Dukhi - 10 books and stories free download online pdf in Marathi

दुःखी.. - 10

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

१०. क्रांतीची ज्वाला भडकली

कामगारांत खूप अशांतता होती. मालकांनी एकदम पगार कमी केले. तिकडे शेतकरी प्रक्षुब्ध होत होते. दुष्काळ पडला होता; परंतु दुष्काळातही सावकारांनी चालविलेल्या जप्त्यांचा सुकाळ सुरू होता. जिकडे तिकडे भुकेचे भूत स्वैर संचारू लागले. जगातील श्रमणार्‍या किसान कामगारांची भूक शांत होईल तेव्हाच जगात शांती येईल.दिलीपचे तरुण मंडळ एकत्र जमले. ते मित्र सर्व परिस्थितीचा विचार करीत होते.'उठाव करावा, झेंडा उभारावा.' एक म्हणाला.'परंतु ते शक्य आहे का? पाऊल टाकणं सोपं. पुढं निस्तरणं कठीण.''शक्याशक्यतेच्या चर्चा करू तर कधीच काही हातून होणार नाही.''आणि अपयश आलं तर?''जगात एकदम यश कोणाला मिळालं आहे? आपल्या अपयशातून भावी यश फुलेल. अशा अनुभवातूनच जग पुढं जात असतं. अनेक अपेशी प्रयत्‍नांतून एक दिवस यश उभं राहातं. शेकडो वेदनांतून, अपयशांतून समाजाची नवीन घडी निर्माण होते; नवीन क्रांती जन्मते. आपल्या त्यागातून व बलिदानातून उद्याच्या यशस्वी क्रांतीचा पाया घातला जाईल. आपण आज बी पेरू, उद्याच्या पिढीला कणीस मिळेल.''आपल्याजवळ साधनसामुग्रीही नीटशी नाही.''मोडकीतोडकी आहे ती पुरे. कामगारांनी इकडून तिकडून गोळा केली आहे. भूत बंगल्याची गढी करू व लढवू.'

'भूत बंगला नको. माहीमच्या बाजूस एक प्रचंड वाडा आहे. तिथं आपण सारे जमू. कामगारांची सारी पथकं तिथं न्यावी. वाडा पडला तर जवळच दुसराही आहे त्यात घुसू. त्याची गढी करू व लढू.''कोणता दिवस?''वर्षप्रतिपदेचा दिवस. त्या दिवशी शालिवाहन राजानं जय मिळवला. दंतकथा आहे की, त्या राजानं कुंभाराच्या मडक्यांचे घोडेस्वार केले व लढाई जिंकली. दंतकथेचा अर्थ इतकाच, लोकांची डोकी मडक्यासारखी झाली होती. डोक्यात ना तेजस्वी विचार, ना भावना; परंतु शालिवाहन राजानं त्यांच्यात तेज फुकलं. तसे आपण शेतकरी, कामगार आजपर्यंत धुळीत पडलो आहोत. आता उठू. झुंजार बनू. वर्षप्रतिपदेचा दिवस, त्या दिवशी क्रांतीचा झेंडा उभारू.'सर्वांनुमते तो दिवस ठरला. गुप्त बैठकी होऊ लागल्या. कामगार संपावर गेले. वातावरण विजेने भरल्यासारखे झाले. सरकारी पलटणी व घोडेस्वार रस्त्यांतून हिंडू लागले. लोक भयभीत होऊन पाहू लागले. काही तरी भयंकर होणार, असे वाटू लागले. भित्र्या श्रीमंतांनी आपली मुलेबाळे, बायकामाणसे परगावी पाठवली; परंतु गरीब कोठे जाणार?दिलीप त्या क्रांतीत होता. त्या झटापटीत त्याला मरण आले तर? गोळी लागली, लाठी बसली तर? फाशी गेला तर? लिलीला शेवटचे भेटावे असे त्याला वाटत होते, परंतु त्याला वेळ नव्हता. त्याने लिलीला पत्र लिहिले; परंतु पत्र कोण नेऊन देणार? त्याने बाहेर पडणे धोक्याचे होते. छबी होती ती एकदम त्याच्यासमोर आली.'काही काम आहे?' तिने विचारले.'लिलीला हे पत्र नेऊन द्यायचं.' तो म्हणाला.'किती कठीण काम!' ती म्हणाली.'तू केलं पाहिजेस.''करीन; परंतु पुढच्या जन्मी तरी मला प्रेम द्या. या जन्मी लिली, पुढच्या जन्मी मी. पुढच्या जन्मी मला विसरू नका, दूर लोटू नका, माझा उपहार करू नका हो.'छबी पत्र घेऊन गेली. दिलीपकडे किती तरी तरुण येत होते, जात होते. लिलीची तो वाट पाहात होता. रात्र पडली तर लिलीचा पत्ता नाही.

दिलीप रात्री आपल्या मित्रांबरोबर त्या माहीमच्या वाडयात गेला. उजाडत बंडाचा झेंडा, क्रांतीचा झेंडा त्या वाडयावर फडकवणार होता. वाडयात क्रांतीचे सैनिक जमले होते. त्यांनी मोडक्यातोडक्या बंदुका दुरुस्त केल्या. चोरून आणलेला दारूगोळा तेथे होता. तेथे एक मोडकी तोफ होती. ती त्यांनी उभी केली.आज शहरात लष्करी कायदा आहे. कोणी घराबाहेर पडायचे नाही. हुकूम आहे. ती पाहा सरकारी पलटण! त्या पाहा तोफा, ते घोडेस्वार! माहीमच्या रस्त्याला चालले लष्कर.क्रांतिकारकांच्या वाडयापासून काही अंतरावर सरकारी तोफा उभ्या राहिल्या. सूर्य वर आला. वाडयावर क्रांतीचे निशाण झळकले. सूर्याने सोनेरी किरणांनी त्या झेंडयाला आलिंगन दिले. वार्‍याने गाणे म्हटले. त्या वाडयातून क्रांतिगीतांच्या घोषणा सुरू झाल्या. समोरच्या सरकारी तोफेतून गोळा सुटला. धुडूम धुडूऽम - आवाज झाला. वाडे हादरले, तावदाने खळकन् पडली. भिंतीवरची घडयाळे पडली. धुडूम धुडूऽम. तो पाहा एक गोळा झेंडयाला चाटून गेला. झेंडा पडू नये म्हणून तो पाहा एक वीर तेथे उभा राहिला. आला, गोळा आला! त्या वीराच्या चिंधडया झाल्या. झेंडयाची या लाल तुकडयांनी पूजा झाली. हुतात्म्याच्या रक्ताने झेंडा रंगू लागला आणि तो पाहा एक युवक! बारा-चौदा वर्षांचा असेल. सरकारची फौज व क्रांतिकारकांचा वाडा यांच्यामध्ये तो रस्त्यात उभा आहे. आगीच्या वर्षावात उभा आहे. सरकारी तोफांतून येणारे काही गोळे जमिनीवर पडत. जे फुटत नसत ते तो युवक उचली. टोपलीत भरून क्रांतिकारकांना नेऊन देई. शाबास त्याची. मध्येच तो आपली टोपी उडवी व क्रांतीचा जयजयकार करी. वाडयातील क्रांतिकारक ब्युगुले वाजवीत. परंतु - अरे, तो पाहा लाल गोळा आला. त्या कोवळया मुलाचे तुकडे झाले. ते दशदिशांत उडाले. मरताना क्रांती म्हणून तो ओरडला. अणुरेणूतून तो आवाज घुमला. वाडयावर गोळे पडत होते. वाडयाचा काही भाग पडला. काही लोक उघडे पडले. बंदुकींच्या फैरी झडू लागल्या. ती पाहा एक गोळी सूंऽ करीत आली. दिलीपला लागणार, लागणार. हे काय? कोणी तरी त्याला एकदम दूर लोटले व ती गोळी स्वत:च्या छातीवर घेतली. ती व्यक्ती पडली. दिलीप तिच्याजवळ गेला. कोण होती ती व्यक्ती?

'अरे, ही तर छबी! ती पुरुषाचा पोषाख घालून आली होती. प्रियकराच्या रक्षणासाठी आली होती. त्याच्यासाठी प्राणार्पण करायला आली होती. रक्तबंबाळ होऊन ती पडली होती. दिलीप तिच्याजवळ बसला.''तू माझ्यासाठी गोळी घेतलीस?''या उदरात प्रेम आहे. या गोळीच्या वेदना नाहीत. मी तर आता मरणार; परंतु एका गोष्टीची क्षमा करा.''तू माझ्यासाठी प्राण दिलेस. मी काय क्षमा करू?''तुम्ही लिलीसाठी चिठठी दिलीत, ती मी नेऊन दिली नाही. मत्सर मनात आला. क्षम्य नाही का तो? एखादे वेळेसही लिलीचा मला हेवा नये का वाटू? तुमचं प्रेम तिला मिळावे व मला एक कणही नये का मिळू? परंतु ती चूक झाली. मी फसवलं तुम्हाला, ही पाहा ती चिठठी. ही घ्या. क्षमा करा. म्हणा क्षमा म्हणून. जरा माझं डोकं तुमच्या मांडीवर घ्या. एक क्षणभर.'त्याने तिचे डोके मांडीवर घेतले. तिने त्याचा हात हातात घेऊन प्राण सोडले. दिलीप उठला. लिलीला त्याचा शेवटचा निरोप शेवटी नाहीच मिळाला. कोण नेईल निरोप? एक तरुण तयार झाला. तो म्हणाला, 'मी जातो.'तो तरुण कसा तरी गेला. मोठया शर्थीने लिलीच्या पत्त्यावर गेला. ती चिठ्ठी त्याच्या हातात होती. तो त्या घरात जाणार, इतक्यात वालजी तेथे भेटला.'कोण पाहिजे?' वालजीने विचारले.'ही चिठठी द्यायची आहे.' तो तरुण म्हणाला.

'मी देतो.''नक्की द्याल?''हो.''मी जातो तर. तिकडे लढाई सुरू आहे.'तो तरुण निघून गेला. वालजीने ती चिठ्ठी वाचली. लिलीच्या प्रियकराची शेवटची चिठठी. लिलीच्या प्रियकराचे प्राण वाचवण्यासाठी त्याला जाणे प्राप्त होते. दिलीप जर मेला तर लिलीचा आनंद नष्ट होईल. लिलीसाठी दिलीपला जगणे जरूर होते. वालजीने चिठठी तशीच स्वत:जवळ ठेवली. तो निघाला. तोही त्या क्रांतिकारकांच्या वाडयात आला. त्यांच्यात तो मिळून गेला. ती तोफ कोणाला नीट डागता येत नाही. वालजीने ती सुरू केली. क्रांतिकारकांकडचा तोफेचा गोळा! धुडूम धुडूम. इतक्यात वालजीच्या दृष्टीस कोण पडले? दोघे एकमेकांकडे पाहात राहिले.

'अहो, हा मनुष्य तुमच्यात कसा आला? हा तर सरकारी अधिकारी! म्हणूनच त्यानं तोफ निकामी केली. उडणार नाही असं सांगितलं. हा गुप्त पोलिस खात्यातील बडा अधिकारी आहे.' वालजी त्या पोलिस अंमलदाराकडे बोट करून म्हणाला.क्रांतिकारकांनी त्याला बांधून ठेवले. त्याचा मागून निकाल लावू असे ठरले. लढाई सुरू होती. तो सारा वाडा उद्ध्वस्त होत आला. त्या वाडयात राहाण्यात अर्थ नव्हता. जवळच्या दुसर्‍या वाडयात घुसावे असे ठरले. मंडळी निघाली; परंतु त्या बांधलेल्या अंमलदाराचे काय करायचे? त्याला गोळी घाला असे लोक म्हणाले; परंतु वालजी म्हणाला, 'तो माझा वाट आहे. सूड मीच घेईन.' इतरांनी बरे म्हटले. क्रांतिकारक बाहेर पडले. त्या दुसर्‍या वाडयात ते घुसू लागले. बाहेरून सरकारी पलटणींनी गोळयांचा वर्षाव केला. प्रेतांचा खच पडला. बाहेर अंधार पडला. रात्र झाली. वाडयाचे दार एकदम बंद करण्यात आले.इकडे वालजीने त्या अंमलदाराचे काय केले?'आता मी तुमच्या ताब्यात आहे. घ्या सूड.' तो अधिकारी म्हणाला.'मी तुम्हाला सोडून देऊन सूड घेतो.' वालजी म्हणाला.

वालजीने त्याला मुक्त केले. वालजी एकदम वाडयाबाहेर पडला. त्या दुसर्‍या वाडयात तो जाणार, तोच दरवाजा बंद! आणि त्याच्या पायाजवळ कोण? तो तर दिलीप! गोळीने जखमी पडला होता. त्याला शुध्द नव्हती. बाहेर अंधार होता. वालजीने एकदम दिलीपला पाठुंगळीस मारले. तो वाडयाच्या पाठीमागच्या वाजूने निघाला. धुडुम धुडुम गोळे येत होते. बंदुकींच्या गोळया सूं सूं करीत येत होत्या.वालजी जात होता. लिलीचे प्रेममय प्राण घेऊन जात होता. इकडे कोठे चालला वालजी? इकडे तर खाडी आहे. समुद्र आहे. ओहोटी होती. पाणी फारसे नसेल. वालजी पाण्यात शिरला. चिखल होता. मोठया कष्टाने पाऊल टाकीत तो चालला. तो पलीकडे आला. तेथे झाडाखाली तो बसला. त्याने दिलीपची जखम बांधली. त्याच्या डोक्यावर पाणी शिंपले. परंतु शुध्द नाही.

ते पाहा कोण आले. चोर की काय?'काय रे? तुझ्याजवळ काय आहे?''काही नाही. हे प्रेत आहे.''प्रेताच्या खिशात काय आहे?''बघतो. हे पाकीट आहे.''दे ते.'वालजीने दिले. ते दोघे गेले. इतक्यात शिटी ऐकू आली. घोडयाच्या गाडीचा आवाज झाला. गाडी थांबली. तिच्यातून पोलिस व एक अंमलदार खाली आले. ते वालजीजवळ आले.'हेच ते दोघे.' पोलिस म्हणाले.

'कोण दोघे?' वालजीने विचारले.'चोर, पळालेले चोर.' पोलिस म्हणाले.'मी चोर नाही. मी एका मरणोन्मुख माणसाला घेऊन बसलो आहे.'

'कोण, वालजी?' त्या पोलिस अंमलदाराने विचारले.'होय. आता पुन्हा मी तुमच्या ताब्यात आहे. परंतु एवढं करा, या जखमी तरुणाला तुमच्या गाडीतून न्या. त्याच्या घरी पोचवा. मग मला वाटेल तिकडे न्या.' वालजी म्हणाला. 'हा तरुण म्हणजे दिलीप. त्या श्रीमंत जहागिरदाराचा नातू. तो म्हातारा रात्रंदिवस याची आठवण काढून रडतो. त्याच्याकडे याला पोचवतो. चला, तुम्हीही बसा गाडीत.' अधिकारी म्हणाला.

गाडी चालली. त्या जहागिरदाराच्या बंगल्यावर थांबली. त्याला हाका मारण्यात आल्या. म्हातारा खाली आला. 'काय आहे?''हा तुमचा नातू घ्या. तो जखमी झाला आहे. जपा.''माझा नातू? कुठं आहे तो? जखमी झाला? कुठं आहे तो?'थांबा, घाई नका करू.'त्या सर्वांनी दिलीपला वर नेले. तेथे खाटेवर ठेवून तो अंमलदार व वालजी खाली आले. गाडी निघाली.'हे पाहा, वाटेत माझी खोली आहे. तिथं लिली आहे. तिला शेवटचा निरोप देईन. लगेच परत येईन. मग मला कुठंही न्या. फाशी द्या किंवा अंदमानात पाठवा. एवढी प्रार्थना मान्य करा.' वालजी त्या अधिकार्‍याला म्हणाला.'बरे.' तो अधिकारी म्हणाला.

गाडी थांबली. वालजी आत गेला. त्याने लिलीला उठवले. त्याने लिलीला सारे सांगितले. लिली रडू लागली.'रडू नको. दिलीप वाचेल. दोघं सुखानं राहा. गरिबांवर प्रेम करा. लिल्ये, जातो हो मी. माझी आठवण ठेव.' असे म्हणून तो निघाला; परंतु तो रस्त्यात येऊन पाहातो, तो तेथे गाडी नाही! कोठे गेली गाडी? कोठे गेला अंमलदार? त्याने उपकार स्मरून का वालजीसही सोडले?