प्रकरण ८
ड्रायव्हरने शिट्टी का मारली म्हणून वज्रने तिच्याकडे पाहिलं.तिने एक टंच दिसेल असा टी शर्ट आणि हाफ पँट घातली होती.
“ काय चाललंय हे?” वज्रने तिला विचारलं.
“ तू नोकर आहेस इथे.तू कोण मला विचारणार?” सांझी म्हणाली.
“ आता आपल्या दोघांत काय नातं आहे हे महत्वाचं नाही.आपण दोघेही एकाच संकटात सापडलोय.तुझ्याकडे बघून त्याने शिट्टी वाजवली तू ऐकलीस ना? पुढची व्यवस्था लागे पर्यंत आपण दोघंच इथे राहणार आहोत.आपल्या संबंधाबद्दल कोणीही शंका घेणे किंवा वावड्या उठवणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं.” वज्र म्हणाला.
“ किती दिवस?”-सांझी.
“ मला अत्ताच सांगता येणार नाही. मला लपण्यासाठी मी जागा शोधतोय. ती मिळाली की मी निघून जाईन आणि तुला तिजोरीतले सर्व पैसे मिळतील हे मी पाहीन.” वज्र म्हणाला.
“ पलाशचा मित्र परिवार मोठा आहे. ते विचारतील तो कुठे आहे म्हणून.” तिने विचारलं.
“ आपण काय सांगायचं ते मी ठरवून ठेवलंय. आत्ताच्या या ड्रायव्हरला मी जे सांगितलं तेच आपण सर्वाना सांगायचं आणि त्यात आपलं एकमत असलं पाहिजे. ”
“ काय?”
“त्याला आणखी एक पेट्रोल पंप उघडायची संधी मिळते आहे.एकदोन महिन्यासाठी तो बाहेरगावी गेलाय त्यासाठी. मोठे डील आहे, सध्या बंद असलेला पंप चालू करायचा आहे त्यामुळे नीट अभ्यास करायला लागणार आहे.”
“ पण तो पर्यंत तुला लपायला जागा मिळाली नाही तर?” --सांझी.
“ शक्यतो मी मिळवीनच ” –वज्र
“ पण नंतर काय? म्हणजे तू गेलास आणि मला पैसे मिळाले तरी त्या नंतर त्याची चौकशी कुणी केली तर काय करायचं?”—सांझी.
“ दोन महिन्यांनी पलाश कडून तुला पत्र येईल की त्याच्या आयुष्यात एक स्त्री आली आहे आणि त्याने तिच्याशी लग्न केलंय.तुझ्यात त्याला रस राहिला नाही.हा पंप त्याने तुला दिलाय. वज्रला मदतीला ठेऊन तू तो चालव.”—वज्र म्हणाला.
“ माझ्याकडे यापेक्षा चांगला पर्याय आहे; अत्ताच तिजोरी उघड त्यातले एक लाख रुपये तू घेऊन निघून जा, पलाश तुला तेवढे देणारच होता.बाकीचे मी घेईन.”—सांझी.
“ मला सुरक्षित अशी जागा सापडे पर्यंत मी जाणार नाही आणि मला त्यातला एक रुपया सुद्धा नकोय.”
ती काहीतरी उत्तरं देणार होती परंतु तेवढ्यात एक गाडी आली आणि त्यातून एक दणकट आणि उर्मट माणूस उतरला.
“ कुठाय पलाश?” त्याला वज्र ने यापूर्वी पाहिलं नव्हतं पण त्याच्या बोलण्यावरून त्याने अंदाज केला तो प्रज्वल लहिरी च असावा.
“ साहेब बाहेर गेलेत. काय हवं होतं आपल्याला? मला सांगा.” वज्र म्हणाला.
“ बाहेर? या वेळेला? आणि कुठे गेलाय?” त्याने विचारलं. त्याच उर्मट आवाजात.
तेवढ्यात सांझी पुढे आली.
“ नमस्ते. काय म्हणताय? कसे आहात? ” तिने प्रज्वल लहिरी ला विचारलं. तिला बघितल्यावर त्याचा स्वर जरा नरमला.
“ तुला पलाशने सांगितलं असंल की आमच्या युनियनचे अध्यक्ष वारले अचानक.त्यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला पलाशला भाषण करायला मी सांगणार होतो. ”
वज्रने सांझीकडे पाहिलं.ती एकदम शांत होती.एखाद्या पोचलेल्या अभिनेत्रीप्रमाणे तिने उत्तरं दिलं,
“ तुमची थोडक्यात चुकामुक झाली.अत्ताच तो बाहेर पडला.”
“बाहेर पडला? पण त्याची गाडी तर बाहेर दिसली मला.” लहिरी म्हणाला.वज्रच्या छातीत धडधडायला लागलं. पण खरं म्हणजे त्याला काळजी करायचं कारण नव्हतं कारण सांझी अस्खलितपणे खोटं बोलत होती आणि उत्तम अभिनय करत होती अशा पद्धतीची परिस्थिती हाताळण्याची तिची कला खरंच लाजवाब होती.
“पलाश ने त्याची गाडी नेली नाहीये. तो साधारण दीड दोन महिने बाहेर असणार आहे, त्यामुळे तो बसनेच गेला आहे. अध्यक्षांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला त्याला येता येणार नाही याचं त्याला नक्कीच वाईट वाटेल.” सांझी म्हणाली.
तिच्या या सगळ्या उत्तरामुळे लहिरी चांगलाच चक्राहून गेला होता.
“ठीक आहे ”तो म्हणाला. “याचा अर्थ तो अध्यक्षांच्या अंत्यविधीला येऊ शकणार नाही हे नक्की.” लहिरी म्हणाला
“नाही ना. मला ही वाईट वाटतंय पण त्याला अचानक आणखीन एक पेट्रोल पंप खरेदी करायची संधी चालून आली. कालच अचानक ही सगळी गडबड झाली.आणि त्याला आज जायलाच लागलं. नाहीतर ही संधी त्याने गमावली असती ”. सांझी म्हणाली.
“पण नक्की गेलाय कुठे तो?”लहिरी म्हणाला.
“मला नक्की माहित नाही पण वर्धमान शहराजवळ ते आहे”
“अरे बापरे म्हणजे इथून सहा-सात तासाचं अंतर आहे साधारण. लहिरी म्हणाला. ते डील झाल्यावर तो इथून तिकडेच शिफ्ट होणार आहे का कायमचा?” त्यानं पुढे विचारलं.
“खरं सांगायचं तर अजून त्या विषयावर आमचं काही बोलणं झालं नाही. सांझी म्हणाली
“ठीक आहे, हा कोण आहे पंछी तुझ्याबरोबर?” लहिरीने विचारलं.
“शीर्ष सहानी. पलाशचा असिस्टंट आहे तो.” सांझिनं उत्तर दिलं.
त्यानं तिरसटलेल्या नजरेने वज्र कडे पाहिलं “काल रात्री फोनवर मला आगाऊ उत्तर देणारा तूच आहेस तर!” तो म्हणाला
“फारसं तातडीचं काम नसताना रात्री चार वाजता फोन करणाऱ्याला मी असंच उत्तर देतो.” त्याच्या नजरेला नजर मिळवत वज्र म्हणाला.
वातावरण चिघळणार असं दिसताच सांझी ने पटकन त्याला विचारलं.
“नाश्ता करणार का? तयारच आहे ”
“नाही आता वेळ नाही मला.निघावं लागेल पलाश येईल तेव्हा मला फोन करायला सांगा”
दोघांकडेही न पाहता लहिरी निघून गेला.
आपण रचलेली कथा लहिरी ला किमान पटली तरी. वज्रच्या मनात आलं. याला पटली याचा अर्थ ती इतरांनाही पटेल. सांझीलाही लक्षात आलं असेल आता की नेमकं काय सांगायचं.
पलाश येईपर्यंत वज्र आणि सांझी दोघेच या युनिटवर राहणार ही बाब मात्र समाजात पसरेल. वज्रला पलाश घोष ने सांझी इकडे राहिला आली त्यावेळेचा सांगितलेला किस्सा आठवला तेव्हाही समाजामध्ये ते दोघे एकत्र राहतात अशी बातमी पसरली होती आणि शेवटी त्याला तिच्याशी लग्न करूनच तो विषय संपवावा लागला होता.
त्या दिवशी रविवार होता.पेट्रोल पंपावर आणि रेस्टॉरंट मध्ये खूप गाड्या आल्या दोघांनाही खूप काम पडलं एकमेकांशी बोलायला वेळही झाला नाही. सर्व आवरे पर्यंत रात्र झाली होती.. रात्री उशिरा दोघेही आपापल्या रूममध्ये जाऊन झोपले.
***
पुढचे चार दिवस सुद्धा आधीच्याच सारखे सर्वसाधारणपणे गेले सांझी आणि वज्र त्या विषयावर एकमेकांशी बोलले नाहीत जणू काही वज्र तिथे नव्हताच अशा पद्धतीने सांझी वावरत होती संपूर्ण वेळ ती किचनमध्येच ऑर्डर प्रमाणे पदार्थ पूर्ण करण्यात गुंतली होती वज्र पंपावर येणाऱ्या गाड्यांमध्ये डिझेल किंवा पेट्रोल भरणं थोडीफार दुरुस्ती करणे ही काम करणं आणि रेस्टॉरंट मध्ये येणाऱ्या पाहुण्यांना सांझीने केलंले पदार्थ वाढणे यात गुंतला होता.
पलाश गेल्यापासून तिने रात्रपाळी चे काम केलंले नव्हतं ते ती संपूर्णपणे वज्रवरच सोडत होती.
रात्री आपल्या खोलीत गेल्यावर मात्र ती जाणून बुजून खिडकीचे पडदे उघडे ठेवून आणि लाईट न मालवता आपले कपडे बदलत असे. वज्रला मुद्दाम उत्तेजित करण्याचा हा प्रयत्न असे. वज्रच्या ते लक्षात येत होतं परंतु जाणीवपूर्वक त्याने स्वतःवर ताबा ठेवला होता.”
पलाश च्या मृत्यूनंतर तब्बल आठ दिवसांनी सांझी रेस्टॉरंट साठी लागणारे सामान, किराणा माल वगैरे खरेदीसाठी पलाश ची कार घेऊन बाहेर पडली जाताना तिने वज्रला कुठे जाते आहे कधी येणार याबाबत काहीच सांगितलं नाही. अर्थात ते चुकीचं नव्हतं तिच्या दृष्टीने वज्र हा त्यांचा नोकर होता. ती गेल्यानंतर साधारण साडेअकरा च्या सुमारास एक गाडी पेट्रोल पंपावर आली वज्रने रेस्टॉरंट मधून ती गाडी पाहिली पेट्रोल भरायला आलेली कोणीतरी असेल अशा विचाराने तो सावकाश पंपाच्या दिशेने जायला लागला त्या गाडीतून एक कुत्रं उडी मारून उतरलं आणि त्याच्या मागोमाग एक माणूस.
उदित उपाधी! वज्र त्याला पूर्णपणे विसरून गेला होता आता खरा धोका होता.
"कुठे आहे पलाश?" गाडीतून उतरता उतरता त्याने चढ्या आवाजात विचारलं.
"पलाश साहेब बाहेर गेले आहेत काय हवंय आपल्याला?"
"बाहेर?"अविश्वासाच्य स्वरात उदित उपाधीने विचारलं. आणि तो भंगाराच्या शेडच्या दिशेने जायला लागला त्याच्याबरोबर त्याचं कुत्र हुंगत हुंगत कशाचा तरी माग काढल्यासारखं शेडमध्ये शिरलं.
"बाहेर गेला याचा अर्थ काय?"उदित उपाधी नं विचारलं
"तुम्हाला काही हवं आहे का?"वज्र ने पुन्हा विचारलं
"हे बघ माणसा, तुझं नाव काय आहे मी विसरलो. पण जे काही नाव असेल ते, नीट ऐक माझं पलाश कडे काय काम आहे हे मी तुला सांगायची गरज नाही तू त्याचा नोकर आहेस. की अचानक तू मालक वगैरे झाला आहेस इथला?"उपाधी खवचट पणे म्हणाला.
"मी मालक वगैरे झालेलो नाही. पलाश साहेब कामासाठी बाहेर गेले आहेत" वज्र म्हणाला
"कसलं काम आहे एवढ? आणि कुठे गेलाय तो?"
"ते तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं होईल"
"कधी परत येणार आहे तो?"
"नक्की माहित नाही कदाचित एक दोन महिन्यांनी."वज्र ने उत्तर दिल
"एक दोन महिन्यांनी? काय नक्की काय कामाला गेलाय तो आणि जाताना आपल्या बायकोला घेऊन नाही गेला तो?"
"हे बघा साहेब मी आत्ता थोडा बिझी आहे. पलाश साहेब एक दोन महिन्यांनी येणार आहेत त्यांची बायको पण आता इथे नाहीये तुम्हाला काय हवंय?"
"मला भेटायचं आहे त्याला. खूप महत्त्वाच काम आहे. कुठे आहे तो?"
"त्याला एक नवीन पेट्रोल पंप खरेदी करायचा आहे म्हणून ते वर्धमान शहरात गेले आहेत. इथून पाच-सहा तासाच्या अंतरावर आहे ते"
"नवीन पेट्रोल पंप ! एकंदरीत तुझा मालक इथे बराच पैसा मिळवतो आहे असं दिसतं. त्याच्या बायकोलाही तो घेऊन गेलाय की ती इथेच आहे?"
"साहेब एकटेच गेले आहेत"
"अरे वा ! म्हणजे त्याच्या सुंदर बायकोला तो तुझ्याजवळ ठेवून गेलाय? दोन महिन्यासाठी?"उपाधी आंबट शौकीनासारखा चेहरा करून म्हणाला.
"हे पहा तुमचं विशेष काही काम असेल तर मला सांगा अन्यथा मला वेळ नाही मला साहेबांनी तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्ही काहीही बोलू नका. साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं आहे की ते नसताना जर तुम्ही इथे आलात आणि इथून काही घेण्याचा प्रयत्न केलात तर मी तुम्हाला उचलून बाहेर फेकलं तरी त्यांची काही हरकत नसेल."वज्र फटकळ पणे म्हणाला.
"माझा मेव्हणा माझ्याबद्दल असं म्हणाला तुला? ठीक आहे. मी तुम्हा दोघांनाही बघून घेईल मला इथून काही वस्तू न्यायची नाहीये. माझ्या पेन्शनच्या कामासाठी काही कागदपत्रावर मला त्याच्या सह्या हव्या होत्या म्हणून मी आलो होतो. तो कुठे आहे मला समजलंच पाहिजे" उपाधी म्हणाला.
"वर्धमान या शहरात गेले आहेत म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे पण त्यांचा नेमका पत्ता मला माहित नाही. मलाही नाही आणि त्यांच्या बायकोलाही नाही."
"मग मला माझ्या पेन्शन पेपरवर सह्या कोण देणार?"
"तो तुमचा प्रश्न आहे दुसऱ्या कोणाच्या तरी घ्या."
"मला त्याच्याच हव्यात"
"मग दोन महिने वाट बघा"
"या दोन महिन्यात मला पेन्शन मिळालं नाही तर कोण जबाबदार ? तू? आणि पलाश कुठे आहे हे त्याच्या बायकोलाही माहित नाही असं तू म्हणतोस हे मला पटत नाही समजा काही इमर्जन्सी आली इथे, आग लागली किंवा तिला बरं वाटत नाहीस झालं आणि पलाश ला संपर्क करायची वेळ आली तर तुम्ही लोक कुठे संपर्क करणार?"उपाधी चिडून म्हणाला.
"ती आणि मी दोघेही आजारी पडणार नाही आणि ह्या जागेला कोणी आगही लावणार नाही. आग लागली तर ती तुम्हीच लावाल आणि तसं झालं तर तुमचं काय करायचं ते मला माहित आहे."वज्र म्हणाला.
"माझ्या डोक्यात एक कल्पना आहे, वर्धमान शहरातल्या पोलिसांना मी एक पत्र लिहितो, त्यांना पलाश घोष च वर्णन कळवतो आणि हा माणूस दिसला तर मला कळवा असं त्यांना सांगतो."उपाधी म्हणाला आणि जायला निघाला. “ तुझ्या मालकिणीला सांग मी उद्या जेवायच्या वेळेला पुन्हा येणार आहे.तो पर्यंत पलाश चा पत्ता आणि फोन शोधून ठेवा.”
आता मात्र वज्र काळजीत पडला. त्यानं खरंच तसं पत्र लिहिलं असतं तर कदाचित..... कदाचित एखादा हवालदार खरंच पलाश घोषची चौकशी करत करत इथे येऊन पोहोचला असता. अधिक खोलवर चौकशी केली गेली असती तर तो कदाचित प्रज्वल लहरीपर्यंत सुद्धा पोहोचला असता त्यातून वज्रची चौकशी केली गेली असती तर मूळ ओळख पटवणं पोलिसांना अवघड नव्हतं. याला पर्याय म्हणजे त्याचं तोंड पैसे देऊन गप्प करणं,पण तसं केलं असतं तर त्याला आणखीनच संशय आला असता.पलाश घोष कडून पत्र येईल अशी व्यवस्था वज्र करणार होता पण उदित उपाधी जर पलाशचं अक्षर ओळखत असेल तर ही युक्ती अंगाशी आली असती.पलाश जर त्याला नेहमी पेन्शनच्या कागदावर सही देत असेल तर नक्कीच त्याला पलाशच्या अक्षराची ओळख असणार. विचार करूनही उदित उपाधीला कसं हाताळायचं हे त्याला सुचेना.उद्या तो पुन्हा उद्या सांझीला भेटायला येईल त्यापूर्वीच काहीतरी उपाय शोधायला हवा होता. सांझी अजून आली नव्हती, तिच्याशी बोलून नंतर ठरवू असा विचार करून शेवटी वज्र शांत झाला.उदित उपाधी दोघानाही त्रासदायक ठरणार होता.त्यामुळे निर्णय घेण्यासाठी सांझी आपल्याला मदत करेल असा वज्रचा अंदाज होता. ती आल्यावर वज्रने उदित बरोबर झालंलं सगळ बोलणं सांगितलं.उद्या तो आल्यावर काय करायचं ते एकत्र बसून ठरवावं लागेल म्हणून सांगितलं.
“ अगदी सोप्प आहे.तिजोरी उघड, तुझे एक लाख घे, निघून जा, मी बाकीचे पैसे घेऊन निघून जाते, एकमेकांना विसरून जाऊ.” ती अलिप्तपणे म्हणाली.
“ही जागा अशीच सोडून जायची वाऱ्यावर? तुझा तो उदित, प्रज्वल कोणीही इथे येऊ शकतो, पोलिसांना सांगू शकतो की इथे राहणारे दोघे पळून गेलेत.या सर्व घटनेची चौकशी होईल.आपल्याला अटक होईल.”
“ आपण विकून टाकू जागा.” सांझी म्हणाली.
“ एका दिवसात? कोण घेणार? आणि तू मालक आहेस? कोणत्या अधिकारात विकणार तू?” वज्रने विचारलं.
तिने क्षणभर विचार केला.
“ मी माझा वाटा घेऊन एकटीच निघून जाते. तू एकटाच ही जागा सांभाळ.”
“ याचा अर्थ असा काढला जाईल की मी तुम्हा दोघानाही मारलं आहे. मला वाचवण्यासाठी मी त्यांना सांगून टाकीन की तूच पलाशला मारलं आहेस आणि पैसे घेऊन पळून गेली आहेस. ”
“तुला असं सुचवायचंय का ,की आपल्याला इथेच कायमचं राहायला लागेल म्हणून?”सांझीने विचारलं
“ कायमचं नाही पण इथल्या नातलग आणि मित्र परिवारात जो पर्यंत ही बातमी पसरत नाही आणि पचत नाही की तो आपल्याला सोडून कायमचा निघून गेला आहे आणि दुसऱ्या बाई बरोबर त्याने सूत जुळवलं आहे, तो पर्यंत आपल्याला इथे राहावं लागेलच. ” वज्र म्हणाला.
“ मी नाही राहणार.”
नाईलाज झाल्याप्रमाणे वज्र ने आपले खांदे उडवले हाताने तिजोरी कडे बोट दाखवून तो सांझी ला म्हणाला,
“तुला पैसे हवं असतील तर तुझी तूच तिजोरी उघड,पैसे काढ आणि जे काय करायचं आहे ते कर.”
यावर तिने फारशी प्रतिक्रिया दिली नाही. वज्र तिथून उठला आणि पेट्रोल पंपा वर जाऊन बसला. मध्यरात्रीपर्यंत त्याने तिथेच वेळ घालवला. पुढे नेमकं काय करायचं याचा विचार करून डोकं सुन्न झालं परंतु त्याला त्याचं उत्तर मात्र मिळाले नाही. त्याने बंगल्याकडे पाहिलं. बंगल्यातला लाईट अजून लागलेला होता. याचा अर्थ सांझी सुद्धा काहीतरी विचार करत जागी राहिली होती.
मध्यरात्रीनंतर पंपावर येणाऱ्या गाड्या बंद झाल्या तेव्हा वज्र तिथून उठला आणि आपल्या खोलीत येऊन आडवा झाला. तिच्याही खोलीतला लाईट आता बंद झाला होता. थोडा वेळ वज्र तसाच पडून राहिला.झोप यायला लागली तेव्हा किती वाजले ते बघायला त्याने घड्याळाकडे नजर टाकली रात्रीचे तीन वाजले होतं.आपल्या उजव्या हाताचे मनगट कपाळावर ठेऊन वज्र डोळे मिटून पडून राहिला आणि त्याच वेळी बेडरूमचे दार उघडले आणि सांझी आत आली.त्याच्या बेडवर बसली, आणि त्याच्या कानात कुजबुजत म्हणाली,
“ जर आपल्याला इथेच राहावं लागणार असेल तर शत्रू म्हणून कशाला राहायचं? ”
( प्रकरण ८ समाप्त.)
वाचक हो माझी कथा आपणास आवडत असेल तर कॉमेंट्स करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना सुद्धा वाचायला सुचवा