Anushakane keli Appuchi svaari books and stories free download online pdf in Marathi

अनुष्काने केली अप्पूची स्वारी

Amiita Salvi

amitaasalvi@gmail.com

अनुष्काने केली अप्पूची स्वारी

-------------------------------

छोटी अनुष्का खूप गोड मुलगी आहे. गोबरे गाल, मोठे डोळे, रेशमी सोनेरी केस-

जणू बाहुलीच! अनुष्का दिसायलाच सुंदर नाही !अभ्यासात हुशार आणि मनाने दयाळू

आहे.सगळ्यानाच ती हवीहवीशी वाटते.नेत्राला मुके प्राणी फार आवडतात.घरी पाळलेल्या

मोती कुत्र्याला ती रोज फिरायला नेते,त्याच्याशी खूप खेळते.मनी मांजरीला दूध पाजते.

त्याना तिचा इतका लळा लागला आहे, की दिवसभर तिच्या पायाशी घोटाळत असतात.

एकदा संकष्टीच्या दिवशी अनुष्का आईबरोबर गणपती मंदिरात गेली होती.जाताना

रस्त्यात तिला एक हत्ती दिसला.पाठीवर रंगीबेरंगी अंबारी होती.वर माहूत दिमाखात

बसला होता. अनुष्काला हत्ती खूप आवडला.देवळात जाऊन देवाला नमस्कार करतानाही

तो देखणा हत्ती तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. गणपतीबाप्पाला ती म्हणाली

"मला एकदा तरी हत्तीच्या पाठीवरून फिरायचे आहे.माझी ही इच्छा पूर्ण करशील

का बाप्पा?" आईबरोबर ती घरी जायला निघाली. देवळाच्या बाहेर खेळण्यांची खूप

दुकाने होती.अनुष्काने चावी दिल्यावर सोंड उंचावत चित्कार करत चालणारा हत्ती

घेतला. घरी गेल्यावर नवीन खेळण्याशी खेळताना तिला जेवण्याचीही शुद्ध नव्हती.

खेळता-खेळता तिच्या कानावर कोणाची तरी हाक आली. अनुष्का तिच्या खोलीतून

बाहेर आली. दरवाजाकडे पहाताच तिचे मोठे डोळे आणखी विस्फारले! दरवाजात एक

पांढराशुभ्र हत्ती उभा होता.अनुष्का कोणीतरी खेचून घेतल्याप्रमाणे त्याच्याजवळ गेली

"मी अप्पू हत्ती.गणपतीबाप्पाने मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुला फिरवून आणायला

सांगितले आहे. " अप्पू धीरगंभीर आवाजात म्हणाला."पण तू किती उंच आहेस मी

तुझ्या पाठीवर कशी बसणार?"अनुष्काने विचारले.अप्पूने तिला अलगद उचलून पाठीवरील

अंबारीत बसवले. नेहमी तिच्या बरोबर रहाणारे मनीमाऊ आणि मोत्याही अप्पूच्या

सोंडेवरून चढून तिच्या बाजूला येऊन बसले.या सहलीत आपले मित्र आपल्या बरोबर

आहेत याचा अनुष्काला खूप आनंद झाला."तू मला कुठे घेऊन चाललायस?" तिने

अप्पूला विचारले."मी तुला जंगलात घेऊन जाणार आहे.तिथल्या गमती-जमती दाखवणार

आहे.तिथल्या माझ्या मित्रांशी तुझी ओळख करून देणार आहे." "पण जंगल खूप लांब

आहे! तू परत येताना रस्ता चुकलास तर? मी परत घरी कशी जाणार?"अनुष्का घाबरून

म्हणाली." तुला बहुतेक माहीत नाही अनुष्का;हत्ती खूप बद्धिमान प्राणी आहे.एकदा

माणसाला आणि स्थळाला आम्ही कधीच विसरत नाही.म्हणूनच बुद्धीचा दाता गणेश

गजमुख आहे." अप्पू अभिमानाने सांगत होता.

बोलता बोलता अप्पू कधी जंगलात पोचला हे अनुष्काला कळले सुद्धा नाही. उंच

झाडांनी वेढलेल्या त्या वनातील गारवा तिला सुखावून गेला. वा-याबरोबर येणारा

सुगंध मन प्रसन्न करत होता. जाता जाता त्याना एक तलाव लगला. तलावात सुंदर

कमळे फुलली होती,हंस पक्षी विहार करत होते.हरणे, ससे, हत्ती काठावर पाणी पीत

होते. अत्त्यंत नयनरम्य दृष्य होते ते! "या जंगलात अनेक जलाशये आहेत पण पाऊस

कमी पडल्यामुळे सर्व सुकून गेली आहेत.हा तलाव मात्र पाण्याने बारा महिने भरलेला

असतो;त्यामुळे जंगलातले सर्व प्राणी इथेच पाणी प्यायला येतात."अप्पू सांगत होता

इमारती बांधण्यासाठी खूप जंगलतोड झाली आहे. जंगलाच्या सीमेच्या आतही इमारती

झाल्या आहेत.जंगलतोडीमुळे पाऊस कमी झाला ! जलाशये आटली की जंगलातले प्राणी

सव‌ईप्रमाणे कघी पाण्याच्या शोधात तर कधी शिकारीच्या जंगलाच्या सीमेकडे जातात

त्याना पाहिले की माणसे घाबरून जातात.तूच सांग अनुष्का जर माणसाने जंगले

तोडली तर पर्यावरणाचा समतोल कसा रहाणार? आणि आम्ही कुठे रहायचे?"अनुष्काला

माणसाच्या स्वार्थीपणाचा राग आला.पण ती काय करू शकत होती? ती तर अजून

लहान होती ! "मी मोठी झाले की मी तुमच्यासाठी काम करेन."ती अप्पूला म्हणाली.

"आता तू चांगला अभ्यास कर.मोठी झालीस की चांगले समाजकार्य कर.दीन - दुबळ्यांना

आधार दे.मुक्या प्राण्यांसाठी काम कर.जगाला ओरडून सांग -माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही

या पृथ्वीवर जगण्याचा अधिकार आहे" अप्पू म्हणाला.

तितक्यातच एक ससा उड्या मारत आला आणि अप्पूच्या सोंडेवरून त्याच्या

पाठीवर येऊन अनुष्काच्या मांडीवर येऊन बसला. लाल डोळ्यांचा तो कापसासारखा

मऊ, शुभ्र ससा थरथरत होता.तिने त्याला थोपटले.पहाते तर काय! समोर वाघोबा उभा

होता.त्याने उडी घेण्यासाठी उचललेला पंजा,डोळ्यांमधील अंगार पाहून अनुष्काचा

थरकाप उडाला.पण सशाला अप्पूच्या पाठीवर बसलेला बघून तो मागे फिरला आणि

निघून गेला."अरे! हे कसे झाले? वाघ जंगलचा राजा; सगळे प्राणी त्याला घाबरतात

मग तुला घाबरून निघून कसा गेला?" अनुष्काने आश्चर्याने विचारले."राजा-प्रजा या

उपाधी तुम्ही माणसानी आम्हाला दिल्या आहेत पण जंगलात असे काही नसते.'बळी

तो कान पिळी' हा इथला कायदा आहे.आम्ही हत्ती वाघोबापेक्षा शक्तिमान आहोत त्यामुळे

वाघोबा सहसा आमच्या वाटेला जात नाही." अप्पू म्हणाला.

अप्पूने दाट जंगलात प्रवेश केला.रंगी-बेरंगी मोर पहाताना अनुष्काचा आनंद गगनात

मावेना. ती त्याना अपुर्वाईने न्याहाळत होती;तोच आकाश मेघानी भरून गेले, अंधारून

आले ;आणि मोर पिसारा फुलवून नाचू लागले.ते विहंगम दृष्य अनुष्का जणू डोळ्यात

साठवून ठेवत होती.तोच सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली.अप्पू

एका डेरेदार वृक्षाखाली उभा राहिला.इथे पावसापासून पूर्ण संरक्षण मिळत होते.पाऊस

थांबला,आणि क्षितिजावर इंद्रधनुष्य दिसू लागले.निसर्गाची विविध रूपे पहाताना अनुष्का

दंग होऊन गेली होती.काय पाहू आणि काय नको असे तिला झाले होते.

"आता आपल्याला परत जायला हवे" अप्पू म्हणाला.नाखुशीनेच अनुष्का परत जायला

तयार झाली.परतीचा प्रवास सुरू झाला!पाऊस पडून गेल्यामुळे रान अधीकच हिरवेगार

झाले होते.मातीचा सुगंध मनाला मोहवत होता.ओल्या मातीवरून चालणारा अप्पू अचानक्

थांबला आणि अनुष्का भानावर आली.अप्पूच्या समोर पारध्याच्या जाळ्यात अडकलेले

अनेक पक्षी जाळ्यातून सुटण्यासाठी धडपड करत होते.त्यांचा कलकलाट चालला होता.

अप्पू म्हणाला यांना सोडवायचे काम तुलाच करावे लागेल;हे काम मी करू शकत नाही.

त्याने अनुष्काला खाली उतरवले. अनुष्काने हळुवार हाताने पक्षाना जाळ्यातून सोडविले..

पक्षी आनंदाने तिच्या अंगा-खांद्यावर खेळू लागले.एक पक्षी जवळच असलेल्या झाडावरील

घरट्यातून चोचीत एक मोती घेऊन आला. तो मोती त्याने अनुष्काला दिला.तिने सवईने

फ्राॅकच्या खिशात ठेवला.

यानंतर मात्र अप्पू कुठेच थांबला नाही.काही क्षणांतच त्यांची स्वारी अनुष्काच्या

घराजवळ आली.पण त्याला निरोप द्यायला तिचे मन तयार होईना."तू माझ्याबरोबरच का

रहात नाहीस? मला खूप आवडतोस तू! " ती अप्पूला म्हणाली. "आम्हाला जंगलात

रहाणा-या प्राण्याना स्वतंत्र्याचा आनंद हवा असतो.बंधनात राहून आम्हाला कितीही

सुविधा मिळाल्या तरीही आम्ही मनातून दुःखीच असतो.आकाशात उडायला मिळाले

तेव्हा पक्षी किती खुश झाले,तू थोड्या वेळापूर्वीच पाहिलेस न? आपली मॆत्री तर

कायम रहाणार आहे." अप्पूने तिला समजावले.जड मनाने अनुष्काने त्याला निरोप दिला.

ती हात हलवत म्हणाली," पुन्हा भेटू.बाय!"

"अग अनुष्का! झोपेत कोणाला हात करतेयस? खेळता खेळता झोपलीस कधी तू?"

सहज अनुष्काच्या खोलीत डोकावणारी आई तिला हलवत म्हणाली.अनुष्का उठून बसली.

"आई! मला आज अप्पूने जंगलात फिरवून आणले.किती मजा आली म्हणून सांगू!"ती

आईला म्हणाली."तू झोपेत स्वप्न पाहिले असशील.हत्तीशी खेळता- खेळता तुझा

डोळा कधी लागला,तुलाच कळले नाही.'मनी वसे ते स्वप्नी दिसे' म्हणतात;तसेच झाले

असणार." आई तिला समजावत म्हणाली.पण अनुष्काला सर्व काही आत्ताच घडले

असे वाटत होते.विचार करता करता सहज तिचा हात खिशात गेला.हाताला काही लागले;

तिने पाहिले तर तो एक तेजस्वी मोती होता.त्या पक्षाने तिला भेट म्हणून दिलेला मोती !

************