Chugand books and stories free download online pdf in Marathi

चुंगड

चुंगड

आकाशाला भिडणारा उंचच उंच डोंगर , आणि हृदयाला घर करणारी खोल खोल दरी. आणि या दोन विसंगतीच मिश्रण म्हणजे निसर्गाचं सौंदर्य. एका लयीत पसरलेले कमी अधिक डोंगर, त्यांनी पांघरलेली हिरवळीची शाल. थोड्या थोड्या अंतरावर वाहणारे लहानमोठे धबधबे. बेभान वाहणारा वारा. धुक्यात न्हाऊन निघालेली ही सृष्टी मोहकच. मध्येच कोवळ्या उन्हात दृष्टीस पडणार एखाद कौलारु. दुरवर दिसणार एकट कौलारु बघुन मनात अनेक प्रश्न येतात की हे लोक अस का राहत असतील? आवड म्हणुन , मजबुरी म्हणुन कि आणखी काही..

अशीच एक झोपडी डोंगरउतारावर वार्या पासुन वाचवण्यासाठी जमिनीलगत, जाणिवपुर्वक बनवलेली. आत एक जुनी बाज, एक छोटीशी माचोळी, एक चुल आणि तिन लेकरांसोबत राहणारी माय. बाहेर सैरावैरा कोसळणारा पाऊस .. आणि झोपडीत काजळी धरलेली फडफडणारी चिमणी. मध्येच पाऊस दिशा बदलायचा आणि एखादा सडाका झोपडीच्या आतही डोकावुन जायचा. त्यासरशी सर्वांचे अंग शहारले जायचे. उन्हाने काळवंडलेले चेहरे , अंगावरचे अर्धवट फाटके कपडे हे परिस्थिती दर्शवणारे होते. मोठी मुलगी दहा वर्षाची. पोलक-परकर घातलेली, केसांचा अंबाडा. केसांना तेल नसल्याने भुरटे , राठ केस. घारे डोळे यामुळे ती वेगळीच भासत होती. दुसरी मुलगी सात वर्षाची,नाजुकशी पोर. तिसरा मुलगा , चार वर्षाचा . तापाने फणफणत होता. कुपोषणाने हात पाय वाळलेले. पोट पुढे आलेल. त्याच्या शेजारी बसुन आई पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवत होती. तिचा काळवंडलेला चेहरा काळजीने अधिक ग्रासला होता. न राहुन आई पोरीकड बघुन बोलली , ' ईलू.. आपलं बग्या वाचलं का रं ?' दहा वर्षाची ईलू आईला धिर देत म्हणाली ,'तु नगं जिव जालू.. व्हईल निट. म्या उद्या जातो वाडिला दवा आणतो'. काळजावलेली माय रडवल्या आवाजात म्हणाली, ' तुका लहान पोरं.. एकटीले पाठवाया जीव घाबरा व्हय..!' त्यावर ईली समजुतदारपणे बोलते, 'माका काय न्हाय व्हतं.. म्या उद्या सकाली सकाली जातो आन् लवकर येतो.' त्यावर आई ईलीच्या डोक्यावर हात फिरवुन जवळ ओढते, 'गुणाची पोरं बाय माझी..!'

सकाळी ईली जायला निघते. आई एक फाटकी कुंची, त्यात अर्धी भाकर ठेवते. एका जुन्या लाकडी संदुकातून चिल्लर गोळा करुन १५ रुपये त्या कुंचीच्या टोकाला बांधुन गाठ मारते. व त्या कुंचीच 'चुंगड' करुन ईलीकडे देते. पाठीवर हात फिरवुन 'निट जावं.. निट यावं माय..!' म्हणते. 'व्हय' म्हणत ईली बाहेर पडते. पलक-पोरकर घातलेली, अंबाडा बांधलेली , एका हातात काठी, एका हातात चुंगड घेवुन अनवाणी चालणारी, बेधडक उगवत्या सूर्याला डोळे लावून बघणारी ईली. एक बिधनास्त अवलिया वाटत होती. झपाझप पावलं टाकतं ती डोंगर उतरत होती. भराभरा डोंगर उतरुन ती पायथ्याला आली. सुंदर नदी वाहत होती. एक नावाडी छोटीशी लाकडी नाव घेवुन सर्वांना त्या नदिच्या पल्याड विनामुल्य सोडत असे. त्याला त्या डोंगरकपारीत राहणाऱ्या लोंकाची खुप जवळीक वाटे.म्हणुन तो ते काम आनंदाने करे. ईली नावेत चढली. तो नाव हाकु लागला. त्या बोटभर नावेत , नखाएवढी दिसणारी ईली माञ त्यावेळी दर्याची राणी वाटत होती.

ईली आता घाटावरुन जाणाऱ्या डांबरी रस्त्याच्या जवळ आली होती. वरील घाटाच्या रस्त्यावरुन तुरळक वाहने जात होती. एक कार भरधाव वेगाने धावत होती. त्यात नशा केलेली तरुण मुले होती. एकाने रिकामी बिअरची बाटली, घाटाच्या दिशेने भिरकावली. गो..गो.. आवाज करत ती बाँटल ईलीच्या पायावर आदळली, फुटली आणि पायाला काच लागली. ईली व्हिव्हळली. रडु लागली. रक्त वाहु लागलं. कार कधिच निघुन गेली होती. त्यांना कसलाच थांग पत्ता नव्हता. ईली रडत होती. माय लेकीच्या नात्याला कसलीच मर्यादा , बंधन नसते. ती नाळ जन्मजात जुडलेली असते. इकडे अचानक ईलीच्या आईला अस्वस्थ वाटू लागलं. मन सैरभैर झालं. डोळे आपसुकच वाहु लागले. ईलीला रडता रडता छोटा भाऊ आठवला आणि ती तशीच उठली. लंगत लंगत , रक्ताळलेल्या पायाने , वाडीवर पोहचली. डाँक्टर खुप माणुसकी जपणारा होता. त्याने लगेच ईलीला आत नेलं. पट्टी केली. तिने भावाबद्दल सर्व काही सांंगितलं. डाँक्टरांनी तिला औषध पँक करुन , कधी खायची सांगुन , एकही पैसा न घेता तिला पाठवुन दिली. ईली खुप खुश होती. डाँक्टरांनी तिला जेवणही दिलं होत. भावासाठी २ पारलेजी ही दिले होते. पारलेजी दिल्यावर भाऊ किती आनंदी होईल या विचाराने मोहरुन , आपल्याच तंद्रीत ती रोडच्या कडेने चालत होती. पायाला लागल्यामुळे कोणी गाडीवर घाटापर्यंत सोडेल का? आसा विचार करुन ती थांबली.एक - दोन गाड्या आल्या पण तिने हात करुनही थांबल्या नाहीत. ईली तिथेच थांबुन वाट पाहु लागली. एक मोटरसायकल दिसली. ईलीचा चेहरा फुलला. तिने हात केला. तशी गाडी सावकाश जवळ आली. ईलीच्या हातातील 'चुंगड' ओढुन घेऊन , परत भरधाव वेगाने गाडी निघुन गेली. ते मोटारसायकलस्वार चोर होते. ईलीला क्षणभर काहीच कळेना. ईली त्यांच्या मागे धावली.. पण गाडी क्षणात दिसेनासी झाली. ईलीवर आभाळ कोसळलं.क्षणात तिच्या स्वप्नांच्या चुरा झाला होता. घरी वाट पाहणारी आई , तिचा चिंतेने ग्रासलेला चेहरा, तापात फणफणारा भाऊ आठवुन ईली कोसळली. तोंडात मुठ दाबुन ईली जोरजोरात रडु लागली. ईलीचा तो हृदयाला भिडणारा आवाज त्या वेळी कोणापर्यंत पोहचत नव्हता. त्या चोराने फक्त चुंगड नेल नव्हत, त्याने नेला होता.. भाऊ जगण्याचा आशावाद, त्याला पुन्हा पुर्ववत करु शकणारी औषध, आईच्या चेहऱ्यावरील चिंता नष्ट होण्याचे एकमेव कारण, भावाच्या चेहऱ्यावर उसण हसु खुलवु शकणारे २ पारलेजी , आईची आजवरची कमाई पंंधरा रुपये , घरातली शेवटची एकमेव फाटकी पण वापरातली कुंची आणि अर्धि भाकरी...

ईली रडुन रडुन पार कोलमडली होती. तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला होता. तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला होता. तिच्या मनात एक विचारांच चुंगड तयार झालं होतं. चार वेगळ्या गोष्टीचं .. एक तो नावाडी, जो काहीही न घेता सर्वांना नदिपार सोडतो. त्याचा उदारपणा. एक तो नशेतील मदमस्त तरुण , जो माणुस , मुके प्राणी यांचा विचार न करता स्वानंदा पाई दारुची बाटली भिरकावतो, त्याच्या बेजबाबदार पणा . एक तो डाँक्टर.. जो माणुसकी जपतो. फुकट उपचार करुन लोकांची सेवा करतो, त्याचा माणुसपणा . एक तो चोर जो फक्त स्वतः च्या जगण्यासाठी , ईलीचं जगणं हिसकावणारा , चुंगड चोरतो, त्याचा स्वार्थ . एकाच पृथ्वी तलावरील , एकाच भागात राहणाऱ्या चार वेगळ्या माणसांचे चार वेगळे स्वभाव.. त्यांचे वेगळे अनुभव अनुभवणारी कोवळी ईली.. रस्त्याच्या कडेला निपचीत पडून होती. अंधुक दिसणारं सर्व काही आता दिसण बंद झाल होत. . तिने हळुवार डोळे मिटले.