Beggar (Part 2) in Marathi Short Stories by suchitra gaikwad Sadawarte books and stories PDF | भिकारी ( भाग २ )

Featured Books
Categories
Share

भिकारी ( भाग २ )

       सुहा विचारांमध्ये गुंतून गेली असताना मागून आवाज आला .. सुहा झालं का तुझं ? चल निघायचं आहे आपल्याला! 

सुहा स्वतःशीच म्हणाली ," निघायचं आहे ... खरंच ? मला हे सगळ दिसतंय तसं स्पष्ट वाटत नाही ...आणि आता इथून मी निघून जाणे हे मला योग्य वाटत नाही ...
ती बरंच वेळ विचार करून झाल्यावर ती तिच्या मैत्रिणींना तिच्या मनातील शंका समजवून सांगण्याचा निर्णय घेते . ती सर्व मैत्रिणींना एकत्र बोलवून त्यांना ओम आणि ओम ची आई यांच्या सोबत ची पहिली आणि ही आता शेवटची भेट असा प्रवास सांगितला ...आणि म्हणाली हे सगळ व्यवस्थित समजून घ्यायचं आहे ..मला ओम ची आई कुठे आहे हे शोधायचं आहे ... मी हे असं सगळं अर्धवट सोडून नाही येऊ शकत...
    मैत्रिणीमधली एक मैत्रिणी म्हणाली... अगं पण हे कोण आहेत? तुझं काय संबंध ? आणि हे सगळ तू का करतेस? तुझ्या आईला आणि आपल्या या मॅम कस सांगणार आहेस ?
  थोडा वेळ विचार केल्यानंतर ती म्हणते की मला तुमची मदत हवी आहे.. आपल्या मॅम ला भेटून इथे काही दिवस राहण्याची विनंती करायची आहे ....
त्यांनी सगळ्यांनी हे ऐकल्यानंतर अस ठरवलं जर प्रश्न काही दिवसाचा असेल तर आपण प्रत्यक्ष दर्शनी प्रकल्प वगैरे कारण देऊन आपण इथे थांबण्यासाठी मॅडम ला तयार करू शकतो .. त्या लगेचच सगळ्याच मॅडम कडे जातात आणि त्यांच्यामधील एक जण मॅडम जवळ जाऊन म्हणाली ... मॅम इथे किती सगळ छान आहे आणि बरंच काही शिकण्यासाठी आहे. आम्हाला इथे काही दिवस आणखी राहण्याची इच्छा आहे . फायनल एक्झाम साठी जे प्रकल्प दिले आहे ते आम्ही इथेच पूर्ण करू शकतो .. आम्हाला ही योग्य जागा वाटत आहे . मॅम मात्र या गोष्टी साठी तयार नव्हत्या ...बरंच वेळ गेल्यानंतर मॅम म्हणाल्या .. ठीक आहे पण यासाठी तुम्हाला आपल्या प्रिन्सिपल मॅम ची परवानगी लागेल . आता..? त्या एकमेकींकडे बघू लागल्या ...
 त्यांच्यामध्ये एक मुलगी क्लासरूम मधील हुशार मुलगी होती आणि तिची प्रिन्सिपल मॅडम सोबत चांगली ओळख ही होती . सगळ्याजणी तिच्याकडे बघू लागल्या ....
    जुई...बघ आता तुला काहीतरी करावं लागेल ... तू काहीही बोल पण फक्त परमिशन हवी आहे ...जुई थोडा वेळ घेते ..तिला काय.. कसं बोलायचं हे कळत नसत . पण सुहाची तळमळ पाहून जुईला हे करावं लागणारच होतं!
थोड्या वेळाने तिने मॅडमला फोन केला. तिने खूप मनापासून त्यांना रिक्वेस्ट केली . काही केले तरी मॅडम तयार होत नव्हत्या , जुई खूप विनंती करत होती, मॅडम प्लीज हा प्रकल्प फक्त इथेच पूर्ण करू शकतो .फक्त एक आठवडा ? आम्ही तुम्हाला आल्यानंतर सगळ व्यवस्थित समजून सांगू पण फक्त परमिशन द्या ! बरेच प्रयत्न केल्यानंतर प्रिन्सिपल मॅम तयार झाल्या ...पण त्या म्हणाल्या ," तुमच्या सोबत जे शिक्षक आहेत त्यांना तिथे थांबवता नाही येणार ! इकडे काही महत्त्वाची कामे आहेत , त्यांना इकडे बोलवावं लागेल..."
     जुई.. मॅम थँक्यू.. ठीक आहे... आम्ही इथे व्यवस्थीत राहणार मॅम ! तिला दिलेली जबाबदारी तिने पार पाडली होती म्हणून ती खूप खुश होती. तिने लगेचच सुहाला हे सगळ सांगितलं ! ती आनंदी तर झाली पण तिला तितकंच टेन्शन ही होत ! कारण त्यांच्या सोबत असणाऱ्या मॅम तर जाणार होत्या ! या अनोळखी शहरात फक्त या चार मैत्रिणी राहणार होत्या ! खोट बोलून परमिशन तर घेतली होती ... पण हे सगळ व्यवस्थित होईल ना ? आम्ही योग्य तर करतोय ना ? असे अनेक प्रश्न तिच्या मनात सतत येत होते ....
तरीही तिने तिच्या चेहऱ्यावर एक हास्य ठेवलं होत ...कारण तिला तिच्या मैत्रिणींना निराश नव्हत करायचं ...
                सुहा आणि तिच्या मैत्रिणी त्यांच्या मॅडमला भेटण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेल्या .त्यांना प्रिन्सिपल मॅडम ने परमिशन दिली हे त्यांनी मॅडम ला सांगितले आणि अर्थातच मॅडम ला हे सगळ आधीच माहित होत. मॅडम ने त्यांना तिथल्या सोयी - सुविधा आणि काही गोष्टी व्यवस्थित सांगितल्या. काही इमर्जेन्सी असल्यास कोणाला भेटायच ... तुमच्या सोबत इथे नेहमी कोण असेल या बऱ्याच गोष्टी त्यांनी मुलींना सांगितल्या . त्या सगळ्या मुली मॅडमला ट्रेन मध्ये बसवून आपल्या रूम वर आल्या .
चौघी एका रूम मध्ये बसून आता उद्या पासून करायचं याचा प्लॅन करतात . आधी सुधाला विचारतात ...आपण सुरुवात कुठून आणि कशी करायची ? सुधा म्हणाली , हे सगळ जे मी बघितल आहे ... त्यावरून मला अस वाटतयं... आपण उद्या मंदिरामध्ये जाऊन सुरुवात करूया ! तिथे आपल्याला ओम ची मम्मी कुठे आहे हे कळेल ! जस तो म्हणाला मम्मी इथे नाही मग कुठे आहे हे त्याला पुन्हा विचारून बघूया ...हे उद्या सर्वात आधी काय करायचं हे थोडफार ठरवून त्या झोपायला गेल्या .
सुहाला झोप येत नव्हती . ती सतत विचार करत होती . तिला ओम आणि त्याच्या आई चा पहिल्या भेटीतील चेहरा काही केले नजरेसमोरून जात नव्हता . तिने बघितल होत ..त्याच्या मम्मीच्या चेहऱ्यावरील काळजी.. भीती ... आणि ओम बद्दल प्रेम..मग अचानक ती त्याला सोडून कशी गेली आणि कुठे गेली .. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर ती शोधत होती .
 दुसऱ्या दिवशी ती सकाळी लवकरच उठते आणि तिच्या मैत्रिणींना ही उठवते. ( चला... लवकर आवरा ... आपलं मिशन आज सुरु होत आहे .... ओमची मम्मी ! )
 सगळ्या पटापट उठतात आणि आवरू लागतात. आवरल्यानंतर त्या गाडी बोलावतात .त्या ज्या रूममध्ये राहत होत्या तिथे मालकाला मॅडम ने सांगून ठेवलं होत .. या मुली जिथे कुठे जातील तिथे फक्त तुमची गाडी आणि ड्रायव्हर सोबत पाठवा . त्या गाडी मंदिराकडे घेऊन जाण्यासाठी सांगतात .
        मंदिराच्या बाहेर खूप छान वातावरण होत म्हणून या चौघी आधी तिथे एका बाकावर शांत बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहत होत्या . तिथे किती शांतता होती ते पाहत होत्या .. तेथील लोकांचा साधेपणा त्यांना खूप आवडला होता. शांत गप्पा करत असताना ..अचानक जुई ची नजर एका गाडीवर गेली. लाल रंगाची कार होती .त्यामधून ओम उतरला आणि त्याच्या सोबत तो माणूस होता जो त्याला त्यादिवशी घेऊन गेला होता... ते दोघे उतरले तितक्यात जुई ने सुहाला खुणावले आणि गाडी कडे पाहायला लावले . सुहा ओम इतका सहज आणि लवकर दिसला म्हणून आनंदी झाली होती पण तितक्यात तिचा आनंदाच काळजी आणि संशय मध्ये रुपांतर झाले . तिने जे बघितलं ते तिला खूप वेगळंच वाटल ... ओम ज्या गाडी मधून उतरला त्या गाडी मधून जो माणूस उतरला तो माणूस त्याचे वडील असू शकतात हे सगळ्यांना माहीत होत. पण त्या गाडीमध्ये एक साडी वाली स्त्री होती . सुहाने खूप प्रयत्न केला तिचा चेहरा बघण्याचा पण तिला स्पष्ट काही दिसलं नाही . जो माणूस ओम सोबत होता तो त्या बाई सोबत बराच वेळ बोलत होता . ओम इकडे बघत उभा होता . त्याला तिथे उभे राहण्यात काही इंटरेस्ट नव्हत हे यांनी बघितल . त्याचं बोलण झाल्यानंतर त्याने ओमला त्या गाडीमधील स्त्रीला बाय बाय कर अस सांगितलं अस दिसत होत ..पण कदाचित ओम तयार होत नव्हता . त्या स्त्री ने गाडीमधून हात बाहेर काढला आणि ओमच्या गालाला लावला . पण ओम ने तो हात काढून टाकला आणि गाडी ही निघून गेली .
गाडी तर निघून गेली पण जो माणूस ओम सोबत होता ..ज्याला आम्ही त्याचे पप्पा समजत होतो त्याने ओम ला एक दोन फटके दिले . जे त्या लहान मुलाने केलं .. त्या परक्या स्त्रीला हात लावून दिला नाही .. बाय बाय केलं नाही ... कदाचित हे फटके त्यासाठीच असावेत... कदाचित...
   ते दोघे आतमध्ये निघून गेले. या चौघी आपापसात बोलू लागल्या. त्यांच्यामधील एक बोलली की जी स्त्री होती तीच ओम ची आई नसेल ना ? सुहा म्हणाली नाही नाही ....ती स्त्री ती नाहीच आणि नसेल च....
आता आपल्याला ओम च्या मम्मीला शोधून काढण आणि भेटणं खूप महत्त्वाचं आहे...