प्रकरण ५
एका दिवशी सकाळी वज्र उठला आणि आपलं आवरल्यावर रेस्टॉरंट मधे गेला.चहा, नाश्ता ची काय सोय होतं आहे हे पाहण्यासाठी. सांझी तिथे किचन ओटा साफ करत होती.
“ गुड मॉर्निंग ” वज्र म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि पुन्हा आपल्या कामाला लागली.
“ मी मदत करू का तुम्हाला?” त्याने पुन्हा विचारलं.
“ मला लागलं तसं काही तर सांगेन मी.” तुटकपणे ती म्हणाली.
“ मला चहा हवा होता.” वज्र म्हणाला.
“ बाहेर बस.” पुन्हा ती फटकन पणे बोलली.
ती खरंच सुंदर होती. अत्ता काम करतांना तर जास्तच छान दिसत होती.वज्र तिच्याकडे बघतच राहिला.
“ काय बघतो आहेस माझ्याकडे टक लावून ?”
“ नाही... काही नाही.. म्हणजे..” गोंधळून तो म्हणाला.तिने हाताने खूण करून त्याला बाहेर हाकललं.
तो बाहेर टेबल खुर्च्या ठेवलंल्या हॉल मधे आला तेव्हा घोष पलाश आधीच येऊन बसला होता.हातात नोटांची मोठी थप्पी होती आणि कागदावर आकडेमोड चालली होती.वज्र येताच त्याने त्याच्यासाठी खुर्ची बाहेर ओढली.
“ बस बेटा.” तो म्हणाला. त्यांच्या टेबलवर चहा आणि कॉफीचे दोन थर्मास भरून ठेवलंले होतं. “ काय घेतोयस? चहा की कॉफी?” त्यानं विचारलं.
“ चहाच. सकाळी तरी चहाच हवा.” वज्र म्हणाला आणि त्याने एका कपात थर्मास मधला चहा ओतून घेतला.
“ तू एक जबरदस्त सेल्समन आहेस.काल तुझ्यामुळे पंधरा डिश ची ऑर्डर मिळाली.केवढा गल्ला साठलाय बघ.” हातातली थप्पी वज्र ला दाखवत तो म्हणाला. “ माझ्या डोक्यात आलंय, तुला मी इथून पुढे रेस्टॉरंट च्या एकूण गल्ल्याच्या पाच टक्के रक्कम कमिशन म्हणून द्यावी. कसं वाटतंय तुला.”
वज्र काय बोलू शकत होता.आधीच त्याला इथे लपायला आसरा मिळाला होता, खाण्या पिण्याची, राहण्याची सोय झाली होती, आणि आता हे वरचं उत्पन्न. काही न बोलता वज्रने हात जोडून नमस्कार केला.
“ मी आणि सांझी एक दोन दिवसासाठी एखाद्या ट्रिपला जाणार आहोत. तुला कपडे किंवा इतर काही गोष्टी हव्या असतील तर माझी गाडी घेऊन बाजूच्या गावात जा आणि हवं ते घेऊन ये.थांब, तुला पैसे देतो खर्चासाठी ” बोलता बोलता त्याने हातातल्या थप्पीतून काही नोटा काढून वज्रच्या हातात दिल्या. “हे तुझ्या कमिशन पोटी अॅडव्हान्स म्हणून घे.” तो म्हणाला.
“ ठीक आहे साहेब.” वज्र म्हणाला.
“तासाभरात आम्ही बाहेर जायला निघू.दुपारी थोडं उशिराने परत येऊ.तुला हाताळायला जमेल ना तो पर्यंत इथलं सर्व?”
“ मला नाही वाटत काही अडचण येईल.दोन तीन दिवसात बऱ्यापैकी शिकवलंय तुम्ही मला. ”
“ त्या भंगाराच्या सामानात जमीन भुसभुशीत करायचं एक जुनं यंत्र आहे.तुला ते चालू करता आलं तर पहा.” पलाश म्हणाला.
वरने त्याला बघतो म्हणून सांगितलं आणि तो पंपाच्या परिसराची झाडलोट करायला बाहेर गेला.एक ट्रक डीझेल भरायला आला.त्याने ते टाकून दिलं, त्याला नाष्ट्यासाठी सुचवलं पण तो घाईत असल्याचं सांगून न थांबता गेला. पलाश बंगल्यातून बाहेर आला.
“ आम्ही निघतोय आता. करशील ना नीट सगळं?” त्याने वज्रला विचारलं. वज्र चं लक्ष बाहेर पडणाऱ्या सांझी कडे गेलं. तो तिच्याच कडे बघत बसला. ही बाई नेपाळी वाटतच नाही.राहते किती मॉडर्न ! बॉलीवूड मधली एखादी नटी वाटेल.हिरोईन नाही पण एक्स्ट्रा तर नक्कीच. पलाश ने आपल्या कोपराने त्याच्या बरगडीत ढोसलं तेव्हा वज्र तंद्रीतून बाहेर आला.
“ तिच्या कडे काय बघत बसला आहेस? मी काय विचारलं तुला?” त्याने विचारलं.
“ हो.हो.जा तुम्ही बिनधास्त.” वज्र पटकन म्हणाला.
दोघं गेल्यावर वज्रने भंगाराच्या ढिगातून जमीन भुसभुशीत करायचं एक जुनं यंत्र शोधून काढलं आणि ते चालू करायला काय करावं लागेल याचा विचार करत बसला.त्यावरचा गंज आधी काढायला हवा होता. गॅरेज मधे कानास होतीच ती घेऊन घासायला सुरुवात केली.थोड्या वेळातच एक गाडी आली.त्यातून उंच,शिडशिडीत असा चाळीशीतील माणूस उतरला.अंगात एक अगदी फेंट असा खाकी रंगाचा शर्ट आणि पंढरी पँट असा पेहेराव होता.त्याच्या मागोमाग एक कुत्रा उडी मारून खाली उतरला.उतरल्यावर त्याने उर्मटपणे लाथ मारून आपल्या गाडीचं दार बंद केलं. वज्र बसला होता त्या दिशेने आला.त्याचे बारीक डोळे आपल्या काळजाचा ठाव घेताहेत असा भास वज्रला झाला.तो उठून उभा राहिला.हा पोलीस असावा असं त्याला उगाचच वाटत राहीलं.
“ बोला, काय हवंय?”वज्रने विचारलं.
“तूच मला बरंच काही सांगू शकशील. उदा.तू कोण आहेस, तू इथे काय करतोयस, घोष कुठाय, तू मला असंही विचारू शकतोस की हे सर्व विचारणारा तू कोण?” तो माणूस म्हणाला.
त्या माणसाच्या अशा प्रकारच्या बोलण्याचा वज्रला राग आला आणि त्याहूनही आश्चर्य वाटलं पण संयम राखून तो म्हणाला,
“ मी शीर्ष सहानी. घोष, साहेबांकडे नव्यानेच लागलोय कामाला. साहेब आणि त्यांची बायको दोघंही बाहेर गेलेत फिरायला.”
“ खरंच की काय ! म्हणजे एक तर तो बाहेर गेलाय फिरायला हे न पटणारं आहे आणि दुसरं ,त्यानं एखादा नोकर हाताशी ठेवणं हे त्याहून न पटणारं आहे. म्हणजे त्याच्या बायकोचा विरोध पत्करून तो कामाला माणूस ठेवेल याचं आश्चर्यच वाटलं.” तो माणूस म्हणाला.वज्रला त्याने शेकहँड केला आणि म्हणाला, “उदित उपाधी, नाव लक्षात राहील? उदित उपाधी. त्याचा मेव्हणा आहे मी.”
हा सांझीचा भाऊ नसावा.कारण तिला कोणी नव्हतं असं तिनं पलाशला सांगितलं होतं.याचा अर्थ तो पलाशच्या आधीच्या म्हणजे गेलेल्या बायकोचा भाऊ असावा. ठीक आहे म्हणजे आपल्याला वाटत होतं तसा हा पोलीस नाही. वज्रने या विचाराने सुस्कारा टाकला.याला गाडित पेट्रोल भरायचं नाहीये किंवा इतर कामंकरून घ्यायची नाहीयेत हे लक्षात आल्यावर वज्र त्या मशीन वरचा गंज काढायचं काम पुन्हा करायला लागला. तो हळूहळू वज्रच्या जवळ यायला लागला.वज्र काय करतोय ते बघायला लागला. त्या मशीन कडे निरखून बघत तो म्हणाला,
“ कोणीतरी पलाशला हे फुकटात दिलेलं दिसतंय.कदाचित घेऊन जाण्या बद्दल पलाशला पैसे दिले असतील.” स्वत:च्या विनोदावर एकटाच मोठ्याने हसला.वज्रला तो आता डोक्यात जायला लागला होता.
“ देणाऱ्याने मशीन गंजलंय म्हणून काढून टाकलं असेल पण पलाश त्या गांजाच्या आत दडलेले पैसे दिसत असतील. हे मशीन चालू करून घेऊन पलाश ते चांगल्या किंमतीला विकतो की नाही बघ तू.” उदित म्हणाला.
वज्र काही बोलला नाही.फक्त हसल्या सारखं केलं आणि शांत बसला.
“ मेटल मधलं फार समजतं त्याला,पण माणसं ओळखण्यात बुद्दू आहे.”
वज्रने आता वरचा गंज काढून आतला एक भाग आटे फिरवून बाहेर काढून पेट्रोलच्या टबात बुडवला.
“ त्याच्या बायको बद्दल तुझं काय म्हणणं आहे?”
इतका वेळ त्याची नजर टाळत कामात गढलेल्या वज्रने हा प्रश्न विचारला जाताच चमकून वर पाहिलं.
“ ठीक आहे ती.” तो म्हणाला.
“ ठीक? एवढ्याच भावना आहेत तुझ्या तिच्या बद्दल? मी पैजेवर सांगतो, तू तिला इथे नको असणार.तूच काय कोणीच तिला इथे यायला नको असतं. मी सुद्धा. तिच्या नवऱ्याचा मेव्हणा असून सुद्धा.तिच्या सारख्या भटक भवानीशी पलाशने लग्न कसं केलं देव जाणे.एखाद्या शून्यातून यावी तशी ती इथे आली, राहिली, आणि अशीच केव्हातरी अज्ञातात निघून जाईल तिचा ठाव ठिकाण मागे न ठेवता, त्याला बरबाद करून.या आमच्या मेव्हाण्यावर आपल्या मादक शरीराच्या जोरावर तिनं मोहिनी घातल्ये.ती अजून त्याच्या मनावरून उतरली नाहीये. तू नीट बघ तिला, तुझ्या हे लक्षात आलं नसेल असं मला वाटत नाही.तुलाही तिचा मोह होत असणार. तू असं समजू नकोस की तू इथे टिकून राहशील, रोज तिला तिच्या नकळत बघत बसू शकशील.ती तुला इथून हाकलवून देण्यासाठी पलाश कडे तगादा लावेल.तिने सुरूच केलं असेल.”
त्याच्या कुठल्याच बोलण्यावर काही प्रतिक्रिया देणं वज्रला योग्य वाटलं नाही.आपला चेहेरा निर्विकार ठेवत तो म्हणाला,
“ तुम्ही काय बोलताय आणि का हे सर्व मला सांगताय मला कळत नाहीये. मी इथे दोन तीन दिवसापूर्वीच आलोय पलाश साहेबाना मदत व्हावी म्हणून मला त्यांनी ठेऊन घेतलंय.”
वज्रने त्याच्याशी बोलताना आपले काम चालू ठेवलं होतं.तो उदित उपाधीच्या बोलण्याकडे हळूहळू दुर्लक्ष करत होता.
“ तू या भागातला दिसत नाहीस. नोकरी बघायला इथे आला होतास? आणि पलाश कुठे भेटला तुला? ”
“ खरगपूर.” वज्र म्हणाला.
“ ठीक आहे तू कामात दिसतो आहेस.मी इथे आलो होतो एका कामासाठी, मला इथली काही हत्यारं घेऊन जायची आहेत.” उपाधी म्हणाला.
“ सॉरी, पण मला नाही देता येणार तुम्हाला.” वज्र म्हणाला.
“ काय म्हणालास मित्रा?” वज्रच्या खांद्यावर हात थोपटत उपाधीने विचारलं. त्यात एक कुत्सितपणा होता.
“ पलाश साहेब येई पर्यंत माझी जबाबदारी आहे इथलं सगळं नीट ठेवायची. ते येई पर्यंत थांबलात तर बरं होईल.”
“ अरे राजा, मी तुझी परवानगी विचारत नाहीये हत्यारं न्यायला, मी सांगतोय तुला की मी घेऊन चाललोय.” असं म्हणत उपाधी गॅरेज च्या दिशेने जायला लागला.
“ सॉरी, मला थांबवावं लागेल तुम्हाला. वज्र म्हणाला.”
“ मी मेव्हणा आहे त्याचा.इतर कुणाला अडवलं असतंस तर ठीक होतं.मला नाही अडवू शकत तू.मी पलाश ला सांगितलं तर नोकरी जाईल तुझी. ”
“ काय सांगायचं असेल तर सांगा.” वज्र म्हणाला. “ पलाश येई पर्यंत ती हत्यारं इथेच राहतील.”
“ अच्छा, म्हणजे आता माझ्या लक्षात आलं, पलाश च्या संपत्तीवर फक्त त्याच्या बायकोचाच डोळा नाही तर तुझाही आहे तर.तुम्ही दोघांनी मिळूनच कदाचित त्याला लुटायचं ठरवलं नसेल कशावरून?”
एक तिडीक वज्रच्या मस्तकातून गेली.त्याने त्याच सणकेत उपाधीची गचांडी धरली, त्याला गदागदा हलवलं आणि गाडीच्या दिशेने लांब ढकलून दिलं.
“ गेट आउट ” वज्र ओरडला.
त्याचं कुत्र घाबरून आधीच टुणकन उडी मारून गाडीत बसलं.दार उघडून उदित उपाधी आत बसला.
“ तुला या सगळ्याचा पश्चात्ताप होईल अशी मी व्यवस्था करणार आहे.”
तो गेल्यावर वज्रला थोडं टेन्शन आलं.पलाश आल्यावर त्याला त्याने झालंलं सगळं स्पष्ट सांगितलं. पलाश काय म्हणेल ते म्हणेल, आपल्याला फार तर हाकलून देईल याची मानसिक तयारी वज्रने ठेवली पण झालं भलतंच.तो खुषच झाला.
“ त्याला हाकलून दिलंस ते बरं च केलंस.तो माझी आधीची पत्नी असताना यायचा आणि दर वेळी तिच्याकडून पैसे न्यायाचा माझी हत्यारे न्यायचा.सांझी आल्यावर मात्र तिने त्याला थारा दिला नाही.त्याच येणं कमी झालं. ” पलाश म्हणाला.
वज्रला आता तिथे येऊन तीन महिने झालं होतं.तो चांगलंच स्थिरावला होता. आपल्याला आता पोलीस पुन्हा गाठू शकत नाहीत याचा अंदाज त्याला आला होता.सुरुवातीला पेट्रोल भरायला आलेली प्रत्येक गाडी हो पोलिसांचीच आहे असा भास त्याला व्हायचा. तो हळूहळू कमी होवून तो निर्धास्त झाला होता.मध्यंतरीच्या काळात पलाश आणि सांझी अधून मधून वज्रवर धाब्याची जबाबदारी टाकून अनेक वेळा फिरायला गेले होते.हा धाबा आपला आहे.अशी भावना वज्रमधे निर्माण झाली. आणि त्याच भावनेतून तो पलाश नसताना धाबा सांभाळत असे. पलाश आणि त्याच्यात एक मित्रत्वाचं किंवा मोठ्या भावासारखं नात निर्माण झालं होतं.सांझी मात्र त्याच्याशी पूर्वीप्रमाणेच फटकून वागत असे.
एका रात्री पलाश ने गप्पा मारताना त्याला सांगितलं की त्याच्या डोक्यात एक असा प्लान आहे की आणखी काही काळ हा धाबा चालवायचा नंतर तो विकून टाकायचा आलेल्या पैशातून एक मोठी प्रदेश वारी करून यायची, झाडून सगळे देश बघायचे.बोट, विमान ट्रेन ने प्रवास करायचा. महागड्या हॉटेलात राहायचं. आणि आल्यावर इथे सुखाने राहायचं.
“ धाबा विकून एवढी रक्कम येईल की जग प्रवास करून आल्यावर सुद्धा काही न करता तुम्ही अत्ता सारखंच जीवन जगू शकाल?” वज्रने विचारलं.
“ सहज शक्य आहे हे. तुला एक सिक्रेट सांगतो.मी हे जे भंगार आणतो ना, त्यातून अनेक चांगली यंत्र मी दुरुस्त करून विकतो, तुला आठवत का तुझ्याच कडून माती भुसभुशीत करायचं यंत्र मी नीट करून घेतलं होतं? ते केवढ्याला विकल असेल मी?पाच हजार रुपये. रोख. या धंद्यात असा रोख नफा फार असतो.फक्त पुरेसा पेशन्स आणि दुरुस्त करायची कला असावी लागते.” मूड मधे येऊन पलाश सांगत होता.
“ सांझी मॅडम ना तुमच्या डोक्यातला हा प्लान माहिती आहे?”-वज्र
“ तिला हा सुखद धक्का देणारे मी.”
आज रात्रपाळी करायची जबाबदारी सांझीची होती.ती एखाद्या पुरुषाप्रमाणे रात्री येणाऱ्या ट्रक मधे डीझेल भरायचे काम करत असे. वज्र आल्यावर तिने रात्रपाळी करू नये असं पलाश तिला म्हणाला होता पण ती तयार झाली नाही. तिला ते काम आवडत असे.ती रात्री हे काम करताना वज्र आपल्या बेडरूम मधून तिच्याकडे बघत बसे.
संध्याकाळी एक टेम्पो त्यांच्या धाब्यावर किरण मालाचं सामान घेऊन आला ड्रायव्हर आणि त्याच्या मदतनिसाने ते भराभर उतरवलं आणि रेस्टॉरंटच्या भटारखान्यात सराईतपणे नेऊन ठेवलं. ड्रायव्हर पलाश समोर जाऊन उभा राहिला.पलाश हातातले पैसे मोजत होता.त्याने त्यातले पैसे ड्रायव्हर ला दिले आणि बाकीचे पैसे नीट लावून ठेवत होता. तेवढ्यात वज्र तिथे आला. आपल्या हातातल्या नोटांची थप्पी सांभाळता सांभाळता त्यातल्या काही नोटा वज्रच्या हातात भरून पलाश म्हणाला,
“ तुझ्या मुळे वाढलेल्या रेस्टॉरंट च्या धंद्यातला आणि भंगारातल्या मशीन चालू करायला तू करत असलेल्या मदतीचे हे कमिशन.”
“अहो मी वेगळं असं काय केलंय? माझ्या कामाचाच हा भाग होता ना?”
“ नाही.” एवढंच पलाश म्हणाला.
“ ठीक आहे पण एवढे पैसे ठेवायचे तर मला एखाद्या बँकेत खातं उघडून द्या.” वज्र म्हणाला.
“ बँक! आयुष्यात मी कधी कुठल्या बँकेत खातं उघडलं नाही. मी फक्त रोखीतच खेळतो आणि रोकडीलाच मानतो. माझ्या घरी तिजोरी आहे, या देशातील सर्वोत्तम भक्कम तिजोरी. अभेद्य सेफ कॉर्पोरेशन ची तिजोरी. त्यातच सगळी रक्कम ठेवतो.तुला मी देत असलेली रक्कम कुठे ठेवायची हा प्रश्न असेल तर माझ्याच तिजोरीत तुझी रक्कम वेगळ्या कप्प्यात ठेवतो किंवा सगळी रक्कम एकत्रच ठेवतो एक चिट्ठी त्यात टाकीन आणि तुझ्या नावाने किती आहेत ते लिहून ठेवीन.”
“ अभेद्य ची तिजोरी आहे!” वज्र उद्गारला.
“ हो.बँकेपेक्षा माझा जास्त विश्वास या तिजोरीवर आहे.पाच वर्षांपूर्वी एक सेल्समन इथे आला होता.त्याचं बोलणं ऐकल्यावर मी लगेच ऑर्डर दिली त्याला.तू तर कुलूप किल्ल्या च्या पिढीजात व्यवसायात आहेस.तुझं काय मत आहे अभेद्य बद्दल? ”
मनातल्या मनात वज्र हसला. जी तिजोरी मी तीन मिनिटात उघडू शकलो कपूरच्या घरी ती अभेद्य? पण वरकरणी तो म्हणाला,
“ म्हणजे काय! प्रश्नचं नाही. देशातली एक नंबर भरोशाची तिजोरी आहे ही.”
“ चल तर मी तुला दिलेले पैसे घेऊन ये तुझ्या खोलीतून, ते पण मी अभेद्य मधे ठेवतो आणि तुला पावती देतो त्याची.म्हणजे माझ्या तिजोरीत असलेल्या एकूण रकमेतले अमुक एक रुपये तुझे, ”
वज्र त्याच्या खोलीत गेला आणि आपल्या गादी खाली ठेवलंले पैसे घेऊन आला.ते त्याच्या ताब्यात दिले.
“ तुला लागतील तेव्हा आणि लागतील तेवढे मागून घे माझ्याकडून.” पलाशने बजावले. “ आणखी एक अर्ध्या तासात एक मोठी तीस सिटर बस येते आहे , म्हणजे दर महिन्यातून एकदा येतेच आजच्या तारखेला.तुला आठवत असेल, मागच्या महिन्यात पण आजच्या तारखेला आली होती.तू जरा किचन मधे जाऊन सांझीला मदत करशील का? कारण सगळे जेवायला थांबणार आहेत.मी बाहेरच बघतो सगळं ” पलाश म्हणाला.
वज्रने किचन मधे प्रवेश केला,
खर तर अडचणीत, समस्येत प्रवेश केला.
सांझी काहीतरी काम करत होती.वज्र आत येताच तिने त्याच्याकडे मान वळवून बघितलं.आणि मागील तीन महिन्यात जे घडलं नाही ते घडलं.
ती वज्रकडे बघून चक्क हसली.
“ तुम्हाला काही मदत करू का मी? बस येणार आहे.”
“ तू माझी बरीच काही मदत करू शकतोस मिस्टर शीर्ष सहानी ”
तिने वज्रच्या खोट्या नावाचा असा काही वेगळ्या टोन मधे उच्चार केला की जणू काही तिला त्याचे खरे नाव माहित होतं.
“ तू हा किराणा माल आत घेऊन जा आणि नीट लावून ठेव.” सांझी म्हणाली.
वज्र एक एक करत सामान आत नेऊन ठेवत असताना त्याला ‘ते’ दिसलं आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला.
बराचसा किराणा माल प्लास्टिक पिशव्यात होता पण काही वर्तमान पत्राच्या कागदी पिशव्यात होता.त्यातल्या एका पिशवीवर वर्तमान पत्रात छापून आलेली बातमी ठळक पणे वज्रच्या फोटोसहीत छापून आली होती. मथला असा होता:
‘नागपूरच्या कारागृहातून पळून गेलेला तिजोरी फोड्या अद्याप फरारच.’
वज्रच्या फोटोवर सांझीने पेन्सिलने मिशा रंगवल्या होत्या आणि थेट त्याला आव्हान दिलं होतं की तू कोण आहेस हे मी ओळखलं आहे.
वज्रच्या मनात विचारांचं काहूर माजलं. तिने पलाश ला सांगितलं असेल का ? तिचा फक्त एक फोन पोलिसांना जाणं पुरेसं होतं, वज्रचं थाटामाटात स्वागत करायला नागपूर कारागृह आतूर झालं असतं. आता इथून पळून जायचं म्हंटलं तरी अशक्य होतं.तिने पलाश घोषला लगेच सांगून टाकलं असतं, पुरावा दाखवला असता.या धाब्यावर डीझेल किंवा पेट्रोल भरायला येणाऱ्या वाहनात बसून जायचं तर त्या दोघांपैकी कुणीतरी बघणारच होतं.आणि हातात पैसे तरी कुठे होतं वज्रच्या? थोड्याच वेळापूर्वी त्याने तिजोरीत ठेवायला पलाशला सांगितलं होतं.त्याने ठेवलेही होते ते.आता लगेच पुन्हा मागायचे तर तो म्हणेलच की अत्ताच ठेवायला दिलेस तर परत कशाला मागतो आहेस. चांगलाच अडचणीत सापडला होता तो.
ती आत आली.वज्रच्या बरोबरीने सामान लावायला मदत करू लागली.जणू काही झालाच नाही असं दोघेही दाखवत होतं.
“ आज तुझी रात्रपाळी आहे ना? पलाश झोपला की आपण बोलायचं आहे.” अचानक तिनं जाहीर करून टाकलं.
“ तुम्ही म्हणाल तसं.” हे बोलाण्यावाचून वज्रला काय पर्याय होता? याचा अर्थ त्यातल्या त्यात एकच समाधान होतं की तिनं अजून पोलिसांना कळवलं नव्हतं.
“ आता पुन्हा पळून जायची वेळ आल्ये वज्र द्विवेदी ! ”
वज्र गप्प बसला.
“ इथून पुढे मी म्हणेन तेच होईल.” सांझीने दम भरला.
तेवढ्यात ती 30 पॅसेंजर ना घेऊन मोठी बस आली. सगळ्याच्या सगळ्या प्रवाशांना जेवायचं होतं. उतरल्या-उतरल्या ते सगळे रेस्टॉरंट मध्ये गेले. वज्र आणि पलाश जेवणाच्या हॉलमध्ये प्रवाशांची व्यवस्था करण्यात मग्न झालं आणि सांझी किचनमध्ये स्वयंपाकात गुंतली. मधूनच पेट्रोल किंवा डिझेल भरायला येणाऱ्या गाड्यांची वज्र बाहेर जाऊन व्यवस्था लावून येत होता.
महाभारतामध्ये अश्वमेध यज्ञामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना द्रौपदी ज्या सफाईने आणि वेगाने वाढत होती असा उल्लेख आहे त्याप्रमाणे सांझी बस मधून उतरलेल्या प्रवाशांची सरबराई करत होती. कुणालाही थांबावं लागत नव्हतं. प्रत्येकाला जे हवंय ते ते पदार्थ तयारच होते. थोड्या वेळाने जेवणं झाल्यावर डिझेल भरून बस निघून गेली. तिघेही दमले होतं. . पलाश च्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधानाचं हास्य होतं.
“तुझ्या मदतीशिवाय आज हे शक्य झालं नसतं मिस्टर शीर्ष सहानी!”
वज्र च्या खांद्यावर थोपटत पलाश म्हणाला.
“श्रेय द्यायचं असेल तर ते स्वयंपाक करणारीला द्या.” वज्र म्हणाला.
“खरंच काय बायको मिळाली आहे मला!” पलाश म्हणाला. वज्र हसला.
“आपण तिघेही ग्रेट आहोत. तिघांनीच हे जमवून आणलं. आता ऐक, मी आणि सांझी इथल्या रिकाम्या डिश आणि भांडी आवरण्याचं काम करतो, तू बाहेर थांबून पंपावर येणाऱ्या ग्राहकांकडे लक्ष दे. तुला आज पुन्हा रात्रपाळी करायची आहे त्यामुळे सगळीकडे आतापासून दमू नको.” पलाश म्हणाला.
अन्य परिस्थिती असती तर पलाश च्या बरोबरीने सांझीला मदत करायला वज्रला आवडलं असतं त्यानिमित्ताने त्याला तिचा सहवास मिळाला असता, पण आता वज्र वेगळा विचार करत होता. त्याच्या अंगाशी परिस्थिती आली होती. आणि त्याला जरा एकांतात विचार करायला वेळ हवा होता. पलाश आत गेल्यानंतर वज्रने बाहेर बसून एक सिगरेट शिलगावली एखाद दुसरा झुरका मारला तेव्हा त्याला आपल्याला कोणीतरी पहात असल्याची जाणीव झाली त्याने मान वळून पाहिलं तर व्हरांड्यात सांझी आली होती आणि आपल्या थंड नजरेने त्याला बघत होती. खिडकीमध्ये पलाश उभा होता त्याच्या हातात रिकाम्या डिशेस होत्या त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.
सांझी त्याच्याशी बोलत होती ते वज्रच्या कानावर पडत होतं.
“हा इथे बसून काय करतोय? बिड्या फुकत बसला आहे बाहेर. आणि तू काम करतो आहेस इथे. मालक आहेस ना तू?” सांझी पलाश च्या अंगावर खेकसत होती.
“हे बघ हनी त्याला आज रात्रपाळी आहे. मीच त्याला थोडा आराम करायला सांगितला आहे.” पलाश म्हणाला
“तू त्याला काय सांगितलं आहेस आणि काय नाही याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. तू त्याला एवढे पैसे देतोयस त्याचा मोबदला त्याच्याकडून वसूल करून घ्यायला हवास” सांझी म्हणाली. “मला इथे काहीच किंमत नाही फक्त रांधा, वाढा, उष्टी काढा आणि रात्री तुझ्याबरोबर झोपा तेवढीच माझी किंमत आहे” सांझी म्हणाली
वज्रने आपल्या हातातील सिगारेट अर्धवट टाकून दिली,पायाने चुरगाळली आणि तो आत आला.
“आज मॅडम खूप दमल्या आहेत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांना जरा विश्रांती घेऊ दे.” वज्र पलाश ला उद्देशून म्हणाला.
“अरे अशा पद्धतीने ती कधीच बोलत नाही, तू येण्यापूर्वी आम्ही दोघेच अशा पद्धतीने हा धाबा हाताळत होतो. तेव्हा तिने कधीही तक्रार केली नाही. आजच हिला काय झालं आहे कळत नाही.”
वज्रला बरोबर कळत होतं. तिला आज रात्री त्याच्याशी बोलायचं होतं. रात्री जागण्यासाठी तिला आत्ता विश्रांती हवी होती कारण आज पलाश ची दिवस पाळी असल्यामुळे तो रात्री झोपणार होता. पण वज्र हे पलाशला सांगू शकत नव्हता तो एवढेच म्हणाला ,
"आपण दोघांनीच इथल्या डिश आवरायचं काम करूया का? मॅडमना घेऊ दे विश्रांती."
“तू खरच देव माणूस आहेस शीर्ष.तुझ्या जागी दुसरा एखादा असता तर सांझी ज्या पद्धतीने तुझ्याशी वागली ते पाहून केव्हाच निघून गेला असता. तू जरी तुझी रात्रपाळी असून सुद्धा आता मला मदत करायला तयार झाला आहेस आणि तिला विश्रांती द्यायचं म्हणतो आहेस तरी सुद्धा मला हे पटलेलं नाही, मी तिला हे आज किंवा उद्या ऐकवीनच की तिचं वागणं बरोबर नाही.” पलाश म्हणाला.
त्यानंतर वज्र आणि पलाशने सर्व स्वयंपाक घर एकदम ठीक ठाक केलं.त्यात बराच वेळ गेला. अधून मधून येणाऱ्या गाड्यांमध्ये इंधन भरण्याचं काम वज्र करत होता. बराच वेळ सांझी त्याला दिसली नाही. चार नंतर केव्हातरी त्याने गाडी सुरू झाल्याचा आवाज ऐकला आपल्या खोलीच्या खिडकी बाहेरून त्याने पाहिलं तर सांझी तिच्या गाडीत बसून बाहेर जाताना दिसली. वज्रच्या मनात पाल चुकचुकली. ही पोलिसांना बोलवायला तर गेली नसेल?
त्याने पलाशला ती बाहेर गेल्याचे सांगितलं तो फक्त हसला.
"माझ्याशी भांडण होतं तेव्हा ती अशीच निघून जाते गाडी घेऊन बाहेर.. तू तिच्याकडे फार लक्ष देऊ नको. जवानी का जोश म्हणतात तशी आहे ती . माझी आधीची बायको अशी नव्हती आम्ही दोघे एकाच शाळेत होतो एकत्रच वाढलो आम्ही वयाने पण सारखे होतो. पण ही बया वेगळीच आहे ती काम करत नाही असं नाही खूप काम करते ती पण भयंकर अहंकारी आहे दुसऱ्यावर वर्चस्व ठेवायला तिला आवडतं माझी आधीची बायको असती तर ती तुझ्याशी या पद्धतीने कधीच बोलली नसती आणि भांडणं झाली तरी अशी निघूनही गेली नसती. "
पलाश आज बरच मोकळेपणाने बोलत होता. वज्र फक्त ऐकायचं काम करत होता, पलाश पुढे सांगायला लागला,
"माझं मलाच आश्चर्य वाटतं की ही मुळात आली कुठून? म्हणजे त्या दिवशी त्या बस मधून ती आली, पण कुठल्या गावाहून आली तिचा आगापिछा काय हे मला कधीच कळलं नाही आणि तिनेही मला सांगितलं नाही. तू आलास तेव्हा मी असा प्लॅन केला होता की तुझ्यावर इथला कारभार सोपवून आम्ही दोघे थोडे मोकळे होऊ एखाद्या सिनेमाला जाऊ, बाहेर फिरायला जाऊ ट्रीपला जाऊ पण तिने यातलं काहीच करू दिलं नाही मला. मी जेव्हा तिला हे सुचवायचो तेव्हा ती डोकं दुखत असल्याचं किंवा बरं नाहीसं सांगून टाळत आली. कधी कधी मला आश्चर्य....."
पलाश ने आपल वाक्य अर्धवट सोडलं.
कदाचित पलाशला असा संशय असावा की तिचा कोणीतरी मित्र किंवा यार असावा आणि त्याला ती अचानक भेटायला जात असावी असा विचार वज्रच्या मनात आला . ती वेळेवर येणार नाही हे गृहीत धरून वज्र आणि पलाशने दुसऱ्या दिवसासाठी जेवणा खाण्यासाठी लागणारी तयारी करून ठेवली होती.
दिवसभरात केव्हातरी सांझी गाडी घेऊन आली आणि आपल्या बेडरूम मध्ये जाऊन खोलीचं दार धाडकन लावून घेतलं.
“मी आत्ताच्या आत्ता जाऊन तिच्याशी बोलतो.” पलाश म्हणाला.
“घाई करू नका थोडा कालावधी जाऊ दे. ती ठीक होईल.” वज्र म्हणाला.
“ठीक आहे. तू म्हणतोस तर तसं करून बघतो.” पलाश म्हणाला आणि झोपायला गेला.
वज्र बाहेर आला आणि रेस्टॉरंटच्या व्हरांड्यातील एका खुर्चीत बसला त्याला शारीरिक आणि मानसिक थकवा आला होता त्याने एक सिगरेट शिलगावली. त्याला माहिती होतं की ती लगेच आता बाहेर येणार नाही पलाश झोपेपर्यंत ती वाट पाहील आणि मगच येईल. ती आता नेमका काय विचार करत असेल याचा विचार वज्र करत राहिला. त्याच्या हातात पैसे
असते तर आता त्याला इथून निघून जायची छान संधी होती. डिझेल भरायला अधून मधून येणाऱ्या एखाद्या ट्रक वाल्याला पैसे देऊन तो दूरवर निघून गेला असता पण आता ते शक्य नव्हतं. त्याला मिळालेली सगळी रोख रक्कम त्याने पलाश कडे ठेवायला दिली होती. ती यायला जेवढा उशीर करत होती तेवढा वज्रच्या मनावरचा दबाव वाढत होता.......
(प्रकरण पाच समाप्त)