अमोल गोष्टी - 12

अमोल गोष्टी

पांडुरंग सदाशिव साने

१२. सत्य केव्हा तरी बाहेर येतेच

युरोपातील एका शहरात फार प्राचीन काळी ही गोष्ट घडली. त्या शहराचे नावमात्र मला आता आठवत नाही. या शहरात न्यायदेवतेचा एक भला मोठा पंचरसी धातूचा एक पुतळा होता. भरचौकात तो उभारलेला होता. त्या पुतळयाच्या डाव्या हातात एक तराजू होता व उजव्या हातात तलवार होती. या शहरात कोणत्याही गोष्टीचा निकाल नीट तोलून पाहून देण्यात येतो. त्यात रेसभरही चूकभूल होत नाही हे दर्शविण्यासाठी तो तराजू होता; आणि अन्यायाचे निर्दालन करण्यात येते हे दाखविण्यासाठी ती तलवार होती.पुढे काही वर्षे लोटली. त्या शहरात पूर्वीचा न्याय राहिला नाही. अन्याय व अनीती यांचे राज्य सुरू झाले. सद्गुणास शिक्षा व दुर्गुणास बक्षीस असा अस्मानी सुलतानी व्यवहार सुरू झाला. तो न्यायदेवतेचा दगडी पुतळा जरी तेथे होता, तरी प्रत्यक्ष व्यवहारात रोज न्यायदेवतेचा खून होत होता; बळी तो कान पिळी हा नियम आता झाला होता. त्या राज्यात दुर्बलांचा वाली कोणी राहिला नाही. दुष्ट व राक्षसी लोक वाटेल तसा जुलूम करू लागले. सर्वत्र कहर गुदरला.या पुतळयात हातात तराजू होता, तो केवढा थोरला होता. या तराजूत पक्ष्यांनी आपली घरटी केली; त्या पाखरांना त्या पुतळयाच्या हातातील तलवारीचे मुळीच भय वाटत नसे. सकाळ झाली म्हणजे या तराजूतील घरटयातून पाखरे भुरभूर उडून जात, सायंकाळ झाली, म्हणजे चिंव चिंव करीत परत घरटयात येत. पक्ष्यांची वसाहतच तेथे बसली म्हणा ना!अशी परिस्थिती असता एका मोठया उमरावाच्या घरी एक मौल्यवान मोत्यांचा कंठा हरवला. त्या उमरावाच्या घरी एक मोलकरीण काम करण्यास होती. तिला जगात कोणी नव्हते. ना आई, ना बाप. त्या पोरक्या पोरीवर तो मोत्याचा कंठा चोरल्याचा आळ आला. त्या पोरीची चौकशी झाली व ती दोषी ठरली. गरीब बिचारी मुलगी! तिला त्या माणिक-मोत्याचे काय करावयाचे होते! परंतु न्यायदेवता त्या वेळेस त्या शहरात आंधळी झालेली होती.

त्या वेळच्या कायद्याप्रमाणे त्या मुलीला गुन्हेगार ठरवून तिला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्या निरपराध पोरीला फासावर मरण आले !तिचा पवित्र आत्मा परमेश्वराजवळ जाऊन राहिला. त्या मुलीची प्रामाणिकता आंधळया जगास पटवून द्यावी असे परमेश्वराच्या मनात आले. एक भले मोठे प्रचंड वादळ उठले! पर्वतासही उडवील असा झंझावत सुटला; विजा चमचम चमकू लागल्या. प्रचंड मेघगर्जना होऊन विश्वाचे कान बधिर झाले! तो पाहा मुसळधार पाऊस पडू लागला. आजच प्रलय ओढवला असे भासले.कडाड् कडाड-अरे बापरे, केवढा आवाज! तो पाहा विजेचा लोळ त्या पुतळयावर आदळला, पुतळा कोसळला! न्यायदेवतेच्या हातातील तो तराजू छिन्नभिन्न होऊन खाली पडला; त्यातील पाखरांची घरटी खाली कोलमडून पडली, आणि काय आश्चर्य! त्या एका पाखराच्या घरटयातून तो पाहा मोत्यांचा हार एकदम खळकन खाली पडला! पाखराने तो हार केव्हातरी चोचीत धरून नेला असावा व घरटयात ठेवून दिला असावा. पण त्याबद्दल त्या पोरीला फाशी जावे लागले.त्या मुलीची निर्दोषिता जगास पटली, पण आता काय उपयोग? उपयोग नाही असे म्हणू नका. उपयोग हा की, सत्य हे बाहेर येते. सत्य लपत नाही - आज ना उद्या एवढाच प्रश्न.

 

 

***

Rate & Review

Sandesh Mohan Chavan 9 months ago

Amit Bendale 9 months ago

छान

komal kharchane 9 months ago

Rachana Jakal Raikar 9 months ago