Addiction - 6 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - 6


तीच सर्व काही बोलून झालं होतं आणि अचानक शब्द बाहेर आले , " रिअली ग्रेट यु आर !! फार सोसलंस तू आयुष्यात तरीही इतकी खंबीर आहेस हे पाहून फारच अभिमान वाटतो तुझा .."

" अस काहीच नाही रे ..ए पण आज पहिल्यांदाच कुठल्यातरी मुलाला रडताना पाहिलं ..मूल पण रडतात का रे " , ती एकाच वाक्यात बोलून गेली ..

त्यावर मी उत्तरलो , " हो रडतात ग !! त्यांना पण भावना असतातच की फक्त ते रडणं जगासमोर नको असत कारण लहानपापासूनच त्यांना कठोर राहण्याची शिकवण मिळाली असते सो एकट्यातच रडतात . "

बोलता - बोलता बराच वेळ होऊन गेला हे लक्षात देखील आलं नाही ..आम्ही दोघेही गप्पात एवढे रंगलो की वेळेचं भानच उरलं नाही ..आता दुसरे कामही करणे गरजेचे होते ..त्यामुळे ती उठली आणि लगेच कपडे चेंज करून पुन्हा हॉलमध्ये परत आली ..मी आतमध्ये फ्रेश व्हायला गेलो ..तेव्हा ती माझ्या रूममध्ये असलेले माझे फोटो पाहू लागली ..मी फ्रेश होऊन आलो ..आणि कार घेऊन तिच्या घराकडे निघालो ..कितीतरी वेळ आम्ही कारमध्येच होतो पण कुणीही कुणाशी बोलत नव्हतं शेवट कार एका इमारतीजवळ थांबवली ..तिचा त्या इमारतीमध्ये फ्लॅट होता ..ती जाणार तेवढ्यातच म्हणालो , " यावेळी तरी घर दाखव म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा होशमध्ये नसशील तेव्हा कमीत कमी घरी तर सोडता येईल .."

ती माझ्या पांचट जोकवर हसली आणि समोर जाऊ लागली ..अचानक तिला काय झालं माहिती नाही ..ती मधातच थांबली आणि पुन्हा कारकडे परतू लागली ..हळूच कारच्या काचेवर बोटाने वाजवू लागली आणि मी गाडीची काच खोलली ..काच खोलताच ती म्हणाली , " प्रेम दहा वर्षे झालीत या शहरात राहताना पण तुझ्यासारखा प्रेमळ आणि समजून घेणारा व्यक्ती कधीच मिळाला नाही त्यामुळे मोह आवरेना झालाय ..तुला काही समस्या नसेल तर या वैश्येशी मैत्री करशील ? "

तिला कोड्यात पाडाव म्हणून थोडा विचारात पडल्याचं नाटक करू लागलो ..आता तिला माझ्या उत्तराची वाट होती ..आणि मी म्हणालो , " मैत्री करेन पण एकाच अटीवर "

" कुठली अट ? ", तिने हळूच स्वरात विचारलं ..

मी कुठलीही वेळ न हरवता म्हटलं , " तू जेव्हा - जेव्हा माझ्याशी भेटशील तेव्हा नशा करणार नाहीस ..मंजूर असेल तर बोल नाही तर ...."

ती ओठांवर हसू आणत म्हणाली , " बस एवढंच ..ठीक आहे एवढं तर नक्कीच करू शकते .."

आणि ती इमारतीत दाखल झाली ..ती जाताच मीही आपले कार फ्लॅटकडे वळवली आणि काहीच क्षणात घरी पोहोचलो ..

त्या दिवसानंतर आमच्यात संवाद आणखीनच वाढत गेला ..मलाही मागील 4 वर्षात फारच कमी मित्र होते त्यामुळे तिची मैत्री हवीहवीशी वाटू लागली ..आमच्या नात्याला कुठलंच बंधन नव्हतं त्यामुळे दोघांनाही मनमोकळं वागता येत होतं ..ती कंटाळली की मला फोन करायची आणि आम्ही रात्र - रात्र गप्पा मारत बसायचो ..तिच्याशी बोलत बसलो की वेळेचं भानच नसायचं ..काहीतरी होत तिच्यात जे मला प्रत्येक क्षणी तिच्याकडे आकर्षित करायचं ..रविवार तर फक्त तिचाच असायचा ..नकळत एक खास नात आमच्यात विणल्या जात होतं ज्याची आम्हालासुद्धा कल्पना नव्हती ..अस नात ज्याला व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील ..सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत चॅटिंग करत असताना दिवस कसा गेला हे माहिती होत नव्हतं ..कधी वेळ मिळाला की मग मूवी पाहायला जात असू .मूवी पाहून आल्यावर पायी भ्रमंती करण्याची मज्जाच वेगळी त्यात आइस - क्रीम सोबत असायची आणि आम्ही जगाला विसरून आपल्याच धुंदीत जगू लागलो ..काय दिवस आणि काय रात्र ..आमच्यासाठी सर्व काही सारखच होत ..शिवाय एक मजेदार गोष्ट अशी की तिने मला दिलेलं वचन पाळलं होत ..ती मला जेव्हाही भेटायला यायची तेव्हा नशा करून नसायची ..कदाचित माझ्यासोबत असतानाच ती मनमोकळं जगायची ..आणि मलाही दिवसेंदिवस तिचा सहवास आवडू लागला ..
असाच एक रविवार ..आज तिने मला जेवणासाठी स्वतःच्या घरी बोलावलं होतं ..जेवणाचा बेत रात्रीचा होता त्यामुळे दिवसभरात सर्व महत्त्वाची कामे करून घेतली ..आमची मैत्री झाल्यापासून मी पहिल्यांदाच तिच्या घरी जाणार होतो त्यामुळे वेगळाच उत्साह होता ..रात्री अगदी वेळेवरच तिच्या घरी पोहोचलो ..निघताना मी तिला तस इंफॉर्म केलं आणि काहीच वेळात तिथे पोहोचलो ..डोर बेल वाजवली ..काही वेळ आतून कुणीच आलं नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा डोरबेल वाजवली आणि सतत बेल वाजवत होतो ..तेव्हाच आतुन आवाज आला , " शहाण्या !! थोडं वाट पाहायला काय होत आणि तिने दार उघडलं ..मी पोळ्या बनवीत होते थोड्या वेळ थांबायला काय होतं रे तुला ..( मी आताही दारावरच उभा होतो ) ..बर ये आतमध्ये ) "

आतमध्ये गेलो आणि हॉलमध्ये बसलो .. ती एकीकडे स्वयंपाक बनवीत होती आणि मी इकडे एकटाच बोर होत होतो त्यामुळे सरळ किचनला गेलो ..किचन मध्ये बसायला जागा नव्हती त्यामुळे ओट्यावर बसून गप्पा मारू लागलो ..

" का रे काय झालं ? " , ती म्हणाली

" तू इकडे आणि मी तिकडे ..एकटाच बसून होतो त्यामुळे फार बोर झालो तेव्हा म्हटलं चला किचनमध्ये जाऊन तुझे काम वाढवू... म्हणूनच आलो " , मी तिची गंमत करत बोलू लागलो ..

ती माझ्या बोलण्याकडे हसत होती ..ती पोळ्या बनविण्यावर संपूर्ण लक्ष देत होती तर मी फक्त एकटाच बडबड करत होतो ..तिला माझा हा स्वभाव माहिती होता त्यामुळे मधातच ती माझ्या बोलण्यावर हसत होती ..त्यामुळे कंटाळा दूर झाला ..श्रेयसिने पोळ्या बनवीत असताना आपले केस बांधून घेतले होते पण अचानक तिचे केस सुटले ..एक तर पोळ्या लाटत असताना तिचे दोन्ही हात व्यस्त होते आणि इकडे तिच्या केसांनी तिला जणू त्रास देण्याचा चंगच बांधला ..ती थोडी समोर आली की केस लगेच चेहऱ्यावर यायचे ..ती त्यांना मागे करायची पण पुन्हा केस समोर यायचे ..काही वेळ असच सुरू होत शेवटी मीच म्हटलं , " मी काही मदत करू का ? "

तिने मानेनेच इशारा करून होकार कळविला ..मी लगेच धावत तिच्या बेडरूमला गेलो आणि काही क्षणात केसांना बांधण्याचा चिमटा घेऊन आलो ..तिला सरळ उभं राहायला सांगून तिचे संपूर्ण केस मागे करून घेतले आणि चिमटा लावला ..काही वेळ आम्ही दोघेही शांत होतो बहुतेक तिला माझं तस करण ऑकवर्ड वाटलं असावं असं मलाच वाटलं..मी पुन्हा एकदा ओट्यावर बसलो आणि ती आपल्या कामात व्यस्त झाली ..काहीच वेळात तिचा स्वयंपाक करून झाला आणि आम्ही जेवायला बसलो ..तिने मला आवडत म्हणून चिकन बनवलं होत ..चिकनचा वास रूममध्ये दरवळू लागला होता त्यामुळे चिकन पाहताच तोंडाला चटकन पाणी सुटल..खर तर मला फक्त आईने बनविलेल चिकन आवडायचं ..त्यामुळे फार तर बाहेर खायला जात नसे पण आज तिच्या हातच जेवण करून आईची आठवण झाली ..मी भरपोट जेवन करून घेतलं ..

रात्रीचे 10 वाजले होते ..दोघेही कोल्ड ड्रिंक्स घेऊन टेरिसवर पोहोचलो ..रात्रीचे शीतल चांदणे पडले होते पण प्रदूषणामुळे त्याचा रंग फिका पडला होता ..बाजूला समुद्र असल्याने वाऱ्याची शीतल लहर मनाला सुखावून जाऊ लागली ..त्यात श्रेयसीचा मूड आज फारच रोमँटिक होता त्यामुळे ते क्षण आणखीनच बहरणार होते ..दोघांच्याही हातात सॉफ्ट ड्रिंक्स होत्या..मी इमारतीकडे चेहरा करून होतो तेवढ्यात तिचा प्रश्न आला आणि मला ठसका बसला ..ती म्हणाली , " ए हिरो तुला मी कशी वाटते ? " ..

" कशी म्हणजे छान !! ", मी उद्गारलो ..

" ते तर आहेच रे पण तस नाही म्हणजे ते तुम्ही म्हणता ना तुमच्या मुलांच्या भाषेत ट्वेन्टी फोर - थर्टी सिक्स - ट्वेंटी फोर " , ती रोमँटिक होत म्हणाली ..

मी त्यावेळी हसू लागलो कारण मुलींनी अस बोलल्यावर त्यावर कस रिऍक्ट व्हायचं हे मला माहितीच नव्हतं..मला शांत पाहुन तीच म्हणाली , " फार बुद्धू आहेस रे तू !!! ..मी एवढी बिनधास्त बोलत असताना तू का लाजतो आहेस .."

" तस नाही ग पण याआधी अस बोलायची वेळ आली नाही त्यामुळे काहीच कळेना झालय " , मी उत्तरलो ..

ती माझ्यापासून दूर होत इमारतीकडे बघू लागली ..थोडा वेळ शांत राहिल्यावर तीच म्हणाली , " मी आधी नव्हते रे अशी पण ....पण आता स्वतःला मेंटेन करावं लागतं ..गमतीदार गोष्ट अशी की आता गल्लीतली बारकी पोरदेखील मला पाहुन शिट्ट्या मारतात .."

तीच हे असं बोलणं एकल की मग मात्र खळखळून हसायला यायचं ..तिला पुढच्याच क्षणी काहीतरी वाटलं ..ती माझ्याकडे पलटत म्हणाली , " तू नाही बघितलं का रे अस कधी एखाद्या मुलीकडे ? "

तिच्या या प्रश्नाने मी तात्पुरता गोंधळलो ..माझ्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलू लागले ..तिच्या ते लक्षात यायला मुळीच वेळ लागला नाही ..

" म्हणजे होती तर एक मुलगी ..सांग ना तिच्याबद्दल " , ती म्हणाली ..

" अग फार काही खास नाही सोड " , मी तिला समजावत म्हणालो ..

" ए हे बरोबर नाही हा ..मी तुला पहिल्याच भेटीत मला माझ्याबद्दल सर्व सांगितलं आणि तू भाव खात आहेस .." , ती रुसून माझ्यापासून दूर पळू लागली ..

काही वेळ तरी ती माझ्याशी काहीच बोलली नाही ..

खर तर 2 वर्षे झाले .. त्या आठवणीत मला कधीच गुंतायला आवडत नाहीत ..त्या आठवल्या की मी बेचैन होतो आणि हाच तो दिवस असतो जेव्हा मला स्वतःवर नियंत्रण ठेवण अशक्य होऊ लागत..त्यामुळे त्या आठवणींना मी मनाच्या एका कोपऱ्यात लपवून ठेवलं होतं ..आज श्रेयसी पहिलीच होती जिंने मला तिच्याबद्दल विचारलं होत आणि न राहवता त्या आठवणीत पोहोचलो ..जिथे पोहोचल्यावर मला माझाच त्रास होऊ लागतो .

दर्द मे भी ये लब
मुस्कुरा जाते है
बिते लमहें हमे
जब भी याद आते है

बिते लमहें ..

" आता बघ तरी माझ्याकडे सांगतोय मी सर्व " , मी म्हणालो ..

ती माझ्याकडे पाहू लागली ..

मी प्रेम ..विदर्भातील एक छोट्याशा खेळ्यात राहणारा मी ..गाव छोट असलं तरी स्वप्ने मोठी होती ..पदवीमध्ये बी.कॉम .पूर्ण केलं ..शेवटच्या वर्षाला असताना आय.सी.आय.सी.आय. बँकेत मुलाखत दिली आणि आणि निवडल्या गेलो ..कामावर लागल्यापासून सर्वच स्टाफमध्ये छान रुळलो ..कमीत कमी वेळात मी माझं नाव बनवू शकलो होतो.. नेमकं त्याच वेळी मुंबईच्या ब्रॅंचला एका मुलाला पाठविण्यासाठी सांगण्यात आलं ..खर तर तिथे सर्व विवाहित होते त्यामुळे कुटुंबाला सोडून येन त्यांना शक्य नव्हतं त्यामुळे मॅनेजर सरानी मलाच मुंबईला पाठवलं ..मीही मुंबईबद्दल बरच एकल होत त्यामुळे घरच्यांची परवानगी घेऊन इथेच रुजू झालो ..इथे कंपनिकडूनच राहण्याची व्यवस्था केली गेली होती आणि माझ्यासोबत एक पार्टनर दिल्या गेला ..आमची ओळख झाली आणि आम्ही सुरुवातीचे संपूर्ण दिवस मुंबई दर्शन करण्यात घालवले ..हळूहळू तो माझा पक्का मित्र झाला ..आता बँकमध्ये नियमित जाण सुरू झालं ..पण सकाळचा वेळ मात्र खाली होता ..बी.कॉम.झाल्यानंतर माझी टी .सी . तशीच पडून होती त्यामुळे एम.कॉम . करण्याचा विचार डोक्यात आला आणि पंकज , मी दोघेही प्रवेश घ्यायला कॉलेजला दाखल झालो ..

जुलैचा महिना होता ..पावसानेदेखील हळूहळू गती पकडली होती ..जिकडे - तिकडे खड्ड्यात पाणी साचू लागलं होतं ..माझा प्रवेश फॉर्म भरून झाल्यामुळे मी पंकजच्या गाडीजवळ उभा होतो ..तेवढ्यात भर वेगाने एक बुलेट गाडी समोरून गेली आणि साचलेलं संपूर्ण पाणी समोर असलेल्या एका मुलीवर उडाल ..ती मुलगी पाठमोरी उभी होती ..ती समोर पाहत असल्याने नेमकं पाणी कुणी उडवलं आहे तिला ते कळलं नाही आणि ती माझ्याकडे येऊ लागली ..तिचा चेहरा रागाने लाल झाला होता ..आणि ती जवळ येताच म्हणाली , " यु स्काउंडल , रास्कल , स्टुपीड .."

ती एकामागोमाग एक शिव्या हासळत होती ..मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती माझं काहीच एकूण घेण्याच्या मूडमध्ये नव्हती ..शेवटी तिच्या मैत्रिणीने तिला ओढत नेलं आणि तेव्हा कुठे सर्व गोळा झालेली पब्लिक कमी होऊ लागली ..काही वेळातच पंकज आला ..

" भावा काय म्हणत होती रे ती " , पंकज म्हणाला ..

" काय म्हणत होती ते कळलं नाही पण बहुतेक इंग्लिश मध्ये शिव्या देत होती .." , मी उत्तरलो ..

" पण का ?? " त्याने हसत - हसत मला विचारलं ..

" काही नाही यार एक बुलेट वाला तिच्यावर पाणी उडवून गेला आणि तिने चुकून बिल माझ्यावर फाडल.." , मी रागावून म्हणालो ..

त्याने हसत - हसत गाडी स्टार्ट सुरू केली आणि आम्ही जॉबवर गेलो ..

क्रमशः ....