urmi books and stories free download online pdf in Marathi

ऊर्मी

ऊर्मी



वय 28, वर्ष पूर्ण

अविवाहित,

ऊर्मीला,

काल मी वाढदिवस साजरा केला. अगदी पहिल्यांदाच, या अगोदर वळीवाच्या पावसागत वाढदिवस केव्हा यायचा नि निघून जायचा हे कळायचंही नाही. आज पहाटेलाच मला जाग आली. बघते तर काय ? पाच वाजलेत...

इथं आल्यापासून पहिल्यांदाच मी पहाटेला उठली होती. नाहीतर दररोज मी सातला उठायची. बेडवरून उठून माऊथब्रश हातात घेत मी डोळ्यावर पाणी शिंपडलं. नॅपकिनने हलकेच चेहऱ्यावर फिरवून केसांचा पुंजका बांधला. अंगावरील गाऊन योग्य तो व्हिवळत मी दार उघडलं.

हलकीशी वाऱ्याची मंद लहर अंगाला शहारून गेली. प्रभात खरंच मनमोहक असते. घराबाहेरचं वातावरण अगदी शांत होतं. अजूनही थंडीच्या दिवसातील पहाट उजळायला थोडाफार अवकाश होता. चार दोन दुधाळ पक्षी घरट्यातून किलबिल करीत जागे झाले होते. मी अंगणात सैरावैरा रंग उधळू लागले.

माझं घर तसं किरायाचं, चार कवेलूच्या खोल्याचं हे घर. दोन खोल्यात मी राहू लागली. अजूनही दोन खोल्या रिकाम्याच होत्या. घरमालक बाहेरगावी राहायचे. घराच्या परिसरात फार मोठी मोकळी जागा, वालकंपाऊंड, बाजूला हिरवीगार शेत, अगदी अर्धा कि.मी. अंतरावर डोंगरराई. माझ्या स्वगावापासून तिनशे मैलाचं अंतर कापीत पहिल्यांदा चार महिन्यापूर्वी इथे आली. त्यावेळेस मला तीन शतकं अंतर कापल्यासारखं वाटलं. महाराष्ट्रातील पूर्वेकडल्या डोंगर इलाक्यातील हे अंतापूर. जीवनाचं अंत पाहायलाच लावणारं वाटलं.

सहलीमध्ये महाबळेश्वर, उटीला जावं अगदी तसं, तीस पस्तीस कि.मी. टेकडीवर चढत-उतरत नागमोडी वळणाने मी इथे आली. महाराष्ट्र-आंध्रप्रदेशाच्या सीमेलगत विसावलेलं टेकड्यांच्या, जंगलाच्या राईत दडलेलं हेच ते अंतापूर.

गावात पन्नास कुटुंब, बहुताअंशी आदिवासी समाजाच्या लोकांनी इथं वस्ती केली होती. चार, दोन इतर समाजाची घरे, गावात एक प्राथमिक शाळा आणि को. ऑफ. बॅंक, दोन किराणा दुकान, एक छोटसं चायपानाचं खेडवळ हॉटेल बस ! एवढच जग, डोंगरउतारावर कापूस, सोयाबिनची शेती. दुसरं काय ?

हं, मी इथे उभी आहे. म्हणजे, मी राहते त्या घरापासून शंभर मीटर उजवीकडे गाव सुरू होतं. डावीकडे तेवढ्याच अंतरावर शाळा, समोर बॅंक, तिथूनच समोर जाणारा हा रस्ता, गावाच्या बाहेर तालुक्याला जातो. इथूनच पाच सहा खेडयातील लोक ये-जा करतात. हा एकमेव रस्ता.

ह्या इलाक्यातील मध्यवर्ती ठिकाणच म्हणावं हवं. तसं चार महिन्यापूर्वी मी इथे आली, तेव्हा खेड्यातील लोकजीवन पाहून रडली. पण आता तसं नाही. अगदी गजबजलेल्या शहरापेक्षा हा निवांतपणा मनाला मोहरवून टाकतो.

मी शाळेत शिक्षिका म्हणून रूजू झाले. सोबतीला एक म्हातारे शिक्षक, दोघच, सोळा मुलं बस !

माऊथब्रश करीत रस्त्यांनी अनवाणी पायाने मी टेहळणी केली. आता उजाडलं होतं. बाथरूममध्ये येवून वॉश केलं. स्टोव्हवरती काळा चहा ठेवला. इथं दूध मिळत नाही म्हणून दररोज काळी चहा घ्यावी लागते. तसं मी पावडर वापरते. पण ती पावडरची चहा पीनं मला नाही आवडत.

होय, आज एकोणतिसाव्या वर्षाचा पहिला दिवस, माझ्या जीवनाची सत्तावीस वर्ष तशी धकधकीत गेली. अठराव्या वर्षीच आईवडील गेले. काकांनी सांभाळ केला. तशी मी सातवीपासून लेडीज हेास्टेलवर राहिली. बाविसाव्या वर्षी डी. एड. झालं नि शिक्षण संपलं. पुढे कॉलेजात जावं पण शिकण्याचा मूड निघून गेला होता.

चार, पाच वर्ष नोकरीसाठी प्रयत्न केले पण, एक वर्ष नापास झाल्यामुळे, टक्केवारी कमी असल्याने नोकरी मिळायला विलंबच लागला आणि आता ह्या अंतापूरात लांब नोकरी मिळाली.

काकूचा स्वभाव फारसा चांगला नसल्यानं तिचं नि माझं कधी जमलच नाही. काकांनी लग्न करून द्यायचं ठरवलं पण पाहुणे यायचे नि जायचे.

काका फार भले ! माझ्या लग्नासाठी अथक उंबरठे झिजवले. नशिबानं माझं लग्न जोडीदार ठरवलं नव्हतं. त्यांच्या प्रयत्नाला काय अर्थ ?

लग्न तरी कसं होणार ! मला रूप, सौंदर्य अजिबातच नाही. काळं सावळं म्हणतात ना अगदी तशीच ! लोकांना आजकाल स्मार्ट वधू पाहिजे. नेमकं एवढेच कारण.

कॉलेजात शिकतांनाही कुण्या मुलांनी माझ्याकडे पाहिलं असेल तर देवाशपथ ! मात्र इतर मुलींशी लगट करणं, हसणं बोलणं नित्याचच असायचं.

लहान असतांना डांबर प्लान्ट म्हणून हिणवणाऱ्या काकांच्या मुलीचा मला रागही यायचा ! हीच घृणा मला शाळेत, होस्टेल, पुढे कॉलेजातही राहिली. तशी मी मैत्री केलीच नाही. कुणी बोललं तर बोलायचं अगदी मोजकं. मुलांनी मला ढुकूंन पाहिलं नाही, याचा मला बराचसा फायदा झाला. तशी मी अभ्यासातही एवढी हुशार नव्हतीच. पण वारंवार वाचनानं मी मध्यम वर्गात समाविष्ट झाली होती. अखेर डी.एड. ला मानसशास्त्रात नापास झाली.

मला पुस्तकातलं काय ? जीवनातलं मानसशास्त्र कधी कळलं नाही. अखेर संघर्ष करीत मी इथपर्यंत.

आता कधी स्वगावी, ते काका, काकू नको ! त्यांनी एवढं केलं त्याचं ऋण पैशाने फेढूच ! कसलं पैशाने ? माझ्या बाबाचं घर नि दोन एकर शेत मी त्यांनाच देवून टाकणार.

मला सख्खा असा भाऊ एकच, माझ्यापेक्षा आठ वर्षानी लहान, सध्या तो नागपूरला इंजिनिअरिंग करतो. आता त्यालाही मी आधार देणार. तोही होस्टेलात राहतो.

सकाळीच उठायचं. एकटीचे काम आटोपायचे. दहाला शाळेत, पाचला घरी आलं की रूमवरच एकट्याने राहायचं. तसं खूप एकांतवास व्हायचा. पण मला ते आवडायचं. इथं फारशी चार, दोन व्यक्तिशी ओळख पण, आपण मुलीची जात कुणाकडं जाणार ? आपल्या रूममध्येच लायब्ररीतलं पुस्तक वाचायचं. तसं कथा, कादंबरी वाचनाचा छंद मला दहा-वीस वर्षापासून नियमीत सुरूच आहे.

यामुळं मला कधीही एकटं वाटलं नाही. घरातली कामं उरकलीत. वालाच्या शेंगा नि पालकचं सूप बनवलं. जेवण घेतलं. नी शाळेत गेली. सर आज मिटिंगला गेल्यानं मी एकटीच शाळेत होती.

मुलं अभ्यासात मग्न झालीत. दुपारचे बारा वाजले. शाळेच्या दारातून काळयासावळ्या वर्णाचा, उंच धिप्पाड देह, तिशीतील पुरूष आत आला.

‘मॅडम, प्लीज एक काम होतं !’

माझं अवधान नसल्यासारखं, दाखवित मी त्यांच्याकडे कटाक्ष टाकलं. कागदाची आवराआवर करीत मी वर्हाड्यांतील खुर्चीवर बसण्यास विनंती केली...


प्रभात,


वय 27 वर्ष पूर्ण,

आजच मी बॅकेंत बदलीच्या ठिकाणी अंतापूरला रूजू झालो. स्वगावापासून दोनशे कि.मी. अंतरावरचं गाव पाहून मी गोंधळूनच गेलो. इथे येताक्षणीच मला नकोसं वाटलं. अशा आडवळणावर बदली, वाटलं की राजीनामाच द्यावा, पण जगण्याचं साधन कोण सोडणार बरे !

माझ्या नोकरीला पाच वर्ष झालीत नि बदलीचं ऑर्डर आलं. आमच्या खात्यात दर पाच वर्षानी बदली होते एवढं नक्की.... पण एवढ्या दूर अंतरावर यावं लागेल असं वाटलही नाही.

बॅंकेत आम्ही दोघच, एक म्हातारा व्यवस्थापक आणि मी लिपीक, गावातला एक मुलगा डेली करिता मदतिला ठेवला आहे. तसं इथं बॅकींग व्यवहार शून्यच म्हणावं लागेल. पाच, सहा गावं, शाळामास्तरांच पगार दुसरं काय ?

काम बघता दिवसाकाठी पाच, दहा लोकांचा व्यवहार, शहरातल्या बॅंकेत काम करतांना थकून जायचो. पण इथे मात्र सुखही सुख. या दृष्टिकोणातून हे गाव फार बरं !

बॅंकेत बारानंतर कुणीही आलं नाही. व्यवस्थापकाशी चौकशी केली तेव्हा,

‘एक खेाली मिळेल, शाळेतल्या मॅडमला विचारून बघा.’

लगेच मी आवराआवर करून शाळेत पोहचलो. मॅडमही अगदी माझ्याच वयाच्या, त्यांनी मला बसायला विनंती केली. मला त्यांच्याशी बोलतांना कसं संकोचल्यासारखं वाटायचं, त्यांनीच विषयाला सुरूवात केली. ‘हं, बोला, काय काम म्हटलंत ?’

मी परिस्थितीचं वर्णन करून रूम किरायाने मिळवून घेतली. आम्ही दोघेही दुपारलाच रूम पाहून आलोत. त्यांच्या एवढेच मला भाडं द्यायच होतं. तसं मी कपडे नि थोडं सामान सोबतच घेवून आलो. मला रूम आवडली. नंतर आवश्यक सामान इकडेच घ्यायचं ठरवलं. एवढ्या लांब अंतरावर कशाला हवं जास्त बोझा ?

इथला खेडवळपणा, सुखसोयीचा अभाव बघून आठ पंधरा दिवसांनी गावाकडे जायचं ठरवलं. चार, दोन वर्ष आटोपली की, बदली काढायचं एवढं मात्र नक्की. रूम पाहून पुन्हा मात्र कामावर गेलो. आज इथला दिवस बराच लांब वाटला.

सायंकाळी पाचला रूमवर पोहचलो. रूमची साफसफाई केली. सामानाची विल्हेवाट लावली. एवढ्यात मॅडम शाळेतून आल्यात.

“वा छान ! संपूर्ण तयारी झाली वाटते. कशाला एवढा त्रास घेतला, मी करणारच होती.”

मला मॅडमनी लाजवलं होतं.

“काम करण्यात कसला आलाय त्रास, हे तर करावच लागणार ना ! आणि आता तर नेहमीचेच कुठपर्यंत दुसऱ्यावर अवलंबून रहायचं ?”

मी न संकोचता बोललो. मॅडमचा स्वभाव मला छान वाटला. मॅडम दार उघडून आत गेल्या. रेडीओ सुरू केलं.

‘कोई ना कोई चाहिए.....प्यार करनेवाला....’ शाहरूखचं सुरेख सुदंर गाणं सुरू झालं होतं. मला सुद्धा हे गीत आवडायचं, यामुळं अंगात कशी शहारी उमलायची.

रात्रभरचा प्रवास नि थकवा घालवायला मी बाथ केलं, कापडं बदलविली. त्या कपड्यावर कशी धूळ बसली नि घाण वास यायला लागली होती. भूकही जोराची लागली. गावाहून आणलेला डब्बा सकाळीच संपला होता. किराणातून सामान आणून स्वयंपाक करायचं ठरवलं.

“बाबुजी इकडेच स्वयंपाक बनविते आहे, जेवण करायचं हं !”

मला बाबुजी म्हणून हाक मारली. तसं आम्हा बॅंकेतल्या कर्मचाऱ्याना बाबुजीच म्हणायचे. मलाही बरं वाटलं. तरीपण उद्याच्या सुरूवातीसाठी किराणा घ्यायला बाहेर पडलो.

“मॅडम, मी किराणातून सामान आणते हं !”

मी तिला सांगित हातात थैला घेऊन बाहेर पडलो. ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती. रस्त्यांनी जातांना वारंवार मात्र तिचे रूप मनपटलावर येत होतं. काळंसावळं तजेल रूप, तिचा मनमोहक स्वभाव, मला केलेली मदत, खूप बरं वाटलं मला !

सामान खरेदी केलं. परतताच तिच्या रूममध्ये गेलो. कॉटवरती बसलो...

“झाली काय खरेदी ?”

“होय !”

“काय घेतलं.”

“जीवनासाठी लागणारं सारं काही.”

“वा छान ! समर्पक उत्तर येतात तुम्हाला, बॅकेत कविता वगैरे तर नाही करत.”

ती मनमोहक हसली.

“नाही बाबा ! तसं काही नाही, एवढं कुठं सुचणार मला ?”

रेडीओवरती बातमीपत्र सुरू होतं. मी तिच्याकडे निरखून पाहिलं. अंगाला चिपकलेल्या बिलोरी गाऊनकडे पाहात मी म्हटलं,

“काय बनविलं ?”

“तुम्हाला आवडेल असच.”

“तुमचही काव्यात उत्तर, तुम्ही करता काय कविता ?”

“नाही, पण दोन-चार केल्या आहेत, आठवलं ते कागदावर उतरवलं.”

वाटाण्याचं उसळ, पापड, लोणचं, भाकरी, चटणी खूप काही. तीनं जेवायला ताट वाढलं.

“आणि तुम्ही...”

“तुमच्यानंतर...”

“असं कसं, आम्ही घरी मिळूनच बसतो. घ्या की, तुम्ही लाजू नका !”

ती स्मित हसली. बुभूळातील प्रेमधुंद कटाक्ष अंतरंगाला बहरवित होता. मिही तिला हसून साद दिली.

“तुम्ही इथं एकट्याच असता. कुणी सोबतीला घेतलं नाही ?”

दोघेही जेवण करीत होतो. तिने आपली कहाणी थोडक्यात विशद केली. मला थोडं उदास वाटायला लागलं.

“आणि लग्न वगैरे !”

तिच्या अंतरंगात माझ्या प्रश्नामुळं भावनावशता येवू लागली. डोळयातून अश्रू ओघळणार एवढ्यातच तिनं टिपलं. ती मनसोक्त लग्नाचे विचार त्याविषयी परिस्थितीचं गर्भ विशद करती झाली.

जेवन आटोपलं, भांडीकुंडी गोळा झाली. तिच्या गर्भगळीत दुःखाला मी वारंवार आठवू लागलो. उजव्या बाजूच्या आलमारीकडे लक्ष टाकलं. लायब्ररीत शंभराहून अधिक पुस्तके दिसली.

“वाचन खूप करता म्हणायचं.”

“होय, इथलं एकमेव करमणुकीचं साधन आहे ते. तुम्हीही अशी वाचणाची आवड लावून घ्या ! नाहितर दिवसं काढणही कठिण होणार तुम्हाला.”

“कुठलं पुस्तक आवडलं तुम्हाला.”

ती विचार करीत हेलकाव्याने प्रेमळ भाव आणित बोलली.

“कुठलं, म्हणजे सगळीच आवडतात. पण राजहंसचं मंजिल उपन्यास फारच भावलं.”

“असे काय आहे त्यात ?”

“सांगावं तर खूप काही, आपलं अंतरंग, प्रेम, दोन मनाचं अचंबित मिलन. सतयुग मे सिताए मरती थी, आज राम मरणे लगे है. असं जीवनाचं प्रतिबिंब, खरंच ! दुःखाचं डोंगर मनावर असतं ना, तेव्हा वारंवार मी ही मंजिल वाचते. दुःख हरवतं, फार बरं वाटते मला.”

“बरं तर आज मी वाचणार, देणार काय वाचायला ?”

“न द्यायला काय झालं, न्या की ?”

“बरं गुडनाईट !”

मी आणि ती बराच वेळ पहिल्यांदाच बोलत बसलो. तशी परस्त्रीशी बोलण्याची माझी पहिलीच वेळ होती. आजतागायत मी इतकं कधिही कुणाशिही बोललो नाही.

अंथरून टाकलं. पाय लांब केले. जेवण थोडं जास्तच झालं होतं. बोलतांना भराभरा कसं पोट भरलं. तेही कळलं नाही. रात्रभराच्या प्रवासानं माझं शरीर थकलं होतं. डोळ्यात धुंदी चढायला लागली होती. पुस्तक वाचण्यात मन नव्हतं. मंजिल चाळलं नी बाजूला ठेवली. डोळे मिटले. मंजिल, खरचं ! मॅडमची मंजिल काय ? हे तर कळणार नाही ना ! असू दे उद्या वाचू.

बराच उशीर झाला होता. तिच्या खोलीतले दिवे मालवले होते.



ऊर्मीला

मी अंथरूणावर पडली, आज कसं शेजारी असल्यानं छान करमणूक झाली नाही का ? मलाही थकवा येत होतं. पण अंथरूणावर पडल्यावर बरिच रात्र मला झोप येत नसे. माझ्या अंतरंगातील उर्मी दाटून यायची.

कित्येक रात्र मी अशाच घालवल्या, बघा ना ! अजूनही आपण वराचा शोध घेत आहोत. आता आपल्याला नोकरी मिळाली. एखादा शिक्षक मिळेलच हीच आशा घेवून जगते आहे.

छान स्वभाव आहे त्यांचा, बोलायलाही अगदी मोकळे. मी पहिल्यांदाच त्यांना पाहिलं तेव्हाच त्यांच्या प्रेमात पडली. होय ! प्रथमच मी कुण्या परपुरूषाचा विचार केला होता. पुस्तक देतांना त्यांचा झालेला स्पर्श, माझं मन पुलंकित झालं होतं. वयात आल्यापासनं प्रथमच मनाचं अंतरंग उलगडणारा हा स्पर्श भासला. वाटलं एकदम घट्ट मिठीत घ्यावं. त्यांचे डोळे माझ्याकडे कसे रोखून बघत होते. माझं अंग ह्या गाऊन मध्ये कसं उन्मळून येतं. ही जीवनाची उर्मी कुठवर तग धरणार.

मी बरीच रात्र निपचित पडली होती. झोप यायचं नावच नाही. मन बेचैन झालं होतं. विकार, वासना माझ्यावर जोर धरायला लागल्यात.

दारावर टक-टक वाजलं. एवढ्या रात्री कोण असेल ?

बाबुजी, खरच बाबुजीचा काय उद्देश असेल बरे !

“कोण ?”

“मी....मी आहे, मला पाणी हवं होतं. पाणी न्यायलाच विसरलो.”

मी उठली, दार उघडलं. डोळे चोळण्याचं नाटक केलं...

“माफ करा हं ! त्रास देतोय तुम्हास. खूप घश्याला कोरड पडली. रोज रात्रौ मला मगाभर पाणी हवं असतं. मला आठवणच राहिली नाही...”

“या ना, आत या !”

मी मगाभर पाणी दिलं. त्यांनी घटाघटा पाणी पिलं.

“काय छान झोप लागली ना !”

“होय, थकव्यामुळं लवकरच डोळे लागले. बरं गुड नाईट !”

मी दार लावलं. अंथरूणावर पडली. आणखी तेच विचार. उर्मी.....मनातली उर्मी......बाबुजीच्या कवेत.....नको.....विचार उन्मळून येत होते. मी केव्हा निद्राधिन झाली कळलेच नाही.



प्रभात


एका महिन्याचा काळ लोटला असेल. मध्यंतरी मी गावाकडेही गेलो. ऊर्मीला नि माझी छान गट्टी जमली होती. दररोज हसणं, मनमोकळेपणाणं चर्चा करणं, वगैरे आलेच. रात्रौ बराच वेळ कधी ती माझ्याकडे तर कधी मी तिच्याकडे बसायचा.

मंजिल वाचली, मलाही वाचनाचा गंध लागला. भराभरा मी बऱ्याच कांदबऱ्या वाचून काढल्या. त्यात एक कळलं. ऊर्मीला उत्तांग स्त्री चित्रणाच्या कादंबऱ्या वाचायची. तिचं मन उर्मी ने पुलंकित होत असावं. एक दोनदा तर जाणून तीने स्पर्श, लगट करण्याचा प्रयत्न केला.

त्यादिवशी तर चक्क ! तिचं नि माझं बाथरूम घरामागे एकच होतं. ती आंघोळीला गेली. पण दारावरची कडी लावायला विसरली असेल. मला काय माहीत ? मी ही आंघोळीला... पटकन दार ढकललं. क्षणभर डोळे मिटले, तिनेही माझ्याकडे पाहिलं नि दार लोटलं.

मला फार पश्चाताप झाला. ऊर्मीलाला मी अर्धविवस्त्र पाहिलं होतं. दिवसभर मनात तीच गोष्ट. मला माझीच लाज वाटायला लागली. तशी तिही त्यादिवशी काही बोलली नाही. मात्र त्यानंतर त्या विषयावर मी बोललो नाही.

ऊर्मीला माझं स्वयंपाक दररोज करायची. मी तिला नकारही दिला. पण शेजारधर्म, सेवाधर्म म्हणून ती सांगायची.

काल मी तिला म्हटलं.

“मला वारंवार तुमच्याकडे जेवणं आवडणार नाही.”

“नाही आवडत तर नका जेवन करू !”

थोडं रागानेच ती बोलली, मिही तिला दुखावल्यानं नाराज होतो. रात्रौ ती माझ्याशी काही बोललीच नाही. मुकाट्यानं पोळी, भात, दालफ्राय, चटणी, लोणचं ताट माझ्या रूममध्ये आणून ठेवलं. तसा मी स्वयंपाक करण्याचा बेतही आखला. तिचं राग पाहून स्वॉरी म्हणावं, पण बोलण्याच्या आतच ती रागाने निघून गेली.

मी थोडावेळ पुस्तक वाचलं. नी दारातून पाहिलं. ऊर्मीला जेवायला बसली होती.

मी माझं ताट पकडून तिच्या समोर जावून बसलो. तीनं माझ्याकडे पाहिलही नाही.

“एवढा रूसवा बरं नव्हे !”

मी तिच्याकडे स्मित हास्य करीत म्हटलं. तिने माझ्याकडे पाहिलं. तिही हसली. आज आणखी आमचं जेवण भरपूर झालं होतं.

“अहो मॅडम, असं रोज तुमच्याकडे, मला तरी खरेच हे योग्य वाटत नाही. तुम्हाला वाटतच असेल तर मी केव्हा स्वयंपाक बनवायचं आहे ते कळवा... मला काय आयत मिळाल्यावर ? असेही नशीब असावे लागतात.”

मी तिला म्हटलं नि हसलो. तीही क्षणातच मंद हसली. लगेच मनातच ठरवलं नि म्हटलं,

“बरं, तुम्हाला मेस सुविधा पुरविण्याचा मोबदला दिला तर चालेल ना !”

“जशी तुमची इच्छा !”

मला तिच्या स्वभावाचा हेवा वाटायचा. मलाही ती आवडायला लागली. माझ्या हृदयातील प्रेमगंध जागृत झालं होतं. पण आपण तिला हवे असेल काय ? आपलं फिल्ड नि तिचं.... दोघेही वेगवेगळे. तिने सामानाची सारवासारव केली. मला स्वतःला रूममध्ये जावं असही वाटलं. पण तिच्या कपाटातील पुस्तके चाळित बसलो. डिसेंबर महिन्यातील कडाक्याची थंडी, खूप गारवा वाहत होता. बाहेर निरभ्र आकाशात ओथंबून चांदण्या पसरल्या होत्या.

गाव तसं लवकरच झोपी गेलं. दारातून आलेला गारवा मनाला प्रसन्न करीत होता.

“किती छान वाटतं इथलं मनोरम्य वातावरण !”

“हो ना ! अगदी प्रसन्न, जावू या का फिरायला.”

मी तिला आडेवेडे घेतले नाही. दोघेही अनवाणी रस्त्यानी फिरायला निघालोत. गार वाऱ्याची मंद झुळूक अंगाला झोंबत होती. फार प्रसन्न वाटायला लागलं. शीतल चांदणं, .... तारा..... मनतारा.... माझ्या जीवनात ऊर्मीलारूपी तारा अगदी लगट करीत होता...

बराच वेळ आम्ही बाहेर फिरत राहिलो. शरीराला बोचरी थंडी जाणवू लागली. आम्ही मागे वळलो. मी स्वतःच्या रूमकडे वळलो. ती ही गेली. मी तिच्याकडे एक नजर टाकली. तिच्या नयनातील बेधुंदपणा मला जणू साद घालीत होता. अंथरूणावर पडलो, माझी मंजील मला डोळ्यात तरळतांना दिसली...




ऊर्मीला


अकरा महिने लोटले, मी आणि प्रभात आजूबाजूलाच राहात होतो. आमच्यातलं अंतर होतं तेवढच राहिलं. माझ्या मनात यायचं, आपण पुढाकार घ्यावा. लग्नाची मागणी घालावं. पण आपण त्याला आवडणार काय ? हाच प्रश्न पडायचा. कुणी मनमोकळं बोललं म्हणजे प्रेम असतं काय ? तसं त्यांच्याही मनात माझ्या बद्दल काय होतं कुणास ठाऊक. पण त्यांनी कधी माझ्या जवळ विषय काढलाच नाही.

तसं त्यांनी पुढाकार घ्यावं, माझ्या मनात वारंवार उर्मी दाटून यायची. कधी वाटायचं, हे दार तोडून जावं. कधी जवळ असलो की, म्हणावसं वाटायचं,

‘किती अंत बघतोस रे या अंतापुरात...’

पण... हिंमत जुळलीच नाही. रात्र-रात्र मी प्रभातच्या सहवासाच्या आठवणीचे स्वप्न रंगवायची...

एकदा त्यांनी मला बाथरूम मध्ये विवस्त्र बघितलं. मी कधीही बोलले नाही या विषयावर, त्यानंतरही बरेचदा गाऊनचे बटन खुलं ठेवलं. जाणून स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला. पण त्यांनी मला कटाक्षाणे टाळलं.

बरेचदा उत्तेजित करणाऱ्या स्त्री कादंबऱ्या त्यांना वाचायला द्यायची. पण त्याविषयी कधी चर्चा केली नाही. माझं पुढाकार घेणारे मन हळूहळू अंतरंगातील उर्मी दाबून रडतच राहिलं...

काल शाळेत असतांना, सुंदर, गोरापान, उंच, धिप्पाड, पाचफुट सहा इंच शरीरयष्टी असलेला पुरूष आत आला. सरांशी त्याची ओळख असेल, नुकतेच ते जवळच्याच शाळेत बदली होवून आले होते. सरांशी त्याचं बोलणं अगोदर झालंही असेल.

सरांनी मला बोलावलं. त्यांचा परिचय दिला.

रमेश, वय तिस वर्ष,शिक्षक. माझ्याच समाजाचा, घरचा श्रीमंत, त्यांनी मला लग्नाबद्दल विचारणा केली. मला त्यांचा मनमोकळेपणा आवडला. त्यांनी विचार करून कळवायला सांगितलं. मी बराच विचार करीत राहिली. सरांनी मला त्यांच्याविषयी प्रोत्साहन दिलं. लवकरात लवकर कळवायला सांगितलं.

मी त्यांचाच विचार करते आहे. रात्रौ जेवण आटोपलं. प्रभातही आज फारसा काही बोलला नाही. माझं मन वेगळं असल्याने असेल कदाचित.

मी अंथरूणावर पडली, काय करावं ? द्यावं काय होकार ? पण....एकदाच पाहिलं, आपण त्यांना ओळखतो तरी कुठे ? पण, शिक्षकच आहेत ना ! वरून आपल्याच समाजातील. एवढा सुंदर पुरूष, आजपर्यंत मनात येत होतं ते सारं काही. त्यांना आपण काळंसावळं असूनही पसंत आलोत, काय करावं ?

की, विचारावं प्रभातला, सांगावं मनातलं बेत. काय म्हणेल तो. प्रभात झोपला असावा. त्याच्या खोलीतले दिवे मालवले होते. विचाराचं चक्र सुरू झालं होतं. निर्णय घ्यायला हवा. प्रभात की, रमेश.

प्रभातवर आपलं प्रेम आहे. पहिलच पे्रम, आणि रमेश छे ! नाही, पण पाहायला कसा देखणा आहे तो, कदाचित तो सुद्धा आपल्यास समजून घेईल. त्यांना आपण आवडल्या शिवाय का मागणी घातली.

मी अंथरूणावरून उठली, प्रभातच्या दारात गेली. माझे पाय थबकले, वाजवावं काय दार ? माझ्या हृदयात कंप सुटला. कपाळावर घामाने जागा घेतली. स्पंदने वाढली. मी माघारी परत रूममध्ये आली...

विचारावं की विचारू नये ? हं ! आठवलं, आपण नाही का लहान असतांना चितपट करायचो, करायचं का चितपट ?

चित आली की, प्रभात नि पट आली की, रमेश... नाही तसं नाही, जर पट आली नि रमेशला होकार दिलं तर प्रभातचं काय ? त्याच्या मनात जर का आपण असलो तर ! तो आपल्याला कदापिही क्षमा करणार नाही.

आपण चितपट करायचं, चित आली तर प्रभातला विचारायचं. पट आली तर ? नको, माझं मन अधिर झालं होतं. जावं प्रभातच्या कुशीत, स्वतःला झोकून द्यावं. त्याची स्वस्वामीनी व्हावं. तो दूर सारेल तर सारेल...

मागल्या महिन्यापासून प्रभात असा फार कमी बोलतोय. कसल्याश्या विचारात तो गर्क असतोय. त्यात काहीतरी बदल झाल्यासारखं वाटते. कदाचित तो आपल्यापासून सुटका तर करू तर इच्छित नाही. मी केव्हापासनं त्याला आपलं मानलं. मी स्वतःला आरश्यात पाहिलं. माझच रूप मला धुक्यागत झालेलं भासलं.

जावू द्या, प्रभातला छान गोरी गोमटी पोरगी मिळेल. आपली इच्छा का म्हणून त्यावर लादावी. पण एकदा विचारावं... मी खूप मन घट्ट केलं. हिंमत जुळवली. दार ठोठावलं. दार टेकून उघडच दिसलं. दाराला ढकललं. मी सरळ आत गेली. कलदार वर उडालं होतं....


प्रभात


मी पॅन्टातील कलदार काढून वर फेकला. ऊर्मीला आत आली. कलदार तिच्या नजरेसमोरून पायाजवळ जावून पडला.

चित होय ! चित आली होती. ऊर्मीलाची चित, ऊर्मीलालाच जवळ करायचं. बस ! झाला निर्णय...

ऊर्मीलाचे केस मोकळे सुटले होते. डोळ्यात आतुरता होती. पारदर्शक नाईट गाऊनातून तिचं बिंब प्रतिबिंब नाईट लॅंपच्या प्रकाशात माझं मन जागृत करायला पुरेसं होतं. मिही तिच्याकडे एकटक पाहू लागलो. तिही अधिर होवून माझ्याकडे बघतच राहिली. दोघांच्याही ओटावर शांतता...

मी मागल्या महिन्यात गावाहून आलो. माझ्यासाठी अनेक स्थळ आली होती. पण मला ऊर्मीला शिवाय कुणिच नको असच वाटायचं. मी तसं सांगितलही. पण हिचा वर्ण पाहून घरच्यांनी नकार दिला. मला लवकरात लवकर लग्नास होकार द्यायचं कळवण्यात आलं. देशमुखाची मुलगी मला सांगून आली होती.

मी आलो तेव्हापासून ऊर्मीलाला विचारावं काय ? विचारावं. असा बराच प्रयत्न केला. पण माझ्या ओठावर शब्दच फुटत नव्हते. वरून मी तिच्यापेक्षा एक वर्ष वयाने कमीही. लहाणपणी मोठं घास घेतल्यासारखं.

मी अबोल झालो. माझं कामात लक्ष लागेना. एवढ्या दिवसात वाचनही बंद झालं. फक्त ऊर्मीलाकडे जेवण घेतलं की मी एकटाच फिरायला जायचा. तासनतास वनराईच्या रस्त्यांशी मनातल्या मनात हितगूज करायचा.

मला माझा निर्णय घ्यायचा होता. मी जेवण आटोपलं. रूममध्ये आलो. माझं मन बेचैन झालं होतं. मी अथरूणावर पडलो डोकं गरगरायला लागलं होतं. वाटलं फिरायला जावं. नको आज निर्णय.... अखेरचा निर्णय.... या अंतापुरातील कुठला तरी अंत.... दिवे मालवले. नाईट लॅम्प लावला. हातात पुस्तक घेतलं. मन लागलं नाही. पुस्तक बाजूला ठेवलं.

मी अंथरूणावरून उठलो, वाटलं जावं. विचारावं.... ऊर्मीला खरंच तू माझ्याशी लग्नास होकार देणार काय ? दारासमोर गेलो. हृद्याची स्पंदने वाढली. मी माझं पाऊल मागे घेतलं. पुन्हा परत आलो. बराच वेळ ऊर्मीला की देशमुखाची मुलगी....

छे ! त्या मुलीला तर मी अजिबात पाहिलं नाही. मग कसं होकार द्यायचं. पण ऊर्मीला घरच्यांना नको ! वयानेही मोठी, काय कराव ? मी.... आठवलं.....निर्णय घ्यावच लागणार.... जीवनभर तर सुख मिळायला हवच ना !

मी पॅंन्टातील कलदार काढून वर फेकला. चित आली तर ऊर्मीला नाहीतर....


उर्मीला

माझ्या डोळ्यातून अश्रू घरंगळू लागले. मी आणि प्रभात दोघेही स्तब्ध. मला हुंदका आला होता. मी दोन्ही हात समोर करीत प्रभातच्या कुशीत सामावली. प्रभातही मुसमुसलेला. त्याने मला घट्ट आवळलं होतं. आकाशातील तारकापुंज. निरभ्र स्वच्छ आकाश... मंद लाल झुळूक...... प्रकाश..... फक्त दोघेच....आम्ही दोघे........ मी त्याच्या बाहुपाशात.......त्याने पप्पी घेतली. त्याच्या मानेवर डोकं ठेवलं. जवळ घेतलं... हवेचा तरंग दारातून दोघांनाही स्पर्श करीत होता. कदाचित वळीवागत भुरकं पाऊस सुरू होणार....

“हं आठवलं ! आज माझा वाढदिवस.”

माझे डोळे भरून आले. समोर कलदार अस्पष्ट पडलेलं दिसलं. त्याकडे निरखून बघितलं. चित...

होय चितच... स्तब्धता....

अशोकस्तभांच्या सिंहाकिंत राजमुद्रेखाली लिहिलं होतं...


सत्यमेव जयते !