Shri Vyankatesh Stotr- krupa prasad aani MI books and stories free download online pdf in Marathi

श्री व्यंकटेशस्तोत्र, कृपाप्रसाद आणि मी!

श्री व्यंकटेश स्तोत्र(मराठी ) माझ्या नित्यातलेच. रोज वाचून वाचून ते आता मुखोदगत झालाय. कोणी तरी सांगितले कि स्तोत्र थोडे मोठ्याने आणि जप मनात करावा. स्तोत्र मोठ्याने म्हटल्याने घरातली 'नकारत्मकता' कमी होते. म्हणून मग मी जरा मोठ्याने म्हणू लागलो. तर त्यात एक सुंदर लय आणि गती गवसली. म्हणताना आनंदी समाधान मिळू लागले. बहुदा हि किमया सगळ्याच स्तोत्रात असावी.

या स्तोत्राची मांडणी (किंवा बांधणी म्हणा )खूप सुंदर आहे. श्री गणेशादिंची वंदना झाली कि, व्यंकटशाची नामावली येते, बहुदा एकशे आठ असावीत, मी कधी मोजली नाहीत. या नामावलीच्या शेवटी 'वैकुंठ निवासीय निरुपमा, भक्त कैवारीया गुण धामा, पाव आम्हा ये समयी' अशी प्रार्थना केल्या बरोबर, 'हृदयी प्रकटला ईश'! मग त्या प्रगटी करणाचे, म्हणजेच व्यंकटेशाच्या सगुण रूपाचे सुंदर वर्णन येते. 'सावळी तनु सुकुमार, कुम-कुम आकार पाद पद्मे' पासून सुरु होणारे वर्णन, थेट 'मस्तकी मुकुट आणि किरीटी ,सभोवती झिळमिळ्यांची दाटी, त्यावर मयूर पुच्छाची वेटी' पर्यंत येऊन थांबते. खरोखरच हे वर्णन इतके प्रत्यंकारी आहे कि, देवाची मूर्ती वाचणाऱ्याच्या डोळ्या पुढे उभी रहाते! त्यांनतर 'आता करू तुझी पूजा ' . पूजे नंतर, 'फल, तांबूल, दक्षणा शुद्ध' झाली, कि 'वर प्रसाद' मागितलाय! हीच ती या स्तोत्राची 'फल श्रुती ' . तशी सगळ्याच स्तोत्रात 'फल श्रुती' असते, पण यातल्या फलश्रुती ची 'बात हि कुछ और हैl ' देवाला काय,आणि काय काय मागावे याचे उत्तम उदाहरण! ज्ञानेश्वरीचे ' पसायदाना' पेक्षा, हि मला जवळची वाटते.

'मजलागी देई ऐसा वर ' म्हणून आपल्या मागण्या नोंदवल्यात!
१. ' मजलागी देई ऐसा वर, जेणे घडेल परोपकार'
हा ग्रंथ पठाण जो करी, त्यास
२. 'दुःख नसावे संसारी. '
३. 'पठाण (हे स्तोत्र )मात्रे चराचरी विजयी करी जगताते. '
४. 'लग्नार्थ्याचे, व्हावे लग्न.'
५. 'धनार्थ्याशी, व्हावे धन.'
६. 'पुत्रार्थ्याचे मनोरथ, पुत्र देऊनिया करावे.' पुत्र तरी कसा? तर,
'पुत्र-विजयी आणि पंडित, शतायुषी भाग्यवंत, पितृ सेवेसी अत्यंत रत ज्याचे चित्त सर्व काळ.'
'उदार आणि सर्वद्न्यपुत्र देई भक्ता लागून. '
७. 'व्याधीसष्टाची पीडा हरण, तत्काल कीजे गोविंदा.'
८. 'क्षय, अपस्मार, कुष्ठताधि रोग,ग्रंथ पठणे सरावा भोग.' (त्या काळचे, ते दूरधर रोग होते.)
९. 'योग अभ्यासासी योग,पठाण मात्रे साधावा.'
१० . 'दारिद्र्याचा व्हावा भाग्यवंत. '
११.' शत्रूचा व्हावा निःपात. '
१२. ' सभा व्हावी वश समस्त ,ग्रंथ पठणे करुनिया. '
अहो संपल्या का आपल्या मागण्या? काआहेत अजून काही? --- हो आता थोड्याच राहिल्यात!
१३. ' विद्यार्थ्यांशी विद्या व्हावी. '
१४. 'युद्धि शस्त्रे न लागावी. '
१५. 'पठणे जगात कीर्ती व्हावी, साधो म्हणोनिया.'
१६ 'अंती व्हावे मोक्ष साधन 'एव्हडे मागतो वरदान.'!
बापरे या मागण्या का काय? देव असला तरी, इतके मागायचे असते काय?

माझे एक मित्र आहेत. चांगला श्रद्धाळू माणूस. दर गुरुवारी, दत्त दर्शन कधी चुकले नाही त्याचे. एकदा मी गमतीने विचारले,
"आज काय मागितले दत्तमहाराजांना?"
" मी कधीच दत्तला, काहीच मागत नाही!"
"का?"
" अहो, ते काय डिमांड हाऊस आहे काय? त्याही पेक्षा 'ते ' सर्वज्ञ आहेत! त्यांना आपल्या अडचणी कळतात! आणि 'ते ' निवारण पण करतात! मग कशाला मागायचे? "
" तुमचे खरे आहे. तरी पण काही अपेक्षा असतीलच कि?"
" अपेक्षा, मारे ढिगालभर असतील! पण आपल्याला' काय ' हवाय हे, 'त्यांना 'आपल्या पेक्षा ज्यास्त कळत! योग्य ती तजवीज 'ते ' करतातच कि!"
हे अगदी खरे आहे. पण माझा दृष्टिकोन, ज -रा वेगळा आहे. आपण आपल्या नकळत्या वयात आपल्या आई कडे, 'मला लाडू दे, मला वरणभात दे' असा हट्ट करायचो. आई ते हट्ट पूरवायची पण. थोडे मोठे झाल्यावर हट्ट कमी झाले तरी, ते हट्टाचे ठिकाण मात्र तसेच कायम असते. आज माझी आई असती तर 'तुझ्या हातचे पिठलं करून दे!' असा मी हट्ट केला असता, आणि तिने तो पुरवलाही असता याची मला खात्री आहे. तसेच भक्ताचे आणि देवाचे नाते असावे. आई सारखे! हक्काने आणि हट्टाने मागण्याचे! आणि आई प्रमाणे, ते मागणे योग्य नसेल तर देवहि देणार नाही! त्यामुळे कृपा प्रसाद मागताना संकोच करू नये असे मला वाटते. असो.
तर असा 'कृपा प्रसाद ' मागितल्यावर श्री व्यंकटेश प्रसन्न होतात आणि 'वर ' देतात. तो असा.
'सर्व कामानेसी साधन, पठाण एक मंडळ, पुत्रार्थ्याने तीन मास, धनार्थ्याने एकवीस दिवस, कन्यार्थाने षण मास,ग्रंथ आदरे वाचावा. क्षय, अपस्मार, कुष्ट्ठादि रोग, इत्यादी साधने प्रयोग, त्यासी एक मंडळ सांग . पठाण करुनिया कार्य सिद्धी. '
येथे देवाने 'साधने प्रयोग ' सांगितले आहे. म्हणजे प्रयत्नासहित! नुसते स्तोत्र वाचून चालणार नाही!तुमच्या प्रयत्न्नांची जोड हवीच!अजून एक गोष्ट हा 'वर ' देताना सांगितली आहे, धना साठी एक्केवीस दिवस, पुत्रा साठी तीन महिने, तर कन्ये साठी मात्र 'षण ' मास! खरेच आहे. अहो पैसे,आणि पुत्रप्राप्ती पेक्षा 'कन्ये 'साठी अधिक पुण्य संचय हवाय! आदी शक्ती, नवनिर्मितीचे बीज धारण करणाऱ्या कन्ये साठी सहस्रावर्तने सुद्धा कमीच आहेत! पण कृपाळू भगवंत सहा महिन्यात देतोय! आणि काहीही सायास न करता होणाऱ्या कन्या मुळातूनच खुडणाऱ्याना ----------- काय म्हणावे?

तर असे हे एक गोड स्तोत्र आहे. पण हे वाचताना मला एक प्रश्न पडतो. आपला सारा आध्यात्म 'सगुणा कडून ' निर्गुणा ' कडे प्रवास असतो असे सांगते. चराचरात त्या दैवी शक्तीचे अधिष्ठाण अनुभवत, शेवटी 'मी ' व 'ती शक्ती ' एकच आहोत, इथपर्यंत यावे लागते, तेव्हा कोठे 'मुक्ती/मोक्ष ' प्राप्त होते. पण या स्तोत्रात श्री व्यंकटेशाच्या नामस्मरणातून म्हणजेच 'निर्गुण ' उपासनेतून, 'हृदयी प्रगटला ईश ' म्हणजे 'सगुण ' आले आहे! तसा मी 'मंदमति 'आहे. कोणी यातला ज्ञानी असेल तर कृपया मार्गदर्शन करावे.

तुम्ही भलेही कट्टर 'नास्तिक ' असाल, तरी तुम्हास एक विनंती आहे, हे स्तोत्र (केवळ १०८ ओव्यांचे आहे . तुमचा फारसा वेळ घेणारे नाही ) किमान एकदा तरी वाचा. एक साहित्यिक प्रकार म्हणून किंवा एक चारोळ्याचा संग्रह म्हणून. तुम्ही एका वाचनात 'आस्तिक ' होणार नाहीत, पण वाचनातून मिळालेला आनंद अप्रतिम असेल याची खात्री मी देतो.

श्री व्यंकटेशार्पण !शुभमभवतु !

-- सु र कुलकर्णी . आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye