गाणी म्हणायचा. ते संपल्यावर परत एकदा मोठं लोटांगण व्हायचं.
आंबा बाईच्या नावाचा उदो उदो मी त्याच्या सोबत करायचो.
देवींची स्तुती सुरु असताना आई त्याच्या संबळाला हळदी कुंकू वाहायची. त्याला आणि मलाही लावायची.
स्तवन ऐकता ऐकता चहा ठेवायची. त्याचं गाऊन संपता संपता चहा होत आलेला असायचा. मग मी तो त्याला नेऊन देणारं. तो अर्धा कप संपवता संपवता तो गावातल्या लोकांची इकडची तिकडची माहिती आईला सांगायचा. मला ही त्याच्या ढंगाने ते ऐकण्यात उत्सुकता असायची.
त्याचा चहा झाला कीं आई त्याला नमस्कार करायची.
तो आशीर्वाद दयायचा.
" शोभा हायेस घरची. शोभा वाढवतं रहायचं. सुखानी नांदायचं बरं का पोरीं!" हे वाक्य बऱ्याचदा त्याच्याकडून मी आईला म्हणताना ऐकलेलं.
मग ती त्याला पाचेक रुपये द्यायची. तर कधी मला द्यायला सांगायची. तो डोक्याला लावून खिशात घालायचा आणि संबळ पाठीवर टाकून निघायचा.
तो दारात त्याचं पायताण पायात सरकवेपर्यंत मी मागून दोन तीन वेळा तरी त्याच्या संबळीवर बोटे वाजवून घ्यायचो.
" थांब लेका तुझ्या तर.. माकड हायेस येकदम." असं उगाच मला दटवायचा आणि पुढल्या घरी निघून जायचा.
पुढं मोठा होत गेलो तसं ते करणं बंद झालं. आताशा मी तो देवी स्तवन गाताना तिथे उभा सुद्धा राहत नव्हतो.
एक दिवस तो घरातून निघताना मी टीव्ही बघत होतो.
पायात वहाना चढवताना त्याने विचारलंच, " वाजवत नाय व्हय रं आता मागून युन ? "
मी फक्त नाही म्हणत मंद हसलो.
" निसटत जात येक येक ते असं!" असं काहीसं तो पुटपुटला आणि निघून गेला.
🍁🍁🍁🍁
चैत्र पौर्णिमा, सोमवती अमावशा, खंडे नवमी.. अशा काही दिवशी पण त्याचं आगमन ठरलेलं असायचं. पित्राच्या दिवशी त्याला आधीच आमंत्रण देऊन ठेवलेलं असायचं. येऊन तो त्याचं जेवण बांधून घेऊन जायचा. तर, अक्षय तृतीयेला सुद्धा त्याला आमंत्रण असायचं.
मोठा झाल्यावर मी एकदा आठवण आली म्हणून आईला विचारलं होतं, " हा सायब्या मामा तुला का शोभा म्हणतो? "
तीने मला सांगितलं होतं.
" मला एकटीलाच नाही तो सगळ्याच बायकांना शोभा म्हणतो. त्याची लग्न करुन पाठवलेली एकुलती एक लेक तिच्या सासरकडच्यानी हुंड्यासाठी जाळून मारली. तिचं नाव होतं शोभा. असं एकदा त्याने सांगितलं होतं. त्याला सख्खी म्हणून तिच होती.
"एक गेली पण शेकड्यानी मिळाल्या."असं तो म्हणतो.
ती अक्षय तृतीयेलाच वारली होती. ते मला कळलं तेव्हापासून माझ्या वडिलांसोबत त्या साहेबराव मामाला मी अक्षय तृतीयेला जेऊ घालते."
पुढे आम्ही गावातच जागा बदलली. मोठ्या घरात राहायला गेलो तेव्हा वास्तुशांतीला तो येऊन देवींची स्तुती ऐकवून गेला. त्यानंतर मात्र सायब्या मला दिसला नाही.
माझ्या लग्नानंतर जागरण गोंधळ करायचा होता. त्यासाठी गोंधळी बघायला वडिलांसोबत मी पहिल्यांदाच तो राहत होता त्या वस्तीत गेलो. त्याच्या घरी त्याचं म्हणावं असं खरंतर कोणीच नव्हतं. कोणीतरी भावकीतला किंवा नात्यातला असा एक माणूस आणि त्याची मंडळी तिथे होते. पण त्यांनी त्या साहेबरावाचा फोटो तिथे हार घालून ठेवला होता.
" सायब्या मामा गेले? " मी विचारलं.
" चार वर्षे हुन गेली. " तो माणूस म्हणाला.
" कळलंच नाही!" माझे वडील म्हणाले.
" कुठं कोण मोठा माणूस व्हता. पेपरात बातमी येणार हुती व्हय सायब्या गेला तर.. " तो म्हणाला.
"यायला हरकत नव्हती खरंतर इतकी घरं त्यांना ओळखतात." मी त्या माणसाला म्हणालो.
अचानक माझं लक्ष गेलं आणि तिच त्यांची जुनी संबळ मला त्यांच्या खाटेखाली दिसली. मी ती ओळखली होती.
मी त्यांना विचारलं.
" व्हय सायब्या मामाची हाय!" तो म्हणाला.
"बघू का!" विचारलं तर त्यानेच ती पुढ्यात आणून ठेवली.
मी खूप निरखून तिला बघत होतो. परत बघायला मिळेल न मिळेल. आता ती वाजत नव्हती कारण ती जीर्ण झाली होती. तिचं कातडं फाटलं होतं. मी तिच्यावर फक्त हात फिरवला. तिच्या पुढे असणाऱ्या कापडाला असणारा खिसा मी हलकेच चाचपला. त्यात मला हाताला काही लागलं. मी हात घालून पाहिलं तर पाच रुपयांचे एक नाणे होते. मी काढून ते हातात घेतलं आणि पाहिलं तर झरकन तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला.
एकदा आईकडे सुट्टे पैसे नव्हते. तर वेगळं आहे म्हणून माझ्याकडे ठेवलेलं पाच रुपयांच नाणं तीने मला मागितलं.
मी चीड चीड आणि हात पाय आपटत तिला दिलं. हे तेच नाणं..
माझ्या पक्क लक्षात राहिलेलं. सायब्या समोर हा प्रकार घडलेला. त्यांनी ते वापरलं नाही.. का?
ते नाणं मी माझ्याकडे ठेऊन घेतलं. त्या माणसाला दुसरं दिलं.
🍁🍁🍁🍁
त्याच्या घरातून निघताना सदगदीत मनाला सायब्याचे ते उच्चरवातले देवीच्या गाण्याचे स्वर ऐकू येत होते.
डुंगडुंग डुंगडुंग
डुंगडुंग डुंगडुंग...
तालात संबळ ऐकू येत होती.
अन शेवटाला सायब्याचे ते शब्द ऐकू आले होते.
" निसटत जातं येक येक ते असं!"
🍁🍁🍁🍁
शब्दभ्रमर