Farmhouse - 5 in Marathi Horror Stories by Shubham S Rokade books and stories PDF | फार्महाउस - भाग ५

Featured Books
Categories
Share

फार्महाउस - भाग ५

एखादा कागदाचा तुकडा असेल आणि जर तो पाण्यात टाकला तर तो झिजून झिजून नष्ट होतो .  पण उलट त्याच कागदाच्या तुकड्याच्या काही घड्या घातल्या आणि होडी बनवली तर ती होडी पाण्यात तरंगते .  त्याच कागदाच्या तुकड्याच्या घड्या वेगळ्या पद्धतीने घातल्या तर तोच कागदाचा तुकडा हवेतही उडू शकतो . त्याचप्रमाणे परिस्थिती व अनुभव मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या व स्वभावाच्या अशा प्रकारे घडी घालतात की कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी तो त्याविरुद्ध लढतोअनुभव मनुष्याला बनवतात  , उभा करतात आणि जगवतात .

आतापर्यंत गण्याने ही बऱ्याच चांगल्या-वाईट गोष्टी अनुभवल्या होत्या . त्या अनुभवावरून तो बरेच काही शिकलाही होता . त्यामुळे यावेळी तुरुंगात गेल्यावर त्याने स्वतःची स्थिती ढासळू दिली नाही.  तरीही राहून राहून त्याच्या मनात बप्पाचे विचार येत होते .

'बप्पा कुठे गेले असतील....?
गपचुप का गेले असतील ...?
मला मुद्दाम पोलिसांच्या तावडीत सोडलं असेल का .....?
त्यांनी ती डायरी का पळवली असेल ....?
त्या डायरीत काय होतं ....?
बप्पा खरंच माझी मदत करत होते का ....?
त्यांचा दुसरा काही हेतू असेल का ....?

असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आवासून उभारले होते . त्याची द्विधा अवस्था झाली होती बप्पांनी त्याला जाळ्यात ढकलून स्वतः मोकळे झाले असे एक मन म्हणत होतं .  तर दुसरे मन त्या कृतीमागचा चांगल्या कारणाचा शोध घेत होतं आणि बप्पा कसे त्याचा हितासाठीच त्याला  सोडून गेले हे सांगत होतं .....
हे विचाराचं द्वंद्व असाच चालू राहिलं असतं पण शेवटी त्याने या विचारांना मनाच्या तळाला दाबून टाकले.

पृथ्वीवर ती माणसं मरत असली , तरीही लोकसंख्या कमी होत नाही . उलट दिवसेंदिवस ती वाढतच जाते . माणसांच्या मनात सुद्धा कितीही वेळा विचार मनातून काढून टाकले तरी प्रत्येक वेळी नवीन विचार उगम पावतातच . त्यामुळे बप्पाबद्दल येणारे विचार मनाच्या गाभाऱ्यातून हाकलून दिले पण मनाचा गाभारा रिकामा कधीच राहत नाही . त्याला आता त्या डायरीचे विचार अस्वस्थ करीत होते .

एकूणात आतापर्यंत त्याच्याबरोबर घडलेल्या साऱ्या घटनाच विचित्र व अतर्क्य होत्या .  एकामागून एक अशा विचित्र घटनांच्या शृंखलेत तो सापडला होता . ती शृंखला तुटायचे नावच घेत नव्हती .  वरचेवर वरचेवर जास्तच अशक्य कोटीतील , भयंकर नि अमानवी अशा घटनांना तो सामोरे जात होता .

पहिल्यांदा जेव्हा तो मृत्यूच्या दाढेत अडकला होता त्यावेळी अंजलीने त्याला वाचवलं .  दुसऱ्यांदा अंजलीने त्याला स्वप्नात एका बंगल्याच्या आवारात नेले .  त्या वेळी हातात आलेली गोगलगाय व घरात घडलेला प्रकार  अमानवी होता .  तिथून सुरू झालेली ही शृंखला पुढे चालत राहिली . आज रात्री पुन्हा एकदा अंजली त्याला त्या पोलिसाच्या घरापाशी घेऊन आली होती जिथे पोलीस मरणाच्या वाटेवर निघाला होता . अंजलीने त्या पोलिसाला वाचवायला सांगितले पण त्या पोलिसाला वाचवताना तो स्वतः धारातीर्थी पडणार होता .  पण न जाणो कशामुळे तो जागा झाला व त्याचा मृत्यू चुकला .

त्याला अजूनही कोडं सुटलं नव्हतं .  ते म्हणजे तो स्वप्नात असायचा पण घडणाऱ्या सारा घटना खरोखरच घडायच्या . मग तो खरेच स्वप्नात असायचा कि वास्तवात...?  का तो एकाच वेळी दोन ठिकाणी असायचा ....? पण हे कसं शक्य होतं ...? विचार करून करून त्याचा मेंदू थकून गेला पण त्याला उत्तर सापडलं नाही .

एकापाठोपाठ एक विचित्र घटना त्याच्या आयुष्यात घडत चालल्या होत्या.  त्याला कोणतीच स्पष्टीकरणं  नव्हती स्पष्टीकरणं असली तरी , त्याला  ती स्पष्टीकरण  माहित नव्हती . जेव्हा तो त्या खोलीपाशी पोहोचला तेव्हा सर्वत्र गोगलगाय होत्या , पण जेव्हा त्याने आत पाय टाकला तेव्हा त्यांनी वाट करून दिली .  त्या माणसाला बाहेर सोडेपर्यंत वाट करून देणाऱ्या गोगलगाय नंतर आक्रमक का झाल्या ...?

या सगळ्या घटनांना वरचष्मा म्हणून त्या डायरीतली विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालू लागले .....जे खून त्याने केलेच नव्हते त्या खुनाचा आरोपी म्हणून त्याला पकडण्यात आलं होतं .  डायरीमध्ये ज्या खुनांचा उल्लेख होता त्या खुनाच्या आरोपात साठी त्याला पकडलं होतं ,  पण त्याने ते खून केलेच नव्हते . मग त्याला का पकडलं .....? उलट तो त्या पोलिस अधिकाऱ्याला वाचवायला गेला होता पण तोच अडचणीत सापडला.

त्याच्या मेंदूचा विचाराच्या ओझ्याने भुगा झाला . सर्व गोष्टीवरती प्रश्नचिन्ह दिसत होती . त्या प्रश्नांच्या गर्दीत त्याचं मन गुदमरून जात होतं .

क्रमःश