Ek aahe aniket - (Baalkatha) books and stories free download online pdf in Marathi

एक आहे अनिकेत - (बाल कथा)

बालचारित्र्य कथा




एक आहे अनिकेत

संजय वि. येरणे





भरारी प्रकाशन, नागभीड.





मनातलं

शिक्षणाची संकल्पना बदलली, आनंददायी शिक्षणातून गंमत जंमत खेळागत शिक्षणाची धुरा सुधारण्यात आली. मी प्राथमिक शिक्षक मनानेच झालो. लहान असतांना वाटायचं, सर, आपल्याला शिकवतात म्हणजे ते किती हुशार असतात बरे ! त्यांना खूप ज्ञान असेल नाही का? हया बालपनातल्या न उमजलेल्या गोष्टीनेच शिक्षकी सेवेचं व्रत स्वीकारायचं ठरलं. पण सुरवातीला जो उत्साह, उमेद या सेवेत होती तो उत्साह पुढे टिकला नाही. शिक्षण सेवा न राहता व्यवसायाचं स्वरूप बनले. राजकीय शासकीय प्रणालीने शिक्षणाचा विकास करतांना त्यात भरपूर सुधारणा घडवल्या. पण कार्यकुशलता नसणे, स्वार्थ, हेवेदावे हयातून गंभीर बाबी दिसू लागल्या. प्रशासनही हयाला जबाबदार धरावं काय? वडयाचे तेल वांग्यावर... कदाचित यामुळेच मी हिरमुसायचा....

तन्मयतेतून मी मनातल्या भावनांचा अंतरंगाचा विचार करतोय. नव्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न करतोय. कथा, कविता, कादंबरी, लेख खूप काही मनात येतं ते लिहीतोय. बरचसं लेखन पडून राहिलं. त्याला कारणही तशीच.... आर्थिक बाब, आम्हासारख्या उकीरडयावर दारिद्रय घेवून जन्माला आलेल्या व्यक्तीला तर नेहमीकरीताच... माझ्याच समस्या गंभीर तर इतर भारतीय बांधवाचं, विद्याथ्र्याचं काय ?

हयातूनच मी एक आहे अनिकेत या बालकथेचं लेखन केलं. अनिकेत माझा विद्यार्थी, त्याचे गुणकौशल्य, स्वभाव चांगुलपणा हयाचं सर्वांनीच कौतुक केलं. मी ही त्याचं बारकाईने निरीक्षण केले. त्याला बोलंकं केलं. गट्टी जमवीली आणि त्याची कहानी त्याच्याच शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न....

इथल्या कथापूर्ण बाबी प्राथमिक शिक्षण काळातील मोजकयाच घटना घेवून चित्रित झाल्या आहेत. उद्देश हाच की इतर विद्याथ्र्यांमध्ये नवगुण, चांगुलपणा यावा. नवे विचार, नवे ज्ञान, नवी दृष्टी, नवी दिशा त्यांना लाभावी. त्याच्या आई बाबांनी शाळेतील शिक्षकांनी बरचसं सहकार्य केलं. त्याच्या मित्रांनीही त्याबाबत बरच काही सांगीतलं. याचमुळे एका इवल्याशा जीवाचं चरित्र कथारूपाने बालकांसमोर ठेवीत आहे.

बालकांना पालकांना काहीतरी चांगलं मिळावं. नवी दिशा व सृजनशिलता निर्माण होण्यास्तव आपणा सर्वाकरीता एक आहे अनिकेत रूपी एका अर्धवट जीवनाची अर्धवट कथा.......

स्मृतीशेष माझा मानद भाऊ

प्रकाशक बंडू कत्रोजवार

यांच्या स्मृतींना.... सादर अर्पण....

लेखक... संजय येरणे. 94041210981


मी अनिकेत, माझ्या हद्यातील आर्त भावनांचा विचार करीत असतांना माझं मन सैरभर धावू लागलं. तशातच अंकुरातून फुटलेली अनुभवांती मी आपणासमोर मांडतोय.....

पण मित्रांनो, मी म्हणजे कोण? त्याचा विचारही तुम्ही करू नका. मी कुणीही नाही. शरीराने, हाडाने, मासाने, रचलेला एक सांगाडा एवढेच. मी जेमतेम बारा-तेरा वर्षाचा तरीपण माझ्या मनात खुप विचार येतात. माझ्या मनातील विचार भावना तुम्हासही कळाव्यात असं मला नेहमी वाटतं. साहजिकच आहे ते. कारण तुम्ही माझे स्वकीय, गुरूजनांनी शिकवलेलं एक वाक्य मला आठवतं. “ हे विश्वची माझं घर” .

मग मला तुम्हाला सांगण्याचा हक्क आपोआप प्राप्त झालेला आहे. असच मला वाटतं.

मी खुप मोठा आहे, छे! असला विचार कधी तुम्ही करू नका! अगदी माणसानं मधमाशी सारखं व्हावं. असाच प्रयत्न मी माझ्या जीवनात करणार आहे.

आमचं घर बाबा, आई, आजी, दादा आणि मी, बस एवढंसच! त्यांनीच मला दिशा दिली. मला मात्र दशा कधी अनुभवायला मिळाली नाही. तरीपण खुप काही कळलय मला. माणसाने अंर्तमुख व्हायला पाहिजे. ऐकुन घ्यायला पाहीजे. आणि विचार करायला हवा. एवढच आजतागत कळलं.

थोर आता कुणीही बनू शकत नाही. पण थोरांच्या पायातील धुळीचा कण बनायचं, असा निर्धार करायला हवा.

सराकडून ऐकलं होतं. त्यावर विचार करू लागलो. आजतागायत विचार चालू आहे. अनंत आसमंतात विचारांच अफाट चक्र फिरतच राहणार. कधी कदाचित एखाद्या चक्रव्युहात हा मानवी देह अडकणार. अभिमन्यू अपयशी ठरला, पण मित्रांनो आपल्याला आधुनिक जीवनाचं चक्रव्यूह भेदून काढायचं आहे....


2

मी अगदी आंनदांने उडया मारल्या. माझं मलाच कळत नव्हतं. आनंदाला उधान आलं. पण “विजयाचा आनंद संयमानं घ्यायला पाहिजेत” असं सुद्धा मी सुविचारातून शिकलो आहे.

आई मला गोलूच म्हणायची नेहमी, छान वाटतं नाही का हे नाव? मात्र बालपणी बरं वाटतं! मोठं झाल्यावर कुणी गोलू म्हटलं तर. जाऊ दे, आतापासुन कशाला विचार करायचा.

हं ! तर विसरलोच होतो. अगदी आनंदात असच सारख विचार येतो.

आईने मला बोलावलं. मी आईकडे धावतच गेलो. किशोर मासिक उघडून दाखविलं. मला मात्र काहिही कल्पना नव्हती ना ! बघतो तर काय? त्यात माझा छापून आलेला फोटो आणि माझा अनुभव.

“एकदा मी रस्त्यानी जातांना एक लहान मुलगी वाटेतच पडली. पण तीला कुणीही उचलत नव्हतं. ती रडत होती. माझं मन गहिवरल, त्या मुलीस उचलून तिच्या आई वडीलाकडे नेलं. त्यांनी मला शाबासकी दिली.”

एवढच छोटं अनुभव, पण पहिल्यांदाच आनंदाश्रू माझ्या डोळयातून तरळले, आपला फाटो अगदी अल्पवयात शुल्लकशा कारणामुळे छापुण येईल असं कुणाला वाटतं? मी ही त्यातलाच समजा.

मी हुशार आहे, असं सारेच म्हणतात. एवढच नाहीतर सर्व शिक्षकवृंदाचं माझ्यावर अपार प्रेम आहे. त्यालाही कारण आहे बरं का?

मी माझ्याच मॅडमचा मुलगा. मग कौतुक होणार नाही तर काय? पण मला मात्र ते कौतुक नको आहे. आपल्यात गुण असतिल तरच कौतुक व्हावं जावू द्या! मला मात्र यातलं काहिच कळत नाही. बरं! बाकीची शाळेतली मुलं हुशार नाहीत का?

माझं गाव अगदी छोटसं, चार पाच गावची मुलं शिकायला येतात. काही मुलं तर अगदी माझ्यापेक्षाही हुशार, माझे मित्र, माझे संवगडी खुप-खुप मजा येते शाळेत. तशी फार मोठी आहे हं माझी शाळा!

पण त्यांचं कौतुक व्हायला पाहीजे, होते सुद्धा! आमच्या शाळेतील माझ्याच गुरूजनाकडून. पण मला मात्र थोडासा जास्तच भाव मिळतो.

मी अंर्तमुख होवून विचार करतोय. सरांनी प्रार्थनेच्या वेळेस विद्याथ्र्यांना माहिती दिली. मुलांनी टाळयाच्या गजरात स्वागत केलं. पण विचाराचं अफाट चक्र माझ्या डोळयात गुफंत चाललं होतं.

माझ्या शाळेला आजतागत मिळालेला पहिलाच बहुमान होता तो. साऱ्यानी माझं कौतुक करावं नाही तर काय? पण मला वाटतं, आपण असेच घडत गेलो पाहीजेत. अगदी कुभांराच्या भट्टीतील मडक्यागत, आपल्याला आकार मिळावा, मला आकार मिळायला सुरवात झाली असच वाटतं. पण आपणही उन्मादाच्या प्रवाहात वाहून न जाता विजयाचा आनंद संयमानं घ्यायला हवा. मी अगदी असाच आहे.

सर आईजवळ नेहमी म्हणतात. “भावनाशिल, संयमशिल, विवेकी आहे तुमचा मुलगा !”

मला तरी कुठं कळतं यातला अर्थ, का? तर आम्ही खेडयातली मुले, शहरातील मुलाइतपत अनुभव संस्कार कुठं मिळतात आम्हाला.

परिस्थीती त्याला कारणीभूत ठरतेय. हं! आठवलं म्हणून सांगतोय.” माझे संवगडी खुप गरीब आहेत हो काही. ज्यांना धड कापडच काय? खायलाही मिळत नाही. अशा परीस्थीतीत जगणं, कुठून पुरवायच्या सोयीसुविधा. खुप तारांबळ होते ना त्यांची”

कधी आई-बाबा बोलत असतात हया विषयावर, काहीतरी समजलं तेवढं ऐकुण घ्यायचा मी....

०००


माझ्या नावावर अचानक मनिऑर्डर आली. फक्त पन्नास रूपये मानधन, मला कुठं कळत होतं यातलं. मी आईस दाखवली. तेव्हा कुठं कळलं. मासिकात लिहलेल्या सदराकरीता मला मिळालेलं ते पहिलच मानधन. मी जाम खुश झालो.

आज मला शाळेत कधी पोहचतो याचच वेड लागलं होतं. तशी मी तयारीही लवकर केली. पण शाळेत जाताच हिरमुसलो. आमच्या शाळेत मोठी-मोठी वडाची झाडं आहेत. निसर्गाच्या मुर्तीमंत छायेत वसलेली ती आमची शाळा. हया शाळेतील ती खुप जुनी एकोणवीस झाडं आमच्या स्वातंत्र्य पुर्व काळातील गुरूजनांनी लावली म्हणतात. त्यांची अपार सावली आज आम्हाला अनुभवायला मिळते आहे.

“खरच आहे ते! झाडं लावतात कुणीतरी आणी फळ मिळते दुसऱ्याना.”

रस्त्याकडे एकटक पाहात होतो. पण सर लवकर आलेच नाहीत. मला मिळालेल्या बक्षिसाची माहीती सरांना कधी सांगतोय हयाचाच विचार करीत होतो. लगेच माझ्या मित्रांनी मला खेळायला हाक दिली. पण कुठलं मन रमतं खेळण्यात. मी अजिबात खेळायला गेलो नाही. प्रार्थना झाली तरी सर आलेच नव्हते. मी मात्र गप्प....

तास सुरू झाला नी सर आले. तेव्हा कुठं मला बरं वाटलं. सर येताच आईने त्यांना कल्पना दिली. पण मला कुठं माहित होतं ते.

सर वर्गात येताच सरांच्या जवळ जावून मी म्हटलं, “ सरजी, मला पन्नास रूपयाचं मनिऑर्डर मिळालं”

“ कसलं रे !”

“ आपण ते मासिकात लिहलं होतं त्याबद्दल”

“ हं छान!”

“ सरजी”

मी थोडसं घुटमळलो, सरांशी अशा स्थितीत कसं बोलायचं.

“ सरजी हे सारं घडलं ते कुणामुळं घडलं माहितेय का?”

“ कुणामुळं?”

“ तुमच्याच सौजन्यामुळं”

सर किंचीतसे हसले, मीही प्रसन्नपणे हसलो.

त्याच तासाला सरांनी विद्याथ्र्यांना सांगितलं

''तुम्हीही असच सुदंर लेखन, वाचन करा”

माझं पुन्हा विद्याथ्र्यांनी तीन टाळयांनी स्वागत केलं. मी मात्र सुखावलो होतो. यशाने, अगदी रसाळ फळागत.

सर नेहमी म्हणतात, "अवांतर पुस्तकाचं वाचन करा, माझा विद्यार्थी जेव्हा माझ्यापेक्षा खुप मोठा होईल तेव्हा कुण्या शिक्षकाला धन्य वाटणार नाही.”

एकदा तर चक्क सरांनी सातवीच्या विद्याथ्र्यांना निरोप देण्याप्रसंगी विद्यादानाची भिक मागितली. मला कळतय, आपल्या विद्याथ्र्यांकडून किती अपेक्षा असतात सरांच्या. पण आमच्या खेडयातल्या मुलांना, पालकांना समजेल तेव्हा ना?

कधी कधी वाटतं खुप शिकावं, खुप मोठं व्हावं. अगदी द्रोणाचार्यापेक्षाही धनुर्धर, अर्जुन शिष्य म्हणुन मोठा झाला ना!

मला माहीत नाही माझ्या प्रारब्धात काय दडलय ते.

सर घरी आले तेव्हा सरांना मी म्हटलं, “सरजी, मी या पैशाचं काहितरी खावू घेवू.”

तसं सरांनी मला मित्रच मानलं होतं. सर माझ्याशी मित्रत्वाने बोलायचे. सुरवातीला मी सरांशी बोलतांना लाजायचा. पण आता इतरापेक्षाही सरांशी मी मनमोकळया गप्पा मारीत असे. माझ्या घरच्यानांही माहित होतं.

“अरे अनिकेत ! आज चतुर्थी, गणपतीचा दिवस, किती छान भाग्यवान दिवस ठरला तुझ्यासाठी, बेट्या आपण या पैशाचं खाऊ घेवू म्हणतोस. तुझ्या जीवनातली पहिली कमाई, आज देवाजवळ ठेवायची, पुजा करायची, आणी म्हणायचं देवाला, अशिच सदबुद्धी दे ! खुप मोठा होवू दे.”

सर जातांना म्हणाले, “पहिली कमाई खर्च करायची नाही हं! अशीच आठवण म्हणुन जपुन ठेव. आपल्याला सदैव प्रेरणा देत असते ती. मी सुद्धा आठवीत असतांना काम करून कमविलेले पाच रूपये देवाजवळ ठेवले होते.”

सरांनी मला समजावलं, खुप काही कळतं सरांच्या बोलण्यातलं. मी आत्ताही ते पन्नास रूपये जपून ठेवलेत आईसाक्ष !


०००

एके दिवशी आईला म्हणावे की म्हणू नये असाच प्रश्न पडला. पण विचारल्या शिवाय कुठं मन रमतं.

“ आई, एक गोष्ट विचारू का गं?”

“ काय?”

“ अगं, आज की नाही आपल्या एका सरांनी त्या प्रफुल्लला शाळेत गाडी पुसायला सांगीतली. त्यानेही मोठया आनंदाने ती गाडी स्वच्छ केली. पण सरांचं बरोबर आहे का गं हे? आम्ही मुलं शाळेतली बरीच काम करतो, करायलाही पाहीजेत. पण सरांनी गाडी पुसायला लावणं मला नाही पटत ते......”

आई हसली कदाचीत मी विचार करतो म्हणून असेल.

“ अनिकेत प्रत्येक गोष्टीवर विचार करावा लागत नाही. काही लोकांचं आचरण, स्वभाव वेगवेगळा असतो, जाऊ दे, आपल्याला काय करायचयं?”

मी मात्र गप्प बसलो, पण मला नाही पटत गरीबांना कुणी वाकवणं, कुणावर अन्याय करणं, आपण तरी का म्हणुन मुकाटयानं सहन करायचं. आपल्यावर कुणाची तरी कृपादृष्टी असावी या करीताच काय? मला नको ते लाच्छनास्पद जीवन. बरं ! तो मुलगा गरीब आहे म्हणुणच त्याला सांगीतलं. मी मॅडमचा मुलगा आहे, मग मला का नाही सांगीतलं ते काम? असला भेदाभेद.................

खुप राग येतो केव्हा-केव्हा, तशी आई म्हणते सुद्धा, “तुला खुप राग येतो केव्हा-केव्हा.”

मलाही कुठं कळतं, असं का घडतं ते?

आईची माया अपरंपार असते. कथा, कविता अनेक पुस्तकातून वाचायला मिळालं. सरांनी मला सानेगुरूजीचं ‘श्यामची आई’ पुस्तक वाचायला दिलं. मी भराभरा ते पुस्तक वाचुण काढलं. किती चांगली होती ना श्यामची आई!

पहिल्यादांच कळलं मला, साने गुरूजी त्यातुळेच घडलेत. पण मी माझ्या आई बद्दल काय सांगावं?

माझी आई सुद्धा अगदी तशीच प्रेमळ, मायाळू, दयाळू आहे हो ! ती शिक्षिका आहे म्हणुणच असेल तिचा स्वभाव.

माझ्या आईचं डोकं दुखणं नेहमीचच. त्यामुळे आईची तब्येत वारंवार बिघडत असते. तेव्हा आईचं घरकाम करणं, डोकं दाबुन देणं, सारं काही काम मीच करतो. मला सुद्धा आईला मदत करणं आवडतं. आईला नाहीतर कुणाला मदत करायची? आई, बाबामुळे आपण या जगात जगतोय. माझीच आई मला जन्मोजन्मी मिळावी कुणाला बरं वाटणार नाही?

कधी-कधी आई माझ्यावर रागावते, पण माझ्याच भल्यासाठी ना!

०००

मी विद्यार्थी आहे, शिकतोय. पण शिकत असतांना किती अनुभव येतात नाही का? सर आम्हास नवनवीन माहीती देतात. प्रत्येकच गोष्ट लक्षात राहात नाही. पण प्रत्येकच बाबी कालानुसार आठवतात. माझं बालपण, बालपणीचं शिक्षण अत्यंत मजेशिरच गेलं. अगोदरच सांगितल्याप्रमाणं.

सर्वांनी भरभरून माझ्यावर प्रेम केलं. त्यामुळेच असेल, मी मात्र सामान्य होवून जगतोय. मी काही एवढा हुशारही नाही. सर नेहमी म्हणतात, तू प्रगती करावीस. सारं काही लक्षात येतं. दरवर्षी माझा पहिला नंबर ठरलेलाच. शाळेत मी सर्वांशी मिळुन राहतो. एकदा आम्हाला सरांनी मेलजोल प्रक्षिक्षणाबाबत माहिती लिहायला सांगीतली. सारं काही खरं-खरं लिहायचं होतं. नाव, पत्ता, अत्यंत जवळचे मित्र असं सारं काही.

मला छंद चित्रकलेचा, चित्र काढणं मला फार आवडतं. थोडंफार चांगलं चित्र काढता येतं. सर्वाशी प्रेमानं चांगलं वागणं हा माझा जीवन उद्देश, असही मी त्यात लिहलं. मला मात्र डॉक्टर व्हायचं आहे असच वाटतं.

सरांनी म्हटलं “ डॉक्टर व्हायचं ना! मग इंग्रजी, विज्ञान अगदी सुरेख जमायला पाहिजेत.”

त्याप्रमाणे मी प्रयत्न करतोय.

सर कधी रागावतातही, पण सर मला कधी मारीत नाहीत. का बरं असेल? मला अजुनही समजलं नाही. पण एकदा सरांनी मला छडया मारल्यात. हातावर वळ आलेत मला काहीएक वाटलं नाही. की माझी तक्रारही नाही.

‘आपल्याला आईवडील नाही का मारीत?’

‘का बरं मारावं?’

‘आपण कुठतरी चुकतो म्हणुनच ना!’

‘आम्हाला कुठं समजतं? सरांनी मारलं तर बिघडलं कुठं? आपल्या भल्यासाठीच सांगीत असतात ना!’

सरांनी कधी एखाद्या मुलास मारलं तर काही मुलं शिव्याही देतात. मला सारं काही कळतं. इतका राग येतो की नाही? वाटतं त्या मुलांचा गळा दाबुन टाकावं....

आईला म्हटलं, ‘आई गं, सरांनी त्या संदिपला मारलं तेव्हा तो शिव्या देवू लागला. मला खुपच राग आला. दुसऱ्या सरांनी कुणाला बोलले, कुणाला मारले किंवा इतर सरांना कुणी शिव्या दिल्या तरी मला एवढं काही वाटणार नाही. पण आमच्या सरांना कुणी शिव्या दिल्या ...........

‘एखाद्या दिवशी .................’

“ अनिकेत एवढं राग येवू देवू नये, सरांनी मुलांना मारणं, मुलांनी सरांना शिव्या देणं, त्यात एवढं विशेष काय आहे?

हं! मला किंवा सरांना कुणी शिव्या दिल्या तर कुणाला मारू नकोस. जर का मी एखाद्या मुलास मारलं तर मला मुलं शिव्या देत नसतिल का? याचा विचार केला का कधी?”

आईचं म्हणणं अगदी बरोबर होतं. तेव्हापासुन मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. राग-लोभ तर चालायचच.

सरांनी कवितेत लिहलयं

'उंच भरारी चंद्रावर घ्या

आकांशा फुलवतिल दिव्य

पुज्य असावे सानेगुरूजी

व्हा तुमचे तुम्ही एकलव्य !’

मला कळतय आपणास उंच भरारी घ्यायची आहे.

आपला गुरू कुणीही असेल त्यांच्यावर श्रद्धा असावी, गुरु पुज्य असावा. स्वतःच एकलव्य बनायचं. माझं स्वप्न कधी तरी पुर्ण व्हावं........

‘एकलव्याचं!’

०००

मी पहिल्या वर्गात असतांना माझी आईच मला शिकवायची. मला आठवतं, मी वर्गात खुप मस्ती करायचा मला इतरासारखी भिती वाटत नव्हती. पण मी खुप खोड्या करतो. म्हणुन मुलं आईला सांगायची. आई माझ्यावर रागवायची, मारायची सुद्धा, मी हिरमुसून जायचा. नंतर आई वर्गात नसली की जशास तसं वागायचा. माझ्यामुळं आई त्रासायची, आई मला घरी समजावून सांगायची.

“वर्गात मस्ती करू नये, सर्वांशी भांवडागत मिळून मिसळून राहायचं, मी तुझी घरी आई आहे. वर्गात मला मॅडमच म्हणायचं. विसरू नकोस हं!” असं नेहमीचं सांगणं.

बालपणीच्या आठवणी किती मस्त असतात नाही का? आपण कितपत चुकलो याचा विचार भविष्यातच करतो. चुकतांना चुक कळत नाही. चुक कळली तरी आपण त्या चुकापासून वळत नाही. सर्वाच्या बाबतीत नेमकं असचं घडतं.

मी दररोज शाळेत जायचा. मला चांगल्या प्रकारे लिहता, वाचता येत होतं. तेव्हा आठवी-दहावीचे वर्ग आमच्याच शाळेत भरायचे. मुख्याध्यापक मा. भुजाडे सर होते. त्यांना मी खुप आवडायचा. ते नेहमी माझं लाड करायचें मी कुठेही असलो तरी ते मला बोलावून काहितरी विचारायचे. आणी नेहमी चाकलेट घेवून दयायचे. त्यांनी मला खुप लाडावलं. नेहमी चॉकलेट घेवून दिलेत. मी सरांकडे जायचा, त्यांना नेहमी चॉकलेट घेऊन मागायचा. आईला माझं वागणं बरं वाटलं नाही. आईनी मला तर एके दिवशी चक्क बदडवूनच काढलं.

मी रडत-रडत एका कोपऱ्यात दडलो. मला तरी कुठं समजायचं. मी एवढासा चिमुकला जीव, आता मला चांगली समज आली.

आई म्हणते, ‘तू असं करायचा, तसं वागायचा.’

किती हसू येतं आपलं बालपणीचं वागणं ऐकुण, मी विचार करतो त्याबाबत....

तसं पाहता शाळेतली सर्व शिक्षकवृंद माझं लाड करायची. आता बऱ्याच सरांच्या बदल्या झाल्यात. मी सहावीत असतांना बऱ्याच वर्षा नंतर चंद्रपुरच्या बसस्टॉपवर भुजाडे सर मिळाले. त्यांनी मला गोलू म्हणुन मला आवाज दिलं. मला वाटलं इथं मला गोलू म्हणुन कोण बोलावणार?

मागे वळून बघताच सर दिसले. त्यांनी मला जवळ घेतलं.

‘ किती मोठा झालास रे गोलू!’

मी सरांना पाहताच भारावून गेलो. सरांना काय वाटलं ते मला कसं काय कळणार? पण त्यांनी माझी पप्पी घेतली.

“ चल आता तुला चॉकलेट घेऊन देतो, तुला चॉकलेट फार आवडते ना!”

सर हसायला लागले, मी लाजलो आणी म्हटले,

“ मी आता चॉकलेट खात नाही.”

“ बरोबर आहे, मोठा झालास ना आता! कसं खाणार बाबा चॉकलेट.”

मला सरांनी चॉकलेट घेवून दिलं. मी नको म्हणतच राहिलो. मला चॉकलेट घ्यावच लागलं.

मी भारावलो, जाणाऱ्या एस.टी. कडे पाहातच राहीलो. विचार करतोय अजुनही भुजाडे सर कधी तरी भेटतील. मला कवटाळून घेतील. मोठं झाल्यावरही मला चॉकलेट घेऊन देतील. त्यांच्या प्रेमाने मी मोहित होणार, अगदी पावसाच्या तुषारागत... मी त्यांना चरणवंदन करणार. पण काय माहित? कधी भेट होणार सरांची....

०००


उन्हाळयातील परीक्षा संपल्या. परीक्षा आली की नुसता वैताग वाटतो. मलाही कंटाळा यायचा. सारखे आई, बाबा अभ्यास कर म्हणुन ओरडायचे. मन नसतांना अभ्यास करणं जीवावर यायचं. तसं पाहता मी खुप अभ्यास करायचा. पण एखाद्या वेळेस खेळावं वाटलं तरी त्यालाही नकार. मी कंटाळायचा वाटायचं घर सोडुन कुठं तरी जावं मी लहान होतो ना! म्हणुन कदाचित कशाचाही विचार न करता माझ्या मनात असले विचार यायचे.

परीक्षा संपली की मजाच मजा, खुप खेळायला फिरायला मिळते. मामाच्या गावला जायला मिळते आणि अभ्यासाला सुट्टी, आता सांगा! कुणाला बरं उन्हाळा आनंदाचा वाटणार नाही. उन्हाळयातील ऊन दररोज तापायची. तरीपण उन्हात खेळणं आम्हा मुलांना काही मोठी गोष्ट नाही.

एकदा उन्हात खेळतांना दादाचं नी माझं भांडण झालं. अशी मस्ती करतानांच मला खुप जोरात लागलं. मी जोराने मोठया आवाजात रडू लागलो. मला राहवेना, इतक्यात आई आली. माझं रडणं ऐकुन आई त्रासली. माझं रडणं काही थांबेना. पाहता-पाहता आई काठीने बदडायला लागली. मला आईचा खुप राग आला. मी तिथुन रडतच उठलो. आईला म्हणालो,

“ आता या घरात मी राहणारच नाही.”

तेव्हाच सायकल घेवून बसस्टॉपकडे रडतच जायला निघलो. मला आई-बाबानी कुणीच अडवलं नाही. पण दादा मला माझ्या मागे मला पाहायला आला. त्याने घरी चालण्यासाठी मला ओढत नेलं.

पण मी आता कुठं जाणार होतो? मी रडतच आपल्या अटीवर कायम राहिलो. दादा माझं नकार ऐकुन त्रासला, निघुन गेला. मी बऱ्याच वेळपर्यंत तिथं रडत होतो. सांयकाळी घरी हिरमुसून परतलो. आई-बाबानी माझ्याकडे बघीतलं. पण मला काहीही म्हटलं नाही.

माझं राग पाहुन हसले, मलाही हसुही आलं. खुप जोराची भुख लागली होती ना!

०००


मला सरासोबत विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी व्हायला जायचं होतं. प्रदर्शनीला जाण्याकरीता माझी निवड झाली. हे माझं सुभाग्यच ठरलं. गांडूळ खत बायोगॅस प्रकल्प मी सरांच्या मार्गदर्शनात तयारही केलं. सरांच्या घरी मला प्रकल्प बनवण्यास सरांनी मदत केली. दुसऱ्या दिवशी मी नारंडा येथे प्रयोग मांडला. मी तयार केलेलं प्रयोग तसं फार आकर्षक होतं असं मला वाटलही नाही. पण विद्याथ्र्यांना समजण्यास फार सोपा होता.

प्रर्शनीत इतर शाळेतील विद्यार्थी प्रयोग बघण्यास येत होती. काही प्रश्न विचारायची, माहिती विचारायची, काही मला माहितच आहे म्हणुन खोडया करायची. इतर शाळेतील सर, मॅडमही प्रयोग बघण्यास येत होती. प्रदर्शनीत जवळपास शंभराच्या वर प्रयोग आले. मला सरांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे मी सर्वांना माहीती द्यायचा. प्रदर्शनीचे तीन दिवस मजेत गेले. मी सरासोबत दररोज येणे-जाणे करायचो. शेवटच्या दिवशी सरांनी बक्षिस वितरण समारंभाला मला नेलं नाही. त्याला कारणही तसच होतं.

आमचा प्रयोग उत्कृष्ट असेल, बक्षिस मिळवेल असं वाटतच नव्हतं. प्रदर्शनीच्या गावी जायला चार-पाच कि.मी. पायदळ चालावं लागायचं. मी लहान असल्यामुळे होणारा त्रास पाहुन सरांनी मला न्यायचं टाळलं. मलाही पाय दुखत असल्यामुळे फार बरं वाटलं.

त्या दिवशी मी गावला निघुन आलो. प्रयोग परत आणण्यास सर नारंडा येथे गेले. प्रदर्शनीत ताटकळत उभं राहावं लागायचं. केव्हा केव्हा मी त्रासायचो. पंरतू सरांना मी बोलू शकत नव्हतो. परीक्षण करणारी सर लोकं आली तेव्हा सरांनी सांगीतल्याप्रमाणे फार सुदंर

शब्दात माहिती दिली. मला तशी भितीही वाटायची. कारण सरांनी म्हटलं होतं आपण जेवढी चांगली माहीती देवू त्यावरच आपला नंबर अवलंबुन असेल. तसं पाहता दिवसभर सर्वांना प्रयोगाविषयी माहिती स्पष्ट करून सारं काही तोंडपाठ झाल्यासारखंच वाटायचं. परीक्षकांना मी जमेल त्याप्रमाणे स्मितहास्य करून माहिती दिली.

शेती आणी शेतीचा विकास, आर्थीक परिस्थीती बेताची असतांना आपण कसे करायचे, बायोगॅस प्रकल्पामुळे आपणास इंधन मिळतो. वर्षाकाठी आपल्याला किती फायदा होतो. पर्यावरणाची बचत तसेच शेती करीता त्यापासुन ऑस्ट्रेलियन गांडूळ द्वारा शेणखत कसं तयार करायचं याची सोपी माहिती मी सर्वांना द्यायचा.

प्रदर्शनीत माझा तृतिय क्रमांक आला. प्रमाणपत्र, शिल्ड मिळालं अशी माहीती मला मिळाली. कारण सर शाळेच्या गावी राहात नसल्यामुळे सर दुसऱ्याच दिवशी येणार होते.

बक्षिस मिळालं असं ऐकताच कधी नव्हे तो इतका जाम खुश झालो. माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. आई, बाबांना आनंदाने उडया मारतच सांगीतलं. थोडासा हिरमुसलो, जर का मी बक्षीस वितरणाला गेलो असतो तर!

रात्रभर विचाराने थैमान मांडलं होतं. सरांना आत्ताच जाऊन भेटावं, आपल्याला मिळालेलं बक्षिस पहावं, आनंदाश्रू माझे गळायला लागले.

वडाच्या झाडात मी सरांची वाट पाहात बसलो. सर येताच मी त्यांच्याकडे धावतच गेलो. सर खिन्न, उदास भासले. सरांनी मला शिल्ड व प्रमाणपत्र दिलं. मी माझ्या अप्रत्यक्ष झालेल्या गौरवाकडे पाझरल्या डोळयांनी बघतच राहीलो. मुलं माझ्याभोवती गोळा झाली. मला काही सुचेना फक्त बक्षिस आणी मी, हे स्वप्न तर नव्हतं!

“अनिकेतला बक्षिस वितरणाला नेलं असतं तर, माझ्या समोर त्याचा गौरव होतांना बघितला असता. स्वतःचं बक्षिस घेतांना त्यालाही आनंद झाला असता. त्याचं हक्क मी हिरावलं. मला खुप वाईट वाटतय. मला तरी कुठं माहित होतं.”

आईला सरांनी म्हटलं होतं.

मला तरी कुठं समजत होतं या मनातील भावनांचा अर्थ!

जीवन जगतांना अनेक चांगल्या वाईट गोष्टीशी सामना करावं लागतं. अनेकावर विश्वास ठेवावा लागतो. प्रत्येक व्यक्तिच्या मनपटलातील केंद्रबिंदुला छेदत मार्गभ्रमण करावं लागतं.

मलाही अगदी असच करायचं होतं. माझ्यासमोर एकच मार्ग, एक्च ध्येय.

वर्तमाणपत्रात बातमी आली. माझं नाव पेपरला बघुन मी भान हरपलो. खुप सुखावलो, असाच सुखावणार. फक्त माया देणारी, छाया देणारी कुणी ना कुणी व्यक्ती जर जवळ असेल तर ना!

०००


वर्गात पहिल्यांदाच निवडणूक घ्यायची ठरली. आजतागत अशी गुप्त मतदान पद्धती कधीही शाळेत झाली नव्हती. कुण्यातरी योग्य नेतृत्व करणाऱ्या मुलांना तोंडी पद्धतीद्वारा वर्गनायक ठरवायचे. मी दरवर्शीच वर्गनायक असायचा. मला ते योग्य वाटत नव्हतं.

दरवर्शी मीच का बरं वर्गनायक? इतर विघाथ्र्यांचं हक्क का बरं डावलल्या जातो? असे प्रश्नविचार वारंवार यायचे. सहावीत असतांना मी सरांशी असं बोलालेही, त्यामुळे मी वर्गनायक तर नव्हतोच, माझा अखेरपर्यत नकार राहिला.

सरांनी नवीन उपक्रमागत मेलजोल अफलातुन क्लबची स्थापना करावयाचे ठरविले. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदासाठी निवडणूक होणार होती.

सरांनी मतपत्रीका तयार केल्या. प्रत्येकी एक पत्रिका मिळणार होती. त्यामध्ये उभ्या असलेल्या विद्याथ्र्यांवर आपल्या आवडीनुसार गुप्त मतदान पद्धतीने मतदान करायचे होते.

आमच्या वर्गात बावन विद्याथ्र्यांमधुन पंधरा उमेदवार निवडणूकीस उभे राहिले. सुरवातीला मी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. अखेरच्या क्षणी मी उमेदवारी अर्ज भरूण उमेदवारी निश्चित केली. तसं पाहता सर्वांना मी उभा नसल्याचे आश्चर्य वाटायला लागले. मला निवडनुक लढण्याची ईच्छाही नव्हती. पण मित्र आग्रहाखातर उभं राहीलो.

प्रचाराला एक दिवसाचा अवधी मिळाला. प्रत्येक मुलं आपण निवडून यावं म्हणुन जमेल तेवढा प्रचार करीत होती.

वर्गनायक आकाश ही रिंगणात राहिला. मलाही आकाशच निवडून येणार असच वाटायचं. मी स्वतःचा अजिबात प्रचार केला नाही. त्याला कारणही तसच होतं. मॅडमचा मुलगा असल्याने मला जास्तच भाव मिळतो अशी बरीचशी मुलं, पालक म्हणतात. करीता आई मला बऱ्याचशा बाबीपासुन अलिप्त ठेवायची. मलाही आईचं म्हणनं पटायचं आपल्यामुळे आईला कुणी दुखावू नये असच मला वाटायचं.

निवडणूकीचा दिवस उजाडला. प्रत्येक विद्याथ्र्यांना क्रमवार मतपत्रिका दिल्या. आपल्याला योग्य वाटेल त्या तीन उमेदवारांना फुली मारायची होती. अगदी शांततेत मतदान पार पडलं. सर्वांच्या मनात उत्सुकता वाढली. काही उमेदवार आपण कसे निवडुन येणार हे सांगत फिरायची. मला यातलं काहीही आश्चर्य वाटलं नाही. मी कोणताही प्रचार केला नव्हता. तसेच वर्गनायक आकाश समोर आपण निवडून येणार असं वाटत नव्हतं.

एका मतपत्रीकेवर तिन शिक्के मारायचे होते. ज्या उमेदवारास जास्त मतदान पडेल ते क्रमवार अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, होणार होते. मी माझं स्वतःला एक मत दिलं. ठरलेली दोन मत आकाश, समताला दिली. कारण ते विद्यार्थी निवडुन येणार असं मनातल्या मनात वाटत होतं.

मतमोजणी त्याच दिवशी दुपारला सुरू झाली. घडी करून टाकलेल्या मतपत्रिका उघडण्यात आल्या. एकही मतपत्रीका अवैध्य ठरली नाही. एवढं एक विशेष होतं.

सुरवातीला लीना, सुषमा, नितिन आघाडीवर होती. मात्र मी बराच मागे राहिलो. आकाश व समताला माझ्यापेक्षाही कमी मत दिसत होती. आम्हा सर्व विद्याथ्र्यांना आश्चर्य वाटायला लागलं. आम्ही केलेलं तर्क विपरीत घडत होतं.

असच असतं, कुणाच्या मनात काय असेल ते आपल्याला मात्र ठरवता येत नाही. घडलही तसच होतं. शेवटच्या मतमोजणी अखेर विजयी उमेदवाराची नावं जाहिर झाली.

अध्यक्ष मी स्वतः, मते सत्ताविस. तर सचिव लिना, मते एक्केविस. उपाध्यक्ष नितिन, मते अठरा मिळवून उमेदवार विजयी ठरले होते.

माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. पण मी अध्यक्ष कसा झालो, याचच आश्चर्य वाटायला लागलं होतं. त्यापेक्षाही नितीन, लिना निवडून येईल असं कुणासही वाटणार नव्हतं. पण प्रत्यक्षात वेगळच घडलं होतं.

मी निवडुन आल्याबद्दल सर्वांना चॉकलेट दिली. काही क्षणभर नाराज तर काही सुखावतच होती. मीही सुखावलो होतो. अगदी रसाळ फळागत ........

“संधीचं सोनं झालं.” मला बालसभा उपक्रमाद्वाराही शाळेतील बालसभा प्रमुख म्हणुन अप्रत्यक्ष सरांकडून निवडण्यात आलं. तसं पाहता शाळामंत्री करीता माझी निवड होणार असं माहित पडलं होतं. पण कुणास माहिती?

तसं पाहता माझी निवड मला योग्य वाटली. आमच्या शाळेत बालसभा उपक्रम आठवडयातुन एकदा घेतलं जायचं. त्याकरीता एक दिवस दोन तासाचा अवधी राखुनही ठेवला होता. त्यामध्ये निरनिराळया स्पर्धा पार पाडल्या जायच्या. मुख्यतः आम्हा विद्याथ्र्यांना प्रश्नमंजुषा स्पर्धा फारच भावली.

दर आठवडयाला वर्ग एक ते सात मधुन फक्त सामान्य ज्ञानाची प्रश्न विचारून, ज्या विद्याथ्र्यांस जास्त प्रश्नाची उत्तरे देता येईल, अशा एकाच विद्याथ्र्यांची प्रत्येक वर्गातुन निवड केली जायची. त्यामध्ये आठ विद्याथ्र्यांची निवड चाचणी घेवून दोन दोनचे चार गट पाडले जायचे.

ठरलेलया दिवशी त्या चारही गटांना सिटवर बसवलं जायचं. आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्यासमोर ‘कौण बनेगा करोडपती’ या टि.व्ही. मालीकेवरील आधारीत खेळाप्रमाणं समोर बसायची.

प्रत्येक गटास चार फेरीमधुन अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारली जायची. त्यांना पर्याय दिले जायचे. या स्पर्धेचे संयोजक येरणे सर होते. त्यानींच ही स्पर्धा सुरू केली होती. दर आठवडयाला त्या चार गटामधुन एक गट विजयी व्हायचा. ज्या गटास जास्त गुण मिळाले तो गट विजयी.

आम्हाला खुप ज्ञानात्मक माहिती मिळायची. सामान्य ज्ञानातही त्यामुळे भर पडायची.

शेवटी दोन महिण्यांनी सर्व विजयी गटाची अंतिम निवड चाचणी कठिण पातळीनुसार व्हायची. त्यामध्ये आजतागत सर्व क्रमानुसार विजयी गटांना शाळेतर्फे उपयोगी भेटवस्तू देवून गौरव केला जायचा.

आम्हाला स्वतःचा नंबर तिथं लागावं असं वाटायचं त्याकरीता प्रत्येक विद्यार्थी अभ्यास करायचे. परंतू एकाच विद्याथ्र्याची निवड केली जायची. कोणते प्रश्न स्पर्धेत विचारणार हया बद्दल कुण्याही सरांना माहिती नसायची. अत्यंत योग्य पद्धतीने ही स्पर्धा हाताळली जायची.

यातली मजेशिर बाब म्हणजे एखाद्या गटास प्रश्नाचे उत्तर न आल्यास शिक्षक किंवा विद्यार्थीमित्र अशी लाईफ लाईन उत्तर देण्याकरीता निवडण्याची मुभा असायची. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे द्यायला तीस सेकंदाचाच अवधी असायचा. त्यामुळे की काय? मजेशिर स्पर्धा म्हणुन आम्हाला ती भावली.

त्यातही विशेष असं की, त्या स्पर्धेचं संचालन, अध्यक्षपद तथा प्रमुख पाहुण्यांचे पद विद्याथ्र्यांनाच मिळायचे. बरेचसे विद्यार्थी उत्तम प्रकारे प्रास्ताविक, संचलन करायचे. भाषणं द्यायची. आमचे शिक्षकवृंद आम्हाला मार्गदर्शन करायची.

विद्याथ्र्यांनीच विद्याथ्र्यासाठी चालवलेली स्पर्धा, विद्याथ्र्यांना मिळालेला मान होता. सर फक्त मार्गदर्शक असायचे.

मी बरेचदा कार्यक्रमाचं संचलन केलं. आवडीने मी त्यात सहभागी व्हायचा. यामुळेच बोलण्याचं कौशल्य, स्टेजडेअरिंग मला मिळाली. एकदा या स्पर्धेचं अध्यक्षपदही भुषवायला मिळालं. मी माझ्या अध्यक्षीय भाषनाची तयारीही केली, पण मला खुप ताप आल्यानं शाळेत उपस्थित राहू शकलो नाही. त्यानंतर गेलेली संधी मला परत मिळाली नाही.

थोर नेते मौलिक विचार स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, अशा बऱ्याचशा स्पर्धांच आठवडयातुन एकदा आयोजन आम्ही करायचो. सरांचं फक्त मार्गदर्शन असायचं. आमच्या बालसभाद्वारा शाळेचं विद्यार्थी मंत्रीमंडळ आपसात कामे वाटुन जोशाने तयारी करायचे. अंतिम फेरीला फार मोठा कार्यक्रम घेवून ग्राम शिक्षण समीती सदस्यगण तथा बाहेरगावचे पाहुणे मंडळींना आंमत्रीत केलं जायचं. याबद्दल वर्तमाणपत्रातही स्तुत्य उपक्रमाबाबत वार्ता देण्यात यायची. त्यात माझं नावही प्रकाशित अनेकदा व्हायचं. तेव्हा मी भान हरपुन आनंदाने उडयाच मारल्या.

मेलजोल अध्यक्षपदावर निवडून येताच भोयगाव येथिल आयोजित शिबीर स्थळी शाळेचं नेतृत्व करण्याचा योग मला मिळाला. त्यावेळेस आमच्या सोबत बोबडे सर तिथं आले. मुबंईहुन दोन मॅडम आल्यात. त्यांनी आम्हाला नेतृत्व, कला तथा इतर विषयासंबधी भरपुर माहिती दिली. मला तीथं तीन दिवस रहायला मिळालं.

गाणे, खेळ, गोष्टी यामुळे मला भरपुर अनुभव मिळालं. तसच भरपुर मनोरंजनही झालं. तिथं आम्हाला दररोज जेवन मिळायचं. पण आम्हाला चहा मिळत नव्हता. तसं मला चहा आवडत नाही. पण सकाळी एकदा आवडीने चहा घ्यायचा. आमच्या प्रत्येक गटाला पुस्तके व बुके देण्यात आली. तिथं शिबीर स्थळी केलेल्या कार्याचा अहवाल दररोज सांयकाळी द्यावा लागायचा. तीन दिवस शाळेचं नेतृत्व करण्याचं भाग्य मला लाभलं. त्या शाळेविषयी आदर प्रेम कुणाला नसणार बरे!

०००


सांस्कृतिक आणि क्रिडा संमेलनात बरेचशे विद्यार्थी सहभाग घ्यायचे. मला अभिनय येत नसल्याने मी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत नव्हतो. त्याबाबत मला अनुभवही नव्हता.

‘आवड असली की सवड मिळते.’ असचं माझ्या बाबतीत घडलं आपल्याला अभिनय करता यावं नेहमीच वाटायचं. तसे मी प्रयत्न सुरू केले. समुहगीत, फॅन्सीड्रेस, एकांकीका यामध्ये हळूहळू सहभागी होवू लागलो. पण मला नाचता येत नव्हतं. आणि कधी नाचताही आलं नाही. सिंदेवाहीच्या, गाडेगावच्या कार्यक्रमात नाना पाटेकरची भुमिका छान जमली. माझ्याकरीता तो क्षण अविस्मरणीय ठरला. मला माझ्यावरच विश्वास बसेना.

शाळेत प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाकरीता ‘श्यामची आई’ सानेगुरूजींच्या कांदबरीवर आधारीत रूपांतरीत एक अंकी नाटक घ्यायचं ठरलं. ज्या विद्याथ्र्यांना सुरेख पात्र जमेल त्या विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली. मला श्यामच्या वडीलाची भुमिका मिळाली. आमचा दररोज सरावही सुरू झाला. पण ते नाटक सादर होवू शकलं नाही. मनाला खंत वाटली. अभिनयाचं भरपुर वाव असलेलं पात्र, माझ्या भुमिकेचं पहिलच नाटक न झाल्याने मी निराश झालो.

यश अपयश जीवनात यायचेच. मला तर यश मिळत होतं. मात्र हे अपयश नव्हतं. एक अनुभव बनुन माझ्यासमोर आलं.

खो-खो, कबड्डी क्रिडास्पर्धात माझा सहभाग असायचा. खो-खो खेळ मला चांगलं खेळता यायचा. कबड्डीत मात्र विशेष मन लागत नव्हतं.

गाडेगावच्या क्रिडास्पर्धेत कबड्डीमध्ये मी राखीव खेळाडू होतो. त्यात मला अचानक मैदानात उतरावं लागलं. आमच्या समोर खुप उंचीने, वयाने मोठे मुलं होते. त्यामानानं मी असा बारीक, हडकुळा, कमजोर देहाचा, मला काय कबड्डी येणार होती? मी मैदानात एकदाही चढाई केली नाही. त्या स्पर्धेत आम्हाला व्दितिय बक्षिस मिळाले.

त्यातला माझा सहभाग नाममात्र व योगदान बघता ते श्युन्यच भरेल. सारं काही यश माझ्या मित्रानींच मिळवलं होतं. एवढं नक्की............

०००

यावर्षी शाळेत ‘अंतरंग’ नावाचं वार्षीकांक हस्तलिखीत प्रकाशित करण्याचा संकल्प करण्यात आला. तसं पाहता प्राथमिक शाळेत तिनशे पृष्ठाचं हस्तलिखीत प्रकाशित होणं ही नवलाईची बाब होती. मला तरी त्यातलं कुठं काय कळत होतं? सारं काही अनुभवाने कळायला लागलं.

माझ्या शाळेतिल सरांनी खुप मेहनत घेवून ‘अंतरंग’ तयार केलं. ‘अंतरंगात’ विद्याथ्र्यांनी स्वतःचे चित्र तथा स्वतः लिहलेले व संकलित केलेले लेख, कथा कविता, चुटकुले, निबंध, विचार इत्यादी बाबी लिहल्यात. सरांचे मार्गदर्षन, लेख, कथा, कविता हया बाबी आम्हाला वाचण्यास उत्कृष्ठ ठरल्या.

मुखपृष्ठाची सुबक रंगीत कॉम्पुटर प्रिटिंग करण्यात आली. वर्गवार वर्गनायक यादी, शालेय मंत्रीमंडळ, शिक्षकवृदांचे फोटो, ग्राम शिक्षण समिती यादी, शाळेतिल यशाचा लेखजोखा, उपक्रम यादी इत्यादी सर्व बाबीचा समावेश करून ‘अंतरंगास’ आकर्षीत बनविण्यात आलं. त्या अंतरंगामुळं माझं अंतरंग उलगडण्याचा मला हक्क मिळाला. असं विद्यार्थी या नात्याने मला वाटते. इतर विद्याथ्र्यांच्या बाबतीतही तसच घडो....

आमच्या आठवणी आम्ही खुप मोठे झाल्यावरही अंतरंगातील पानापानावर येणाऱ्या सर्वांकरीता उजाळा देत राहतील.

आजही अंतरंग दरवर्षी प्रकाशित होतो. नव्या उपक्रमाची त्यात भर पडत आहे. अंतरंगाच्या व्दितीय आवृत्तीत आदर्षाकडे वाटचाल करणाऱ्या शालेय विद्याथ्र्यांचा गौरव उपक्रम सुरू केला.

शाळेतील एक विद्यार्थी, एक विद्यार्थीनीची निवड करून त्यांचे फोटो तथा त्यांचे कार्य व गौरव प्राप्त माहिती त्यात नमुद करण्यात आली.

प्रथमतःच सातवीची विद्यार्थीनी कु. चंद्रकला धुर्वे व सहावीतुन माझी निवड करण्यात आली. पहिल्यांदाच आदर्शाकडे वाटचाल या गौरवाचा मी मानकरी ठरलो. माझे कार्य, गुण व स्वभावामुळे ही निवड केल्याचे कळले. मला भिती वाटते आहे माझ्या पुढिल जीवनाची.

कारण माझं पुढिल जीवन आदर्शाप्रत राहावं. नाहीतर त्या गौरवाचा काय फायदा? माझं आदर्श अबाधित रहावं असच मनोमन वाटतं.

०००


तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये तृतीय क्रमांक मिळालं. त्यानंतर आम्हाला जिल्हास्तरावर जायचं होतं. जिल्हास्तरीय विज्ञानप्रदर्शनी सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे ठरली. माझ्या सोबत मार्गदर्शक येरणे सर येणार होते. मी पुर्वीसारखच पण त्यापेक्षाही आकर्षक असं मॉडेल बनविलं.

मला आनंद झाला, कारण मला सिंदेवाहीला जायला मिळेल एवढच नव्हतं. तर सरांच्या सोबत त्यांच्या स्वगावी जायला मिळेल. यामुळेच मी आनंदित होतो. मी लहान असल्यामुळे मला आई बाबाशिवाय कधीही कुठल्या गावला जायला मिळत नव्हतं

नवं गाव, नवे विद्यार्थी मित्र, तिथली शाळा पाहण्याचा योग मला आला. आम्हा खेडयातील मुलातला व शहरातील चंट मुलातला फरक मला अनुभवण्याचा तो योग होता.

तिथे विज्ञान विषयक सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. तिथं मला सरांनी भाग घ्यायला लावलं. परंतू मी सहभाग घेतला नाही. मला भिती वाटत होती. स्पर्धा झाल्यानंतर असं वाटायला लागलं की, त्यातील बरीचशी उत्तर मला येत होती. सरांनी मला सामान्य ज्ञानाची माहिती दिली. आमच्या शाळेतही पुढे अशी स्पर्धा घेण्यात आली.

दिवसभर प्रयोगासमोर बसुन प्रयोगविषयक माहिती दयायचं एवढच काम होतं. दिवसभर नवे विद्यार्थी, नवे शिक्षक यांच्याशी बोलायला मिळत होतं. सरांना वेळोवेळी मनात आलेल्या सर्व शंका विचारायचा नि उत्तरे मिळवून घेत असे.

रात्रो सांस्कृतिक कार्यक्रमात नाना पाटेकर, असरानी, अमजदखॉन, हयांची मी नक्कल सादर केली. तीन-चार हजार प्रेक्षकासमोर स्टेजवर जाण्याची माझी पहिली वेळ, मला थोडी भितीही वाटली. प्रेक्षकांना बघुन मी नकारही दिला.

“तू गाडेगावला जसं कार्यक्रम सादर केलस ना! अगदी तसच करायचं. चुकलं तर चुकलं, मनात भिती बाळगायची नाही. लोकांना थोडच माहित असतं, स्टेजवर आपण काय बोलणार आहोत. कुठं अडखळलं, कुठं चुकलं हे प्रेक्षकांना काय माहित. जा बिनधास्त नक्कल सादर कर, खुप छान होईल, माझा विश्वास आहे तुझ्यावर.”

सरांच्या आपुलकीने मी स्टेजवर चढलो. आणि सर्व प्रेक्षकांनी मला दाद दिली. तोच कार्यक्रम ‘वन्स मोअर’ म्हणुन दुसऱ्यादा करायला लावलं. मी सादर केलेली नक्कल खुप छान जमली होती.

नंतरचे दोन दिवस तिथले सर्व विद्यार्थी हाच व्हे नाना.....! असं म्हणायची. मी लाजायचा, बऱ्याचशा सरांनी मला जवळ बोलावून तू कुठल्या शाळेचा ? तुझे सर कुठे आहेत. असं वारंवार विचारायची.

मी मनातल्या मनात जाम खुश होतो.

तीन दिवसानंतर सरांच्या गावी गेलो. सरांच्या कुटूंबात मिसळायला मिळालं. नंतर आम्ही स्वगावी परतलो. प्रदर्शनीत मला कुठलाही नंबर मिळाला नाही. पण सांस्कृतिक कार्यक्रमात मिळालेल्या यशाचा वाटेकरी बनुन मी परतलो.

आईला सारं काही सांगीतलं. मित्रानांही खुप माहिती दिली.

नव ज्ञान- नव दिशा मला मिळतच राहो.

‘हम होंगे कामयाब एक दिन ..........मन मे है विश्वास ...’

गितांच्या ओळी मनात रेंगाळतच राहाव्यात. अगदी सरांच्या आईने बनविलेल्या वडयाची चव माझ्या जिभेवर जशी रेंगाळत आहे अगदी तशीच.


०००

तिसऱ्या वर्गात असेन, आई सोबत मामाच्या गावला आठ-दहा दिवस राहायला गेलो. मामाच्या गावी खुप छान छान मन रमतं.

‘झुक झुक झुक झुक अगीनगाडी....... धुरांच्या रेखा .... पडती झाडे......तुप रोटी खावूया ......’

खरच! मामाच्या गावी जायलाच हवं. अगदी असच हिंगणघाटला रेल्वेनी जायला मिळे. तिथं मी वेटाळातील प्रत्येक घरी जायचा. तसं मी पुर्वीपासनच खडबडया होतो. कुणाच्या घरी गेल्यानंतर कुणी काही खायला दिलं तर सुरवातीला मी नाही म्हणायचा. नंतर आग्रह करताच मी खाऊन घेतो. तशी माझी सवयच आहे. पण माझा दादा कधिही कुणाच्या घरी काहीही खात नाही. त्याला नाही आवडत! तसं तो नेहमी माझ्यावर रागावत असतो.

‘कधी कुणी काही दिलं तर खाऊ नये?’

त्या दिवशी मी शेजाऱ्याकडे गेलो. त्यांनी मला उपमा खायला दिलं. पण मी खाल्लं नाही. दादाची गोष्ट मला पटकन आठवली. त्यामुळं मी नकार दिलं. तेव्हा शेजारची काकू म्हणाली.

“पहा, इतका लहान असुन सुद्धा कुणी खायला दिलं तर खात नाही. किती शहाणा असल्यासारखा वागतो.”

नंतर मी घरी आल्यावर आईला सांगीतलं.

“अनिकेत कुणी प्रेमाने आग्रह केल तर खायला काय हरकत आहे?” आईनं म्हटलं.

तेव्हाच मी त्यांच्या घरी धावत गेलो. दादाबद्दल माहिती सांगीतली,नि मी त्यांना उपमा मागून खाऊन टाकला.

आई माझ्या असं वागण्यामुळं खुप हसली. ती हसते आहे. हसतच राहावी. सदासर्वकाळ......फक्त माझ्यासाठी......

हिंगणघाटवरून बाखर्डीला मी मावशी आई परत यायला निघालो. राजुऱ्यात बसस्टॉपवर बसची वाट पहात होतो. तेवढयात एक बस आली. आई कुठली बस आहे ते बघायला गेली. मीही आईच्या मागे पळतच गेलो. गर्दीमुळे आई दिसली नाही. मला वाटलं आई त्या बसमध्येच बसली असेल.

मी रडकुंडा होवून त्या बसमध्ये चढलो. आईला बघू लागलो.

‘ आई, आई .......’ म्हणत रडू ओरडू लागलो. आई मला दिसलीच नाही. बस धावू लागली. मी रडू लागलो. तिथल्या लोकांना ‘माझी शारदा आई दिसली का?’ रडतच विचारलं. मी माझ्या गावाचं नाव सांगताच त्यांनी मला बसमधुन उतरवलं. मी रडतच इकडे तिकडे पाहू लागलो. मी खुप घाबरलो होतो. आई मला शोधतच होती. आई दिसताच आईकडे पळतच गेलो. आईला कवटाळलं. आईनं मला जवळ घेतलं. आधी समजावलं. नंतर खुप रागावली. मावशीही रडायला लागली होती. नंतर काही वेळ आम्ही बसस्टॉपवर बसुन राहिलो. मावशी मला समजावू लागली.

माझं रडण हळूहळू कमी होवू लागलं. गावच्या बसमध्ये चढलो. बस धावत होती. मन सैरभर हिरवी पराटी पाहू लागलं. मनात विचार येत होते. मन पळत होतं. बालपणाच्या आठवणी अशाच पळत राहणार त्यादिवसापासुन कुठं जर गेलो, आणि कुणी मला जर सांगीतलं, ‘इथेच थांब !’ तर........काय? मी तिथुन कुठेच हलत नाही.

एकदा आमच्याकडे जेवणाचं आमत्रंण होतं. तसं मला कुठलं आमंत्रण आलं की, जेवायला जाणं खुप आवडतं. तीथही मी रामटेके सरांशी जेवायला गेलो. पंगती मध्ये सरांशी जेवायला बसलो. सगळे लोक लेवायला लागले. पण मी आपला चुपचाप. सरांचं माझ्याकडे लक्ष गेलं.

“ अरे! अनिकेत जेवण सुरू कर.” सरांनी म्हटलं.

‘सरजी, मला जेवणावर तेल दिलं नाही.’ मी म्हटलं.

“आता तुला तेल कसं मागायचं, इथं तेल कोण देणार, तू असच जेवण कर.”

मी जेवण केलं नाही.

‘मला तेल हवं, नाहितर मी नाही जेवणार जा!’

मला तेल पाहिजेच, मी आग्रह सुरू केला. सरांनी ओळखीच्या व्यक्तीला बोलावलं. त्यांनी मला तेल मागुन दिलं.

मी जेवण सुरू केलं. घरी येताच सरांनी आईला सांगीतलं.

“तुमचा गोलू खुपच जिद्दी आहे, तेलाशिवाय हा जेवणच करीत नव्हता.”

आईनं मला समजावलं, “ कुठेही जेवायला गेलं तर काहीतरी पाहीजेत असं हट्ट धरू नये.”

मी वयाने, शरिराने, विचाराने मोठा झालो. ही गोष्ट आई मला सांगते. तसं मला आठवत नाही. तेव्हा मी पहिलीत असेन. आईने काढलेल्या बालपणीच्या आठवणीने हसू येतं. खूप मजा येते.

बालपणी हट्ट केला तर तो पुर्ण झालाच पाहिजे नाही का?

बालपण देगा देवा.... खडी साखरेचा मेवा. गंमत वाटते नाही का? असं बालपण पुढेही मिळावं, पुर्नजन्म मिळालाच आणि देवानं म्हटलं “ कुठला जन्म हवा?”

मी विचार करेन........

‘किर्तीरूपानं उरण्याचा.’

०००


सोमेश्वर शिरपुरकर माझा बालमित्र, माझ्यापेक्षा दोन-एक वर्षाने लहान असेल. त्याच्याशी खेळण्यात रमण्यात खुप मजा येते. दोघेही मिळुन शाळेत जाणं. सरांनी सांगीतलेली कामं करणं इतपत त्याच्याशी गट्टी रमली. स्वभावानेही तसा दिलदार आहे बेटा, मागे त्याची तब्येत बिघडताच मी त्याला पाहायला गेलो. मित्र कर्तव्य ना माझ्र हे !

दररोज शाळेत आटयापाटया खेळणे. खुप मजा लुटणं एवढच खेळण्यासंदर्भात कळलय मला. कधी-कधी क्रिकेट खेळणं, तसं माझ्या आवडीचं खेळ. मलाच काय? कुणाला बरं आवडणार नाही. पण नको रे बाप्पा उगीच क्रिकेट.

त्या दिवषी अचानक पहिल्या वर्गाच्या चिमुकल्या मुलास खुप जोरात चेंडू लागला. तेव्हा मला खुप वाईट वाटलं. आईच्याच वर्गातील मुलगा होता तो.

“ खेळ खेळायचं पण आपल्यापासनं दुसऱ्यास त्रास होवू नये” . आई म्हणायची.

शाळेचं मैदान फारसं मोठं नव्हतं. आणि एकाच मैदानात तिनशे मुलं खेळणं म्हणजे मोठे खेळ खेळायला वाव मिळत नव्हतं. कधी वाटतं शाळेला खुप खुप मोठं मैदान असतं तर..............

०००

नेहमी सोमेश्वरला मी म्हणायचा, पण सोमेश्वर बेटा नुसता हसतो. हं ! तो हसायला फारच वस्ताद आहे. त्याला सांगीतलेल्या कामाला तो कधीही नकार देत नाही. तशी सगळी मुलं माझं फारसं ऐकतात. केव्हा-केव्हा उगीच वाटतं मनाला.

एके दिवशी मला कटिंग करायला चांदुरला जायचं होतं आमच्या गावात सलुनचं दुकान नाही. खेडयातील न्हावी धंदा करण्याकरीता मात्र इथे येत असतात.

चांदुरला त्यालाही सोबत नेलं. तीथं बराच उशीरही झाला. जोराची भुख लागली. मी केळ विकत घेतले. दोघांनाही भरपुर केळी खाल्ली. पण झालं उलटच, सोमेश्वरला तिन चारदा संडासला जावं लागलं. मला फार वाईट वाटलं. आपल्यामुळे त्याला त्रास झाला. दोन तीन दिवस तो पोटाची तक्रार घेवूनच होता.

बरं झाल्यावर त्याला म्हटलं ‘हं! चांदूरला केळाची कशी मजा झाली.’

तो निव्वळ हसला.......

मलाही हसू आलं. आईलाही हसू आलं. असच हसत राहावं हसतच जगावं, अगदी माझ्या बालमित्रासारखं. केव्हा त्याच्या आठवणी उमाळून येतात. हसुही आवरत नाही. जेवण करतांना मग्न असलो तरी मी हसतो. आई-बाबा विचारतात, कशाचं हसू आलं?

मी आणखी हसतो. मनातल्या मनात हुदंका घेवून ‘काही नाही असच.’ सारं काही आठवतं.....फक्त हसणं. बालपणाचं हसणं, या जन्मावर या जगण्यावर शतदः प्रेम करावे.

बालपणापासुनच मी धडपड करीत आलो. अभ्यास करणं जेवढं महत्वाचं तेवढच खेळणंही. अगदी लहान असतांना चेतनशी मी टायर चालवण्याचा खेळ खेळायचा. शांत सुस्वभावी असाच हा माझा मित्र मला लाभला. अभ्यासातही हुशार बेटा.

एकदा सरांनी आम्हाला तुम्ही काय बनन्याचा प्रयत्न करणार असा प्रश्न केला.

चेतन म्हणाला “ मी इन्सपेक्टरच होणार” तेव्हा सरांनी म्हटलं, “ शरिराने धडधाकट आहेस तू, तसाच हुशारही, तुझी जिद्द, तळमळ अशीच वाढवित रहा. तू तुझं ध्येय नक्कीच गाठशिल.

चेतन मला म्हनाला, “अनिकेत तुला काय व्हावसं वाटतं?” मी किंचीतसा हसलो. क्षणभर विचार केला. ‘मला डॉक्टर व्हावसं वाटतं.’

मी विचार करतोय. माझे ध्येय, स्वप्न पुर्ण होणार की नाही? जर कदाचित या ध्येयापासुन परावृत्त राहिलो तर.....

०००

यावर्षी शाळा मंत्रीमंडळात अध्यक्ष पदावर निवड, वाचनालय समितीवर अध्यक्षपद मिळालं. छोटयाश्या वाचन विचार स्पर्धेत प्रथम पारीतोषीक मिळालं. खुप शिकावं खुप मोठं व्हावं, मनाने, भावनेने अंगी आदर असावा. असं सारखं वाटतं. ही धडपड कायम राहावी. दरवर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हावं जिद्द, तळमळ ही कायम ठिकावी. समाजाचं ऋण फेडण्याचं बळ अंगी यावं मी कृतज्ञ असेन या गुरूजनांचा, या समाजाचा, या देशाचा.

०००

माझे चार-पाच बालमित्र मिळुन आम्ही तान्हा पोळा साजरा करायचं ठरवलं. त्याकरीता प्रत्येक घरून मी वर्गणी गोळा केली. माझ्या गावात वार्डा-वार्डात पोळा भरतो. पण आमच्या वार्डात पोळा भरत नाही. तीस रूपये गोळा केले. सिताफळाच्या झाडाचं तोरण बांधलं. त्याला कारणही तसच होतं. जवळपास आंब्याची झाडं नव्हती. खुप मोठया झाडाला आमचे हातही पुरले नसते त्यामुळेच......

वर्गणीच्या पैशातुन पोहे, साखर, चॉकलेट, फुगे घेतले. पोळा भरवायच्या ठिकाणी तोरण बांधुन जागा सजवली. सर्व मुलांनी लाकडी नंदिबैल आणले. सर्वांना समोर बसविलं, साखर पोहयाचा काला तयार केला. बैलाची पुजा केली. आरती केली. त्यानंतर बैलाच्या सभोवताल मी गुढी फिरवली. एक दोन दणक्यात नारळ फोडलं.

नारळ काही लवकर फुटलेच नाही. कारण नारळ ओलं होतं. प्रसाद वाटला. तोरणाला बांधलेले फुगे मुलांनी फोडले. तोरण तोडले. त्यानंतर मंदिरात पुजेसाठी निघालो.

तान्हा पोळा आनंदाने साजरा केला. मी सुरू केलेली ही वार्डातील तान्हा पोळ्याची प्रथा दरवर्षीच सुरू राहणार असं मला तरी उगीच वाटते.

०००

दिवसागणिक मी वयाने, मनाने मोठा होतोय. तसच खुप विचार करतो. मनातल्या इच्छा आकांशा पुर्ण करण्यास मी धडपडतोय. आई बाबांनी मडक्यागत आकार दिला. गुरूजनांनी ज्ञानाची धडे दिलेत. माझ्या पुढिल आयुष्याला भरभरून शुभेच्छा मिळाल्यात.

मित्रांनो मी अगोदरच म्हटलय, ‘जीवन एक चक्रव्युह आहे, ते भेदुन काढायचं.’

कठिन परिस्थीती, येणारा पुढिल अघटित काळ यात रमायचं आहे. मनात येणाऱ्या विचारापेक्षा वाटेल तेवढं सोपं नाही. किर्तीवंत व्हावं असच वाटतय. ‘मरावे परी किर्तीरूपी उरावे’ ही म्हण आपणा सर्वांना लक्षात ठेवायची आहे. याकरीताच मी विचार करतोय. मी अजुनही बालक आहे. पुढिल जीवनाचं कालखंड कसं असेल मलाही माहीत नाही. यश मिळावं, यशवंत व्हावं ! कुणाची ईच्छा नसेल बरे ! माझ्या अर्धवट प्राथमिक जीवनाची अर्धवट कहाणी........

पुर्ण यशदायी व्हावी. कल्पनेतील कॅक्टसला येणाऱ्या फुलाप्रमाणं, कधीही न आलेल्या उमरीच्या झाडाला फुल यावं. अपेक्षा बाळगतोय !

एका अर्धवट जिवनाची अर्धवट कथा

इथेच थांबवतोय...

तुमचाच अनिकेत....

०००