Aanandi rahane soppe aste.. books and stories free download online pdf in Marathi

आनंदी राहणे सोप्पे असते..

आनंदी राहणे सोप्पे असते..

'मला दुःखात राहायच आहे..' अस कोणी बोलतांना कधी ऐकलय? पण त्या विरुद्ध मला नेहमीच मस्त जगायचं आहे हे मात्र बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकायला मिळते. सगळ्यांनाच आनंदी आणि सुखी राहायचं असत पण खूप कमी लोकं आनंदी राहू शकतात. त्याच कारण म्हणजे नेहमीच आनंदी राहायचं अस म्हणत सुद्धा आपण त्यासाठी उपयुक्त प्रयत्न करत नाही किंवा आपल्याला आनंदी करणाऱ्या गोष्टी उद्यावर ढकलत असतो. आपण सतत ऐकत असतो, 'आयुष्य क्षणभंगुर आहे आज आनंदी राहा', 'पैसा हे सर्वस्व नाही..' पण खरच आपण ह्या गोष्टीचा विचार करून वागतो का हा विचार करण्याचा मुद्दा आहे. 'उद्या मी आंनदी होईन' ह्या वाक्याला खरच काही अर्थ आहे का ह्या गोष्टीचा विचार महत्वाचा. आयुष्य धावपळीच झाल आहे. सतत कशाच्यातरी मागे आपण धावत असतो. पण धावपळीच्या आयुष्यात थोड थांबून स्वतःलाच विचारायची गरज असते, 'मी कधी निवांत बसले आहे?', 'मी कधी घरच्यांशी निवांत गप्पा मारल्या आहेत?', 'कधी मी मोबाईल, 'कॉम्पुटर समोरून लांब होऊन स्वतः बरोबर वेळ घालवला आहे?', 'कधी मी निवांत निसर्गात बसून एखाद आवडीच पुस्तक वाचल आहे?' ह्याच त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंदी बनवतात. आंनदी होण्यासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. पण ह्याचा कधी विचारच केला जात नाही. खूप साधे सोप्पे प्रश्न पण खूप कमी वेळा ह्या गोष्टींचा विचार होतो. म्हणूनच ह्या सगळ्यांची उत्तरे स्वतःशीच पडताळून पहायची गरज असते.. आणि जर ह्यातली काही उत्तरे जरी हो आली की तुम्हाला आनंदी कसे राहायचे माहिती आहे. पण ह्याची उत्तरे नाही आली तर नक्कीच आपल्याला विचार करायला लागणार आहे. आपल आयुष्य आपण सतत दुसऱ्याला काहीतरी दाखवायला जगत असतो पण त्यात आयुष्यातला आनंद मात्र हरवून बसतो. आनंदी राहाण आपला हक्क आहे आणि त्यासाठी आयुष्यात थोडे बदल केले तर आयुष्य बदलेल हे अगदी नक्की...पण फक्त आनंदी राहण्यासाठी निर्धार उपयोगी पडत नसतो. आयुष्य नेहमीच सुंदर असते. पण ते पाहण्याची कला येणे महत्वाचे. आनंद आपल्या अवती भोवतीच आहे पण ते दिसण्यासाठी डोळे उघडे ठेवण्याची गरज असते. थोड थांबून आतला आवाज ऐकण्याची गरज असते. आणि आतला आवाज ऐकू यायला लागला की मग कोणीही आपल्याला आनंदी राहण्यापासून अडवून ठेऊ शकत नाही. आनंदाची रेसिपी तशी सोप्पी आहे पण सगळ्याच प्रमाण योग्य झाल की आयुष्य आनंदाने भरून जाईल ह्यात शंका नाही.

१. स्वतःसाठी थोडा वेळ गरजेचा-

खूप काम, खूप ताण.. ह्यातून स्वतःकडे पाहायला, स्व संवाद करायला वेळ मिळतच नाही. जर आपण स्वतःशीच कनेक्ट झालो नाही तर आनंदी होण्याचा एक मार्ग बंद होतो. आपण स्वतःसाठी जेव्हा वेळ देतो तेव्हा नवीन नवीन कल्पना सुचायला सुरवात होते. स्वप्नांची आठवण होते. आणि त्या दिशेने वाटचाल चालू होते. आयुष्य म्हणजे फक्त पैसे नाही ह्याची जाणीव होते. पण हे सगळ जाणवायला स्वतः बरोबर वेळ घालवण गरजेच असत. आपल्याला काय आवडते हे शोधायचं असेल तर त्यासाठी स्व संवाद नेहमीच उपयुक्त ठरतो. त्यामुळे कितीही घाई, कितीही धावपळ असेल तरी थोडा वेळ स्वतःसाठी काढून आत्मचिंतन करायची नक्कीच गरज असते. आभासी जगातून थोडा वेळ बाहेर येण्याची सगळ्यांना गरज असते आणि तस केल्याने खरा आनंद मिळवणे सोप्पे होते.

२. आपल्याला आनंद कश्यात मिळतो हे शोधणे गरजेचे-

प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते. काही जणांना पुस्तक वाचून आनंद मिळतो तर काही जणांना पेंटिंग करून. आणि दुसऱ्यांनी केल म्हणून मी करतो ह्या विचाराने कोणतीही गोष्ट केली तर त्यातला आनंद हरवणार हे नक्की. आपल्याला कश्यात आनंद आहे हे शोधून काढणे गरजेचे असते. काहीतरी करायची तीव्र इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करतांना होणारा आनंद हा कल्पनातीत सुंदर असतो त्यामुळे ते शोधून काढणे गरजेचे ठरते. आपल्या आतला आवाजाकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे सुद्धा तितकेच महत्वाचे. पण मोबाईल आणि इंटरनेट च्या व्यसनामुळे आतला आवाज ऐकूच येत नाही आणि मग पुढे काही करायचा प्रश्न सुद्धा येत नाही. मग आपल्या इच्छा कुठेतरी दाबून रहतात आणि अर्थात त्यामुळे सगळ असून पण आयुष्य दुःखी बनत राहते. विनोद शेअर करून आनंद मिळतो पण तो क्षणभंगुर आनंद असतो. ते पण गरजेचे असते पण जरा खोलात जाऊन नक्की आनंद कशात आहे हा विचार केला की फक्त काही क्षण नाही तर पूर्ण आयुष्य आंनदी होण्यास मदत होईल.

३. सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे महत्वाचे-

आयुष्यात खूप गोष्टी होत असतात. कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक.. नकारात्मक विचार आले आणि त्या बरोबर वाहवत राहिलो तर मात्र आयुष्य अधिकाधिक दुःखी होत राहते. दुःखाच्या दरीत आपण लोटले जातो. प्रत्येकाच्याच आयुष्यात काही न काही चांगल्या गोष्टी घडत असतात. जर त्या सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले तर नक्कीच आयुष्य आनंदी तर बनतेच पण त्याचबरोबर, आयुष्याकडे पाहायचा दृष्टीकोन देखील बदलतो. आंनदी राहणे फक्त एखाद्या गोष्टीवर अवलंबून नसते. कधी कधी कोणती नवीन गोष्ट करतांनाच आनंद, कधी काही गोष्टी पूर्ण झाल्याचा आनंद आपल्यालाच शोध्याचा असतो. आणि सकारात्मक विचार केला की छोटे छोटे आनंद समोर दिसायला लागतात.

४. प्रश्नांपेक्षा उत्तराकेडे लक्ष देणे गरजेचे-

आपली एक सवय असते. आपण प्रश्न सोडवण्याऐवजी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतो. मग मात्र पंचाईत होते. कारण छोटासा प्रश्न सुद्धा अगदी मोठा वाटू शकतो. आणि प्रश्नाच्या मागे धावंता धावता हातात तर काहीच येत नाही. आणि उत्तर सुद्धा मिळत नाही. त्यामुळे प्रश्न आले तर त्याची उत्तरे शोधायचा प्रयत्न करायचा. एकदा का उत्तर शोधायला लागलो की एकाच प्रश्नांची असंख्य उत्तरे मिळालेली दिसतात. आणि साहजिकच आयुष्य आनंदी होणे सोप्पे होते.

५. कोणतीही गोष्ट जास्ती मनाला लाऊन न घेणे-

अस दिसून येते की कोणतीही छुल्लक गोष्ट मनाला लाऊन घेतली की आयुष्य दुःखाने भरून जाते. मग आनंद कुठेतरी हरवून जातो. सतत दुःख करत बसण्यापेक्षा, जर कधी एखादी चूक झाली तर एक छोटासा शब्द 'सॉरी' खूप प्रभावशाली होतो. तसेच कोणी आपल्याला दुखावले तर मोठ्या मानाने त्या माणसाला माफ केल की सुद्धा ताण हलका होण्यास मदत होते. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, मग त्या बद्दल विनाकारण दुःख करून हातात तर काहीच येत नाही आणि आयुष्य निराशेचे गर्तेत अडकत. शक्य असेल अर परिस्थिती बदलायचा प्रयत्न गरजेचा असतो पण बाकीच्या वेळी स्वतः मध्ये बदल करते फायद्याचे ठरवते. गोष्टी मान्य करणे ही एक कला आहे आणि गोष्टी मान्य केल्या की आयुष्यात आनंद परत येतो.

६. स्पर्धा नकोच-

धकाधकीच्या आयुष्यात महत्वाची ठरते ती स्पर्धा. सतत कोणाच्यातरी पुढे जायची इर्ष्या आंनदाने जागून देत नाही. प्रगती होण्यासाठी थोडी फार स्पर्धा गरजेची असते पण एका ठराविक वेळेनंतर कोणाशी स्पर्धा करायची गरज नसते. अति स्पर्धा मानसिक आरोग्य आणि मनःशांती दोन्हीसाठी चांगली नसते. त्यापेक्षा कोणाशी बरोबरी न करता अधिकाधिक उत्तम होण्यासाठी प्रयत्न केला आणि स्वतःमध्ये सुधारणा केली तर आयुष्य नक्कीच आंनदाने भरून जाण्यास मदत होईल.

७. आवडता छंद जोपासणे-

छोटासा छंद देखील मन प्रसन्न ठेवण्यास मदत करतो. खूप काही मोठे नसेल पण आपल्याला आवडते अशी कोणतीही गोष्ट आनंदी करते. त्यामुळे मला वेळ नाही हे म्हणण्यापेक्षा बिझी आयुष्यातून थोडा वेळ स्वतःसाठी आणि स्वतःला जे आवडते आहे ते करण्यासाठी दिला तर आयुष्य नक्कीच आंनदाने भरून जाईल. आनंदी राहणे ही एक स्थिती असते आणि ते आपल्यालाच करावे लागते. बाहेरची कोणतीही गोष्ट त्यासाठी उपयोगी ठरत नाही.

छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या तर आनंदी राहणे सोप्पे होऊ शकते. खर तर, आंनदी राहणे ही एक स्थिती आहे आणि त्याचबरोबर, आतली शांती आणि आनंद ह्यांचा खूप जवळचा संबंध आहे. आपण आपल्या आत डोकावून पाहिलं की कोणत्या गोष्टी आनंद देतील ह्याची प्रचीती नक्कीच येईल. अन एकदा का आनंद शोधायची ट्रिक कळली की बाहेरचा कोणताच घटक आतला आनंद हिरावून घेऊ शकत नाही. आणि आनंद शोधायची सवय लागली की हळू हळू पूर्ण आयुष्य समाधानी होण्यास मदत होईल आणि आनंदाने भरून जाण्यास मदत होईल हे अगदी नक्की.