World War 2 in Marathi Short Stories by Siddhesh Chaudhari books and stories PDF | द्वितिय महायुद्ध - भाग 4

Featured Books
Categories
Share

द्वितिय महायुद्ध - भाग 4

१९२४ चा फेब्रुवारी महिना उजाडला होता. म्युनिकचे बंड पूर्णपणे चिरडले गेले होते, नाझींचे १६ सैनिक जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते आणि अ‍ॅडॉल्फ हिटलर देशद्रोहाच्या (High Treason) भयंकर आरोपाखाली तुरुंगात होता. कायद्यानुसार या गुन्ह्यासाठी केवळ एकाच शिक्षेची तरतूद होती—ती म्हणजे थेट फाशी! संपूर्ण जर्मनीला वाटले होते की म्युनिकच्या अंधाऱ्या कोठडीत आता हिटलर नावाच्या एका माथेफिरूचे राजकीय करिअर कायमचे संपले आहे.

पण खटला सुरू झाला आणि हिटलरने या संकटालाच एका सर्वात मोठ्या राजकीय रंगमंचाचे रूप दिले.

फेब्रुवारी १९२४ मध्ये जेव्हा म्युनिकच्या विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू झाली, तेव्हा सभागृह आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी आणि सामान्य नागरिकांनी खचाखच भरले होते. हिटलरने कोर्टात स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणताही वकील उभा केला नाही. तो पिंजऱ्यात गुन्हेगारासारखी मान खाली घालून उभा राहिला नाही, तर तो ताठ मानेने न्यायाधीशांसमोर उभा राहिला आणि थेट न्यायालयातच त्याने आपली सिंहगर्जना सुरू केली.

न्यायालयात शांतता पसरली आणि हिटलरच्या आवाजातील तोच परिचित अंगार संपूर्ण सभागृहात घुमू लागला. तो गर्जला:

"न्यायाधीश महोदय! माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होय, मी म्युनिकमध्ये बंड केले, हे मी मान्य करतो! पण मी माझ्या मातृभूमीशी देशद्रोह केलेला नाही! खरा देशद्रोह तर त्या नेत्यांनी केला आहे, ज्यांनी १९१९ मध्ये व्हर्सायच्या तहावर स्वाक्षरी करून आमच्या महान जर्मनीचा स्वाभिमान मित्र राष्ट्रांच्या चरणी गहाण ठेवला!

जेव्हा देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते, जेव्हा आमची लहान मुले भुकेने रस्त्यावर मरतात आणि जेव्हा एका महान राष्ट्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर भिकाऱ्यासारखे उभे केले जाते... तेव्हा त्या जुलमी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे हा गुन्हा असू शकत नाही! मी आज इथे कोणत्याही सरकारच्या दयेची भीक मागण्यासाठी उभा नाही. तुम्ही मला दोषी ठरवा किंवा काहीही शिक्षा द्या, पण इतिहास मला निर्दोष मुक्त करेल. कारण माझा हा लढा स्वतःसाठी नाही, तर माझ्या प्रिय जर्मनीचा गमावलेला सन्मान परत मिळवून देण्यासाठी आहे!"


हिटलरचे हे भाषण ऐकून कोर्टात उपस्थित असलेल्या लोकांच्या अंगावर काटा आला. जे पत्रकार त्याला एक हिंसक बंडखोर म्हणून पाहत होते, ते दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांत त्याच्या 'देशभक्तीच्या' कथा लिहू लागले. एका रात्रीत हिटलर म्युनिकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जर्मनीचा 'हिरो' बनला. न्यायाधीशांवरही त्याच्या भाषणाचा इतका प्रभाव पडला की, त्यांनी कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्याऐवजी हिटलरला केवळ ५ वर्षांच्या अतिशय सौम्य कारावासाची शिक्षा सुनावली. तीही एका अशा तुरुंगात, जिथे त्याला सर्व सुख-सुविधा मिळणार होत्या—ते होते 'लँड्सबर्ग तुरुंग' (Landsberg Prison).

तुरुंगातील कोठडी हिटलरसाठी शिक्षा ठरलीच नाही, तर ते त्याचे विचार केंद्र बनले. मागच्या वर्षी (१९२२) इटलीमध्ये मुसोलिनीने कसा 'मार्च ऑन रोम' करून एका रात्रीत सत्ता मिळवली होती, याच्या बातम्या त्याने तुरुंगात बसून पुन्हा अभ्यासल्या. हिटलरला समजले की, मुसोलिनीची अंध नमुना (Copy) करून चालणार नाही. मुसोलिनीने जेव्हा रोमवर चढाई केली, तेव्हा इटलीचे लष्कर त्याच्या बाजूने उभे होते. पण जर्मनीमध्ये मात्र लष्कराने हिटलरवरच गोळ्या चालवल्या होत्या.

हिटलरने कोठडीत विचार केला—"आता केवळ बंदूक आणि सशस्त्र बंडाच्या मार्गाने चालून जमणार नाही. मुसोलिनीने जो रस्ता इटलीत वापरला, तो जर्मनीसाठी वेगळा करावा लागेल. मला आधी लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकून जर्मन जनतेला आणि लष्कराला कायदेशीररित्या माझ्या बाजूने करावे लागेल."

लँड्सबर्ग तुरुंगाच्या त्या सुसज्ज कोठडीत मिळालेल्या मोकळ्या वेळेत हिटलरने नाझी विचारसरणीचा पाया रचायला सुरुवात केली. तो कोठडीत येरझाऱ्या घालत मजकूर तोंडने सांगत गेला आणि त्याचा सर्वात विश्वासू सहकारी रुडॉल्फ हेस (Rudolf Hess) एका टाईपरायटरवर ते शब्द तंतोतंत टाईप करत गेला. यातूनच जन्माला आला जगातील सर्वात वादग्रस्त, विषारी आणि भयानक ग्रंथ—'माइन काम्फ' (Mein Kampf), म्हणजेच 'माझा संघर्ष'.

या पुस्तकात त्याने मुसोलिनीच्या फॅसिझमपेक्षाही क्रूर अशा 'नाझीवादाचे' (Nazism) नियम जगासमोर मांडले:

१. आर्यन वंशाचे श्रेष्ठत्व: जर्मन (आर्यन) लोक हे जगातील सर्वात शुद्ध आणि श्रेष्ठ वंशाचे आहेत आणि संपूर्ण जगावर राज्य करण्याचा अधिकार फक्त त्यांचाच आहे.

२. ज्यू बद्दलचा पराकोटीचा द्वेष: जर्मनीच्या पहिल्या महायुद्धातील पराभवाला आणि आर्थिक संकटाला केवळ 'ज्यू' (Jews) लोकच जबाबदार आहेत, असा भयानक खोटा प्रचार त्याने या पुस्तकात केला.

३. लेबेन्सराउम (Lebensraum - जगण्यासाठी जागा): जर्मनीला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी पूर्व युरोप आणि रशियाच्या जमिनीवर लष्करी ताकदीने कब्जा करावा लागेल, हा त्याचा आगामी युद्धाचा प्लॅन त्याने उघडपणे लिहून ठेवला.

हे पुस्तक म्हणजे केवळ आत्मचरित्र नव्हते, तर येणाऱ्या काळात जगाचा विनाश कसा होणार, याचा तो लिखित आराखडा होता.

हिटलरला ५ वर्षांची शिक्षा झाली होती, पण त्याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीचे कारण देऊन कोर्टाने त्याला अवघ्या ९ महिन्यांतच, म्हणजेच २० डिसेंबर १९२४ रोजी तुरुंगातून सोडून दिले. जेव्हा हिटलर लँड्सबर्ग तुरुंगाच्या भव्य दरवाजातून बाहेर पडला, तेव्हा त्याच्या एका हातात 'माइन काम्फ'ची स्क्रिप्ट होती आणि डोक्यात जर्मनीवर हुकूमशाही गाजवण्याचा नवीन लोकशाही मार्ग!