Dukhi - 4 books and stories free download online pdf in Marathi

दुःखी.. - 4

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

४. अटक

त्या उदार पुरुषाचे मूळचे नाव वालजी. वालजी घोडयावर स्वार होऊन परत आपल्या शहरी आला. पोलिस लवकरच आपणास पकडणार ही त्याला खात्रीच होती. सायंकाळ होऊन गेली होती. त्याने आवराआवर केली. उरलेसुरले काम आटोपले. त्याने अंगात एक विशेष जाकीट घातले, त्यावरून आणखी एक अंगरखा घातला. त्यावरून आणखी एक जाड लांब कोट घातला. त्याला दवाखान्यात जाऊन त्या अभागिनीची भेट घ्यायची इच्छा होती. तिची मुलगी आणण्याचे त्याने कबूल केले होते; परंतु अकस्मात हा खटला आला. त्या मुलीकडे जाण्याचे राहिले आणि आता तर ते शक्य नव्हते; परंतु त्या आईला भेटता आले तर पाहावे असे वालजीला सारखे वाटत होते.त्या अभागिनीचा ज्या पोलिस अधिकार्‍यासमोर त्या दिवशी तो खटला चालला होता. त्या पोलिस अधिकार्‍याने त्याच वेळेस वालजीला ओळखले होते. घसरणार्‍या मालाच्या गाडीला एका खांद्याने वर उचलणारा असा शक्तिमान दुसरा कोण असणार? वालजीच्या शक्तीच्या कथा पोलिसांत पसरलेल्या होत्या. त्याचे फोटोही होते. त्याच वेळेस त्या पोलिस अधिकार्‍याने वालजीस पकडले नाही. वालजी नगराध्यक्ष होतो. तो उदार म्हणून प्रसिध्द होता. सारे लोक त्याला देवाप्रमाणे मानीत. त्याला एकदम अटक करण्याने दंगा झाला असता.त्या पोलिस अधिकार्‍याने अधिक पोलिस मागवून घेतले आणि आता तर हा वालजी ही शंकाच नव्हती. ते दुसरे पोलिसही इकडे आले. वालजीच्या शहरात आज जिकडेतिकडे पोलिस होते. चव्हाटयाचव्हाटयावर, नाक्यानाक्यावर पोलिस खडे होते.

रात्र झाली. दवाखान्यात कसे जावयाचे? सर्वत्र पोलिस होते. वालजीच्या घराजवळ एक संन्यासिनी राहात असे. वालजीची तिच्यावर भक्ती होती. तो रोज तिच्याकडे जावयाचा व तिला वंदन करून तिचा आशीर्वाद घेऊन यावयाचा. तो लपतछपत तिच्याकडे गेला.'माईजी, मला तुमच्याकडे थोडा वेळ लपू दे,' तो म्हणाला.'त्या खाटेखाली राहा,' ती म्हणाली.'कोणी चौकशीसाठी आले तर मी इथं नाही असं सांगा,' त्याने विनविले.आता रात्र बरीच झाली. वालजीच्या घराला गराडा पडला. सर्वत्र पोलिस उभे होते. तो पोलिस अधिकारी वर गेला; परंतु वालजी नाही! कोठे गेला वालजी? त्याने का पुन्हा हातावर तुरी दिल्या? आज बारा वर्षे त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. आपण प्रथम वर कळविले, हा नगराध्यक्ष वालजी आहे. नंतर कोर्टात ती गोष्ट जाहीर झाली. आपल्या हुशारीबद्दल आपणास बढती मिळेल, असे त्या नव्या पोलिस अधिकार्‍यास वाटत होते; परंतु आता तर फजितीची वेळ आली.शहरभर तपास सुरू झाला; परंतु वालजीचा पत्ता नाही.'त्या संन्यासिनीकडे ते जातात. तिच्यावर त्यांची भक्ती आहे,' कोणी तरी माहिती दिली.

'बस. तिथंच असेल तो,' पोलिस अधिकारी आनंदाने म्हणाला.पोलीस अधिकारी त्या संन्यासिनीच्या घरी आला. संन्यासिनी तेथे ध्यानस्थ बसली होती. दारावर टकटक आवाज झाला. संन्यासिनीने उठून दार उघडले.'काय पाहिजे?' तिने प्रश्न केला.'इथं नगराध्यक्ष आहेत का? ते तुमच्याकडे आहेत असं कळलं.''आहेत; नाहीत. नाहीत ते इथं.'

'प्रथम एकदम आहेत म्हटलंत?'

'ते चुकून आलं तोंडात.'

'मग नाहीत ना ते इथं?'

'नाहीत.'

'संन्यासिनीच्या शब्दांवर मी विश्वास ठेवतो. मी जातो. झडती घेत नाही. प्रणाम!' असे म्हणून तो पोलिस अधिकारी गेला.काही वेळा गेला. वालजी खाटेखालून बाहेर पडला. त्याने संन्यासिनीचे आभार मानले.'सार्‍या जन्मात आज खोटं बोलले,' ती म्हणाली.'देव रागावणार नाही,' तो म्हणाला.वालजी हळूच बाहेर पडला. तो बोळातून, अंधारातून, लपत छपत, सावधानपणे जात होता. पोलिसांचा सुळसुळाट जरा कमी होता. पोलिसांनी गावाबाहेर जाणारे रस्ते रोखून धरले; वालजी दवाखान्यात आला. रात्रीचे बारा वाजून गेले असतील. मध्यरात्री नगराध्यक्ष आले हे पाहून दाया, नोकर-चाकर चपापले.'ती स्त्री कशी आहे?' त्याने विचारले.'तिची आशा नाही. 'माझी मुलगी. माझी मुलगी' एवढंच ती म्हणते. घटका- दोन घटकांची ती सोबतीण आहे.' मुख्य दाई म्हणाली.'कुठं आहे ती?''या बाजूला.'वालजी लिलीच्या आईजवळ गेला. तो तिच्याजवळ बसला. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले.'लिलीला आणलंत? कुठं आहे ती?' तिने क्षीण स्वरात विचारले.'मला जायला झालं नाही, आणीन हो तिला.' तो म्हणाला.'आणीन! आणलं नाहीत ना? आता का मी जगणार आहे ती येईपर्यंत? जाऊ दे. देव आहे तिला. लिले, देव हो तुला -' असे म्हणून तिने निराशेने हात आपटले. तिने लगेच डोळे फिरवले. लिलीला पाहाण्यासाठी डोळे उघडे होते. आता ते मिटत चालले. नाडी सुटत चालली. शेवटची लक्षणे दिसू लागली. लिलीच्या आईने राम म्हटला.वालजी सदगदित झाला. तो म्हणाला, 'लिलीच्या आई, तुमच्या मुलीचा मी सांभाळ करीन. तुम्ही सुखानं स्वर्गात जा. तुमच्या आत्म्याला शांती मिळो! मी शक्य ते लिलीसाठी करीन. तिच्या सुखासाठी प्राणही फेकीन.'त्याला तेथे थांबण्याची आता आवश्यकता नव्हती. त्या अभागिनीच्या प्रेताच्या व्यवस्थेसाठी त्याने पैसे दिले. तो निघाला तेथून. कोठे गेला तो? तो पोलिसचौकीवर गेला. सारे स्तब्ध राहिले.'मला ना पकडायचं आहे? हा मी आलो आहे. पकडा मला!' तो म्हणाला. पोलिस अधिकारी तेथे आला. वालजीला पकडण्यात आले. जड शृंखला त्याच्या हातापायांत घालण्यात आल्या. उदारांचा राणा, अनाथांचा आधार पुन्हा एक चोर झाला.

Share

NEW REALESED