Tijori - 7 in Marathi Crime Stories by Abhay Bapat books and stories PDF | तिजोरी - प्रकरण 7

Featured Books
Categories
Share

तिजोरी - प्रकरण 7




प्रकरण ७

पलाश घोषने सुद्धा तिच्याकडे चमकून पाहिलं.त्याचा विश्वासच बसला नाही.

“ याला एक छदाम सुद्धा घेऊन देणार नाही.सगळी रक्कम माझी आहे ही.तू मला थांबवू शकशील असं मनातही आणू नको.”

“ मूर्ख बये, आपल्या दोघांसाठी हे पैसे मी साठवले आहेत.सगळ्या जगाची सफर तुला घडवायची असं माझ्या मनात होतं. ते रिव्हॉल्व्हर भरलेलं आहे.खाली टाक ते आणि विचार कर शांतपणाने.” –पलाश

“ खाली टाकण्यासाठी मी ते हातात घेतलेलं नाहीये. मी पोलिसांना सांगते की एका दरोडेखोराला तू आश्रय दिला आहेस आणि तिजोरीतलेते पैसे दोन नंबरचे आहेत. त्या पैशावर तू टॅक्स  भरलेला नाहीस. गुमान माझ्या मार्गातून दूर हो नाहीतर गोळी घालीन मी तुला.” सांझीने दम भरला.

वज्र अजूनही तिजोरीच्या उघडलेल्या दाराजवळ उभा होता. ज्या प्रकारे सांझी त्या दोघांना बंदुकीच्या इशाऱ्यावर नाचवत होती, त्याने त्याच्या मस्तकाची शीर तडकली.त्याने तिजोरीच्या उघडलेल्या दाराला लाथ मारली.दार बंद झालं सांझीची नजर क्षण भरासाठी तिजोरीकडे वळली तिच्या लक्षात आलं  की तिजोरी पुन्हा लॉक झाली. तेवढ्यात संधी साधून पलाश तिच्या दिशेने झेपावला, या गडबडीत तिच्या हातातल्या बंदुकीचा ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सणसणत पलाशच्या छातीत घुसली. हे सगळ इतक्या पटकन घडलं की कुणालाच काय झालं ते समजलं नाही. पलाशचा अजस्र देह खाली कोसळला,भीतीने सांझीने आपला चेहेरा झाकून घेतला आणि ती मोठ्याने किंचाळली.

“ तू मारलंस त्याला.” वज्रच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. ती क्षणात पळत गेली आणि आपल्या बेडरूमचं दार तिने लावून घेतलं.वज्रला काय करावं ते सुचत नव्हतं.

पोलिसाना बोलवण्याजोगी स्थिती नव्हती. समजा तिने पोलिसांना सांगितलं असतं की पलाशला वज्रनेच मारलं तर? वज्र हा पळून आलेला कैदी आहे हे पोलिसांना कळलं असतं तर साहजिकच त्यांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला असता की वज्रनेच पलाशला मारलं असावं. त्यांच्यासाठी वेगळ्या काही पुराव्याची गरज नव्हती. 

सुन्न मनाने वज्र तिथेच बसून राहिला तेवढ्यात बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. वज्रला बाहेर जावंच लागलं.

एक आलिशान कार पेट्रोल भरण्यासाठी बाहेर आली होती. ड्रायव्हिंग सीटवर एक जाडजूड मध्यमवयीन माणूस होता. त्याच्या शेजारी एक सुंदर तरुणी होती. 

“फुल कर” तो म्हणाला. “आणि काहीतरी खायला ही हवं आहे आम्हाला.” तो जाडगेला माणूस म्हणाला.

वज्रने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता गाडीत पेट्रोल भरलं. 

“तू ऐकलं नाहीस का मी काय म्हणालो ते? आमची खायची सोय कर.” 

“रेस्टॉरंट बंद झालंय साहेब.” वज्र म्हणाला ही पीडा लवकरात लवकर इथून जायला हवी, त्याने मनात विचार केला पण तो जाड्या माणूस हट्टालाच पेटला होता. 

“बंद झालं असेल रेस्टॉरंट तर उघड. आम्हाला खायला घालणं तुझं कर्तव्य आहे.” 

“माफ करा साहेब सर्व अन्न संपलं आहे आणि रेस्टॉरंट बंद झालंय.” 

“तू मालक आहेस का इथला?” 

“नाही मालक झोपलेत. मी इथे नोकरीला आहे.” वज्र म्हणाला. 

“मला मालकाशीच बोललं पाहिजे. उठव त्यांना. आम्हाला भूक लागल्ये. लवकर बनवून दे काहीतरी. तू उठवतोस की मी आत जाऊन बोलू मालकाशी? मीच बोलतो कारण नोकरांशी बोलण्याची मला सवय नाही.” 

“थांबा साहेब, मी बघतो काही आहे का.” वज्र पटकन म्हणाला. त्या जाड्या माणसाच्या शेजारी बसलेली तरुणी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती आपण दुसरीकडे जाऊन खाऊ असं काहीतरी म्हणत होती पण आता त्याचा अहंकार दुखावला होता त्याने तिला गप्प केलं. 

“काय खायला घालू शकतोस तू आम्हाला?? 

“सँडविच देऊ शकतो.” वज्र म्हणाला.

“ठीक आहे. कर पटकन. आणि कॉफी पण बनव.” 

वज्र ने पटकन किचनमध्ये जाऊन दोन मोठे सँडविच आणि कॉफी बनवून त्याला दिली चांगलाच अडकला होता तो. 

त्याच्या बरोबरीने सांझी सुद्धा त्यात अडकली होती ती पोलिसांना हे सांगू शकत नव्हती की तिच्या हातून चुकून गोळी उडाली. कारण पोलिसांनी लगेच विचारलं असतं की हातात रिव्हॉल्व्हर घेऊन ती काय करत होती. याचा खुलासा पोलिसाला देणं सोपं नव्हतं. तिला हे सांगावं लागलंच असतं की पिस्तुलीचा धाक दाखवून ती तिजोरीतले नवऱ्याचे पैसे पळवणार होती. तसं झालं असतं की पोलिसांनी तिला अटक केली असती. याच्यापेक्षा त्याच्या खुनाचा आरोप वज्रवर टाकणं तिला जास्त सोपं होतं. ती पोलिसांना सांगू शकली असती की मी किचन मध्ये काम करत असताना या माणसाने म्हणजे वज्रने तिजोरी उघडली तेवढ्यात पलाश अचानक आला आणि वज्र तिजोरी उघडत असलेला त्याला दिसला त्यामुळे पलाशला मारण्या वाचून वज्रपुढे पर्याय नव्हता. 

त्याच क्षणी वज्र च्या डोक्यात विचार आला की तातडीने पलाशची गाडी घेऊन तिथून पळ काढावा पण तिने पोलिसांना फोन करून लगेच त्याच्या मागावर माणसे सोडली असती आणि त्याला पकडायची व्यवस्था केली असती. 

थोडक्यात ती वज्रला जेवढे अडकवू शकत होती तेवढेच वज्र सुद्धा तिला अडकवू शकत होता. हा विचार त्याच्या मनात आला. तिने वज्रला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर वज्र पोलिसांना सांगणार होता की तिजोरीतले सगळे पैसे हे काळा पैसा होते म्हणजे त्यावर टॅक्स भरलेला नव्हता त्यामुळे पोलिसांनी ते सगळे पैसे ताब्यात घेतले असते आणि तिला काहीच मिळाले नसतं. एक वेळेस ती पोलिसांना सांगून वज्रला पुन्हा अटक करू शकत होती पण ते केलं असतं तर वज्र तिला ते पैसे मिळवून देणार नव्हता त्यामुळे तिला सुद्धा विचार करायला लागणार होता ही वज्रला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की नाही. 

एकंदरीत दोघांनाही एकमेकांना अडकवण्यासाठी पन्नास-पन्नास टक्के संधी होती. 

सर्वात आधी पलाश च्या प्रेता चं काय करायचं याचा विचार करायचा वज्रने ठरवलं. तो त्याची बॉडी पुरून ठेवू शकत होता पण त्यासाठी त्याला पलाश कुठे गेला आहे याची काहीतरी गोष्ट रचून सांगावी लागणार होती.

एव्हाना आपलं खाणं आणि कॉफी संपवून ते जोडपं रेस्टॉरंट मधून उठून आपल्या गाडीकडे निघालं होत. पैसे घेण्यासाठी वज्र त्यांच्या दिशेने गेला. जेवढं बिल झालं होतं बरोबर तेवढीच रक्कम त्या माणसाने वज्रला दिली.एक रुपयाही जास्त नाही. पैसे घेऊन वज्र पुन्हा बंगल्याच्या दिशेने निघाला त्याच वेळेला त्याला समोर ‘ते’ दृश्य दिसलं.

सांझीने फोन उचलला होता.

*******

वज्र आणि सांझी दोघांची नजरा नजर झाली. तिचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता. डोळे निस्तेज झालं होतं. तिच्या हातात फोन होता आणि वज्र च्या हातात रिव्हॉल्व्हर. 

“फोन खाली ठेव.” रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वज्रने आज्ञा केली.

तिने घाबरून फोन खाली ठेवला. 

“तुझ्या बेडरूम मध्ये चल आपल्याला बोलून ठरवावे लागेल.” वज्र म्हणाला. ती बेडरूम कडे जायला निघाली वज्र तिच्या मागोमाग गेला 

“तू पोलिसांना बोलवणार होतीस?” वज्रनं विचारलं पण तिने काही उत्तर दिलं नाही ती बेडवर सुन्नपणे बसून होती. 

“या खुनाचा आरोप माझ्यावर आणायचा विचार तुझ्या मनात आलाय?” वज्रनं विचारलं. 

ती काही बोलली नाही तेव्हा वज्रपुढे बोलू लागला,

“तुझ्या मनात तशी कल्पना आली असेल तर ते चूक आहे तुला तिजोरीतले पैसे हवं असतील तर तू माझ्यावर तो आरोप न आणलेलाच बरा. जर का पोलिसांनी मला पकडलं तर मी त्यांना सांगेन की तिजोरीतले पैसे हे बे हिशोबी पैसे होतं म्हणजे त्यावर टॅक्स भरला नव्हता. ही बातमी पोलिसाला खूपच आवडेल ते सगळे पैसे ताब्यात घेतील. तुला त्यातला एक छदाम सुद्धा मिळणार नाही. मला अटक केल्याचं समाधान तुला मिळेल पण मला असं वाटतं माझ्या अटकेपक्षा तुझं पैशावर प्रेम आहे याचा विचार कर. आणि त्यातून तुला फोन करायचा असंल तर फोन कर.” फोन कडे बोट दाखवत वज्र म्हणाला. तिने काहीच हालचाल केली नाही. 

“यापेक्षा दुसरा पर्याय म्हणजे आपण त्याला इथे कुठेतरी पुरु आणि दुसऱ्यांना सांगण्यासाठी तो कुठेतरी बाहेर गेलाय अशी कथा रचू. काही काळ तसाच जाऊ दे जेव्हा सगळं व्यवस्थित आहे असं वाटेल त्या वेळेला तिजोरीतले सगळे पैसे तू घे आणि मी कुठेतरी निघून जाईन.” वज्रने तिला पर्याय सुचवला. 

“मी मारलंलं नाही. अपघाताने गोळी उडाली.” ती अस्फुट आवाजात म्हणाली जर का आपण त्याला पुरलं आणि नंतर त्यांना ते प्रेत सापडलं तर समजतील की हा खून आहे. सांझी म्हणाली. 

वज्रच्या मनात आलं ही गोष्ट चांगली झाली.ती आता किमान चर्चा करण्याच्या अवस्थेत तरी आली आहे.

“पण अपघाताने गोळी उडाली हे तू सिद्ध कसं करणार?” वज्रने तिला विचारलं; “तुझ्या हातात पिस्तूल का होती याचे उत्तर तू काय देणार पोलिसाना?” तिच्याकडे याचे उत्तर नव्हतं. 

“तू ठरव सांझी, तुला काय हवंय? मला अटक केल्याचा समाधान की तिजोरीतला पैसा?” वज्रने पुन्हा विचारलं. आता त्याला खात्री पटत चालली होती की ती पोलिसांना फोन करणार नाही. तरीसुद्धा तिने फोन करायचा प्रयत्न केला तर तिला थांबवणं पण आवश्यक होतं 

शेवटी मनाचा निश्चय केल्यासारखं ती वज्रला म्हणाली, 

“मला पैसा हवाय. मी इथेच राहीन. तुला वचन देते की मी कोणालाही तुझ्याबद्दल सांगणार नाही.” 

“जेव्हा सगळं काही सुरळीत आहे असं मला खात्रीलायक वाटेल त्याच वेळेला मी तुला ते पैसे घेऊ देईन, त्यापूर्वी नाही. तोपर्यंत तुझी थांबायची तयारी नसेल तर आत्ताच पोलिसांना फोन करून टाक” वज्रने निर्वाणीचे सांगितले.

एकंदरीत आपण वज्रच्या सापळ्यात अडकलो आहे हे तिला कळून चुकलं. एक नैराश्य आणि चीड याची संमिश्र भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. 

“चालता हो इथून. नीघ.” ती किंचाळत म्हणाली. 

आपला चेहरा तिने अंथरुणात लपवला आणि हुंदके द्यायला लागली 

वज्रच्या लक्षात आलं की आपण जिंकलो आहोत. तो खोलीच्या बाहेर गेला. दरवाजा लावून घेतला. तिला शांत होण्यासाठी थोडा वेळ द्यायचा असं त्याने ठरवलं. प्रेत पुरण्यासाठी नंतर तीच त्याला मदत करेल असा त्याचा अंदाज होता. त्याने घड्याळात पाहिलं. साडेअकरा वाजले होतं. अजून सुरुवात करायला अवधी होता. एकदा खड्डा खणायला आणि त्याला पुरायला सुरुवात केली की कुठलाही व्यत्यय येणार नाही अशीच वेळ निवडायला हवी होती. काहीतरी करायचं म्हणून वज्र जेवणाच्या हॉलमध्ये गेला. आणि तिथली आवराआवरी करायला लागला. जे काही घडलं त्याचा विचारच करायचा नाही असं त्याने ठरवलं होतं. तरीसुद्धा पलाश चा अजस्त्र देह खाली कोसळत असतानाचे दृश्य त्याच्या मनातून पुसले जात नव्हतं. रात्री साडेअकरा ते एक वाजेपर्यंत चार-पाच ट्रक डिझेल भरण्यासाठी पंपावर आले पण एक नंतर पंपावर येणारे ग्राहक बंद झालं आता सुरुवात करायला हवी होती . सांझी कशी आहे हे बघण्यासाठी वज्र आत गेला. बेडरूम चा लाईट चालू होता.

“मी आलोय.” वज्र बाहेरून आवाज देत म्हणाला. 

“निघून जा इथून. मी तुला मदत वगैरे काहीही करणार नाहीये.” ती आतून ओरडली. आता तिच्या मदतीची अपेक्षा करणे म्हणजे वेळ व्यर्थ घालवणं ठरलं असतं. वेळेत काम उरकायला हवं तर आपल्याला एकट्यानेच करायला लागणार हे वज्र ने मनातून जाणलं. नेमका कुठे खड्डा खणायचा याचा विचार वज्रच्या मनात यायला लागला. बऱ्याच शक्यतांचा विचार केल्यानंतर शेवटी त्याने असं ठरवलं की ज्या ठिकाणी भंगाराची शेड आहे त्या शेडमध्येच त्याला पुरायचे. सुदैवाने त्या शेडमध्ये खालच्या बाजूला फरशी किंवा सिमेंट घातलेलं नव्हतं जमीनच होती. कुदळ आणि फावडं घेऊन तो शेडमध्ये गेला. ज्या कोपऱ्यात भंगार माल पडला होता त्या ठिकाणी त्याने खणायला सुरुवात केली. जवळजवळ चार फूट खोल खड्डा त्याने खणला. तोपर्यंत रात्रीचे तीन वाजले होतं. बाहेर थंड हवा होती पण काम केल्यामुळे तो घामाघूम झाला होता. खड्ड्यातून तो बाहेर आला. प्रथम त्याने अंघोळ केली. कपडे बदलले आणि बंगल्याकडे निघाला. सांझीच्या बेडरूम मध्ये अजूनही लाईट होता. हॉलमधील लाईट त्याने लावला पलाश घोषचा अजस्त्र देह अजूनही तिथेच होता. फारसं रक्त आलं नव्हतं. अगदी थोडसं रक्त कारपेटला लागलं होतं. वज्रने पलाश च्या शरीराला स्पर्श करून पाहिलं. प्रेत आता ताठ व्हायला लागलं होतं आपण याला एकट्याला उचलून किंवा ओढून खड्ड्यापर्यंत नेऊ शकू का? असा विचार त्याच्या मनात आला ज्या माणसावर आपण मनापासून प्रेम केलं आणि ज्या माणसाने आपल्यावर मनापासून प्रेम केलं, आपल्याला नोकरी दिली, लपण्यासाठी आश्चर्य दिला तो अशा अवस्थेत पडल्याचे पाहून त्याला अत्यंत वाईट वाटलं, पण काही झालं तरी पुढच्या क्रिया कराव्याच लागणार होत्या वज्र मागील बाजूला भंगाराच्या शेड कडे गेला भंगार उचलण्यासाठी एक हातगाडी ठेवलंली होती ती त्याने बंगल्यापर्यंत आणली ती आणताना त्याचा बराच आवाज झाला पण सांझी तो आवाज ऐकून सुद्धा काय चालू आहे ते बघायला बाहेर आली नाही. एकंदरीत वज्रला मदत करायची नाही असंच तिने ठरवलेलं दिसत होतं. वज्रने  एकदा रस्त्यावर दूरवर नजर टाकून कुठलंही वाहन पेट्रोल भरायला येत नाही ना याची खात्री केली. ती खात्री झाल्यावर त्याने हळूहळू ती हातगाडी ज्या ठिकाणी प्रेत पडलं होतं त्याच्या जवळ  न्यायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला हॉलमधील  फोनची बेल वाजली. अरे बापरे आत्ता रात्री तीन वाजता कोणाचा फोन आणि आपण या कामात गुंतलेले असताना? वज्रच्या मनात विचार आला. एकदा फोन घेऊ नये असंही त्याला वाटलं. पण विचारांती त्याने तो घेतला. पलीकडचा आवाज थोडासा आक्रमक भाषेत विचारत होता,

“कोण? पलाश घोषच बोलतो आहे ना?” 

“नाही. कोण बोलताय आपण ? “ वज्रने विचारलं 

“मला पलाश हवाय. त्याला सांगा प्रज्वल लहिरी चा फोन आहे.” 

“साहेब झोपलेत. ” वज्र म्हणाला 

“माझं नाव सांग त्याला, उठेल तो. त्याला म्हणावं आमच्या ट्रेड  युनियनच्या अध्यक्षांच्या अंतीम संस्काराबद्दल मला बोलायचं आहे. तो तिथे  श्रद्धांजली वाहण्यासाठी भाषण करेल का अध्यक्षांच्या बद्दल हे मला जाणून घ्यायचय. तू त्याला माझं नाव सांग म्हणजे तो तुला काही बोलणार नाही.” 

“मी साहेबांना उद्या विचारीन. जे विचारायचं आहे  ते फार तातडीचं आहे असं मला वाटत नाही.” वज्र म्हणाला

“अरे !! कोण आहेस तू? समजतोस काय स्वतःला? तुला मी जे सांगितलंय तेवढं निमूटपणे कर. मला  त्याचा स्वभाव माहिती आहे. कामाचे स्वरूप सांगितल्यावर तो नक्कीच माझ्याशी बोलायला तयार होईल.”

आता वज्रच्या डोक्यात सणक गेली. त्याच वेळेला भीतीने त्याच्या मानेवरून दोन घामाचे थेंब खाली ओघळले.

“मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही.” तो फोनवर पलीकडच्या माणसाला म्हणाला,

“या वेळेला पलाश सरांना कोणत्याही परिस्थितीत मी उठवणार नाही. तुम्हीच काय अगदी पंतप्रधानांचा फोन आला तरी मी उठवणार नाही. आत्ता ते त्यांच्या पत्नी बरोबर त्यांच्या बेडरूम मध्ये झोपले आहेत. उद्या फोन करा.” वज्र म्हणाला आणि फोन ठेवून दिला. 

त्या माणसाचा पुन्हा फोन येईल असा वज्रचा अंदाज होता म्हणून तो फोन जवळच दोन-तीन मिनिटे उभा राहिला परंतु फोन आला नाही. पण ही दोन-तीन मिनिटे म्हणजे दोन तासासारखी भासली त्याला. आता वेळ घालवण्यात अर्थ नव्हता त्याने पटकन ते प्रेत हातगाडीत टाकले आणि आपण खणलेल्या खड्ड्यात ते व्यवस्थित ठेवून वरून माती घालून ते बंद केलं. हे सर्व करताना त्याला अत्यंतिक मानसिक वेदना होत होत्या, पण फाशीच्या तक्तावर जाण्यापासून स्वतःला वाचवायचे झालं तर नाईलाजाने त्याला हे करावेच लागणार होतं त्यामुळेच त्याने ते केलं होतं. त्याला पुरल्यानंतर काही प्रार्थना म्हणावी अशी त्याला इच्छा झाली पण त्या रात्री ती प्रार्थना सुद्धा त्याला आठवेना. त्याने त्या शेडमध्ये दिवे बंद केलं आणि आपल्या खोलीत जाऊन पुन्हा एकदा आंघोळ केली आणि नंतर निवांत आपल्या अंथरुणात जाऊन पडला. 

पहाटे त्याला केव्हातरी झोप लागली. पलाश कुठे गेला याची काहीतरी भाकड कथा तयार करावी लागणार होती. सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम त्याच्या डोक्यात तोच विचार आला. 

प्रज्वल लहिरी नावाचा आगाऊ माणूस सकाळी पुन्हा नक्कीच फोन करेल त्याला काय उत्तर द्यायचं हा मोठा प्रश्न होता. आणि त्यालाच नाही इतर दुसऱ्या कोणीही फोन केला तरी काय उत्तर द्यायचं हे ठामपणे आणि नि:संधिग्धपणे विचार करून ठरवावे लागणार होतं. सकाळी साडेसहाला एक ट्रक डिझेल साठी थांबला तोपर्यंत त्याने एक कथा मनाशी रचून ठेवली होती ती शंभर टक्के फुल प्रूफ होतीच असं नाही पण ती विश्वासार्ह वाटेल अशी होती. 

ट्रक वाल्याने सांगितलं की त्याने रात्रभर प्रवास केला होता आणि चहा किंवा कॉफी मिळू शकेल का याची चौकशी केली. 

“हो नक्कीच करतो मी.” वज्र त्याला  म्हणाला.त्याने प्रथम ट्रकमध्ये डिझेल भरलं नंतर किचनमध्ये येऊन कॉफी करायला घेतली कॉफी घेऊन तो बाहेर आला आणि ट्रक ड्रायव्हरच्या कपात त्याने कॉफी ओतली. 

“खायला पण आहे का काही? आमलेट वगैरे?” ट्रक ड्रायव्हरने विचारलं.

वज्र आमलेट तयार करायला किचनमध्ये गेला तेव्हा ट्रक ड्रायव्हर तिथल्या एका टेबलवर बसला. 

“मोटू कुठे दिसत नाही? झोपलाय की काय?” त्यानं विचारलं. वज्रला आठवलं, अगडबंब देहाच्या पलाशला नेहमी येणारे ट्रक ड्रायव्हर मोटू म्हणत असत.

“त्याला आणखी एक पेट्रोल पंप उघडायची संधी मिळते आहे.एकदोन महिन्यासाठी  तो बाहेरगावी गेलाय त्यासाठी. मोठे डील आहे, सध्या बंद असलेला पंप चालू करायचा आहे त्यामुळे नीट अभ्यास करायला लागणार आहे.” वज्रने मनाशी ठरवलेलं सांगितलं. 

“ कुठे आहे हे नवीन युनिट?” ड्रायव्हर ने विचारलं.

“ मला ते सांगितलं नाही साहेबांनी. पण लांब आहे इथून ते आणि तयार आहे युनिट.म्हणजे साहेबांनी ते फक्त खरेदी करायचं बाकी आहे.” वज्र म्हणाला.

“ मोटू तिकडे नवीन युनिट ला गेला तर इथलं कोण बघणार? तूच?”

“ हो.बहुतेक ” वज्र म्हणाला, “ ...आणि मिसेस पलाश घोष असतीलच इथे, मालकीण म्हणून.”

त्या दोघांचं बोलणं चालू असताना त्याचं खाणं संपलं होतं.तोवर सांझी खाली उतरून आली होती.  वज्रचं लक्ष नव्हतं पण तिच्या कडे बघून ट्रक ड्रायव्हरने शिट्टी मारली आणि आपल्या ड्रायव्हिंग सीटवर बसला. 

( प्रकरण ७ समाप्त.)


वाचक हो माझी कथा आपणास आवडत असेल तर कॉमेंट्स करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना सुद्धा वाचायला सुचवा