दुःखी.. - 2

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

२. अभगिनी व तिची लहान मुलगी

ते तीन तरुण होते. तिघे एकमेकांचे मित्र होते, ख्यालीखुशाली करणारे होते. प्रत्येकाचे एकेक प्रेमपात्र होते. परंतु हळुहळू त्या तिघांना त्या प्रेमपात्रांचा वीट आला. आपल्या पाठीमागे असणार्‍या त्या तिघींचा त्याग करावयाचा असे त्यांनी ठरविले.ते तिघे आपापल्या त्या दोन दिवसांच्या राण्या बरोबर घेऊन निघाले. ते एका सुंदर थंडगार हवेच्या ठिकाणी जाणार होते. त्यांच्या प्रियकरणींना आनंद झाला होता. आपल्यावर आपल्या प्रियकराचे किती प्रेम, असे प्रत्येकीला वाटत होते.ते हवेचे ठिकाण फारच मनोहर होते. जिकडे तिकडे घनदाट छाया होती. जंगलातून मधूनमधून नागमोडी लाल रंगाचे रस्ते होते. कोठे उंच गगनभेदी शिखरे, तर कोठे पाताळास भिडू पाहाणार्‍या दर्‍या. नाना रंगांची व गंधांची फुले जिकडे तिकडे दिसत. पक्ष्यांचे कर्णमधुर आवाज राईतून ऐकू येत.ते तिघे तरुण व त्या तिघी तरुणी एका भव्य हॉटेलात उतरली. प्रत्येकाची स्वतंत्र खोली होती. सायंकाळी ती  सारी फिरायला गेली. काही वेळ सर्व जण बरोबर होती. पुढे वाटा फुटल्या. एकेक जोडपे एकेक दिशेला गेले.त्या गर्द छायेत ते पाहा एक जोडपे बसले आहे. प्रेमाशिवाय जणू जगात काही नाही, असे त्यांच्या मुद्रेवरून दिसत आहे.'मला कधी कधी शंका येते. विचारू का?' ती म्हणाली.'कोणती शंका!' त्याने विचारल.

'तुम्ही माझा एक दिवस त्याग कराल. तुम्ही मला सोडून जाल. का असं मनात येतं ते कोणास कळे! नाही ना मला टाकणार? नाही ना अंतर देणार?''ती पाहिलीस वेल? त्या झाडाला कशी घटट विळखा घालून बसली आहे. ती तुटेल, मोडेल, परंतु झाडाला आपण होऊन सोडणार नाही.''वेलीनं झाडाला घट्ट धरून ठेवलं आहे; परंतु झाडाचा काय नेम? तो वृक्ष दुसर्‍या वेलीही जवळ करतो. काही वेली गुदमरतात, काही हसतात. झाडाला काय त्याचं?''आपणा दोघांमध्ये कायमचं प्रेमाचं नातं जोडणारी लिली नाही का? लिली आपणास एकमेकांपासून दूर होऊ देणार नाही.''लिलीला बरोबर आणलं नाही. घरीच ठेवून आले. आई, आई म्हणत असेल. आता दोन-तीन वर्षांची झाली. तीन वर्षं. तीन वर्षं आपण प्रेमात दवडली. अशीच सारी जातील का? असाच हा जन्म जाईल का, पुढील जन्म जातील का? तुम्ही मला तुमच्या राहात्या घरी केव्हा नेणार? विचारलं का वडिलांना? किती दिवस त्या वस्तीत मी राहू? सांगा ना.''नेईन. लवकरच नेईन. बाबांच्या कलानं घेतलं पाहिजे. त्या दिवशी माझ्यावर रागावले. नीट राहायचं असेल तर घरी राहा, नाही तर चालता हो. व्यापारात लक्ष घाल. उडाणटप्पूपणा किती दिवस चालायचा? सारी फुलपाखरं आता सोडून दे, वगैरे कितीतरी बोलले. हे बघ, बाबांनी घालवलं तर उद्या आपण कुठं जाणार? गरिबीत राहायची मला सवय नाही. जरा दमानं घे हो.''पैसे काय करायचे? आपण गरिबीतही राहू. मी मिलमध्ये कामाला जाईन. तुम्हाला कष्टाचं काम होणार नाही. तुम्ही घरी राहा; परंतु आता दूरदूर नको. खरंच नको.''बरं, विचार करू.'असे त्यांचे बोलणे चालले होते. त्या दुसर्‍या जोडप्याचे काय चालले आहे बोलणे? प्रियकरांचे विश्रब्धापलाप ऐकू नयेत. त्यांची मोकळी मने त्या वेळेस बोलत असतात; परंतु आपण ऐकू या. आपणाला त्यांचा हेवा ना दावा. जगात कसे प्रकार असतात ते पाहायचे आहे.

 'तुझं माझ्यावर प्रेम नाही. मी तुला इतके पैसे देतो. कधी कधी घोडयाच्या गाडीतून फिरवतो तरी तुझं प्रेम नाही.  का बरं असं? माझ्या मनाला काय वाटत असेल? तुझा त्याग करावा असं मनात येतं; परंतु तो कृतघ्नपणा होईल म्हणून भितो.''तुमचंही माझ्यावर कुठं आहे प्रेम? मलाच का एकटीला गाडीतून फिरवता? दुसर्‍या कुणी अवदसा नाही बसल्या तुमच्या गाडीत?''आपल्याच जातीच्या लोकांना शिव्या देणं वाईट.''आमची जात म्हणजे काय वाईट?''मग वेश्या होणं का चांगलं?''चांगलं नसेल तर लाळ घोटीत त्यांच्याकडे का जाता?''क्षणभर करमणूक.''आम्ही काय करमणुकीपुरत्या?''अग, थटटा केली. अशी रागावू नकोस. आज तरी इथं तुला एकटीलाच आणलं की नाही? खरं प्रेम तुझ्यावरच.''अगदी गळयाशपथ?''होय, शपथ.''खरंच, तुमच्याबरोबर बोलण्यात मला मजा वाटते. वेळ कसा पटकन जातो. तुम्ही माझ्याकडे आला नाहीत म्हणजे मी अधीर होते. हसता काय? खोटं नाही सांगत.''अगदी गळयाशपथ?''हो गळयाशपथ.'असा दुसर्‍या जोडप्याचा संवाद चालला होता आणि तिसरे? तिसर्‍याचाही थोडा प्रकार पाहू या. बोलण्यावरून माणसाची परीक्षा होते. बोलण्याच्या स्वरावरून परीक्षा होते. त्या वेळच्या मुद्रेवरून परीक्षा होते.'मला तुम्ही मोत्यांचा हार कधी देणार? देईन देईन म्हणता नि काही नाही. फसवी तुमची पुरुषांची जात!''आणि तुमची मोठी प्रामाणिक वाटतं? स्त्रियाच पुरुषांनाही जन्म देतात. स्त्रियाच फसव्या असतील म्हणून पुरुष फसवे होतात. स्त्रियांच्या ओठांवर साखर असते; पोटात विष असतं. बोलणं, हसणं गोड; परंतु मनांत डोकावून पाहिलं तर ? रामराम ! सारी घाण.'

 'आपण या सुंदर ठिकाणी भांडायला का आलो? ही फुलं तुझ्या केसांत घालू?''काही नको.''नको म्हणजे हवीत. बायकांचं उफराटं बोलणं, अहंभावी बोलणं.''किती घाणेरडी आहेत ती फुलं!''माझा हात लागून घाणेरडी झाली. तुझ्या केसांचा स्पर्श होऊन सुंदर होतील!''एक सुंदरसा बंगला कधी घेऊन देणार?''तुझं माझं लग्न लागेल तेव्हा.''अजून नाही का लागलं?'

'तसं देवाधर्मासमक्ष कुठं लागलं आहे?''देव सर्वत्र आहे ना? आपण एकत्र आलो त्या क्षणीच लग्न लागलं. ते देवानं पाहिलं. हृदयातील धर्मानं अभिनंदिलं.  हसता काय?''परंतु मंत्र वगैरे कुणी म्हटले का? माझे बाबा वगैरे तिथे होते का?''मंत्र म्हणणं म्हणजे धर्म वाटतं? खरंच सांगा, तुमचं माझं लग्न विधिपूर्वक करायचं म्हटलं तर तुमचे वडील वगैरे येतील का?''जाऊ देत ही बोलणी. प्रेमात रमावं. जाईल दिवस तो आपला. पुढचं फार पाहू नये. आज आपण आनंदात आहोत ना?''आणि उद्या?''उद्याचं कोण सांगू शकेल? जगात नक्की असं काय आहे? सारं अस्थिर व चंचल. जाईल दिवस तो मजेत दवडावा. ऊठ. कोणी तरी येत आहे.''माझा हात धरून उठवा.'

'मला नाही उठवत.''मी तर हलकं फूल आहे.''तुम्ही असता फुलाप्रमाणं, परंतु बसता मानेवर दगडाप्रमाणं.''तुमच्या गळयाला का फास लावतो आम्ही?'

 'फासही बरा. तो क्षणभर गुदमरवतो व मारतो तरी. जीव सुटतो; परंतु तुम्ही गळयात हात घातलेत की गुदमरवता; परंतु मारीत नाही. पुन्हा ते हात दूरही करता येत नाहीत. सुकुमार, परंतु जड, खरं ना? बरं, ऊठ आता.'त्याने हात धरून तिला उठविले. दोघे निघून गेली. झाडांची पाने सळसळ वाजत होती. काही फांद्या वाकून त्या जोडप्यांच्या कानगोष्टी ऐकत होत्या. त्या जंगलातील रस्त्यांवरील विद्युद्दीप चमकू लागले. किती सुंदर दिसत होते दृश्य! हिरव्या हिरव्या झाडीत ते विजेचे दिवे; परंतु फिरायला जाणारे परतू लागले. एखादे वेळेस वाघाच्या डोळयांचीही  बिजली दिसायची.आमची तिन्ही जोडपी त्या हॉटेलात आली. भोजने झाली. तांबूलभक्षण झाले. गाणे झाले. गप्पा झाल्या. विनोद झाले. सारी झोपण्यासाठी आपापल्या जागी निघून गेली.रात्र गेली. उजाडले आता;परंतु आमच्या त्या तीन युवती अद्याप उठल्या नव्हत्या. बाहेरही जरा थंडच होते. गुलाबी झोपेत त्या होत्या; परंतु गुलाबाचे काटे अजून कळायचे होते. बर्‍याच वेळाने आपापल्या खोल्यांत त्या तिघी  जाग्या झाल्या, परंतु त्या तिघींचे प्रियकर नव्हते. ते कोठे गेले व केव्हा गेले? येथे निजले तर होते. केव्हा उठून गेले?त्या तिघी सर्वत्र हिंडल्या, परंतु प्रियकरांचा पत्ता नाही. त्या आपापल्या खोल्यांत जाऊन बसल्या. बराच वेळ झाला तरीही कोणी आले नाही. शेवटी त्या तिघी एके ठिकाणी बसून नवीन विचार करू लागल्या.पहिली : हे असे कसे गेले? गोडगोड बोलून यांनी गळा असा कसा कापला? माझ्या मनात संशय येई तो खरा झाला.दुसरी : येथे आणून आपणास सोडून गेले असे दिसते.तिसरी : तरीच मला म्हणाले, उद्याचे कोणी सांगावे? जाईल दिवस तो आपला.पहिली : मग आता काय करायचे?दुसरी : आपल्याला विचार करण्याची जरूरीच नाही. पिढीजात आपला धंद असाच आहे. हा गेला तर तो. तो गेला तर आणखी कोणी. जगात पुरुष आहेत तोपर्यंत आपणास चिंता नाही.तिसरी : बरे झाले मेला गेला तो. पैसे देई, पण अगदी घाणेरडा.

 दुसरी : आपला हा काही पहिलाच अनुभव नाही.पहिली : मला तरी हा पहिलाच अनुभव आहे. काय करावे, आता कोठे जावे?तिसरी : चला परत मुंबईला जाऊ. आपली दुकाने थाटू.पहिली : मी दुकान थाटून बसू? आयुष्याची, अब्रूची, सौंदर्याची, तारुण्याची का विक्री करू? असे कसे मी करू? माझं त्या तरुणावर प्रेम होते. मी त्याला देव मानले. मी मनाने त्याला सर्वस्व दिले. तो मला सोडून गेला तरी त्याची स्मृती माझ्याजवळ आहे. तो फसवणारा निघाला म्हणून का मीही त्याला फसवू? मी कुठेही जाईन, मोलमजुरी करीन व त्याचे चिंतन करीत राहीन. प्रेम एकदाच देता येते. ते पुन्हा कसे कोणाला देता येईल? ते कोठे आहे आता देण्यासाठी शिल्लक? सारे त्याला दिले. माझ्या लिलीच्या जन्मदात्याला सारे दिले.तिसरी : तुम्ही वेडयासारखं काय बडबडता? असली भाषा आपणासारख्यांच्या तोंडी शोभत नाही.पहिली : आपण का माणसं नाही?दुसरी : आपण माणसांची करमणूक आहोत.पहिली : मला तुमचं बोलणं समजत नाही.

दुसरी : हळुहळू समजेल.त्या पुन्हा आपल्या खोल्यांत गेल्या. एक दिवस गेला. दोन गेले. त्यांच्या प्रियकरांचा पत्ता नाही. शेवटी हॉटेलवाल्याचे बिल देऊन त्या तिघी निघून गेल्या.कोठे गेल्या निघून? दोघींचे माहीत नाही. एकीचे माहीत आहे. त्या लिलीच्या आईचे माहीत आहे. ती मुंबईत जेथे राहात असे तेथे परत गेली. आता त्या शहरात तिला राम वाटेना. जवळचे सारे विकून थोडेसे पैसे जमवून ती लहान मुलीला घेऊन मुंबई सोडून निघाली.लिलीचे पुढे कसे होईल; हीच एक त्या तरुण मातेला चिंता होती. ती लिलीकडे बघे व मनात म्हणे, 'लिली न जन्मती तर मी जीव दिला असता, परंतु लिलीसाठी जगले पाहिजे. लिलीचे लग्न होईपर्यंत, तिचा संसार सुरळीत सुरू होईपर्यंत तरी मला जगले पाहिजे; परंतु लिलीला कसे वाढवू? कसे हिचे पालनपोषण करू? घर ना दार. देहाचे दुकान मांडू? छे, ती कल्पनाच असह्य वाटते. मग काय करू? आणि लिली जवळ असेल तर कोठे कामधाम तरी कसे करता येईल? हिला कोणाजवळ ठेवायची?'

 असे अनेक विचार त्या मातेला त्रस्त करीत होते. लिलीला कुशीत घेऊन ती रडे. रडता रडता झोपी जाई. असे करीत, हिंडत हिंडत ती एका गावाला आली. सायंकाळी पाच-सहा वाजण्याची वेळ असेल. ही दमलेली आई एका झाडाखाली पडली होती. जवळ तिचे बाळ झोपले होते. उशाशी एक पेटी होती.त्या झाडाजवळ एक खाणावळ होती. त्या खाणावळवाल्याची मुले या झाडाजवळ खेळत होती. एकमेकांचे डोळे धरीत, लपत, कोणी कुणाला पकडी. पळापळ होई. एक खेळ संपे. दुसरा सुरू होई. भातुकली मांडीत. झाडाची पडलेली पाने ह्याच पत्रावळी. त्यांच्यावर काही तरी लुटुपुटीचे वाढायचे, सर्वांनी खायचे, लुटुपुटीच्या द्रोणातून लुटुपुटीची कढी भुरकायची. मग कोणी एखादा कागद आणी. त्याची कोणी होडी करी, कोणी पंखा करी, कोणी फाडून पीळ भरून झाड करी. मुलांच्या गंमती. आमची लिलीही हळूच उठून त्या मुलांत मिसळली. तीही हसू लागली. खेळू लागली. लुटुपुटीचे जेवू लागली. त्या मुलांना गंमत वाटली. त्यांनी तिला आपल्यात घेतले. लिली फार सुंदर दिसे.'कशी आहे मुलगी?' त्यांच्यातील एक म्हणाली.

'साबुदाण्यासारखी.' दुसरी बोलली.'दुधासारखी.' तिसरी बोलली.चौथीला अद्याप उपमा सुचत नव्हत्या. खाणावळवाल्याला मुली बर्‍याच होत्या. मुलगा एकच होता.लिलीची आई जागी झाली; परंतु जवळ मुलगी दिसेना. ती कावरीबावरी झाली. मुलगी कोणी घेऊन तर नाही गेले असे मनात येऊन ती दचकून उठली. तोच समोर लिली दिसली. खेळण्यात दंग होती. त्या मुलामुलींशी एकरूप झाली होती. घाबरलेली माता कौतुकाने लिलीचा खेळ पाहू लागली.'आता घरात या रे. पुरे खेळ. तिन्हीसांजा झाल्या.' खाणावळवाल्याची बायको दारातून म्हणाली. ती मुले खेळ आटोपून निघाली. त्यांच्याबरोबर लिलीही निघाली. ती मुले थांबली. ती विचार करू लागली. इतक्यात लिलीची आई तेथे आली व लिलीने तिला मिठी मारली.

 'तुम्ही तिची आई वाटतं?' मोठया मुलीने विचारले.'हो.''छान आहे तुमची मुलगी. आमच्यात तर इतकं सुंदर कोणी नाही. तुम्ही झाडाखाली राहाता? तुमचं इथंच घर?''हो. या झाडाखाली घर.''थंडी लागेल, पाऊस लागेल, परंतु उन्हाळयात बरं. नाही?''येता की नाही घरी?' ती आई दारातून पुन्हा म्हणाली. ती सारी मुले गेली. लिलीची आई लिलीला घेऊन झाडाखाली बसली. तिच्या मनात किती तरी विचार येत होते. शेवटी तिने त्या खाणावळवाल्या बाईकडे काही तरी  विचारण्याचे ठरविले. ती तिच्याकडे गेली.'कोण पाहिजे तुम्हाला? ते तर बाहेर गेले आहेत.' खाणावळवाली बाई म्हणाली.'मला तुमच्याशीच आधी काही बोलायचं आहे.''काय बरं?''मी एक गरीब मुलगी आहे. तुम्ही जणू माझ्या आईसारख्या. मी संकटात आहे. मला कोणी आधार नाही. मी व ही माझी मुलगी दोनच आम्ही. या मुलीचं कसं पालन-पोषण करावं याची चिंता वाटते. मी काही मोलमजुरी करीन, तर हिला कुठं ठेवू? मघा माझी मुलगी तुमच्या मुलांच्या खेळात रंगून गेली. तुमच्या मुलांनीही तिला आपल्यात घेतलं. माझ्या मनात विचार आला की, माझ्या मुलीला तुमच्याकडेच ठेवावं, तुमची इतकी मुलं आहेत त्यांत ती वाढेल. तिच्यासाठी निराळं फार काही करायला नको. मी तिच्यासाठी दर महिना पाच रुपये पाठवत जाईन. दर साल एक वाढवीत जाईन. मध्येच जास्त कमी लागलं तरी पाठवीन. तुम्ही तिला वाढवा, शाळेत घाला, शिकवा. ती जसजशी वाढेल तसतशी मी रक्कमही वाढवीन. मुलीची जात, पोलकं, परकर सारं लागतं. ठेवाल का तुमच्याकडे? कराल का या मातेवर दया?' लिलीच्या आईने डोळयांत पाणी आणून विचारले.

'मी काय सांगणार? ते घरी आले म्हणजे त्यांना विचारीन व मग काय ते कळवीन. माझ्या मते ठेवायला हरकत नाही. इतकी मुलं आहेत त्यांत आणखी एक. भरल्या गाडयाला मुठीचं का ओझं होतं? पाहीन विचारून हो.'

 लिलीला घेऊन तिची आई झाडाखाली बसली. आईच्या मांडीवर लिली होती. हसत होती. आकाशातील चांदोबाकडे झाडाच्या पानांतून ती पाहात होती. थोडया वेळाने खाणावळीतून बोलावणे आले. लिलीला घेऊन तिची आई गेली.'ऐकलं तुमचं म्हणणं. परंतु 7 रुपये हवेत. पुढच्या वर्षी 8, मग तिसऱ्या वर्षी 10 चौथ्या वर्षी कळवीन. अहो, अनेक खर्च असतात. आजारीच पडली, काढाच ठेवा, सुंठ आणा, - एक का दोन, मुलांची शेकडो दुखणी. गोवर आहे, कांजिण्या आहेत, देवी आहेत. नाना प्रकार. पाच रुपयांत कसं व्हायचं? थंडीत गरम कापड हवं, उन्हाळयात मलमल हवी. हो, सारं नीट नको का करायला? आणि सहा महिन्याचे पैसे आज आगाऊ आधी मुलीला ठेवताना. कारण तुम्हाला नोकरी कधी मिळेल त्याचा काय नेम? हल्ली सर्वत्र बेकारी. पाहा परवडत असेल तर. मी ठेवायला तयार आहे. सारं मनापासून करीन. तशी आमची ही प्रेमळ आहे. ठरवा तुमच्या मनात.' खाणावळवाला म्हणाला.

 'काय ठरवू मी? सात तर सात; परंतु ठेवा. कुठं घेऊन जाऊ तिला मी? तुमचीच मुलगी माना.' लिलीची आई म्हणाली.'परंतु सहा महिन्याचे पैसे?' त्याने विचारले.'देत्ये ना ते.' ती म्हणाली.'ठीक. ते झाडाखालचं सामान घेऊन इथं या. जाईपर्यंत इथंच राहा.' त्याने आस्थेने सांगितले.'रात्रभर विसावा घेऊन मी उजाडताच जाईन. कुठं तरी कामधंदा पाहिला पाहिजे. इथं थांबून काय करू?' ती बोलली.खाणावळवाल्याच्या एका खोलीत ती माता राहिली. तिने आपल्या मुलीला जणू शेवटचे पोटभर जेवू घातले. घोटभर कढत दूध पाजले. तिला कुशीत घेऊन ती पडली. तिला झोप येईना. मुलगी कुशीत झोपली होती. आईला अगदी चिकटून झोपली होती.पहाटेची वेळ झाली. ती माता उठली. मुलीला सोडून जाणे तिला भाग होते. लिली उठल्यावर ते शक्य नव्हते. तिला झोपेतच सोडून जाण्याशिवाय मार्ग नव्हता. त्या अभागिनीने मुलीचा शेवटचा मुका घेतला. पुन:पुन्हा ती लिलीकडे बघत होती. तिची तृप्ती होईना; परंतु ती उठली. त्या खाणावळवाल्याला व त्याच्या बायकोला ती म्हणाली, 'माझी मुलगी तुमच्या पदरात मी घालीत आहे. जपा तिला. तिला पोटच्या मुलाप्रमाणं वागवा. आईची तिला आठवण होऊ देऊ नका. तिच्या डोळयांतून पाणी नका येऊ देऊ. तिला काही कमी नका करू.'ती दोघे म्हणाली, 'काळजी नका करू. आम्ही सारं नीट करू.'ती माता निघून गेली. लिली झोपेत हसत होती.

***

Rate & Review

Verified icon

Shashi 6 months ago

Verified icon
Verified icon

Krishna Walunj 9 months ago

Verified icon

tushar gaikwad 9 months ago

Verified icon

harihar gothwad 9 months ago