"पंधराच दिवस?" अनिताने विचारलं.
"हॊ पंधराच!" तन्मय म्हणाला.
"आपला हेतू शुद्ध आहे. प्रामाणिकपणे आपण मुलं शिकवतो आहोत. आपलं कामं सुरळीत चाललंय. ही मुळावर घाव घालणारी अडचण आपल्यालाच का आलीये तन्मय? काय करायचं आता?" अनिता खूप दुःखी झाली होती.
"ही वास्तू मी वाचवणार अनिता. ही नुसती इमारत नाही. माझ्या आईचं मंदिर आहे. तिचं स्वप्नं आहे. असं तुटून देणार नाहीये मी ते. करतो काहीतरी. " असं तन्मय तर म्हणाला होता पण त्याला तरी कुठं माहित होतं की तो काय करणारे.
बँकेकडून घेतलेल्या कर्जावर त्याने त्याच्या राहत्या घरावर आणखी दोन मजले चढवले, सुसज्ज वसतिगृह बांधून त्याने घरापासून काही अंतरावर असणाऱ्या एका रेड अलर्ट वस्तीमध्ये जन्मलेल्या मुलांना राहून शिकता यावे म्हणून सोय केली होती.
तन्मयची आई शुभदा मोहिते यांनी सुरु केलेल्या त्या शाळेत देहविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांना शिकायला आणून खूप अडचणीनी भरलेली ती समाजसेवा सुरु केली. त्या वारल्यावर आईचं काम तन्मयने करिअर ची उत्तम संधी डावलून पुढे नेलं.
त्यात त्याला अनिताची साथ लाभली जी त्याचं शाळेत शिकली होती आणि तन्मयशी प्रेमसंबंध जुळून त्याची पत्नी झाली होती. त्याच्या आईचे उपकार आणि प्रेम दोन्ही होते तिच्यावर.
आपण समजतो की समाजकन्टक फक्त अशा अंधाऱ्या वस्तीत जन्माला येतात. पण पांढरंपेशा समाजातले काही लोकं त्यांच्याही पेक्षा खालच्या पातळीवर जाऊन त्रास देऊ शकतात याचा अनुभव तन्मयला येऊ लागला. त्याचा बंगला ज्या भागात होता. तो भाग उच्चभ्रू लोकांनी वेढलेला होता. अशा भागात त्या वस्तीतलं वारंही फिरकू नये म्हणून काही लोकं नाकं मुरडत होती, तिथे या माय लेकरांनी खुशाल त्या वस्तीतली मुले आणून त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केलेली. त्यांना ते खाचितच खपणार नव्हतं. त्यांनी ते थांबवण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण शुभदाबाई कणखर बाण्याच्या होत्या त्यांनी ते प्रयत्न हाणून पाडले. त्यांच्या पश्चात हे थांबेल असं वाटून ती मंडळी खुश होती. पण तो वारसा तन्मयने पुढे न्यायचं ठरवलं.
त्यामुळे आधी फक्त वैतागलेली लोकं चिडली. त्यांनी हरेक प्रकारे तन्मयला आणि अनिताला त्यांच्या कार्यात अडथळे आणायला सुरुवात केली. कधी एखादी कायदेशीर परवानगी मिळवण्यातल्या अडचणी तर कधी व्यक्तिगत त्रास. त्या वस्तीत जन्माला आलेल्या अनिताला तर तिच्या चारित्र्यावरची शेरेबाजी ही सहन करावी लागली. ते लोकं आपल्या स्थानाचा, पैशाचा वापर करत तन्मयला थोपवू पाहत होते.
आता तर त्यांच्या दृष्टीने कहरच झाला होता. आईकडून मिळालेली सर्व जमापुंजी आणि राहत्या वास्तूला गहाण ठेवत तन्मयने कर्ज काढून वरती दोन मजले बांधले. 40 एक मुले राहू शकतील असं वस्ती गृह, मेस, वाचनालय. अशी सोय त्याने तिथे केली. तेव्हाही परवानग्या वैगरेसाठी झालेली अडवणूक त्याने कशीबशी पार करत ते काम तडीस नेले.
"फुलबाग" पुर्ण केली.
त्या वस्तीतली मुलं चांगल्या वातावरणात वाढवीत असं ज्या स्त्रियांना वाटत होतं. त्या स्त्रियांनी त्यांना राहायला पाठवलं. तिथे राहून त्यांच्यात निश्चितच सकारात्मक बदल घडून त्यांचं आयुष्य उज्ज्वल होणार होतं. पुढल्या खर्चाची तजवीज आणि काही शिक्षक वैगरे नेमण्यासाठी तन्मय अनिता धावपळ करत होते. त्यांच्या प्रयत्नांना थोड्याफार प्रमाणात यशदेखील मिळत होतं. पण पांढरंपेशा समाजातल्या "त्या" झुंडीने परत त्यांचे कू प्रयत्न केले आणि एक दिवस तन्मयला नोटीस आली.
आपलं बांधकाम बेकायदेशीर आहे. आपण स्वतः ते पाडावं अन्यथा शासकीय ते कारवाई करण्यात येईल. सोबतच बँकेने देखील दोन हफ्ते तारखा उलटून गेल्या तरी भरले नाही अशा कारणाने विलंब होत असल्याचे दाखवून कर्ज परत करा असा घोषा लावला. खोल चौकशी करता त्याला समजले की ओळखीचा वापर करत त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या शेठ लोकांनीच हे घडवून आणलंय. ज्यांना खाज भागवण्यासाठी अशा वस्तीतल्या स्त्रिया तर हव्या असतात. पण त्याचं फ़लीत मात्र त्यांची जबाबदारी नसते. उलटं ते त्या गोष्टीला गलिच्छ समजतात.
तन्मय आता चांगलाच कचाट्यात सापडला होता. त्याने त्याच्या मित्रांना नातेवाईकांना संपर्क करुन पाहिला पण उपयोग झाला नाही. त्याच्या या वेडापाई कोण नुकसान सोसणार? असा सगळ्यांचा सुर होता. काहींनी तर त्याला विकून मोकळा हॊ आणि स्वतःच आयुष्य पुढं ने असाच सल्ला दिला. पण तन्मयला आईचं स्वप्नं पुढं न्यायची जिद्द होती. तो बधत नव्हता.
सर्वप्रकारे प्रयत्न करुन शेवटी तो हरला. ती तारीख उजडली जेव्हा शासनाचा ताफा ते बांधकाम पाडण्यासाठी आणि बँकेची लोकं उरल्या घरावर लिलावाची नोटीस लावायला आले.
तन्मय सर्व मुलांना आणि आतल्या सामानाला बाहेर काढून अनितासोबत हतबल उभा होता. आजूबाजूचे शेठ लोकं देखील तो तमाशा पाहायला आले होते. इमारतीवर घाव घालण्यासाठी रेकिंग बॉल सज्ज होता. बँकेच्या माणसाने कायदेशीर नोटीस घराच्या दारावर लावली. मशीन सुरु करण्यात आलं. अनिता आणि तन्मयचे अश्रू थांबत नव्हते. त्यांच्या समोर त्यांची फुलबाग उध्वस्त होणार होती. अनिताने तन्मयचा हात घट्ट धरला होता. हतबलतेने दोघांना घेरलं होतं.
रेकिंग बॉल वर उचलला गेला. तेवढ्यात चार महागड्या गाड्यांचा ताफा त्या बंगल्याच्या आवरापाशी येऊन हॉर्न वाजवू लागला. तीन गाड्यांमधून बॉडीगार्ड्स आणि काही ऑफिशिंयल्स उतरले. पहिल्या गाडीतून एक वृद्ध उतरले. अतिशय तेजस्वी अशी त्यांची चर्या होती. चेहऱ्यावर प्रचंड श्रीमंतीचा रुबाब होता. मुद्रा गंभीर होती. जाणत्या लोकांना कळलं. " श्री. केशव सरदेशमुख साहेब." मोठे उद्योजक. अब्जावधीची श्रीमंती असणारी मोठी आसामी. राजकीय शक्ती आणि मोठ्या लोकांच्या ओळखी असणारे मोठे शक्तिशाली व्यक्तिमत्व.
सगळे थांबून पाहू लागले. यांचं इथं काय कामं? त्यांचे ऑफिशिंअल्स बँक अधिकारी आणि शासनाच्या लोकांकडे गेले. केशवसाहेब स्वतः चालत तन्मयकडे आले.
"तन्मय.. तूच नं?!" त्यानी त्यांच्या गंभीर आवाजात विचारले.
"हॊ! मीच." तन्मय म्हणाला.
त्याच्यासोबत उभ्या असणाऱ्या अनिता, वीस पंचवीस मुलांकडे आणि पडलेल्या पसाऱ्याकडे त्यांनी एक नजर टाकली.
" हेच व्हायचं होतं. तुझ्याही अंगात तिचंच रक्त खेळतंय त्यामुळे ही परिस्थिती ओढवणारच." ते म्हणाले.
" म्हणजे मी समजलो नाही. " तन्मयचं त्यांचं तिथं येणं बुचकळ्यात टाकत होतं.
"शुभदा जिद्दी होती. पण कणवाळू. चाकोरीच्या बाहेर जाऊन गोष्टी करायच्या असायच्या तिला. तिच्या या सवयीमुळेच तिने तुझ्या वडलांशी म्हणजे प्रभाकरशी लग्न करुन स्वतःच्या वडिलांशी दुरावा निर्माण केला. प्रभाकर पण तसलाच समाजसेवेच व्यसन त्यालाही. चुकीच्या लोकांशी वैर त्याला संपवून गेलं...तीही गेली..असो! शुभदाने तिच्या मार्गाने केलेलं कामं आज तू पुढे नेत आहेस. तुही तसलाच... हम्म.. पण पुढे काय? आता तरी हे सगळं असं होतं चाललंय? काही पर्यायी विचार केलायस?" सरदेशमुख साहेब म्हणाले.
आत्तापर्यन्त सगळे फक्त तमाशा बघत होते. हा प्रश्न विचारणारे तेच होते.
"अजूनतरी नाही. सध्या मुले त्यांच्या आयांच्या स्वाधीन करुन मग काहीतरी सोय करीन. पण आपला यात संबंध मी नाही समजलो. " तो म्हणतच होता.
तितक्यात शासनाची लोकं परत निघाली. बँकेच्या कर्मचाऱ्याने ती नोटीस फाडलेली तन्मयने पाहिली. त्याला तो धक्का होता. अनिताही आश्चर्यने बघत होती.
"शुभदा.. म्हणजे माझी मुलगी. होय.. आणि त्या नात्याने तू माझा नातू. तुझ्या आईला मी समजू शकलो नाही. पण तुही तेच करायला निघालास तेव्हा मला समजलं. तुम्ही लोकं ह्या कारणांसाठीच जन्म घेता. पैसा, मोह, सामाजिक उच्चपद ह्यापेक्षाही तुम्हाला दुर्लक्षित घटकांना मदत करण्याची जबरदस्त इच्छा असते. तू आणि शुभदा याच पठडीतले! तुला आणि तिला साथ ही तशीच लाभलीये असं दिसतंय." अनिताकडे एक नजर टाकत ते म्हणाले.
"असो..! तुला इथून पुढे कसलाही त्रास होणार नाही. तुझं कर्ज मी चुकवलंय. परवानगीचा तिढा पण सुटलाय. शिवाय शुभदाच्या वारसाहक्काचा हिस्सा मी तुला दिलाय. त्याचे पेपर्स येतील लवकरच तुझ्याकडे. तू त्याचा वापर तुझ्या कार्यासाठी करू शकतोस. माझी कसलीही अट वां हरकत नाही. मोठा हॊ. आईच स्वप्नं पुर्ण कर." ते म्हणाले.
तन्मयच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने त्यांना हात जोडले. त्याच्या खांद्यावर हाताने थोपटत देशमुखसाहेब हलके हसत मागे फिरले.
तन्मयने घरासमोर पालथा पडलेला तो बोर्ड उचलून हातात घेतला. त्याच्या आईने शाळा सुरु करताना बनवून घेतलेला.
कापडाने पुसत त्याने त्यावरची माती साफ केली.
अनिताकडे बघून तो म्हणाला, "आपली फुलबाग वाचली."
- शब्दभ्रमर 🍁🍁