You are with me...! - 6 books and stories free download online pdf in Marathi

तू माझा सांगाती...! - 6

"नांव काय तुझं?" जनार्दन सारंग यांनी प्रसन्न मुखानं स्मित करून त्या रोबोटला विचारलं.
"यूनीट 15 ओर्डर नंबर 26. सर!"
"खूपच मोठं नांव आहे! अगदी ग्रेट वॉल ऑफ चायना!" जनार्दन हसत म्हणाले.
त्यांच्या टिप्पणीवर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 देखील हसला.
"अरे तुला हसता येत?" जनार्दन सारंग चेहऱ्यावरील आल्हाद ओसरू न देता आश्चर्याने विचारलं.
"हो सर! मी त्या सर्व भावना दर्शवू शकतो, ज्या तुम्ही दर्शवू शकता! आपली इच्छाच तशी होती." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 जनार्दन यांना म्हणाला.
"आम्ही भावना दर्शवत नाही. त्या अनुभवतो. ते तू करू शकतोस?" जनार्दन यांनी त्याला परंतू केला.
"अंफॉर्च्युनेटली, नाही सर." यूनीट 15 ओर्डर नंबर 26 उत्तरला.
"शकशील!" जनार्दन हसत म्हणाले,
"माणूस सुद्धा लहान असताना भावना इमिटेटच करतो. नंतर सवय बनून जाते व भावना एक्स्प्रेस करणं स्वाभाविक होऊन जातं...!"
"हो सर!"
"बरं. मला आंब्याचं झाडं लावायला मदत करशील?" जनार्दन यांनी यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ला विचारलं.
"हो सर! पण आपल्याला रोपटं लावावं लागेल. नंतर ते मोठं झालं, की त्याचं झाड होईल...!"
यूनीट 15 ओर्डर नंबर 26 च्या बोलण्यावर जनार्दन सारंग खळखळून हसले,
"तुम्ही रोबोट्स खूप निरागस असता. अगदी लहान मुलासारखे. प्रत्येक गोष्ट शब्दशः घेता."
यावर यूनीट 15 ओर्डर नंबर 26 काहीच म्हणाला नाही.
"बरं ये. ते रोपटं घेऊन इकडे ये." समोर बोट करून जनार्दन सारंग यांनी यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ला आंब्याचं रोपटं दाखवलं.
यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने त्याच्या नवीन मालकाची आज्ञा पाळली आणि थोड्या अंतरावर मुख्य दरवाजा जवळील टेबल वरचं आंब्याचं रोप घेऊन तो जनार्दन सारंग यांनी खणलेल्या खड्डयापाशी आला. त्याने ते रोप जनार्दन सारंग यांना दिले. त्यांनी ते त्या खड्डयात ठेवले. यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने खड्डा मातीने भरला व रोपाला पाणी घातले.
"थँक्यू!" म्हणत जनार्दन सारंग यांनी यूनीट 15 ओर्डर नंबर 26 चे आभार मानले.
"गरज नाही सर! आपली सेवा हे माझं कर्तव्य आहे!" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 जनार्दन सारंगना म्हणाला.
"कर्तव्य पार पाडणाऱ्याची प्रश्नसा करावी. त्याने काम करण्यास प्रेरणा मिळते. या भावनेचा पण लवकरच जाणता होशील तू. आपण केलेल्या कामाची प्रश्नसा होत नाही हे पाहून लोक कामचुकार होण्याची शक्यता असते!" ओठांवरील स्मित न हटवता जनार्दन यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ला बोलले.
"ती भीती माझ्यासोबत तुम्हाला नाही सर. मी रोबोट आहे. माणूस नाही!" यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ने हजरजबाबी उत्तर दिलं.
त्याचं हे तार्किक तरीही मार्मिक उत्तर ऐकून जनार्दन सारंग मनमोकळे हसले,
"हो! पण हळू-हळू तू देखील माणूस होशील म्हणून सांगितलं. लक्षात ठेव. माणसाची कोणतीच वाईट सवयी लागून घेऊ नको. चांगलं मात्र आत्मसात कर!" जनार्दन सारंग यांनी वडीलधारी म्हणून यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ला मोलाचा सल्ला दिला.
आणि आत ते निघून गेले. यूनीट 15 ओर्डर नंबर 26 त्यांच्या मागून घरात गेला.
.
.
.
रात्री, डायनिंग टेबलवर;
"जेवणार?" जनार्दन सारंग यांनी समोर हात बांधून उभारलेल्या यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ला विचारलं.
"मी जेवत नाही सर!"
"मग?"
"चार्जिंग पुरेसं आहे."
"हा. तू रोबोट नाही का? तू इतका माणसासारखा दिसतोस, की मला विसरायलाच झालं होतं. पण मग बस तरी!" जनार्दन यांनी यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ला आग्रह केला.
"मी रोबोट आहे सर. माझे पाय नाहीत दुखणार!"
"मित्च्! बस रे!"
जनार्दन सारंग यांच्या आग्रहावरून यूनीट 15 ओर्डर नंबर 26 त्याच्या समोर बसला.
"तू खरंच जेवत नाहीस?" जनार्दन सारंग यांनी यूनीट 15 ओर्डर नंबर 26 ला पुन्हा विचारलं.
"नाही. पण तुम्हाला पाहून एनिमेट करू शकतो! तुम्हाला कंपनी हवी असेल तर!"

"नाही गरज नाही. असू देत."
जनार्दन सारंग यांनी स्वतःच वाढून घेत जेवण चालू केलं...
"बरं मला सांग, तू झोपतोस तरी का? म्हणजे तू कधी डिसपॅच होशील माहीत नव्हतं. म्हणून मला तशी सोय करता आली नाही."
"कंपनीकडून माझ्या येण्याची तारीख आपल्याला मेल केली होती."
"असेल, पण मी पाहिले नाही. तुझ्या झोपण्याचं काय करूया?"
"कृपया काळजी नको. मी रात्री हायब्रनेशन मोड मध्ये असतो. उभ्या-उभ्या मी स्वतःला चार्ज करू शकतो. मी झोपत नाही!"