Dombivali Fast Code 60 - 4 in Marathi Thriller by Siddhesh Chaudhari books and stories PDF | डोंबिवली फास्ट: कोड ६० - 4

Featured Books
Categories
Share

डोंबिवली फास्ट: कोड ६० - 4

फास्ट लोकल भायखळा ओलांडून पुढे सरकत होती, पण अभिमन्यूच्या मनाचा वेग त्या ट्रेनपेक्षाही जास्त होता. लोकलच्या खिडकीबाहेर पाहताना त्याला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटत होत्या. डॅशबोर्डवरचे ते डिजिटल घड्याळ कारमध्येच सुटले होते, पण त्याच्या हातातील मनगटी घड्याळाचे काटे मात्र वेगाने पुढे सरकत होते— ११:१२.

मास्टरमाईंडने दिलेल्या वेळेनुसार, ११:३४ वाजता त्याच्या फोनमधील सर्व पुरावे स्वतःहून नष्ट होणार होते. आता त्याच्याकडे केवळ २२ मिनिटे शिल्लक होती.

ट्रेन अखेर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) प्लॅटफॉर्म नंबर ६ वर येऊन थांबली. नेहमीप्रमाणे प्रवाशांची झुंबड गेटच्या दिशेने धावू लागली. अभिमन्यूने डोक्यावरची टोपी अजून थोडी खाली ओढली. स्टेशनवर नेहमीपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त होता. सायबर सेलने नक्कीच सीएसएमटीच्या रेल्वे पोलिसांना (GRP) त्याचा फोटो आणि हुशार गुन्हेगाराची माहिती वायरलेसवर पाठवली असणार, याची त्याला जाणीव होती.

मुख्य एक्झिटकडे जाण्याऐवजी अभिमन्यूने विरुद्ध दिशेला, म्हणजेच ट्रेनच्या इंजिनच्या बाजूने रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत पाऊल ठेवले. तिथे प्रवाशांना जाण्यास बंदी असते, पण 'कोड ६०' च्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी त्याला नियम तोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

"ज्या ट्रेनमधून प्रवास सुरू झाला, तिचा मार्ग जिथे संपतो, तिथून अवघ्या ६० सेकंदांच्या अंतरावर एक जुना रेल्वे यार्ड आहे..." गुन्हेगाराचे ते शब्द त्याच्या कानात घुमले.

अभिमन्यूने ट्रॅकच्या बाजूने वेगाने चालायला सुरुवात केली. डाव्या बाजूला लोकल ट्रेन्स उभ्या होत्या आणि उजव्या बाजूला लांब पल्ल्याच्या गाड्यांचे रिकामे डबे उभे होते. उन्हाचा चटका वाढला होता, आणि रेल्वे रुळांमधून येणारी उष्णता त्याच्या जीवाची लाहीलाही करत होती. साधारण दोन-तीन मिनिटे चालल्यानंतर त्याला समोर रेल्वेचे जुने, निर्जन झालेले कारशेड आणि यार्ड दिसले. तिथे जुने गंजलेले डबे आणि केबल्स अस्ताव्यस्त पडल्या होत्या.

त्याने घड्याळ पाहिले— ११:२२. आता फक्त १२ मिनिटे!

"ट्रॅक नंबर ६ च्या बाजूला असलेला सिग्नलबॉक्स..." तो स्वतःशीच पुटपुटला आणि ट्रॅक्सचे नंबर्स मोजू लागला. १, २, ३, ४, ५... आणि हो, समोरच ट्रॅक नंबर ६ होता. त्या ट्रॅकच्या अगदी कडेला एक जुना, लोखंडी सिग्नलबॉक्स उभा होता, ज्यावर गंज चढला होता.

अभिमन्यू आजूबाजूला पाहत सावधगिरीने त्या सिग्नलबॉक्सपाशी पोहोचला. त्याचे हृदय ओरडून सांगत होते की हा एक सापळा असू शकतो, पण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा हाच एकमेव मार्ग होता. त्याने सिग्नलबॉक्सच्या मागच्या बाजूला हात फिरवला. तिथे कपड्याच्या एका काळ्या तुकड्यात काहीतरी गुंडाळून ठेवले होते.

त्याने तो तुकडा बाहेर काढला. ते कापड उघडताच आत त्याचा स्वतःचा 'सॅमसंग' फोन होता! फोन चालू होता आणि त्याची स्क्रीन लॉक नव्हती.

अभिमन्यूच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी आनंदाचे भाव आले. त्याने घाईघाईने फोनचे फाईल मॅनेजर आणि ईमेल चेक केले. आत खरोखरच एक 'Hidden Encrypted Folder' होते, ज्यामध्ये त्याच्या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर (MD) आणि एका सायबर हॅकरमधील व्हॉट्सॲप चॅट्स, व्हॉईस नोट्स आणि ६० कोटी रुपयांच्या ट्रान्झॅक्शनचे मूळ डिजिटल लॉग्स होते. हा फ्रॉड अभिमन्यूने नाही, तर कंपनीच्या एमडीने स्वतःचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि कंपनीला बुडवण्यासाठी केला होता!

"माझ्याकडे पुरावा आहे! आता पोलीस मला अटक करू शकत नाहीत," अभिमन्यू जोरात ओरडणार तितक्यात त्याच्या हातातील त्या जुन्या नोकिया फोनची रिंग पुन्हा वाजली. स्क्रीनवर पुन्हा तोच आकडा होता— '६०'.

अभिमन्यूने फोन उचलला, "मला पुरावा मिळालाय. तुझा गेम संपला!"

Palykadun tech thand hasu aikayla aale. "गेम अजून संपलेला नाही, अभिमन्यू. हा तर फक्त पहिला लेव्हल होता. तू पुरावा शोधलास, पण तू घड्याळ पाहायला विसरलास. आता ११:३० झाले आहेत. तुझ्याकडे त्या यार्डमधून बाहेर पडण्यासाठी फक्त ६० सेकंद आहेत."

"म्हणजे?" अभिमन्यूचा गळा सुकला.

"मी मघाशीच म्हणालो होतो, मला ६० सेकंदांचा खेळ आवडतो. सायबर सेलचे अधिकारी आणि रेल्वे पोलीस गेल्या ५ मिनिटांपासून तुझ्या फोनचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करत आहेत. मीच त्यांना तुझा आयपी ॲड्रेस दिलाय! ते यार्डच्या तिन्ही बाजूंनी आत घुसले आहेत. जर पुढच्या ६० सेकंदांत तू तिथून पळाला नाहीस, तर तुझ्या हातात पुरावा असूनही तू एन्काउंटरमध्ये मारला जाशील किंवा पोलिसांच्या गोळीचा बळी ठरशील. पळ अभिमन्यू, पळ!"

कॉल कट झाला.

अभिमन्यूने दचकून मागे पाहिले. यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारावरून आणि बाजूच्या ट्रॅक्सवरून ७-८ पोलीस अधिकारी हातात पिस्तूल घेऊन धावत त्याच दिशेने येत होते. सायबर सेलचा तो कडक मिशांचा अधिकारी सर्वात पुढे होता.

"अभिमन्यू नवले! सरेंडर कर! दोन्ही हात वर कर आणि तिथेच थांब!" पोलिसांचा आवाज यार्डमध्ये घुमला.

अभिमन्यू समोर पाहिले. समोर फक्त रेल्वेची एक जुनी, बंद पडलेली भिंत होती. मागून पोलीस येत होते, डाव्या-उजव्या बाजूनेही वेढा पडत होता. त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण ६० सेकंद सुरू झाले होते. एका हातात स्वतःचा फोन ज्यामध्ये त्याच्या सुटकेचा पुरावा होता, आणि दुसऱ्या हातात तो नोकिया फोन... अभिमन्यूने भिंतीच्या दिशेने धाव घेतली.

तो भिंतीपाशी पोहोचला, तिथे रेल्वेच्या केबल्सचे एक मोठे जाळे वर गेले होते. पोलिसांनी नेम धरला... "थांब, नाहीतर गोळी चालवावी लागेल!"

अभिमन्यूने केबल्सचा आसरा घेऊन भिंतीवर चढण्याचा प्रयत्न केला. मागे एक जोरदार आवाजासह गोळी झाडली गेली, जी सिग्नलबॉक्सला लागून ठिणग्या उडवून गेली. अभिमन्यूने जीवाची पर्वा न करता भिंतीवरून पलीकडच्या बाजूला उडी मारली!

पलीकडे काय होतं? तो पोलिसांच्या हाती लागला की मास्टरमाईंडच्या दुसऱ्या चक्रव्यूहात अडकला?