Kunu gaan shikte books and stories free download online pdf in Marathi

कुनू गाणं शिकते

कुनू गाणं शिकते
कुनू एक छोटी गोड मुलगी. तिला गाणी म्हणायला खूप आवडायचं.गाणी ऐकायलाही खूप भारी वाटायचं तिला. 
आई म्हणायची,"कुनू तुझा आवाज फार छान आहे गं.मधेच गुणगुणतेस तेव्हा किती छान वाटतं ऐकायला. मला आणि बाबांना वाटतं की तू गाणं गायला शिकावंसं." पण कुनू मात्र मुळीच तयार होईना  असं गाणं शिकायला.
"छे मला असं एकाजागी बसून गायला मुळ्ळीच आवडत नाही. गाणं म्हणताना मला नाचायला पण आवडतं.आणि तुम्ही ते करू देत नाही मला. मला नाही शिकायचं ताईसारखं सा रे ग म. ताईची टीचर घरातच बसून तिला सारखं सारखं तेच तेच म्हणायला लावते. मला नाही आवडत एकाच भिंतीकडे बघत बसून गाणं म्हणायला!"
   या गप्पांमधेच मे महिन्याची सुट्टी लागली.कूनू सुट्टीत आजोळी रहायला गेली. यावेळी ती आता सहा वर्ष पूर्ण झाली होती.त्यामुळे आपण आता मोठे झालो आहोत असं तिला वाटायला लागलं होतं!
  आजोबांच्या आमराईत कोकिळ पक्ष्याचं गाणं ऐकून कुनू खूपच खुश झाली.कुनूने आंब्याच्या झाडामागे लपलेल्या कोकिळ पक्ष्याला शोधायचं ठरवलं. पण तो काही केल्या सापडेना. भल्या पहाटे कुहू कूहू आवाजाने कोकिळ कुनूला हाक मारत असे.कुनूची झोपमोड होई. एक दिवस कुनू कोकिळ पक्ष्याला म्हणाली,"आता पुन्हा झोपमोड केलीस माझी तर खबरदार! कट्टीच करेन तुझ्याशी!" पण कोकिळ मात्र रोज पहाटे गातच राही. कुनूला वाटे की याला म्हणावं सगळेच कौतुक करतात याच्या गाण्याचं.आपण शिकावं का गाणं याच्याकडे? " तिने एकदा पहाटे उठून कोकिळ पक्ष्याला हाक मारली."कोकिळ पक्ष्या... मला शिकवतोस का गाणं तुझ्यासारखं? आवडेल मला असं झाडाच्या फांदीवर बसून गायला तुझ्यासारखं."
कोकिळ काही बोलेचना. नुसता रोज गातच राहिला.. आपल्याच नादात..
सुट्टीत आजोबांकडे गावाला गेलेली कुहू  एक दिवस डोंगरावर फिरायला गेली.भणाणता वारा तिच्या कानात शिरला. वार्‍याची शिट्टी तिला ऐकू आली." "वारा दादा,मला पण शिकव नं अशी शिट्टी वाजवायला". वारा तिला धावतच म्हणाला की "त्यासाठी असं सैरावैरा इकडेतिकडे पळावं लागतं,डोंगरांशी गप्पा माराव्या लागतात.मगच येते शिट्टी  वाजवता!"
कूनू जरा हिरमुसली पण ओठांचा चंबू करून शिट्टी वाजवायचा प्रयत्न करायला लागली.
आजोबांच्या गावी घरामागे पर्‍ह्याचं पाणी वाहत असे. डोंगरातल्या ओहळातून पाणी वाहताना ते कानाला फोर गोड वाटे ऐकायला आणि जिभेला गोड वाटे प्यायला!
ओहळाला कूनू म्हणाली" ओहोळकाका मला शिकव नं रे गाणं म्हणायला तुझ्यासारखं! आणि तुझ्या गाण्याला तर छान नादही आहे".
ओहोळकाका म्हणाला, अग वाटेतल्या दगडधोंड्यांशी मैत्री करायला लागते त्यासाठी. मग तेही तबला वाजवून माझ्या झुळझुळ आवाजाला साथ करतात."
डोंगरावरच्या सड्यांवर गवतात लोळण घेत छोटी छोटी रानफूलं मजेत डोलायची. ते पाहून कूनूला खूप आनंद होई.
"फुलांनो, मला शिकवां नं असं छान डोलायला.वार्‍यावर नाचायला, मज्जा करायला!" कूनू त्यांना म्हणाली.
फुलं गोंडस हसून म्हणाली. "त्यासाठी जमिनीच्या पोटात लपून बसावं लागतं वर्षभर. आत बसून अभ्यास करायचा आणि मग जमीन आईच्या पोटातून बाहेर आलं की लगेच नाचायला डुलायला सुरुवात करायची. वार्‍याशी मैत्री करायची त्यासाठी"!
कोकिळ पक्षी, वारा, ओहोळ ,फुलं यांच्याकडून गाणं शिकायची,नाच शिकायची इच्छा कुनूला स्वस्थ बसू देईना. पण ते जमणं तसं सोपं नाही हे ही तिला समजायला लागलं होतं.
आता काय करायचं बरं??!!
सूट्टी संपून कूनू घरी परत आली खरी पण आईला कळलं होतं की कुनूला काय वाटतय ते!
आईची मैत्रीण होती शालन मावशी. तिने शालन मावशीच्या घरी कूनूला नेलं.
शालन मावशी गायिका होती. तिच्या घरी मोठी बाग होती. शालन मावशी भल्या पहाटे आपल्या बागेत बसून तंबोरा घेऊन गात असे. पक्षी पण मधेच बडबड करून मावशीच्या गाण्यात आपलंही गाणं म्हणून घेत. सकाळचा थंड वारा कानात शिरे आणि गप्पा मारत असे.बागेतली फुलं सकाळी ताजीतवानी होऊन उठत आणि मावशीचं गाणं ऐकत बसतं.काही कळ्या तर पेंगतच ऐकत शालन मावशीचं गाणं!
कुनूला हे भारीच  आवडलं... शालन मावशी तू मला शिकवशील गाणं?
मावशी हसून म्हणाली" हो  शिकवेन की. पण तुला तर सा रे ग म शिकायला नाही नं आवडत??
" हो गं.मला नं घरात बसून सा रे ग म परत परत म्हणायला मुळ्ळीच आवडत नाही.पण तू मला इथेच बागेत बसून शिकवलस नं तर मी नक्की शिकेन." मला नं कोकिळ पक्ष्याचा आवाज ऐकत, वार्‍याशी गप्पा मारत, फुलांबरोबर बसून मज्जा करत गाणं शिकायचय... आणि तुझ्या बागेत हे सगळे मित्र मैत्रिणी आहेतच की! तुलाही छान वाटत असेल नं यांच्यासारखं गायला यांच्याबरोबर बसून??"
मावशी म्हणाली, "अगदी खरं आहे बघ कुनू. फूलं,वारा,पक्षी यांच्य सहवासात मला छान छान गायला सुचतं.पण एक गोष्ट मात्र खरी बरं का कूनू,, सगळ्यांनाच असं गायला आणि गाणं शिकायला मिळतं मोकळ्या निसर्गात असं नाही.त्यामुळे जेव्हा बंद घरात गाणं म्हणायला लागेल तेव्हा डोळे मिटून कल्पना करायची की हे सगळे सोबती आपल्याबरोबर आहेत. मग असा आनंद चार भिंतीच्या आतही मिळू शकतो".
कुनूला फारसं काही समजलं नाही पण मावशीचं म्हणणं तिला पटलं असावं.त्यामुळे
कुनूचं गाणं तर सुरु झालं... चला तर मग तुम्ही कधी जाताय वार्‍याची शिट्टी,ओहोळाचा खळखळाट ऐकायला?? आणि गाणं शिकायला??!