Spardhechya palikade - 1 books and stories free download online pdf in Marathi

स्पर्धेच्या पलीकडे - (भाग १)

स्पर्धेच्या पलीकडे...... (भाग १)

सकाळचे सहा वाजले होते, गुलाबी थंडी उतरू लागली होती. सूर्याची किरणे आता कोणत्याही क्षणी डोकावू लागणार होती. शनिवार वाड्याच्या बस स्टॅंडवर फारशी गर्दी नव्हती, सिंहगडला जाणारी बस नुकतीच सुटली होती. त्यामुळेच स्टँडवरची बरीचशी गर्दी कमी झाली होती.

राहुल आणि विनोद दोघेही आपापल्या सायकली घेऊन कोणाची तरी वाट पाहत होते.

"विन्या, तू निघताना फोन केला होतास न मंदारला?

तुला माहितीये न तो नावाप्रमाणेच मंद आहे. सहाला पोचायचे असेल तर तो सहाला बेडमधून बाहेर येतो." - राहुल

"अरे हो यार, पाच मिनिटात पोहचतो असे बोलला तो मला. येईल बघ इतक्यात.

पण तू रम्याला फोन केलायस न?

तो ही दिसत नाही अजून." - विनोद

"त्याची काळजी करू नकोस, रमेश तसाही उशिरा येत नाही. पोहचेलच बघ तो इतक्यात." - राहुल

इतक्यात दोघांनाही रमेश दुरून येताना दिसला.

"काय रे तुम्ही दोघेच? मंद्या कुठे आहे? आणि आपला पक पक पकवणारा पक्या कुठे आहे? त्याला फोन केला की नाही? " - रमेश.

"आईला, रम्या तू काय शाळा घेतोस का आमची? पक्याला तू फोन करणार होतास न राव?" - विनोद

"असे होय, हे घे तुमच्या समोरच फोन लावतो." - रमेश

असे बोलून रमेशने आपल्या खिशातून मोबाइल काढला आणि प्रकाशला फोन करू लागला. राहुलला मात्र रमेशचे असे वागणे अजिबात झेपले नव्हते.

"रम्या, काय हे तू निघायच्या आधी फोन करायला हवा होतास?" - राहुल

राहुल दिसायला मुळातच गोरा होता, त्यात त्याला राग अनावर होत असे. त्यामुळेच तो चिडला की आपोआप त्याचा चेहरा लाल होत असे. आताही अगदी तसेच झाले. राहुलचा चेहरा रागाने लाल झाला आणि विनोद व रमेश दोघेही हसू लागले.

"विन्या तू साक्षीदार आहेस. पक्या आला की सांगायचे राहुल्याला आज पाहिलं मी लाल केलाय. कालच बेट लावली होती बच्चू ने आपल्याशी. म्हणतो पाच मिनिटे उशिरा येतो आणि राहुल्याला लाल करतो. मी ही बोललो तुझ्या आधी मी लाल करतो.

नेहमीप्रमाणेच मी जिंकलो.

राहुल आय एम सॉरी, पण मी पक्याला फोन केलाय, निघायच्या आधीच. पण तो पाच मिनिटे उशिरा येणार आहे. कारण तुला कळलेच असेल आता, त्याला तुला लाल करायचा होता." - रमेश.

आपल्या स्वभावावर आपले मित्र पैज लावतात ही बाब राहुलला नवीन नव्हती, त्यामुळे त्याचाही राग काही क्षणातच निवळला. तसेही एकंदरीतच त्याचा रमेशवरचा राग फार टिकत नसे.

"राहुल, आता तसेही हे दोघे यायला थोडा वेळ लागेल असे दिसतय. मी काय म्हणतो तो पर्यंत आपण समोरच्या टपरीवर फक्कड चहा मारुयात का?" -विनोद

विनोदच्या या वाक्यावर मात्र रमेश आणि राहुल यांनी लगेच सहमती दिली आणि तिघेही समोरच्या टपरीकडे निघाले.

राहुल, रमेश, प्रकाश, विनोद आणि मंदार पाचही जिगरी दोस्त. त्यांचा ग्रुप तसाही वेगळाच होता. कॉलेजमध्ये सगळ्यांनाच त्यांच्या मैत्रीचा हेवा वाटत असे, ते पाचही जण मात्र आपल्याच जगात गुंतलेले असत. इतर कोणाशी मैत्री करायची त्यांना गरजच पडत नव्हती. पाचही जण अभ्यासात हुशार होते त्याच बरोबर विविध खेळातही निपुण होते. घरची परिस्थितीही थोड्याफार फरकाने सारखीच असल्याने एकंदरीत त्यांचे एक मेकांशी चांगले पटत असे. त्यातही सगळ्यांचे छंद देखील सारखेच होते, आता दर रविवारी सकाळी किंवा पहाटे उठून सायकलवरून दूर कुठेतरी फिरायला जाणे हा ही त्यातलाच एक भाग होता. त्यांचे बेत नेहमीच अचानक ठरत असत आणि बहुतेक वेळा पाचही जण एकत्रच फिरत असत. आजचा बेत देखील त्यांनी काल रात्री घरी जात असताना ठरवला होता. त्यामुळेच ही अशी चुकामुक होणे सहाजिक होते. पण राहुलला मात्र अशी बेशिस्त अजिबात सहन होत नसे. त्याच्या घरच्या वातावरणामुळे आणि थोडी त्याच्या मेहनतीने शिस्त ही त्याच्या अंगी अगदी ठासून भरली होती. इतपत ठीक होते पण आपल्या मित्रांनाही ती पाळावी असा त्याचा आग्रह नव्हे तर हट्ट असे आणि त्यामुळेच त्याचे इतरांशी खटके उडत असत.

प्रत्येक मोठ्या गटामध्ये नेहीमच छोटे छोटे उपगट आपसूकच बनत असतात, या पाच जणांचा गटही त्याला अपवाद नव्हता. राहुल आणि मंदार यांचे गुण कितीही चांगले असले तरी त्यांची मते नेहमीच एकमेकांना पटत होती असे नव्हते. मंदारची बेशिस्त बहुतेक वेळेला या आगीत तेल ओतण्याचेच काम करत असे. आजही तसेच घडत होते. सहा वाजताची वेळ ठरली असताना सवा सहा झाले तरी मंदार यायची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे त्या दोघांचे परत एकदा वाजणार याची पुरेपूर कल्पना इतरांना आली होती.

या दोघांच्या भांडणात बहुतेकदा रमेश राहुलच्या बाजूने तर विनोद मंदारच्या बाजूने उभा असे.

प्रकाश मात्र वेगळेच प्रकरण होते. त्याचा स्वभाव बोलका होता. त्यामुळेच 'पक पक पक्या' हे नाव त्याला पडले होते. अभ्यासात हुशार, बोलायला चतुर, ताकदीने श्रेष्ठ असे सगळे गुण त्याच्यात ठासून भरले होते. बहुतेक वेळेला ग्रुपची भांडणे तोच सोडवत असे, ग्रुपमधील महत्त्वाचे निर्णयही त्याच्याच संमतीने होतील याची तो विशेष काळजी घेत असे. म्हणजेच तो स्वत:ला या ग्रुपचा नेता समजत असे. अर्थात बाकीच्या चारही जणांना याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती.

थड्याच वेळात प्रकाश तिथे पोचला मग चौघांनी परत एक एक चहा घेतला. शेवटी साडे सहा वाजता मंदार धापा टाकत तिथे पोचला, तो थेट झोपेतून उठून तिथे पोहचल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. आपण उशिरा पोहचल्याने राहुल भडकला असणार हे मंदारने ताडले होते. त्यामुळेच आल्या आल्याच त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि उशीर का झाला याचे कारण तो सांगू लागला.

पण राहुल मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. मंदारची नेहमीची करणे त्याला तोंडपाठ झाली होती. कधी गजरच झाला नाही, कधी आईने अडवून ठेवले, कधी सायकल पंक्चर झाली तर कधी काय... ही सगळी करणे राहुल आणि ग्रुप मधील सर्वाना आता तोंडपाठ झाली होती.

त्यामुळेच इतक्या वेळ आवरून ठेवलेला राग राहुलने मोकळा केला. मंदारला त्याने झाप झाप झापले. तेव्हा कुठे तो शांत झाला.

"मी काय म्हणतो राहुल्या-" - विनोद

"तू अजिबात मध्ये पडू नकोस विनोद, मला माहिती आहे तू नेहमी प्रमाणेच याचीच बाजू घेणार आहेस ते."- राहुल विनोदला गप्प करत खेकसला आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला राहुल आणि मंदार मधील भांडणात नकळतच विनोद व रमेश दोघेही खेचले गेले. काहीच क्षणात चौघेही तावातावाने भांडू लागले. प्रकाश मात्र शांतपणे टपरीवर बसून चहा पित होता.

"चला काका, निघतो. या चौघांना आवरले पाहिजे. नाहीतर थोड्याच वेळात इथे महाभारताचा फुल्ल एपिसोड बघायला मिळेल." - प्रकाश टपरीवाल्याला हसत हसत म्हणाला.

"एक मिनिट!!!! सगळे शांत व्हा पाहू.

आपला मूळ प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला निघायला उशीर झालेला आहे. आणि आता जर आपण इथे भांडत बसलो तर तो उशीर अजून वाढतच जाणार आहे.

त्यामुळे तुमच्या या भांडणात किती वेळ घालवायचा हे तुमच्या सारख्या हुशार मुलांना माझ्यासारख्या मित्राने सांगणे उचित होणार नाही.

म्हणूनच मी समोर बसून चहा घेतो. भांडण संपले आणि नेहमीचे सोपस्कार झाले की मला कळवा. माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे आपला हा वेळ भरून काढण्याची." - प्रकाश.

- क्रमशः